तक्रारदार : वकील श्री.गंडभीर हजर.
सामनेवाले : एकतर्फा.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*--*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
निकालपत्रः- श्री.एस.आर.सानप, सदस्य - ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-**-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. सामनेवाले क्र 1 ही विलेपार्ले येथील सहकारी गृहनिर्माण संस्था असून, सामनेवाले क्र 2 हे इमारत बांधकाम विकासक असून सामनेवाले 1 हे या संस्थेच्या इमारतीचे पुर्नबांधणीचे काम त्यांना सोपविण्यात आले होते. तर तक्रारदार हे सामनेवाले क्र. 1 या संस्थेचे सभासद आहेत.
2. तक्रारदारांच्या तक्रारीमधील कथनानुसार, सामनेवाले 1 यांची इमारत मोडकळीस आल्याने ते पुर्नबांधणीच्या विचारात असतांना सामनेवाले यांनी त्या इमारतीची पुर्नबांधणी प्रस्ताव सादर केला व सामनेवाले क्र. 1 या गृहनिर्माण संस्थेने सर्वानुमते मंजूर केला. त्यानुसार सामनेवाले क्र. 1 व सामनेवाले क्र. 2 यामध्ये झालेल्या करारनाम्यातील शर्ती व अटीपैकी एका अटीनुसार सामनेवाले क्र. 2 यांनी सामनेवाले क्र 1 संस्थेच्या इमारतीमधील प्रत्येक सदनिकेच्या चटई क्षेत्राच्या प्रत्येक चौ.फु. रू 531/-,प्रमाणे प्रति चौ. फुट या दराने सर्व सभासदांना इमारत बांधकाम कालावधीत इतरत्र राहण्याची सोय करण्यासाठी व कॉर्पस फंड साठी एकूण रू. 37.70 लाख दिले. यापैकी प्रस्तुत तक्रारदार यांचा हिस्सा, त्यांच्या सदनिका क्षेत्रफळाच्या हिशोबाने रू. 2,52,225/-,एवढा असतांना सामनेवाले 1 यांनी तक्रारदारांना केवळ रू. 2,10,000/-,एवढेच अधिदान केले व उर्वरीत रक्कम रू. 42225/-,अधिक गॅरेज व इतर असे रू.2500/-,असे एकत्रित रू. 67225/-, तक्रारदारांना देण्याचे हेतूतः टाळले.
तक्रारदारांच्या कथनानूसार, त्यांनी वेळोवेळी तोंडी/लेखी विनंती करून सुध्दा सामनेवाले क्र 1 यांनी त्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्यामुळे त्यांनी प्रस्तुत तक्रार दाखल करून, तक्रारदारांच्या हिश्श्याची रक्कम सामनेवाले क्र. 2 यांचेकडून मिळाल्यानंतर सामनेवाले क्र. 1 यांनी ती तक्रारदारांना ती हेतूतः न दिल्याची बाब ही सामनेवाले क्र. 1 व 2 यांच्या सेवासुविधामधील त्रुटी असल्याचे जाहिर करून सदर रक्कम 21% व्याजासहित, तसेच नुकसान भरपाई रू. 5,000/-,आणि तक्रार खर्च रू.1,000/-, या सह परत मिळावी अशी मागणी केली आहे.
3. तक्रारदारांनी आपली तक्रार, पुराव्याचे शपथपत्रे, कागदपत्र व लेखीयुक्तीवाद दाखल केला. सामनेवाले 1 यांनी कैफियत व शपथपत्र दाखल केले व तेच पुराव्याचे शपथपत्र समजण्यात यावे अशी विनंती केली. यानंतर तक्रारदारांनी अधिकचे पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. परंतू सामनेवाले 1 यांनी शेवटपर्यंत आपली अधिकची कैफियत अथवा लेखीयुक्तीवाद दाखल केला नाही. तसेच सामनेवाले क्र. 2 यांना संधी देऊन ही आपली कैफियत दाखल केली नाही त्यामुळे त्यांच्या विरूध्द प्रकरण एकतर्फा निकाली करण्यात आले.
