नि.14 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 158/2010 नोंदणी तारीख – 23/6/2010 निकाल तारीख – 26/8/2010 निकाल कालावधी – 63 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री जयवंत जिजाबा जगदाळे मु.पो. कुमठे, ता.कोरेगाव जि. सातारा ---- अर्जदार (अभियोक्ता श्री एम.डी.जाधव) विरुध्द विजय एंटरप्राईझेस एण्ड मोबाईल शॉपी तर्फे प्रोप्रा. पी.एम.बर्गे, रा. मेनरोड, जैन मंदिराशेजारी, कोरेगाव जि. सातारा ----- जाबदार (एकतर्फा) न्यायनिर्णय 1. अर्जदार यांनी जाबदार यांचे दुकानातून सोनाटा (टायटन) या कंपनीचे घडयाळ रक्कम रु.900/- देवून खरेदी केले आहे. त्याची पावती जाबदार यांनी दिली आहे. सदरचे घडयाळ खरेदी केल्यापासून बंद पडते व पुन्हा चालू होते असे घडयाळाबाबत घडत होते. त्यावेळी अर्जदार यांनी जाबदार यांना वेळोवेळी घडयाळ नेऊन दाखविले परंतु जाबदार यांनी दुरुस्त करुन देण्याचे टाळले होते. सदरचे घडयाळास जाबदार यांनी एक वर्षाची वॉरंटी दिली होती. परंतु वॉरंटी कालावधीमध्ये बिघडलेले घडयाळ दुरुस्त करुन देण्यास जाबदार यांनी नकार दिला आहे. सबब जाबदार यांना घडयाळ दुरुस्त करुन देण्याचा आदेश व्हावा, अर्जाचे खर्चापोटी व मानसिक त्रासापोटी रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार यांना प्रस्तुत तक्रारअर्जाचे नोटीसची बजावणी होऊनही ते नेमलेल्या तारखांना मंचासमोर हजर राहिले नाहीत. तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. अर्जदार यांनी याबाबत दाखल केलेले शपथपत्र नि.10 पाहिले. सबब, जाबदार यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करण्यात आला. 3. अर्जदारतर्फे दाखल नि.12 कडील लेखी युक्तिवाद पाहिला तसेच नि.11 कडील पुरसिस पाहिली तसेच दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 4. अर्जदारची तक्रार पाहता अर्जदारने जाबदारकडून सोनाटा (टायटन) कंपनीचे घडयाळ रक्कम रु.900/- (नऊशे) रोख देवून घडयाळ खरेदी केले परंतु घेतलेपासून सारखे बंद पडते, 1 वर्षाची वॉरंटी असूनही जाबदार दुरुस्त करुन देत नाही, गॅरंटीची कागदपत्रे अर्जदारचे अशिक्षितपणाचा फायदा घेवून जाबदारने दिली नाहीत, सबब घडयाळ बदलून द्यावे अशी तक्रार दिसते. 5. अर्जदारने नि.5/1 कडे जाबदार पी.एम.बर्गे विजय एंटरप्राइझेस एण्ड मोबाईल शॉपी सर्व प्रकारचे मोबाईल विक्री व दुरुस्ती असे नमूद असलेली मूळ पावती दाखल केली आहे. सबब सदरची पावती पाहता जाबदारचा घडयाळ विक्रीचा व्यवसाय आहे हे दिसून येत नाही तसेच सोनाटा (टायटन) कंपनीचे जाबदार अधिकृत विक्रेते आहेत असेही दिसून येत नाही. अशा परिस्थितीत मोबाईल शॉपी मधून जर अर्जदारने नादुरुस्त घडयाळ खरेदी केले असेल तर त्यास अर्जदारच जबाबदार आहेत. कोणत्याही कंपनीची खरेदी केलेली वस्तू बदलून मागणेची असेल तर त्यासाठी सदर वस्तू सदर कंपनीचे अधिकृत विक्रेतेकडून खरेदी करणे आवश्यक आहे. 6. अर्जदारचे तक्रारीत अर्जदारने अशिक्षितपणाचा फायदा जाबदारने घेतला असे कथन केले आहे. तक्रारअर्जावरती तसेच इतर दाखल कागदपत्रांवरती अर्जदारने इंग्रजीमध्ये सहया केलेल्या दिसतात म्हणजे त्यांना इंग्रजीही लिहिता वाचता येते असे दिसते. अशा परिस्थितीत अशिक्षितपणाचा फायदा घेतला असे म्हणता येणार नाही. अर्जदारने घडयाळास एक वर्षाची गॅरंटी होती व आहे असे कथन केले आहे. निर्विवादीतपणे ब्रॅण्डेड कंपनीचे वस्तुंना वॉरंटी/गॅरंटी असते परंतु वॉरंटी/गॅरंटीचा फायदा घेणेसाठी वस्तू कंपनीचे अधिकृत विक्रेतेकडून खरेदी करणे आवश्यक आहे. सबब दाखल कागदपत्रांवरुन जाबदार घडयाळ कंपनीचे अधिकृत विक्रेते आहेत हे दिसून येत नाही. निर्विवादीतपणे तक्रारअर्जामध्ये कंपनी पक्षकार नाही. अशा परिस्थितीत अर्जदार आपली तक्रार जाबदार विरुध्द शाबीत करु शकले नाहीत या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 7. मे. मंचास अर्जदारसाठी एक बाब स्पष्ट करावीशी वाटते की, ग्राहक संरक्षण कायदा व ग्राहक मंच ग्राहकांसाठी ग्राहकांचे हक्क सुरक्षित करणेसाठी निर्माण झाले आहेत. परंतु त्या अन्वये न्याय मिळविण्यासाठी ग्राहकांनीही प्रथम आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत. त्यामध्ये प्रथम कर्तव्य म्हणजे कोणत्याही ब्रॅण्डेड कंपनीची वस्तू खरेदी करताना सदर कंपनीच्या अधिकृत विक्रेत्यांकडूनच वस्तू खरेदी करावी, खरेदी पावतीवरती सदर विक्रेता हा अधिकृत विक्रेता आहे असे नमूद आहे का ते पहावे, वस्तूचे बॉक्समध्येच वॉरंटी/गॅरंटी कार्ड असते, ते विक्रेतेकडून भरुन घ्यावे वगैरे. अशी कर्तव्ये जर ग्राहकांनी पार पाडली तर निश्चितपणे मंचास न्याय देणेस मदत होणार आहे. 8. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज नामंजूर करणेत येत आहे. 2. खर्चाबाबत आदेश नाही. 3. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 26/8/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |