जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, चंद्रपूर,
ग्राहक तक्रार क्रं. 96/2015 नोंदणी दिनांक :- 15/6/2015
निर्णय दिनांक :- 09/06/2017
निर्णय कालावधी : - वर्ष 11 म.24 दि.
अर्जदार/तक्रारकर्ता :- यशोधरा चंद्रमणी देठे,
वय – 45 वर्षे, धंदा – घरकाम,
राह.जवाहरनगर वार्ड, राजूरा, तह.व जि.राजूरा
:: वि रु ध्द ::
गैरअर्जदार/विरुध्दपक्ष :- विन्फ्रा टेच रिअलेटर्स प्रा.लि. श्री कर्मवीर
पुंडलीक तेलंग, एस 12, जे.के.होम, गुरूद्वारा
जवळ, तुकूम, चंद्रपूर,ता. जि.चंद्रपूर
अर्जदार तर्फे :- श्री.खोब्रागडे, प्रतिनिधी
गैरअर्जदारा तर्फे :- एकतर्फा
गणपुर्ती :- मा. अध्यक्ष श्री उमेश व्ही.जावळीकर,
मा.सदस्या, किर्ती गाडगीळ (वैदय)
मा. सदस्या. कल्पना जांगडे (कुटे)
::: नि का ल प ञ:::
(मंचाचे निर्णयान्वये, मा. श्री उमेश व्ही.जावळीकर अध्यक्ष)
(पारीत दिनांक :- 09/06/2017)
1. सामनेवाले यांनी तक्रारदारांस ग्राहक सरक्षंण अधिनियम अन्वये तरतुदीनुसार सेवासुविधा पुरविण्यात कसूर केल्याने प्रस्तूत तक्रार दाखल केली आहे.
2. तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडे दिनांक 21/11/2011,29/5/2011 व 28/11/2012 रोजी प्रत्येकी रक्कम रू.8500/- असे एकूण रू.17,400/- सामनेवाले यांच्या व्ही.एस.101 या गुंतवणुक योजनेमध्ये गुंतविले. त्याबाबतचे प्रमाणपत्र सामनेवाले यांनी तक्रारदारांस दिनांक 22/12/2011 रोजी दिले. सदर्हु योजनेप्रमाणे 1800 युनिटची मुदतपुर्तीनंतर मिळणारी रक्कम रू.36,000/- सामनेवाले तक्रारदारांस देण्यांस अटी व शर्तीप्रमाणे पात्र होते. सामनेवाले यांनी तक्रारदारांस दिनांक 20/11/2011 रोजी सदर योजनेत गुंतवणूक केल्याबद्दल पावती दिली. सामनेवाले यांच्या योजनेच्या अटी व शर्तीप्रमाणे 36 महिन्यानंतर सामनेवाले तक्रारदारांस 1800 चौ.फुट मिळकत तक्रारदारांच्या नांवे करतील असे माहितीपत्रिकेत नमूद आहे. तक्रारदारांनी तक्रारीसोबत दाखल केलेले कागदपत्रांची पाहणी केली असता सामनेवाले हे तक्रारदारांनी केलेल्या गुंतवणूकीमधून जमीन मिळकत विकसीत करून सामनेवाले यांच्या अटी व शर्तीप्रमाणे तक्रारदारांनी संपूर्ण रक्कम सामनेवाले यांना अदा केल्यांस लाभांश व व्याजासह मुदतपूर्तीनंतर रक्कम व मिळकतीचा ताबा तक्रारदारांस देतील असे नमूद आहे. सामनेवाले यांच्या माहितीपत्रकात नमूद प्रमाणे तक्रारदारांनी सामनेवाले यांच्याकडे जमा केलेली रक्कम सामनेवाले यांनी मुदतीत परत न करून मिळकतीचाही ताबा न दिल्याने तक्रारदारांनी सामनेवाले यांना दिनांक 27/2/2015 रोजी वकीलामार्फत नोटीस पाठवून करारातील अटींची पुर्तता करणेंस लेखी कळविले. परंतु सदर नोटीस सामनेवाले यांनी न स्विकारल्याने तक्रारदारांस परत आली. त्यानंतरही सामनेवाले यांनी तक्रारदारांस गुंतवणूक केलेली रक्कम व्याजासह व लाभांशासह परत न दिल्याने तक्रारदाराने प्रस्तूत तक्रार गुंतवणूक रक्कम, व्याज व लाभांषासह तक्रारदारांस सामनेवाले यांनी अदा करावी तसेच शारिरीक मानसीक त्रासापोटी व तक्रार खर्चापोटी दंडात्मक रक्कम सामनेवाले यांनी तक्रारदारांस अदा करावी अशी विनंती केली आहे.
