जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 62/2011 तक्रार दाखल तारीख –02/05/2011
मारुती पि.निवृती लाड
वय 48 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.पिंपरखेड पो.हिवरा ता.आष्टी जि.बीड
विरुध्द
1. विजय पि.उत्तमराव राठोड
रा.वाघळूल ता.आष्टी जि.बीड
अध्यक्ष, श्री संत सेवालाल महाराज
ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित
वासनवाडी ता.जि.बीड .सामनेवाला
2. सौ.जयश्री अरुण पवार
रा.वाघळूज ता.आष्टी जि.बीड
सचिव, श्री संत सेवालाल महाराज
ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित
वासनवाडी ता.जि.बीड
3. व्यवस्थापक,
श्री संत सेवालाल महाराज
ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित
वासनवाडी ता.जि.बीड
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.डी.एम.डबडे
सामनेवाला क्र.1 व 3 तर्फे :- अँड.एल.एम.काकडे
सामनेवाला क्र.2 तर्फे ः- कोणीही हजर नाही.
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार मौजे पिंपरखेड ता.आष्टी येथील रहिवासी असून शेती करुन गुजरान करतात.
तक्रारदारांनी सन 2005 मध्ये त्यांचे घरगुती अडचणीसाठी सामनेवाला क्र.3 कडे रक्कम रु.1,00,000/- कर्जाची मागणी केली. सामनेवाला यांनी सदरचे कर्ज आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता झाल्यानंतर तक्रारदारांना दिले.
तक्रारदारांनी कर्जाची परतफेड दि.05.05.2010 रोजी केलेली आहे. कर्ज खाते बेबाकी झालेले आहे. म्हणून तक्रारदारांनी सामनेवाला क्र.1 ते 3 कडे बेबाकी प्रमाणपत्राची मागणी केली. त्यांचे नांवे असलेल्या मौजे पिंपरखेड ता.आष्टी येथील सर्व्हे नंबर 114/ई ड या मिळकतीवरील सामनेवाला पतसंस्थेचा बोजा उतरविण्या बाबत विनंती केली. परंतु प्रत्येक वेळी सामनेवाला क्र.1 यांनी आज सामनेवाला क्र.3 नाही व सामनेवाला क्र.3 कडे मागणी केल्यावर त्यांनी आज सामनेवाला क्र.1 नाही व सामनेवाला क्र.2 कडे मागणी केल्यावर त्यांनी सर्व अधिकारी अध्यक्षांना आहेत असे प्रत्येकी वेळी सांगून बेबाकी प्रमाणपत्र व मिळकती वरील बोजा उतरल्याचे पत्र देण्याची टाळाटाळ केली. म्हणून तक्रारदारांनी तालूका उपनिबंधक,सहकारी संस्था, बीड यांचेकडे तक्रार अर्ज दिला. त्या बाबत त्यांनी सामनेवाला संस्थेला तक्रारदारास बेबाकी प्रमाणपत्र तिन दिवसांचे आंत दयावे असे दि.28.06.2010 रोजी पत्र दिले. परंतु सामनेवाला यांनी तक्रारदारांना बेबाकी प्रमाणपत्र व बोजा उतरविल्याचे पत्र दिले नाही. अशा प्रकारे सामनेवाला यांनी तक्रारदारांना दयावयाचे सेवेत कसूर केलेला आहे त्यामुळे तक्रारदारांना शारीरिक, मानसिक त्रास झालेला आहे म्हणून तक्रारदार त्यांचेकडून खालील प्रमाणे रक्कम वसूल करण्यास पात्र आहेत.
