::: आ दे श :::
( पारीत दिनांक :21.10.2016 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली असून थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्ता व त्याचे सासरे जयदिश मन्साराम जोध यांनी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून दि. 14/1/2013 रोजी मौजे मलकापुर येथील शेत सर्व्हे क्र. 3/3, एन.ए.पी/34/मलकापुर/5/1997-98 या मंजुर लेआऊट नकाशातील प्लॉट क्र. 3 वरील संकेत टॉवर अपार्टमेंट मध्ये फ्लॅट क्र. 402, रु. 12,00,000/- मध्ये विकत घेण्याचा सौदा केला. तक्रारकर्त्याने इसाराचे दिवशी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना रु. 5,21,000/- नगदी दिले, परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी इसार चिठ्ठीमध्ये रु. 21,000/- दिल्याचे नमुद केले. सदरहु फ्लॅट हा 1025 चौ. फुट बिल्टअप एरियाचा आहे व सदर फ्लॅट सर्व सुखसुविधांसह देण्याचे विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी कबुल केले. सदरहु बांधकाम हे दि.15/3/2013 रोजी किंवा त्याचे आत उर्वरित रक्कम देवून विकत घेण्याचे ठरले होते. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदरहु फ्लॅटचे आजपर्यंत बांधाकाम पुर्ण केले नाही. तसेच तक्रारकर्त्याने दिलेल्या रु. 5,00,000/- ची कुठलीही पावती दिली नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी मंजुर नकाशापेक्षा जास्त बांधकाम करुन 3 फुट सरकारी जागेवर वाढविले आहे. नकाशातील पार्कींग जागेवर दोन दुकाने गैरकायदेशिररित्या बांधली आहेत व बांधकाम पुर्ण न करता गैरकायदेशिररित्या बिल्डींग कंम्प्लीशन सर्टीफिकेट मिळविले व इमारतीतील काही लोकांना फ्लॅटच्या खरेद्या करुन दिल्यात. आज रोजी सुध्दा या इमारतीचे काम पुर्ण झालेले नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन प्रार्थना केली की, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी, बंद केलेल्या इमारतीचे काम तीन महिन्यात पुर्ण करुन द्यावे. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी इसारापोटी घेतलेले रु. 5,21,000/- ची पावती तक्रारकर्त्यास द्यावी. तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5,00,000/- व तक्रारीचा खर्च रु. 5,000/- देण्याचा आदेश विरुध्दपक्षास द्यावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 02 दस्तऐवज पुरावा म्हणून जोडण्यात आले आहे.
विरुध्दपक्ष 1 व 2 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी त्यांचा संयुक्त लेखी जबाब दाखल करुन, त्याद्वारे तक्रारीतील आरोप नाकबुल केलेले आहेत. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी असे नमुद केले की, तक्रारीचे स्वरुप हे स्पेसिफिक परफॉरमन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट दुसरी शब्द रचना करुन मागीतलेले आहे. सदर कायद्याच्या कलम 16 नुसार तक्रारकर्ता हा नेहमी त्याच्यावर असलेली जबाबदारी पुर्ण करण्यास सदैव तयार होता व आजही तयार आहे, अशा प्रकारची विधाने सिध्द करावी लागतात, जी तक्रार कायद्याप्रमाणे ह्या न्यायमंचामध्ये चालु शकत नाही. सदर सौद्यापोटी इसार म्हणून रु. 21,000/- नगदी देण्यात आलेले आहे व बाकीची राहीलेली रक्कम सदरचे फ्लॅटचे खरेदीखत नोंदवून देतेवेळी म्हणजेच दि. 15/3/2013 किंवा त्याचे आंत घेण्याचे ठरले आहे. सदर करारनाम्यात फ्लॅटची एकूण किंमत रु. 12,00,000/- नमुद केली आहे. तक्रारकर्त्याने आज पर्यत कधीही नोटीस देवून असे नमुद केले नाही की त्याने रु. 5,21,000/- इसाराचा भरणा केला आहे. तक्रारकर्त्याने दि. 15/3/2013 रोजी किंवा त्याच्या अगोदर तो पैसे भरण्यासाठी तयार असल्याबद्दल कधीही लेखी स्वरुपाची किंवा तोंडी विनंती केली नाही, ह्यावरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्ता हा कधीही खरेदी घेण्यास इच्छुक नव्हता. स्पेसिफिक रिलीफ ॲक्ट नुसार व कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट नुसार राहीलली रक्कम देण्याची तारीख 15/3/2013 ठरलेली असतांना तक्रारकर्त्याने करारनाम्याच्या अटींचा भंग केला आहे व म्हणून रु. 21,000/- ची रक्कम ही फॉरफीट झाली आहे. सदर प्रकरणात गुंतागुंतीचे कायदेशिर प्रश्न निर्माण झालेले आहेत व असे प्रकरण ह्या न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येत नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास नुकसान भरपाई देण्याचे आदेशासह खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केला व विरुध्दपक्षाने लेखी युक्तीवाद दाखल केला तसेच विरुध्दपक्षाने तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात उभय पक्षांनी दाखल केलेले दस्त व लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन करुन व विरुध्दपक्षांचा तोंडी युक्तीवाद ऐकुन काढलेल्या निष्कर्षाचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला.