3. सामनेवाले यांना मंचाची नोटीस पाठविली असता सामनेवाले यांचे कार्यालय बंद असल्याने तसेच नवीन पत्त्यावर पाठविले असता सामनेवाले सदर पत्त्यावर रहात नसल्याने मंचात परत आली. त्यानंतर सामनेवाले यांना दैनिक महाविदर्भ मध्ये दिनांक 4/3/2016 रोजी सामनेवाले यांना जाहीर नोटीस प्रसिध्द करून दिनांक 16/3/2016 रोजी हजर राहून पुढील कार्यवाही करण्यांस लेखी कळविले. तरीदेखील सामनेवाले मंचासमोर हजर न राहिल्याने सामनेवाले यांच्याविरूध्द तक्रार एकतर्फा चालविण्यांत यावी असा विनंतीअर्ज तक्रारदाराने दिला. न्यायाच्या दृष्टीने अर्ज मंजूर करण्यांत आला. सदर आदेश आज रोजी अबाधीत आहेत.
4. तक्रारदारांची तक्रार, कागदपत्रे, पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवादाबाबतची पुरसीस व तोंडी युक्तिवाद यावरून तक्रार निकाल कामी खालील मुद्दे तयार करण्यांत येतात.
मुद्दे निष्कर्ष
(1) तक्रार चालविण्याचे अधिकारक्षेत्र मंचास आहे काय ? नाही
(2) आदेश तक्रार अंमान्य
कारण मिमांसा
मुद्दा क्रं. 1 ः-
5. वि.प.यांच्या माहितीपुस्तिकेतील अटी व शर्तींचे अवलोकन केले असता तक्रारदार यांनी वि.प. यांच्या गुंतवणूक योजनेमध्ये नफा व मिळकत प्राप्त करण्याच्या उद्देशाने तीन वर्षांच्या मुदतीच्या योजनेत गुंतवणूक केल्याची बाब सिध्द होते. सामनेवाले यांच्या योजनेचे स्वरूप पाहता सामनेवाले यांच्या नफ्यावर आधारीत लाभांशाची टक्केवारी निश्चित करण्यांत येईल असे नमूद असून सामनेवाले यांच्या चार योजना व अनेकविध पर्याय उपलब्ध आहेत. त्यामध्ये मासीक व एकरकमी अशा स्वरूपाच्या गुंतवणूकीचे पर्यायही उपलब्ध आहेत. मुदतपूर्तीनंतर विशिष्ट चौरसफुटाची मिळकत तक्रारदारांच्या नावे करण्याबाबतही माहितीपुस्तिकेत नमूद आहे. तक्रारदारांना सदर माहिती पुस्तिकेतील व नोंदणी प्रमाणपत्र दि.22/12/2011 मधील अटी व शर्तीप्रमाणे सामनेवाले यांच्याकडे जमा केलेली रक्कम गुंतवणूकीसाठी असून नफा कमविण्याच्या उद्देशाने केल्याची बाब कागदोपत्री पुराव्यावरून सिध्द होते. ग्राहक संरक्षण अधिनियम कलम 2(1)(ड) अन्वये ग्राहक या संज्ञेची व्याप्ती पाहता नफ्यासाठी केलेल्या गुंतवणूकीबाबतची तक्रार मंचाकडे दाखल करता येणार नाही असे न्यायतत्व आहे. सबब तक्रारदार यांची तक्रार वर नमूद निष्कर्षावरून तक्रारदारांनी सदर गुंतवणूक नफा कमविण्याच्या उद्देशाने केल्याने व ही बाब कागदोपत्री पुराव्याने सिध्द झाल्याने प्रस्तुत तक्रारीतील वादकथनाविषयी न्यायनिर्णय देण्याचे अधिकारक्षेत्र मंचास नसल्याने मुद्दा क्रं. 1 चे उत्तर हे नकारार्थी नोंदविण्यात येत आहे.
मुद्दा क्रं. 2 बाबत ः-
6. मुद्दा क्रं. 1 च्या विवेचनावरुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
अंतीम आदेश
(1) अर्जदार क्र.96/2015 ची तक्रार अमान्य करण्यात येत आहे.
(2) खर्चाबाबत आदेश नाहीत.
(3) उभय पक्षांना आदेशाची प्रत तात्काळ पाठविण्यात याव्या.
चंद्रपूर
दिनांक – 09/06/2016