1. प्रवास खर्च रु.5,000/-
2. शारीरिक व मानसिक त्रास रु.25,000/-
3. कर्ज न मिळाल्यामुळे झालेले नूकसान रु.50,000/-
4. तक्रारीचा खर्च रु.10,000/-
----------------------
एकूण रु.90,000/-
-----------------------
विनंती की, सामनेवाला यांनी तक्रारदारांना तात्काळ बेबाकी प्रमाणपत्र व मिळकती वरील बोजा उतरविल्याचे पत्र देण्या बाबत आदेश व्हावेत, तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे रक्कम रु.,90,000/- योग्य व्याजासह देण्या बाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 व 3 हे वकिल श्री.लक्ष्मीनारायण माधवराव काकडे यांचे मार्फत दि.07.07.2011 रोजी हजर झाले. त्यांनी त्यांचा खुलासा ग्राहक संरक्षण कायदयातील तरतुदीनुसार वेळेत सादर केला नाही. म्हणून त्यांचे विरुध्द खुलाशाशिवाय तक्रार चालविण्याचा निर्णय दि.30.08.2011 रोजी जिल्हा मंचाने घेतला. सामनेवाला क्र.2 यांचे नोटीसची बजावणी होऊन पोहच पावती बजावणी न झाल्याने त्यांचे पाकीट पोहच पावतीसह परत आलेले नाही. त्या बाबत तक्रारदाराने कोणतीही तजविज केलेली नाही.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, यांचे सखोल वाचन केले.
तक्रारदाराचे विद्वान वकील श्री.डबडे यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील सर्व कागदपत्रे पाहता तक्रारदारांनी सामनेवाला कडून घेतलेल्या कर्जाची पूर्ण परतफेड केलेली आहे. त्यांची खातरजमा करुन उपनिंबंधक, सहकारी संस्था बीड यांनी दि.28.07.2010 रोजी तक्रारदाराच्या तक्रार अर्जावरुन सामनेवाला क्र. 1 व 3 यांना कर्ज निरंक झाले असल्याने तिन दिवसांचे आंत प्रमाणपत्र देण्या बाबत कळविले आहे. तरी सुध्दा सामनेवाला यांनी तक्रारदारांना बेबाकी प्रमाणपत्र दिलेले नाही. प्रकरणात खुलासाही दाखल केलेला नाही किंवा तक्रारदाराच्या तक्रारीला आव्हानही दिलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराचे वरील म्हणणे ग्राहय धरण्या पलिकडे न्याय मंचाला पर्याय नाही. त्यामुळे सामनेवाला क्र.1 व 3 यांनी तक्रारदारांना बेबाकी प्रमाणपत्र व 7/12 उता-यावरील कर्जाचा बोजा उतरविल्याचे प्रमाणपत्र देण्याची त्यांची जबाबदारी असताना ते न देऊन दयावयाचे सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते.
तसेच कर्ज बेबाकी होऊन बेबाकी प्रमाणपत्र न मिळाल्याने तसेच 7/12 उतारा-यावरील बोजा कमीन झाल्याने निश्चितच तक्रारदारांना मानसिक त्रास झालेला आहे.त्यामुळे सामनेवाला क्र.1व 3 यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.3,000/- व तक्रारीचा खर्च रु.3,000/- देणे उचित होईल असे न्यायमंचाचे मत आहे. तक्रारीत तक्रारदारांनी प्रवास खर्च रु.5,000/- व कर्ज न मिळाल्यामुळे झालेले नूकसान रु.50,000/- ची मागणी केलेली आहे परंतु या बाबत तक्रारीत कर्ज मागणी बाबतचा कोणताही उल्लेख नाही तसेच प्रवास खर्चा बाबत कोणताही पुरावा नाही. त्यामुळे तकारदाराच्या सदरच्या मागण्या मंजूर करणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. सामनेवाला क्र.1 व 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना कर्ज बेबाकी प्रमाणपत्र व त्यांची 7/12 उता-यावरील कर्ज बोजा कमी करण्याचे पत्र आदेश प्राप्तीपासुन त्वरीत दयावे.
3. सामनेवाला क्र.1 व 3 यांना आदेश देण्यात येतो की, तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रु.3,000/- (अक्षरी रु.तिन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रु.3,000/- (अक्षरी रु. तिन हजार फक्त) दयावेत.
4. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20 (3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड