जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ग्राहक तक्रार क्रमांक : 303/2010. तक्रार दाखल दिनांक : 19/05/2010. तक्रार आदेश दिनांक : 29/04/2011. श्री. कमलाकर श्रीधरपंत देशमुख, वय 65 वर्षे, व्यवसाय : सेवानिवृत्त, रा. 105/68, उमा नगरी, मुरारजी पेठ, सोलापूर. तक्रारदार विरुध्द 1. ना. विजयसिंहजी मोहिते पाटील नागरी सह. पतसंस्था मर्यादीत, कुर्डुवाडी, शाखा - टेळे कॉम्प्लेक्स, शिंदे चौक, सोलापूर. (नोटीस/समन्स मॅनेजर यांचेवर बजावण्यात यावे.) 2. श्री. संतोष जनार्दन नवले, वय सज्ञान, व्यवसाय : चेअरमन, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर. 3. श्री. शंकर चतुर्भूज नवले, वय सज्ञान, व्यवसाय : संचालक, रा. सदर. 4. श्री. नानासाहेब बाजीराव नवले, वय सज्ञान, व्यवसाय : संचालक, रा. सदर. 5. श्री. परमेश्वर छगन गुंजाळ, वय सज्ञान, व्यवसाय : संचालक, रा. सदर. 6. श्री. काशीम दशरथ गुंजाळ, वय सज्ञान, व्यवसाय : संचालक, रा. सदर. 7. श्री. सुधीर दामू हनवते, वय सज्ञान, व्यवसाय : संचालक, रा. सदर. 8. श्री. सदाशिव सखाराम शेलार, वय सज्ञान, व्यवसाय : संचालक, रा.सदर. विरुध्द पक्ष गणपुर्ती :- सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार, सदस्य सौ. संजीवनी एस. शहा, सदस्य तक्रारदार यांचेतर्फे अभियोक्ता : पी.पी. कुलकर्णी विरुध्द पक्ष क्र. 1 यांचेतर्फे अभियोक्ता : एल.ए. गवई विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांचेतर्फे अभियोक्ता : डी.पी. बागल आदेश सौ. संगिता एस. धायगुडे, अध्यक्ष यांचे द्वारा :- 1. प्रस्तुत तक्रारीमध्ये तक्रारदार यांनी उपस्थित केलेला विवाद थोडक्यात असा आहे की, ते शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतर त्यांना प्राप्त भविष्य निर्वाह निधी व उपदान रकमा विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेमध्ये गुंतवणूक केल्या आहेत आणि त्याचा तपशील खालीलप्रमाणे :- ठेव तपशील | रक्कम | पावती क्रमांक | गुंतवणूक तारीख | मुदत संपण्याची तारीख | व्याज दर | मुदत ठेव पावती | 1,00,000 | 000835 | 26/2/09 | 26/3/10 | 14 टक्के | मुदत ठेव पावती | 1,00,000 | 000834 | 26/2/09 | 26/3/10 | 14 टक्के | मुदत ठेव पावती | 35,000 | 000848 | 26/2/09 | 26/3/10 | 14 टक्के | आवर्तक ठेव | 2,000 | 19 | 27/4/09 | -- | -- |
2. तक्रारदार यांना कुटुंबासाठी व औषधोपचाराकरिता ठेव रकमेची आवश्यकता होती आणि मुदतीनंतर तक्रारदार यांनी ठेव रक्कम व्याजासह मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे. तक्रारदार यांना त्यांच्या औषधोपचाराकरिता ठेव रकमेची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी प्रस्तुत तक्रार दाखल केलेली आहे आणि विरुध्द पक्ष यांच्याकडे गुंतवणूक केलेली ठेव रक्कम व्याजासह मिळावी आणि शारीरिक व मानसिक त्रासापोटी अनुक्रमे रु.10,000/- व तक्रार खर्चापोटी रु.5,000/- मिळावेत, अशी विनंती केलेली आहे. 3. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी रेकॉर्डवर म्हणणे दाखल केले असून तक्रार अमान्य केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी दि.17/9/2009 रोजी ठेव पावती क्र.835, रु.1,00,000/- वर रु.50,200/- ओ.डी. कर्ज घेतले असून सदर पावती कर्जास तारण आहे. तसेच तक्रारदार यांनी ठेव पावती क्र.848 वर दि.8/4/2009 रोजी रु.10,500/- कर्ज उचलले आहे. जोपर्यंत कर्जाची परतफेड होत नाही, तोपर्यंत ठेव रक्कम परत करता येत नाही. तक्रारदार यांनी विश्वासाने ठेव पावती नंतर आणून देतो, तोपर्यंत त्यांच्या पावती क्र.434 वरील ठेव रक्कम रु.1,00,000/- त्यांच्या बचत खात्यास वर्ग करुन घेतली आणि त्यापैकी रु.60,000/- काढण्यात आले आहेत. तक्रारदार यांनी त्यांना ठेव पावती क्र.835 अद्यापि परत केली नाही. शेवटी त्यांनी तक्रार खर्चासह रद्द करण्याची विनंती केली आहे. 