- निकाल पञ -
(मंचाचे निर्णयान्वये, मा.श्री विजय चं. प्रेमचंदानी, अध्यक्ष)
(पारीत दिनांक : 26 नोव्हेंबर 2015)
अर्जदाराने सदर तक्रार, विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांनी दुचाकी वाहनाचे कर्ज पेड करीत असतांना सुध्दा गैरअर्जदाराने वाहनाचे कोणतेही दस्त वा पासींग करुन न दिल्याबाबत तक्रार दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 यांचेकडून दुचाकी वाहन खरेदी केल्यामुळे अर्जदार हे गैरअर्जदार क्र.1 चे ग्राहक आहे. अर्जदार हीने दुचाकी वाहन खरेदी करण्याकरीता दि.20.1.2012 रोजी गैरअर्जदार क्र.1 चे विजीता मोटर्स या नावाने असलेल्या दुकानामध्ये गेली असता मॉडेल क्र.एसएस-125 दुचाकरी वाहन निळ्या रंगाच्या वाहनाचे कोटेशन दिले होते. कोटेशन प्रमाणे दुचाकी वाहनाची किंमत रुपये 60,511/- होती, त्यामध्ये वाहनाची किंमत, विमा, आर.टी.ओ.पासींग, हायपोथीकेशन व स्मार्ट कार्ड इत्यादी कामाकरीता वाहनाचे कोटेशन दिले होते. त्याप्रमाणे अर्जदार हीने दि.21.1.2012 ला गैरअर्जदार क्र.2 च्या पत संस्थेमधून लोन करीता गैरअर्जदार क्र.1 चे प्रतिनीधी स्वतः येवून अर्जदार हीचे नावानी लोन रुपये 60,511/- चा धनादेश क्र.089242 गैरअर्जदार क्र.1 चे प्रतिनीधी यांनी सदर धनादेश दि.21.1.2012 ला घेवून गेले. त्यानंतर, दुचाकी वाहन घेतेवेळी डाऊन पेमेंट म्हणून रुपये 26,000/- भरल्याशिवाय वाहन मिळणार नाही असे सांगीतल्याने अर्जदार हीने नगदी रुपये 26,000/- हे गैरअर्जदार क्र.1 च्या प्रतिनीधीकडे दिले. त्यानंतर, दि.23.1.2012 रोजी यामा कंपनीची एसएस 125 इंजिन नं.35 बी 4032421, चेसीस नं.एमई135804982032406, रंग निळा हे वाहन रुपये 53,500/- चे बिल देवून अर्जदार हिला गाडी देण्यात आली व गाडी सोबत विम्याचा कव्हरींग लेटर सुध्दा देण्यात आला. अर्जदार ही पत संस्थेच्या कर्जाची नियमीत परतफेड दि.27.1.2014 पर्यंत करीत असतांना सुध्दा गैरअर्जदार क्र.2 यांनी धनादेश देतेवेळी वाहना संबंधी सर्व दस्ताऐवज गैरअर्जदार क्र.2 कडे जमा करण्यास सांगीतले असतांना गैरअर्जदार क्र.1 यांनी कोणतेही दस्ताऐवज गैरअर्जदार क्र.2 यांचेकडे जमा केल्याची किंवा पाठविल्याची कागदोपञी दिसून येत नाही. तसेच अर्जदार हिने कर्जाची परतफेड करुन सुध्दा गैरअर्जदार क्र.1 यांनी अर्जदार हिच्या वाहनाचे रजिस्ट्रेशन करुन दिले नाही, त्यामुळे सन 2012 पासून वाहन बिना रजिस्ट्रेशन शिवाय अर्जदार हिला चालवावे लागत आहे. गाडी विकत घेतल्यानंतर लोन केस असल्याने रजिस्ट्रेशन करण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.1 ची आहे. अर्जदार हिने दि.22.12.2014 रोजी वकीलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवून सुध्दा अजूनपर्यंत वाहनाचे आर.सी.बुक अथवा इतर कागदपञ तक्रारकर्तीस प्राप्त झाले नाही. तरी अर्जदार हिने गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना दि.25.3.2015 ला वकीलामार्फत नोटीस पाठविले. गैरअर्जदार क्र.1 यांनी नोटीस घेण्यास नकार देवून अर्जदारास परत आला. अर्जदार ही मागील एक ते दिड वर्षापासून सदर वाहनाबाबत नोंदणी करण्यासाठी गेली असता उडवाउडवीचे उत्तर देवून गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी शारीरीक, मानसिक व आर्थिक ञास होत आहे.
2. गैरअर्जदार क्र.1 व 2 यांनी अर्जदार हिचे वाहनाचे नोंदणी प्रमाणपञ मिळवून देण्याबाबत आदेश व्हावे, तसेच अर्जदार हिला मानसिक, शारिरीक, आर्थिक ञासापोटी रुपये 50,000/- व व तक्रार खर्चापोटी नुकसान भरपाई रुपये 10,000/- गैरअर्जदार क्र.1 व 2 यांचेवर बसविण्याचा आदेश व्हावा, अशी मागणी केली.
3. अर्जदाराने नि.क्र.4 नुसार 23 झेरॉक्स दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदार क्र.1 व 2 यांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ला नि.क्र.16(अ) नुसार भारतीय पोष्टाचे अहवालानुसार गैरअर्जदार क्र.1 ला नोटीसची बजावणी होऊन सुध्दा हजर झाले नाही, त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 विरध्द नि.क्र.1 वर एकतर्फा आदेश दि.29.10.2015 ला पारीत केला. गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.7 नुसार लेखीउत्तर व नि.क्र.10 नुसार 2 दस्ताऐवज दाखल केले.
4. गैरअर्जदार क्र.2 यांनी नि.क्र.7 नुसार दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने त्यांच्या लेखी उत्तरात असे कथन केलेले आहे की, अर्जदार हिने गैरअर्जदार क्र.2 वर तक्रारी लावलेले आरोप खोटे असल्याने अमान्य करुन नाकबूल केले. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी उत्तरातील विशेष कथनात पुढे नमूद केले की, अर्जदार हिने दि.20.1.2012 ला गैरअर्जदार क्र.1 कडून मॉडेल क्र.एस एस-125 मोटार सायकल चे कोटेशन घेवून गैरअर्जदार क्र.2 कडे कर्ज मिळण्याचा अर्ज सादर केला. सदरहू कर्जात अर्जदाराचे पती विकास विनोद मंडल हे अर्जदाराचे जमानतदार आहेत. गैरअर्जदार क्र.2 ने त्यांचे नियमानुसार वाहन कर्ज फक्त रुपये 39,000/- मंजूर केल व 13 टक्के द.सा.द.शे. या व्याजदराने तीस मासीक हप्त्यात संपूर्ण कर्ज प्रतिमाह रुपये 1723/- या मासीक किस्तीने भरण्याचे अटीवर कर्ज मंजूर केले. अर्जदार हिने वाहनाची संपूर्ण रक्कम रुपये 60,511/- चा धनादेश मिळण्याकरीता संस्थेमध्ये तीला मंजूर असलेल्या कर्ज रुपये 39,000/- च्या व्यतिरिक्त रुपये 21,511/- ही मार्जीन रक्कम भरली. अशारितीने अर्जदार हिने गैरअर्जदार क्र.2 कडून रुपये 60,511/- चा गैरअर्जदार क्र.1 चे नावे बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा चामोशी चा धनादेश प्राप्त केला. गैरअर्जदार क्र.2 ने 20.1.2012 चे पञानुसार वाहनाचे विकत घेतलेल्या गाडीची एक चाबी, आर.सी.बुक संस्थेमध्ये जमा करण्याकरीता पञ दिले होते, परंतु आजतागायत अर्जदार किंवा गैरअर्जदार क्र.1 ने गाडीचे आवश्यक कागदपञ व एक चाबी गैरअर्जदार क्र.2 संस्थेकडे जमा केली नाही. अर्जदार हिने सदर प्रकरणात मागणी केलेले दस्ताऐवजाशी गैरअर्जदार क्र.2 चा कोणताही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध नाही. अर्जदाराकडून गैरअर्जदार क्र.2 ने मंजूर केलेल्या रुपये 39,000/- रकमे व्यतिरिक्त इतर कथन केलेल्या रकमेशी या गैरअर्जदाराचा कोणताही संबंध नाही. अर्जदाराला वाहनाचे कागदपञ देण्याची जबाबदारी गैरअर्जदार क्र.2 ची नसल्यामुळे या प्रकरणामध्ये अर्जदार ही गैरअर्जदार क्र.2 ची ग्राहक नाही. गैरअर्जदार क्र.2 ला अनावश्यकरीत्या प्रकरणात जोडल्यामुळे अर्जदारावर रुपये 25,000/- खर्च बसवून तक्रार गैरअर्जदार क्र.2 विरुध्द खारीज करण्याची कृपा करावी.
5. अर्जदाराने दस्ताऐवज व लेखी युक्तीवाद दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 ने लेखी जबाब, दस्ताऐवज व पुरसीस दाखल केले. गैरअर्जदार क्र.2 व 3 यांना संधी देवूनही शपथपञ व लेखी युक्तीवाद दाखल केले नाही. गैरअर्जदार क्र.1 ला नि.क्र.16(अ) नुसार भारतीय पोष्टाचे अहवालानुसार गैरअर्जदार क्र.1 ला नोटीसची बजावणी होऊन सुध्दा हजर झाले नाही, त्यामुळे गैरअर्जदार क्र.1 विरध्द नि.क्र.1 वर एकतर्फा आदेश दि.29.10.2015 ला पारीत केला. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, अर्जदाराचे लेखी युक्तीवाद व दोन्ही तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : होय.
व्यवहार केला आहे काय ?
3) गैरअर्जदार क्र.2 ने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : नाही.
व्यवहार केला आहे काय ?
4) अर्जदाराचा तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
6. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 चे दुकानामधून वाहन खरेदी केले व सदर वाहन खरेदीकरीता गैरअर्जदार क्र.2 कडून कर्ज घेतले ही बाब प्रकरणात दाखल दस्ताऐवज व गैरअर्जदार क्र.2 चे जबाबावरुन सिध्द झाले आहे. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
7. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडून दुचाकी वाहन खरेदी केले व त्यात गैरअर्जदार क्र.1 ने परिवहन विभागात नोंदणी करुन दिलेली नाही व त्याचे नोंदणी पुस्तिकाही अर्जदाराला पुरविली नाही ही बाब अर्जदाराने दाखल तक्रार व दस्ताऐवजावरुन सिध्द झालेले आहे. गैरअर्जदार क्र.1 हे प्रकरणात हजर झाले नाही व त्यांचे विरुध्द नि.क्र.1 वर प्रकरण एकतर्फा चालविण्याचे आदेश पारीत करण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराने घेतलेले दुचाकी वाहनाचे परिवहन विभागात नोंदणी करुन दिली नाही व त्यासंदर्भात नोंदणी पुस्तिकाही पुरविली नाही म्हणून गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दर्शविलेली आहे, ही बाब सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.2 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 3 बाबत :-
8. अर्जदाराने गैरअर्जदार क्र.1 कडून खरेदी केलेले दुचाकी वाहनाची नोंदणीबाबत अर्जदाराचे वाद अर्जदाराचे तक्रारमध्ये दर्शवितो. गैरअर्जदार क्र.2 नी अर्जदाराला वादातील दुचाकी वाहन खरेदी करण्याकरीता कर्ज दिले होते त्यात गैरअर्जदार क्र.2 चे वाहनाचे नोंदणी करण्याबाबत कोणतीही जबाबदारी नव्हती. अर्जदाराने सदर तक्रारीत गैरअर्जदार क्र.2 नी वाहनाबाबत दिलेल्या कर्जाचे संदर्भात कोणताही वाद किंवा सेवेत ञुटीबाबत तक्रार केलेली नाही. गैरअर्जदार क्र.2 चे अर्जदाराचे दुचाकी वाहनाचे नोंदणी प्रमाणपञ मिळण्याकरीता कोणत्याही प्रकारचा सहभाग आवश्यक आहे ही बाब अर्जदार तक्रारीत सिध्द करु शकलेला नाही. म्हणून गैरअर्जदार क्र.2 नी अर्जदाराप्रती न्युनतम सेवा दिली आहे ही बाब सिध्द झाले नाही. सबब, मुद्दा क्र.3 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
9. मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदाराला अर्जदाराचे वाहनाची नोंदणी प्रमाणपञ परिवहन विभागातून मिळविण्याकरीता नियमाप्रमाणे योग्य ते सहकार्य करावे.
(3) गैरअर्जदार क्र.1 ने अर्जदारास झालेल्या शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 5000/- व तक्रारीचा खर्च रुपये 2500/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत द्यावे.
(4) गैरअर्जदार क्र. 2 विरुध्द कोणतेही आदेश नाही.
(5) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
(6) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 26/11/2015