- दाखल दस्तांवरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा ग्राहक होत असल्याचे सिध्द होत असल्याने व तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा ग्राहक असल्यासंबंधी कुठलाही वाद नसल्याने तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येत आहे.
- तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार तक्रारकर्त्याने त्याच्या सासऱ्यांसह विरुध्दपक्षाकडे जाऊन दि. 14/1/2013 रोजी संकेत टॉवर अपार्टमेंट या बांधकाम सुरु असलेल्या इमारती मधील 4 थ्या माळयावर फ्लॅट नं. 402, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून विकत घेण्याचा सौदा केला. सदरहु सौदा रु. 12,00,000/- मध्ये ठरला. तक्रारकर्त्याने इसाराचे दिवशी विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना रोख रु. 5,21,000/- दिले, परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी इन्कमटॅक्स भरावा लागतो, असे सांगुन इसार करतांना इसार चिठ्ठीमध्ये रु. 21,000/- इसारापोटी मिळाल्याचे नमुद केले. तसेच रु. 5,00,000/- चा हिशोब विरुध्दपक्षाच्या लेखा उताऱ्यात लिहीलेला असल्याचे सांगीतले. सदर फ्लॅट 1025 चौ. फुट बिल्टअप एरियाचा असून, दि. 15/3/2013 रोजी किंवा त्याचे आत उर्वरित रक्कम देऊन विकत घेण्याचे ठरले होते. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 सदरहु फ्लॅट आज पर्यंत बांधकाम पुर्ण करुन दिलेला नाही. तक्रारकर्त्याने वारंवार फ्लॅट पुर्ण करुन देण्याची व सौदा पुर्ण करुन देण्याची मागणी केल्यावरही विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी फ्लॅट पुर्ण बांधुन दिलेला नाही.
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर इमारतीचे बांधकाम नियमाप्रमाणे केले नाही, तसेच सदर इमारत मंजुर नकाशापेक्षा जास्त बांधकाम करुन, 3 फुट सरकारी जागेवर वाढविली व पार्कींग जागेवर 2 दुकाने गैरकायदेशिररित्या बांधले व बिल्डींग कंम्प्लीशन सर्टीफिकेट मिळविले आहे. आज रोजी सुध्दा सदरहु इमारतीचे बांधकाम पुर्ण झाले नसल्याने तक्रारकर्त्याला दुसऱ्या ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहावे लागत आहे.
- यावर, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी त्यांच्या जबाबात असे म्हटले आहे की, स्पेसीफीक रिलीफ ॲक्टच्या कलम 16 नुसार तक्रारकर्ता हा नेहमी त्याच्यावर असलेली जबाबदारी पुर्ण करण्यास सदैव तयार होता व आजही तयार आहे, हे तक्रारकर्त्याला सिध्द करावे लागेल. सदरच्या सौद्यापोटी इसार म्हणून रु. 21,000/- रोख नगदी देण्यात आलेले आहे व बाकीची राहलेली रक्कम सदरचा फ्लॅट खरेदीखत नोंदवून देतेवेळी म्हणजेच दि. 15/3/2013 किंवा त्याचे आंत घेण्याचे ठरले होते. जेंव्हा करारनाम्यात एकूण किंमत रु. 12,00,000/- नमुद केली आहे, तेंव्हा इसाराची रक्कम रु. 5,00,000/- कमी लिहीण्याचे कोणतेही कारण नाही. तक्रारकर्त्याने आज पर्यंत कधीही नोटीस देऊन रु. 5,21,000/- इसाराचा भरणा केल्याचे, विरुध्दपक्षाला सांगीतले नाही.दि. 15/3/2013 रोजी किंवा त्याच्या अगोदर तक्रारकर्ता पैसे भरण्यास तयार असल्याचे कधीही लेखी किंवा तोंडी स्वरुपात विरुध्दपक्षाला कळविले नाही. त्यावरुन स्पष्ट होते की, तक्रारकर्ता हा कधीही खरेदी घेण्यास इच्छुक नव्हता. तक्रारकर्त्याने करारनाम्यातील अटींचा भंग केला असल्याने, तक्रारकर्त्यानेच विरुध्दपक्षाला नुकसान भरपाई द्यावी.
- उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर मंचाने दाखल दस्तांचे अवलोकन केले असता, तक्रारकर्ता त्याची तक्रार सप्रमाण पुराव्यासह सिध्द करु शकलला नसल्याचे दिसून येते. दस्त क्र. अ-2 ( पृष्ठ क्र. 22 ते 24 ) वरील करारनाम्यात इसाराचा भरणा रु. 21,000/- व फ्लॅटची खरेदी किंमत रु. 12,00,000/- नोंदविलेली दिसून येते. तक्रारकर्त्याने इसारापोटी रु. 5,21,000/- दिल्याचे कोठेही पुराव्यासह सिध्द केलेले नाही. तसेच करारनाम्याचे पृष्ठ क्र. 3 वर असे नमुद केले आहे की, “ बाकी राहीलेली रक्कम आम्ही तुमचे कडून सदर फ्लॅटचे खरेदीखत तुम्हास नोंदवून देतेवेळी म्हणजेच दि. 15/3/2013 रोजी किंवा त्याचे आत घेण्याचे ठरले आहे. खरेदी खताचे मुदतीवर आम्ही तुमचे कडून उर्वरित रक्कम घेऊन, सदर स्थावर मिळकत फ्लॅटचे खरेदीखत तुमचे नावाने लिहून व नोंदवून देऊन फ्लॅटचा ताबा देण्याचे मान्य केले आहे. सदर विक्री करारनाम्यास तसेच खरेदी खतास लागलेला संपुर्ण खर्च तुम्ही म्हणजे घेणाऱ्याने करण्याचे ठरले आहे.”
करारनाम्यात नमुद असलेल्या दि. 15/3/2013 ला तक्रारकर्ता खरेदी करण्यास तयार असल्याचे, परंतु विरुध्दपक्षाने बांधकाम पुर्ण न केल्याने, विरुध्दपक्ष खरेदी खत करुन देण्यात तयार नसल्याचे कुठलेच पुरावे तक्रारकर्त्याने मंचासमोर सादर केले नाही. दि. 15/3/2013 पासून प्रकरण दाखल करेपर्यंत जवळपास अडीच वर्ष तक्रारकर्त्याने करारनाम्याची पुर्तता होण्यासाठी कुठलीच कारवाई अथवा प्रयत्न केल्याचे दिसून येत नसल्यामुळे, तक्रारकर्त्याची तक्रार मंचासमोर सिध्द होऊ शकलेली नसल्याने तक्रारकर्त्याची तक्रार खारीज करण्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे.
सबब अंतीम आदेश येणे प्रमाणे ..
- तक्रारकर्ते त्यांची तक्रार, पुराव्यासह सिध्द न करु शकल्याने, खारीज करण्यात येत आहे.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.