4. विरुध्द पक्ष क्र. 3 ते 8 यांना मंचाच्या नोटीसची बजावणी होऊनही ते गैरहजर राहिले आहेत आणि त्यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या विरुध्द एकतर्फी चौकशीचे आदेश करण्यात आले. 5. तक्रारदार यांची तक्रार, विरुध्द पक्ष यांचे म्हणणे व त्यांनी दाखल केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करता, निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होत आहेत. मुद्दे उत्तर 1. विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना त्रुटीयुक्त सेवा दिली आहे काय ? अंशत: 2. तक्रारदार ठेव रक्कम मिळविण्यास पात्र आहेत काय ? होय. 3. काय आदेश ? शेवटी दिल्याप्रमाणे. निष्कर्ष 6. मुद्दा क्र. 1 ते 3 :- तक्रारदार यांनी आपल्या तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या सोलापूर शाखेमध्ये मासिक व्याज प्राप्ती ठेव पावतीद्वारे रक्कम गुंतविल्याचे रेकॉर्डवर दाखल पावत्यांवरुन निदर्शनास येते आणि त्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांना कौटुंबिक कारणास्तव व औषधोपचाराकरिता ठेव रकमेची निकड भासल्यामुळे मुदतीनंतर ठेवीची मागणी केली असता रक्कम देण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे, अशी तक्रारदार यांची प्रमुख तक्रार आहे. 7. तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष क्र.1 पतसंस्थेच्या सोलापूर शाखेमध्ये ठेवीद्वारे रक्कम गुंतवणूक करुन वित्तीय सेवा घेतलेली आहे. ठेव रक्कम मुदत संपल्यानंतर परत करणे, ही विरुध्द पक्ष यांची करारात्मक जबाबदारी व कर्तव्य आहे. परंतु विरुध्द पक्ष क्र.1 व 2 यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार यांनी दि.17/9/2009 रोजी ठेव पावती क्र.835, रु.1,00,000/- वर रु.50,200/- ओ.डी. कर्ज व ठेव पावती क्र.848 वर दि.8/4/2009 रोजी रु.10,500/- कर्ज उचलले असून जोपर्यंत कर्जाची परतफेड होत नाही, तोपर्यंत ठेव रक्कम परत करता येत नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. तसेच तक्रारदार यांनी विश्वासाने ठेव पावती नंतर आणून देतो, तोपर्यंत त्यांच्या पावती क्र.434 वरील ठेव रक्कम रु.1,00,000/- त्यांच्या बचत खात्यास वर्ग करुन घेतली आणि त्यापैकी रु.60,000/- काढण्यात आल्याचे आणि तक्रारदार यांनी त्यांना ठेव पावती क्र.835 अद्यापि परत केली नसल्याचे त्यांनी नमूद केले आहे. 8. तक्रारदार यांनी ठेव पावतीवर कर्ज घेतल्याविषयी विवाद नाही. तक्रारदार यांनी ठेव रकमेची मागणी केलेली आहे. त्यामुळे कर्ज रक्कम वसूल करुन ठेवीची उर्वरीत रक्कम मिळविण्यास तक्रारदार हक्कदार ठरतात. विरुध्द पक्ष यांनी उर्वरीत ठेव रक्कम परत न करुन सेवेमध्ये त्रुटी केल्याचे स्पष्टपणे दिसून येते. शेवटी आम्ही खालील आदेश देत आहोत. आदेश 1. विरुध्द पक्ष 1 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांनी कर्ज घेतलेल्या तारण ठेव पावत्याच्या मूळ रकमेतून व त्यावरील देय व्याज रकमेतून देय कर्जाची रक्कम वसूल करुन उर्वरीत रक्कम या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावी. तसेच ज्या पावत्या कर्जासाठी तारण नाहीत, त्या ठेव पावत्यांची रक्कम ठेव तारखेपासून द.सा.द.शे. 14 टक्के व्याज दराने या आदेशाच्या प्राप्तपासून तीस दिवसाचे आत द्यावी. 2. विरुध्द पक्ष 1 ते 8 यांनी वैयक्तिक व संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना तक्रार खर्चापोटी रु.1,000/- या आदेशाच्या प्राप्तीपासून तीस दिवसाचे आत द्यावेत. (सौ. संगिता एस. धायगुडे÷) अध्यक्ष (सौ. प्रतिभा प्र. जहागिरदार) (सौ. संजीवनी एस. शहा) सदस्य सदस्य जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सोलापूर. ----00---- (संविक/स्व/28411)
| [HONABLE MRS. Pratibha P. Jahagirdar] MEMBER[HONABLE MRS. Sangeeta S. Dhaygude] PRESIDENT[HONABLE MRS. Sanjeevani S. Shah] MEMBER | |