4. प्रस्तुत मंचाने तक्रारदारांची तक्रार, पुराव्याचे शपथपत्र, कागदपत्रे. लेखीयुक्तिवाद तसेच सा.वाले क्र. 1 यांची कैफियत व शपथपत्र यांचे वाचन केले. त्यानुसार न्यायनिर्णयकामी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1. | सामनेवाले 1 या संस्थेच्या इमारत पुर्नबांधणी दरम्यान, सामनेवाले क्र. 1 यांनी सामेनवाले क्र. 2 यांचेकडून तक्रारदाराला इतरत्र राहण्याची सोय करण्यासाठी, मिळालेल्या तक्रारदारांच्या हिश्शाच्या रकमेपैकी, रू. 67,225/-, तक्रारदारांना न देता ती स्वतःकडेच ठेवल्याची बाब ही सामनेवाले यांच्या सेवा सुविधामधील कसून असल्याचे तक्रारदार सिध्द करतात काय? | होय. |
2. | तक्रारदार, सामनेवाले 1 यांचेकडून त्यांच्याकडे असलेली रक्कम रूपये 67,225/-,व्याज/नुकसान भरपाई सह परत मिळण्यास पात्र आहेत काय? | होय. |
3. | अंतीम आदेश | तक्रार अंशतः मान्य करण्यात येते. |
कारण मिमांसा
5. प्रस्तुत प्रकरणातील सामनेवाले 1 ही गृहनिर्माण सहकारी संस्था असून त्यांच्या मालकीची विलेपार्ले येथील इमारत मोडकळीस आल्याने, सदर इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधण्याचे करार, सामनेवाले 1 व सामनेवाले क्र. 2 यांच्यामध्ये माहे ऑगष्ट 2006 मध्ये झाला. या करारातील तरतूद क्र. 9 नूसार सामनेवाले क्र. 1 यांच्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन भोगवटा प्रमाणपत्र मिळेपर्यंत, इमारतीमधील सदनिकाधारकाची इतरत्र राहण्याची सोय करण्याच्या हेतूने, सामनेवाले क्र. 2 यांनी सामनेवाले क्र. 1 यांना, इमारतीमधील एकुण सदनिकेचे चटई क्षेत्रफळ विचारात घेऊन, प्रत्येक चौ.फूटास रू.550/-,या दराने, रू. 40 लक्ष दिले. या रकमेपैकी काही खर्च वगळता उर्वरीत रक्कम रू. 37.70 लाख सर्व सभासदांना आपआपल्या सदनिकेच्या चटई क्षेत्रफळाच्या हिशोबाप्रमाणे अदा केली. मात्र, तक्रारदारांच्या हिश्श्याच्या एकूण रकमेपैकी रू. 67,225/-,एवढी रक्कम तक्रारदारास न देता ती सामनेवाले यांनी आपल्या ताब्यात ठेवली. ही बाब उभयपक्षकारांनी मान्य केली आहे. ही रक्कम मिळावी म्हणून तक्रारदारांनी वारंवार विनंती करून सुध्दा त्यांना देण्यात आली नाही असे तक्रारदारांनी नमूद केले आहे व त्या प्रीत्यर्थ मागणी केलेल्या पत्राच्या प्रती दाखल केल्या आहेत.
6. या संदर्भात सामनेवाले क्र. 1 यांच्या वतीने दाखल केलेल्या कैफियतीमध्ये असे नमूद केले आहे की, तक्रारदार हे सामनेवाले क्र. 1 या संस्थेचे 6 वर्ष सचिव होते व त्यानंतर त्यांच्या जागी दुस-या सचिवाची निवड झाल्यानंतर, तक्रारदारांनी संस्थेच्या कागदपत्राच्या, हिशोबांचा व पैशाचा चार्ज/तपशिल, अनेकवेळा मागणी करूनही दिला नाही व प्रत्येक वेळी वेगवेगळी सबब सांगून तक्रार दाखल करेपर्यंत त्यांनी उपरोक्त तपशिल/चार्ज दिला नाही व ही बाब तक्रारदारानी आपल्या तक्रारीमध्ये अथवा शपथपत्रामध्ये नमूद करण्याचे हेतूतः टाळले असल्याने त्यांची तक्रार फेटाळण्यात यावी. या कथनाच्या पृष्टयर्थ, सामनेवाले 1 यांनी, परिशिष्ट ब वरील दि. 19.06.2007 रोजीचे, तक्रारदाराने दिलेले पत्र सादर केले आहे व उपरोक्त कागदपत्रे चार्ज देताक्षणी उर्वरीत रकमेचा तयार ठेवलेला धनादेश रू. 67225/-,क्र. 145460 हा सुध्दा शपथपत्रासह दाखल केला आहे.
7. सामनेवाले हयांचे वरील कथन सत्य आहे असे जरी मानले तरी देखील सामनेवाले 1 संस्थेने तक्रारदारांचे विरूध्द महाराष्ट्र सहकारी संस्थाचा कायदा अंतर्गत कायदेशीर कारवाई करणे अपेक्षीत होते परंतू हयाप्रकारची अडवणुक योग्य नाही.
8. प्रस्तुत प्रकरणातील संपूर्ण तपशिलाचे अवलोकन केले असता एक बाब निश्चित होते की, सामनेवाले संस्था यांनी तक्रारदारांची एकटयाचीच रक्कम का रोखुन ठेवली त्यामागे सा.वाले दिलेले कारण हे, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे विचारात घेता प्रबळ व विश्वसनीय वाटते. वास्तविक व्यवस्थापन समितीमधील प्रत्येक सदस्य हा सर्व सभासदांचा विश्वस्त या नात्याने काम पाहतो व असे सदस्यच अपप्रवृतींना उत्तेजन देऊ लागले तर सहकारी संस्थेचे व्यवस्थापन निष्क्रीय ठरते.
9. प्रस्तुत प्रकरणातील तक्रारदारांचा हा जरी खोटारडेपणा असला तरी सा.वाले क्र 1 यांनी तक्रारदारांची देय असलेली रक्कम रूपये 67225/-,रोखुन त्यांच्यावर अन्याय केला असेल असे प्रस्तुत मंचास वाटते.
प्रसतुत सा.वाले 1 यांनी तक्रारदारांची उर्वरीत रक्कम रूपये 67225/-,रोखुन ठेवण्यासाठी सा.वाले यांचे मते जरी योग्य कारण असले तरी प्रस्तुत प्रकरणातील न्यायनिर्णय घेतांना ते कारण न्यायोचीत वाटत नाही. सा.वाले यांनी या संदर्भात तक्रारदारांविरूध्द अन्य कायदेशीर उपाययोजना न करता तक्रारदारांना देय असलेली रक्कम रूपये 67225/-,न देता आपल्या ताब्यात घेऊन सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली ही बाब तक्रारदार सिध्द करतात काय
10. वरील चर्चेनुरूप व निष्कर्षावरून खालील प्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार 474/09 मान्य करण्यात येते.
2. सा.वाले क्र 1 यांनी तक्रारदारांना त्यांच्या हिश्श्याच्या देय असलेल्या
रक्कमेपैकी रू.67225/-, तक्रारदारांना न देता ती आपल्या ताब्यात
ठेवली ही बाब सा.वाले यांचे सेवासुविधा असल्याचे जाहीर करण्यात
येते.
3. सामनेवाले यांनी त्यांच्या ताब्यात असलेली तक्रारदारांच्या हिश्श्यापैकी
रोखुन ठेवलेली रू.67225/-,दिनांक 09.11.2008 पासुन(म्हणजे सा.
वाले क्र. 2 यांचेकडून सामनेवाले क्र. 1 यांना रक्कम मिळाल्याच्या दिनांकापासून), द.सा.द.शे 9% व्याजासह तक्रारदारास आठ आठवडयाचे आत अदा करावे, अन्यथा तद्नंतर त्या रक्कमेवर 12% व्याज देय होईल.
4. तक्रारदारास त्यांचे रक्कमेवर व्याजाचा आदेश दिल्याने नुकसान भरपाईचा
आदेश नाही, तथापि तक्रार खर्चापोटी सा.वाले यांनी तक्रारदारास रू.5,000/-
देण्याचा आदेश करण्यात येतो.
5. सा.वाले क्र 2 यांचा या प्रकरणातील जबाबदारीची संबध येत नसल्याने
त्यांच्याविरूध्द आदेश नाही.
6. आदेशाच्या प्रमाणित प्रती सर्व पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.