::: आ दे श :::
( पारीत दिनांक :21.10.2016 )
आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार
सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, दाखल करण्यात आली असून थोडक्यात खालील प्रमाणे आहे.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून दि. 13/5/2014 रोजी मौजे मजकापुर येथील शेत सर्व्हे क्र. 3/3, एन.ए.पी/34/मलकापुर/5/1997-98 या मंजुर लेआऊट नकाशातील प्लॉट क्र. 3 वरील संकेत टॉवर अपार्टमेंट मध्ये फ्लॅट क्र. 406, रु. 12,50,000/- मध्ये विकत घेतला होता. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर सौदा हा रु. 11,00,000/- चा असल्याचे खरेदीखतामध्ये नमुद केले. सदर फ्लॅट विकत घेतल्यावर एक महिन्यातच संपुर्ण घरात पाण्याचे लिकेज सुरु झाल्याने तक्रारकर्त्याचा संपुर्ण फ्लॅट दिवसेंदिवस खराब होत गेला. विरुध्दपक्षाला वारंवार सुचना देऊनही व विरुध्दपक्षातर्फे आश्वासन देऊनही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या फ्लॅटचे लिकेज दुरुस्त करुन दिले नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ने बांधकाम पुर्ण केलेले नसून, पाण्याचे बोअरींगचे संयुक्त मीटर अद्यापपर्यंत लावले नाही. सदर मिटरचा विद्युत भार हा तक्रारकर्त्याच्या मिटरवरच असून त्याचे बील तक्रारकर्ता व इमारतीतील इतर रहीवासी भरत आहे. सदर बोअरींगच्या पाण्याचा जास्त वापर बांधकामा करिता झाल्याने फ्लॅटच्या लोकांना वापरण्याच्या व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी मंजुर नकाशापेक्षा जास्त बांधकाम करुन 3 फुट सरकारी जागेवर वाढविले आहे. नकाशातील पार्कींग जागेवर दोन दुकाने गैरकायदेशिररित्या बांधली आहेत व बांधकाम पुर्ण न करता गैरकायदेशिररित्या बिल्डींग कंम्प्लीशन सर्टीफिकेट मिळविले व इमारतीतील काही लोकांना फ्लॅटच्या खरेद्या करुन दिल्यात. आज रोजी सुध्दा या इमारतीचे काम पुर्ण झालेले नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी नियमाप्रमाणे सदर इमारतीमध्ये अद्यापपर्यंत संयुक्त मिटर व इलेक्ट्रीकचे संयुक्त पॉईंट सुध्दा लावलेले नाही. त्यामुळे संपुर्ण अपार्टमेंट अंधारात असते. त्यामुळे तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन प्रार्थना केली की, विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी, बंद केलेल्या इमारतीचे काम तीन महिन्यात पुर्ण करुन द्यावे. बांधकामाकरिता वेगळी बोअरिंग करुन त्याचे राहीलेले उर्वरित बांधकाम पुर्ण करावे. सदरहु इमारतीमध्ये संयुक्त मिटर घेवून त्या मिटरचा बोअरींगसाठी वापर करावा. संयुक्त इलेक्ट्रीक पॉईन्ट्स प्रत्येक मजल्यावर देण्यात यावे. फ्लॅट लिकेज झाला असल्याने सदरहु फ्लॅटचे जे काही नुकसान झाले त्या नुकसानीची भरपाईपोटी परत सदरहु फ्लॅट व्यवस्थित रिपेअर करुन द्यावा. तक्रारकर्त्यास झालेल्या मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 2,00,000/- व तक्रारीचा खर्च रु. 10,000/- देण्याचा आदेश विरुध्दपक्षास द्यावा.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 01 दस्तऐवज पुरावा म्हणून जोडण्यात आले आहे.
विरुध्दपक्ष 1 व 2 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी त्यांचा संयुक्त लेखी जबाब दाखल करुन, त्याद्वारे तक्रारीतील आरोप नाकबुल केलेले आहेत. विरुध्दपक्षाने असे नमुद केले की, दि. 13/5/2014 च्या रजिस्टर खरेदीखताने पुर्ण भरणा रु. 11,00,000/- मिळाल्यावर फ्लॅट क्र. 406 चे खरेदीखत करुन दिलेले आहे. खरेदी होण्यापुर्वी संपुर्ण इमारतीचे तक्रारकर्त्याने पुर्णपणे निरीक्षण केलेले होते, तसेच बांधकाम चालु असतांना भेटी सुध्दा दिलेल्या आहेत. तक्रारकर्त्याचे संपुर्ण समाधान झाल्यावर त्याने खरेदीखत करुन घेतलेले आहे. खरेदीखत करुन घेत असतांना तक्रारकर्त्याने कोणत्याही प्रकारची तक्रार केली नाही. ज्या गोष्टींचा खरेदी खतामध्ये उल्लेख नाही, त्या संबंधी कोणतीही मागणी करण्याचा तक्रारकर्त्याला अधिकार नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी इमारतीच्या कामाबद्दल चांगल्या प्रतीचे साहीत्याचा वापर केलेला आहे. त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास नुकसानभरपाई देण्याचे आदेशासह खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर व लेखी युक्तीवाद दाखल केला व विरुध्दपक्षाने लेखी युक्तीवाद दाखल केला तसेच विरुध्दपक्षाने तोंडी युक्तीवाद केला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात उभय पक्षांनी दाखल केलेले दस्त व लेखी युक्तीवाद यांचे अवलोकन करुन व विरुध्दपक्षाचा तोंडी युक्तीवाद ऐकुन काढलेल्या निष्कर्षाचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला.
- या प्रकरणात तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 चा ग्राहक असल्यासंबंधी वाद नसल्याने व दाखल दस्तांवरुन तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र.. 1 व 2 चा ग्राहक असल्याचे सिध्द होत असल्याने, तक्रारकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा ग्राहक असल्याचे ग्राह्य धरण्यात येत आहे.
- तक्रारकर्त्याच्या तक्रारीनुसार तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचेकडून संकेत टॉवर अपार्टमेंट मध्ये फ्लॅट नं. 406 हा रु. 12,50,000/- मध्ये विकत घेतला असतांना विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदर सौदा हा रु. 11,00,000/- चा असल्याचे खरेदीखतामध्ये नमुद केले.
सदर फ्लॅट विकत घेतल्यावर एक महिन्यातच संपुर्ण घरात पाण्याचे लिकेज सुरु झाल्याने तक्रारकर्त्याचा संपुर्ण फ्लॅट दिवसेंदिवस खराब होत गेला. विरुध्दपक्षाला वारंवार सुचना देऊनही व विरुध्दपक्षातर्फे आश्वासन देऊनही विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याच्या फ्लॅटचे लिकेज दुरुस्त करुन दिले नाही.
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 ने बांधकाम पुर्ण केलेले नसून पाण्याचे बोअरींगचे संयुक्त मीटर अद्यापपर्यंत लावले नाही. सदर मिटरचे कनेक्शन तक्रारकर्त्याच्या मिटरवरच असून त्याचे बील तक्रारकर्ता व इमारतीतील इतर रहीवासी भरत आहे. सदर बोअरींगच्या पाण्याचा जास्त वापर बांधकामा करिता झाल्याने फ्लॅटच्या लोकांना वापरण्याच्या व पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होते. तसेच विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी मंजुर नकाशापेक्षा जास्त अवैध बांधकाम केले आहे. नकाशातील पार्कींग जागेवर दोन दुकाने बांधली आहेत व बांधकाम पुर्ण न करता गैरकायदेशिररित्या बिल्डींग कंम्प्लीशन सर्टीफिकेट मिळविले व इमारतीतील काही लोकांना फ्लॅटच्या खरेद्या करुन दिल्यात. आज रोजी सुध्दा या इमारतीचे काम पुर्ण झालेले नाही. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी नियमाप्रमाणे सदर इमारतीमध्ये अद्यापपर्यंत संयुक्त मिटर व इलेक्ट्रीकचे संयुक्त पॉईंट सुध्दा लावलेले नाही. त्यामुळे संपुर्ण अपार्टमेंट अंधारात असते.
- विरुध्दपक्षाने त्यांच्या जबाबात तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील संपुर्ण बाबी नाकारुन असे नमुद केले की, खरेदीखत होण्यापुर्वी संपुर्ण इमारतीचे तक्रारकर्त्याने पुर्णपणे निरीक्षण केलेले होते व बांधकाम चालु असतांना भेटी सुध्दा दिलेल्या आहेत व तक्रारकर्त्याचे संपुर्ण समाधान झाल्यावर त्याने खरेदीखत करुन घेतलेले आहे. ज्या गोष्टींचा खरेदी खतामध्ये उल्लेख नाही, त्या संबंधी कोणतीही मागणी करण्याचा तक्रारकर्त्याला अधिकार नाही.
- उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर मंचाने दाखल दस्तांचे अवलेाकन केले. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी जबाबातही केवळ तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील मुद्दे नाकारलेले असून, त्या व्यतीरिक्त अधिकचा जबाब अथवा लेखी व तोंडी पुरावाही दाखल केलेला नाही.
त्याच प्रमाणे तक्रारकर्त्यानेही त्याने तक्रारीत घेतलेले आक्षेप, जसे, पार्कींग जागेवर दोन दुकाने गैरकायदेशिररित्या बांधले, तिन फुट सरकारी जागेवर अतिक्रमण करुन बांधकाम केले, गैरकायदेशिररित्या बिल्डींग कम्प्लीशन सर्टीफिकेट मिळवले, तक्रारकर्त्याचा फ्लॅट लिकेज होत आहे. बिल्डींगच्या पाण्याचे मिटरचे कनेक्शन हे तक्रारकर्त्याच्या मिटरवर घेतलेले आहे ई. पुराव्यासह सिध्द केले नाही. तसेच पृष्ठ क्र. 10 वरील खरेदी खतावर, तक्रारकर्त्याने समजुन उमजुन स्वाक्षरी केली असल्याने खरेदीखता मध्ये रु. 12,50,000/- ऐवजी रु. 11,00,000/- चा सौदा नमुद केल्याचा तक्रारकर्त्याचा आक्षेप गृहीत धरता येणार नाही. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनीही तक्रारकर्त्याचे आक्षेप खोडून काढणारा कुठलाच पुरावा मंचासमोर आणलेला नाही, जसे बिल्डींग कंम्प्लीशन सर्टीफिकेट, बोअरींगसाठी संयुक्त मिटर असल्याचा पुरावा, संयुक्त इलेक्ट्रीक पॉईंट असल्याचा पुरावा ई. सबब तक्रारकर्त्याच्या तक्रारीतील संपुर्ण इमारतीसाठी आवश्यक सुविधांची, मागणी केलेल्या प्रार्थनेतील क्र. 3 व 4 मंजुर करण्यात येत आहे. तसेच तक्रारकर्त्याच्या फ्लॅट मध्ये लिकेज होत असल्याचे गृहीत धरुन स्लॅबचे वॉटर प्रुफींग करुन देण्याचा आदेश, सदर मंच विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना देत आहे. तसेच शारीरिक, आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 3000/- तक्रारकर्त्याला देण्याचा आदेश हे मंच विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना देत आहे. सबब अंतीम आदेश येणे प्रमाणे…
- तक्रारकर्ते यांची तक्रारीतील प्रार्थना क्र. 3 व 4...
3. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी सदरहु इमारतीमध्ये संयुक्त मिटर घेवून त्या मिटरचा बोअरिंगसाठी वापर करावा.
4. संयुक्त इलेक्ट्रीक पॉईन्ट्स प्रत्येक मजल्यावर देण्यात यावे.
मंजुर करण्यात येत असून त्याची पुर्तता व तक्रारकर्त्याच्या फ्लॅटच्या स्लॅबचे वॉटर प्रुफिंग करुन देण्याचे आदेश विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांना देण्यात येत आहे.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक वा संयुक्तीरित्या तक्रारकर्त्यास, मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 5000/- ( रुपये पाच हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 3000/- ( रुपये तिन हजार ) द्यावेत.
- सदर आदेशाचे पालन निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
- सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.