hri Vikas Balso Kadam filed a consumer case on 30 Jun 2015 against Vijay Seeds Co. Ltd in the Satara Consumer Court. The case no is cc/14/217 and the judgment uploaded on 31 Aug 2015.
सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार क्र. 217/2014.
तक्रार दाखल दि.26-12-2014.
तक्रार निकाली दि. 30-6-2015.
श्री.विकास बाळासो.कदम,
रा.चितळी, ता.खटाव, जि.सातारा. .... तक्रारदार
विरुध्द
1. विजय सिडस् कंपनी लि.तर्फे-
मुख्य व्यवस्थापक,
ए-9/17, नवीन एम.आय.डी.सी.
जालना 431 203, जि.जालना, महाराष्ट्र.
2. दि खानापूर तालुका खरेदीविक्री संघ लि. विटा-
तर्फे- प्रोप्रा. आण्णा विठोबा जानकर,
रा.दि खानापूर तालुका खरेदीविक्री संघ लि.
विटा, ता.खानापूर, जि.सांगली. .... जाबदार
तक्रारदारातर्फे –अँड.ए.आर.कदम.
जाबदारातर्फे- अँड.ओ.एस.तिपोळे.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.श्री.श्रीकांत कुंभार, सदस्य, यानी पारित केला
1. तक्रारदाराने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार जाबदारांविरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदारांचे तक्रारीचा थोडक्यात आशय खालीलप्रमाणे-
तक्रारदार हे चितळी, ता.खटाव, जि.सातारा येथील रहिवासी असून ते व्यवसायाने प्रगतीशील शेतकरी आहेत. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय शेती आहे. मौ.चितळी, ता, खटाव, जि.सातारा येथे तक्ररदारांच्या मालकीची खालील वर्णनाची शेतजमीन आहे-
अ.क्र. | गट क्र. | क्षेत्र हे. आर. | आकार रु. पै. |
1 | 2703 | 5 81 0. 40 पोटखराब
एकूण -6.21 | 3. 75 |
वरीलप्रमाणे शेतमिळकत असून वरील वर्णनाच्या शेतमिळकतीमध्ये तक्रारदारांचा 4 आणे हिस्सा आहे म्हणजेच एकूण शेतमिळकतीपैकी 1 हेक्टर 45 आर जमीन तक्रारदाराचे हिश्श्याला आहे. यामध्ये तक्रारदारानी सन 2014 चे सालासाठी कांदयाचे पिक घेणेचे ठरवले.
यातील जाबदार हे विजय सिडस कंपनी लि. जालना या नावाने वेगवेगळया पिकांचे बियाणे निर्माण करणारी कंपनी असून ते बि बियाणे संपूर्ण महाराष्ट्रात जाबदार त्यांचे अधिकृत विक्रेते/डिलरमार्फत विक्री करतात. जाबदार क्र.2 हे जाबदार क्र.1 यांनी उत्पादित केलेल्या बि बियाणांची विक्री करणारे अधिकृत विक्रेते आहेत. यातील तक्रारदार हे कांदा उत्पादनाचे बाबतीत 10 ते 15 वर्षापासून माहितगार शेतकरी आहेत. लागवडीपासून ते काढणीपर्यंत या पिकाच्या दर्जेदार उत्पादनाबाबत त्याना पूर्वानुभव आहे. यासाठी तक्रारदारानी सन 2014 साली त्यांच्या वर नमूद शेतमिळकतीमध्ये 1 हेक्टर क्षेत्रावर कांदा लागवडीचे ठरवले व दि.11-7-2014 रोजी जाबदार क्र.2 यांचेकडून कांदा नाशिक लाल 3 जातीचे जाबदार क्र.1 यानी उत्पादित केलेले प्रतिपॅक 500 कि.ग्रॅ. च्या 10 बॅगा प्रतिबॅग रु.700 प्रमाणे एकूण रु.7000 चे कांदा बियाणे खरेदी केले. विषयांकित शेतमिळकतीवर मेहनत मशागत तयार करुन ठेवलेल्या जमीनीमध्ये त्यांनी वरील कांदा बियाणांची पेरणी केली, त्यासाठी तक्रारदारानी एकूण 6 ट्रॉल्या शेणखत, प्रति ट्रॉली रु.4000 प्रमाणे रु.24,000 चे शेणखत घालून त्याठिकाणच्या स्थानिक पध्दतीने कांदा बियाणांची विस्कटून पेरणी दि.17-7-2014 रोजी केली. लागवणीनंतर सदर पिक जमिनीतून 4 बोटे ऊंच उगवून आले व जाबदारांचे प्रतिनिधींचे मार्गदर्शनाप्रमाणे व तक्रारदारांचा कांदा उत्पादनाचा अनुभव यास अनुसरुन तक्रारदारानी वेळोवेळी गरजेनुसार खते, औषधे फवारणी केली. या सर्व कारणास तक्रारदाराना रु.42,750/- इतका खर्च आला. जाबदार क्र.1 यांचे माहितीपत्रकाप्रमाणे व जाबदार क्र.2 यांनी दिलेल्या तोंडी माहितीप्रमाणे तक्रारदारानी कांदा पिकास वापरलेल्या बियाणांपासून उत्पादित होणारा कांदा हा चांगली वाढ होऊन रंगाने पूर्ण लालसर दिसेल व एकरी साधारण 8 ते 9 टन उत्पादन निघेल याचा विश्वास यातील जाबदारानी तक्रारदाराना दिलेला होता. परंतु प्रत्यक्षात जाबदारानी तक्रारदाराना दिलेल्या विश्वासाप्रमाणे तक्रारदारांच्या कांदा पिकाची वाढ व्यवस्थित झाली नाही याची कल्पना तक्रारदारानी जाबदार क्र.1 व 2 याना फोनवरुन कळविली व जाबदार क्र.2 याना प्रत्यक्ष भेटून सांगितले. त्यावेळी जाबदार क्र.1 यानी त्यांचा प्रतिनिधी येऊन पहाणी करुन जाईल असे सांगितले. परंतु प्रत्यक्षात जाबदार क्र.1 व 2 याना वारंवार फोनवरुन संपर्क साधूनही शेवटपर्यंत जाबदार क्र.1,2 किंवा त्यांच्या अधिकृत प्रतिनिधीने तक्रारदाराचे शेतावर कांदा पिकाची पहाणी केली नाही. त्यामुळे नाईलाजाने दि.10-10-2014 रोजी तालुका कृषी अधिका-यांना कांदा पिकाची परिस्थिती सांगून पेरणीसाठी वापरलेले बियाणे दोषयुक्त असलेबाबत तक्रारदारानी तक्रारअर्ज दाखल केला. या तक्रारीस अनुसरुन सातारा जिल्हा परिषद कृषी विभागाने जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचे सचिव तथा मोहिम अधिकारी यांनी तक्रारदार व जाबदारांना नोटीस काढली व तालुका कृषी अधिका-यांचे कमिटीने दि.28-10-2014 रोजी कांदा पिकाची पहाणी केली व दोन पंचाचे समक्ष कांदा पिकाचा पंचनामा केला. निरनिराळया ठिकाणची रोपे तपासली परंतु तक्रारदारांचे कांदा पिकाची वाढ झालेली नसलेचे सदर कृषी अधिका-याना आढळून आले व हे सदोष विषयांच्या वापरामुळे झालेचे कृषी कमिटीचे समोर स्पष्ट झाले. या पहाणीवेळी कांदा पिकाचे प्लॉटवर बियाणे तक्रार समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय कृषी अधिकारी, सातारा तालुका कृषी अधिकारी, खटाव, सदस्य सचिव तथा कृषी अधिकारी पंचायत समिती खटाव, तंत्र अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी सातारा, तक्रारदार स्वतः व जाबदार क्र. 2 हे सर्व हजर होते व त्यांचे उपस्थितीतच वरील कांदा पिक तपासणी/पहाणी झाली. या पीक पहाणीपूर्वी पीक पहाणी करणेस उपविभागीय कृषी अधिकारी सातारा याना जाबदार क्र.1 यांचे प्रतिनिधीस फोनवरुन पिक पहाणी करणेस हजर रहाणेस सांगितले होते तथापि जाबदार क्र.1 स्वतः किंवा त्यांचा कोणीही प्रतिनिधी कांदा पीक पहाणी करणेस उपस्थित नव्हता. कृषी कमिटीचा पिक पहाणी अहवाल जिल्हा बियाणे तक्रार समितीने प्रकरणी सादर केलेला असून अहवालामध्ये तक्रारदारानी वापरलेल्या कांदयाचे बियाणे सदोष असलेमुळे कमी प्रतीचा कांदा (छोटा कंद स्वरुपात)निर्माण झाला आहे असा निष्कर्ष काढणेत आला आहे, त्यामुळे तक्रारदाराना जाबदाराकडून बियाणे घेऊन पेरणी केलेल्या कांदा पिकाचे उत्पन्नात 80 ते 90 टक्के घट झाली आहे. निघालेले 10 ते 15 टक्के कांदा उत्पादन हे निकृष्ट प्रतीचे असलेने बाजारात ते खपले नाही त्यास ग्राहक न मिळाल्याने ते तसेच शेतात पडून आहे. उत्पादित झालेले कांदे लालसर दिसत नसून वेगवेगळया वाणाचे व आकाराने लिंबासारखे दिसतात. या बाबी तक्रारदारानी फोनवरुन जाबदार 1 व 2 यांना सांगितल्या होत्या व आहेत. त्यामुळे तक्रारदार हे यातील जाबदारानी त्यांना सदोष बियाणे पुरवून त्यांच्या नुकसानीस कारणीभूत ठरलेमुळे व तक्रारदाराना सदोष सेवा दिलेमुळे तक्रारदारानी मे. मंचात तक्रार दाखल करुन जाबदाराकडून नुकसानभरपाई मिळावी अशी विनंती मे.मंचाला केली आहे. जाबदारानी विषयांकित कांदा पिकाच्या उत्पादनातून मिळणा-या प्रति एकरी उत्पादनाची दिलेली हमी पहाता तक्रारदारांच्या 1 हेक्टर क्षेत्रात 20 टन उत्पन्न येणे आवश्यक होते परंतु जाबदारानी तक्रारदाराना दिलेल्या सदोष बियाणामुळे रक्कम रु.3,00,000/-पेक्षा अधिक उत्पन्नास मुकावे लागले. सन 2013-2014 मध्ये चितळी परिसरात याच कांदयाचा भाव हा रु.15 ते 18 प्रतिकिलो म्हणजे प्रतिटन रु. 15,000/- ते रु.18,000/- या दरम्यान होता. त्यामुळे तक्रारदाराना जाबदाराकडून वैयक्तिक व संयुक्तीकरित्या कांदा पिकाच्या नुकसानीपोटी रु.3,00,000/- व त्यावर द.11-7-2014 पासून प्रत्यक्ष रक्कम हाती पडेपर्यंतचे द.सा.द.शे. 18% व्याजाने होणारी संपूर्ण रक्कम मानसिक, शारिरीक त्रासापोटी रु.1,00,000/-, अर्जाचा खर्च रु.20,000/- जाबदाराकडून मिळणेबाबतची विनंती मे. मंचास केली आहे.
2. तक्रारदारानी प्रकरणी नि.1 कडे तक्रारअर्ज व नि.2 कडे त्याचे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, नि.4 कडे वकीलपत्र, नि.5 कडे पुराव्याची एकूण 16 कागदपत्रे त्यात, नि.5/1 कडे तक्रारदारांच्या जमिनीचा खाते उतारा, नि.5/2 कडे गावकामगार तलाठी चितळी कडील सातबाराचा उतारा, नि.5/3 कडे गावकामगार तलाठी चितळी यांचा पिक पहाणी अहवाल दाखला, नि.5/4 ते 5/13 कडे कांदा पिकावर फवारण्यांची औषधांची बिले, नि.5/14 कडे गटविकास अधिकारी वडूज याना दिलेले तक्रारअर्जाची स्थळप्रत, नि.5/17 कडे तालुका कृषी अधिकारी वडूज याना दिलेल्या तक्रारअर्जाची प्रत, नि.5/16 कडे उपविभागीय कृषी अधिकारी यानी तक्रारदाराना विषयांकित कांदा पीक तपासणी अहवाल, नि.23 कडे राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली रि.अ.नं.1227/04 मधील न्यायनिवाडे, नि.18 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र इ. कागदपत्रे प्रकरणी दाखल केली आहेत.
3. प्रस्तुत तक्रारीची नोटीस रजि. पोस्टाने यातील जाबदार क्र.1 व 2 याना पाठवणेत आली. सदर नोटीस जाबदार क्र.1 व 2 याना मिळाली, त्याच्या पोस्टाच्या पोहोचपावत्या प्रकरणी नि.8/1 कडे दाखल आहेत. पैकी जाबदार क्र.1 यानी नि.13 कडे त्यांचे वकीलपत्र, नि.11 कडे महत्वाची कागदपत्रे, नि.15 कडे कैफियत, नि. 16 कडे नि.15 चे पृष्टयर्थ प्रतिज्ञापत्र, नि.21 कडे पुराव्याची एकूण दोन कागदपत्रे, नि.21/1 कडे स्टेटमेंट, नि.21/2 कडे स्टेटमेंट 1, नि.24 कडे लेखी युक्तीवाद, नि.25 कडे पुराव्याचे प्रतिज्ञापत्र, नि.27 कडे नि.27/1 कडे अपील क्र.1857/2007, 1139/2009, क्र.1475/2007 मा.राज्य आयोग मुंबई यांचा न्यायनिर्णय, नि.27/4 कडे परिपत्रक, नि.27/5 कडे डॉ.लवांडे यांचा कांदा पिकावरील लेख, नि.27/6 कडे मा.राष्ट्रीय आयोग दिल्ली यांचा II (2007)CPJ 145(NC) यांचा न्यायनिवाडा इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
4. जाबदार क्र.1 यांची नि.15 कडील कैफियत व नि.25 कडील पुराव्याचे प्रतिज्ञापत्र अभ्यासले असता त्यानी तक्रारदारांच्या तक्रारीस खालीलप्रमाणे आक्षेप नोंदलेले आहेत. तक्रारदारांची तक्रार मान्य नसून अर्जास कारण घडलेले नाही. विषयांकित कांदा बियाणे खरेदी केले इतकाच मजकूर मान्य आहे. तक्रारदारानी कांदा पिकाचे उत्पादन करणेसाठी तक्रारीत मांडलेचा खर्च मान्य नाही. विषयांकित कांदा बियाणाच्या लागवडीपासून आठ ते नऊ टन किंवा नेमके किती उत्पन्न मिळेल हे तक्रारदाराना सांगितले नव्हते. कृषी अधिकारी तपासणी/पहाणी कमिटीचा अहवाल मान्य नाही. दि.28-10-2014 चा पंचनामा मान्य नाही. जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचा बियाणे सदोष होते असा निष्कर्ष खोटा व चुकीचा असलेने प्रस्तुत जाबदाराना मान्य व कबूल नाही. तक्रारदार शेतक-याने खरीप हंगामामध्ये कांदा लागवड केली परंतु ती बियाणापासून रोपे तयार करुन लावली नाहीत, साधारणतः कांदा पिक तयार होणेस 145 ते 155 दिवस लागतात. वरीलप्रमाणे तक्रारदाराने कांदापीक पेरणीद्वारे पेरले व त्यामुळे सदर कांदा पिकाची पहाणी 100 दिवस पूर्ण झाली असताना झाली असलेने त्यावेळी काढलेचे निष्कर्ष हे पूर्णतः चुकीचे येतात. या काळात कांदयाला रंग, पूर्ण वाढ व परिपक्वता आलेली नसते. 1 हेक्टर क्षेत्रास 10 किलो कांदा बियाणे आवश्यक असते. परंतु प्रत्यक्षात तक्रारदारानी 5 किलो कांदा बी वापरलेले आहे व हे प्रमाण नियमानुसार नाही. तक्रारदारांच्या सात बारा उता-यावर कांदा पिक केलेची नोंद नाही. अशा परिस्थितीत कृषी अधिकारी वडूज यानी दिलेला पिक पहाणी अहवाल खोटा व बनावट आहे. तक्रारदाराना या जाबदारानी कोणतीही सदोष सेवा दिलेली नाही. तक्रारदारानी खोटा अर्ज दाखल केला आहे वरील आक्षेप असलेने तक्रारदारांचा अर्ज फेटाळणेत यावा असे आक्षेप जाबदारांनी तक्रारदारांचे तक्रारीस नोंदवलेले आहेत.
यातील जाबदार क्र.2 यानी त्यांचा वकील प्रतिनिधी न नेमता त्यानी प्रकरणी नि.9 कडे अर्जाने हजर होऊन जाबदार क्र.1 यानी दिलेली कैफियत हीच जाबदार क्र.2 यांची कैफियत म्हणून वाचणेत यावी असा अर्ज दाखल केला. त्यामुळे जाबदार क्र.1 व 2 यांची एकच कैफियत व आक्षेप असल्याचे दिसून येते त्यामुळे जाबदार क्र.1 व 2 एकत्रित आक्षेपांचा विचार करणेत आला.
5. तक्रारदारांची तक्रार, पुराव्याची कागदपत्रे व जाबदारांची सर्व पुराव्याची कागदपत्रे, त्यांच्या कैफियतीतील सर्व आक्षेप यांचा विचार करता आमचेसमोर सदर प्रकरणाचे निराकरणार्थ खालील मुद्दे उपस्थित होतात-
अ.क्र. मुद्दा निष्कर्ष-
1. तक्रारदार हा जाबदारांचा ग्राहक आहे काय? होय.
2. जाबदारानी तक्रारदारांना सदोष कांदा बियाणांची विक्री करुन
त्यांना हमी दिलेप्रमाणे प्रत्यक्षात पिक उत्पादनास तक्रारदाराना
मुकावे लागून त्यांचे उत्पन्न बुडाले, या कृतीमुळे जाबदारानी
तक्रारदारास सदोष सेवा दिली आहे काय? होय.
3. जाबदारांनी त्यांचे आक्षेप पुराव्यानिशी शाबित केले आहेत काय? नाही.
4. तक्रारदार हा त्याच्या मागणीप्रमाणे कांदा उत्पादनाचे
नुकसानीसाठी जाबदाराविरुध्द नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहे काय? होय.
5. अंतिम आदेश काय? तक्रार अंशतः मंजूर.
6. कारणमीमांसा- मुद्दा क्र.1 ते 5
6.1 सदर तक्रारीचा वर नमूद थोडक्यात सारांश पाहिला व तक्रारदारानी नि.5/1 कडे दाखल केलेला गाव चितळी, ता.खटाव, जि.सातारा येथील गट क्र.2703च्या जमिनीचा खाते उतारा व नि.5/6 कडे दाखल केलेला वरील गट नंबरचा सातबाराचा उतारा व त्यावरील नोंदी पाहिल्या असता सदर गटावर 5 हेक्टर 1 आर + पोट खराब 0.40 आर अशी एकूण 6 हेक्टर 21 आर जमीन असून तक्रारदारांचा त्यामध्ये 64 आण्याचा हिस्सा असून तिचा धारक मालक कब्जेवहिवाटदार तक्रारदार आहे हे नि.5/1 कडील दाखल धारणा जमीन (खाते उतारा)नोंदीवरुन शाबित होते म्हणजेच तक्रारदार हा शेतकरी असून त्याचे खात्यावर वरील गटातील नावे असलेली 1 हेक्टर 45 आर जमीन स्वतः कसतो त्यामुळे तो शेतकरी असल्याचे निर्विवादरित्या शाबित होते.
6.2- तक्ररदारानी त्यांच्या वर नमूद शेतमिळकतीमध्ये नाशिकलाल 3 या प्रकारचे कांदा पिकाचे उत्पादन घेणेचा उद्देश डोळयासमोर ठेवून खरील हंगामामध्ये पेरणी करावयाच्या या पिकासाठी त्यांच्या शेतमिळकतीमध्ये नांगरण वगैरे करुन कांदा पिकास आवश्यक त्याप्रमाणे जमीन तयार करुन घेतली, त्यामध्ये पूर्वीचे 2 ट्रॉली शेणखत व जादा 6 ट्रॉल्या शेणखत किंमत रु.20,000/- घातले व जमीन कांदा पिकास पेरणी योग्य झालेवर यातील जाबदार क्र.1 यांनी उत्पादित केलेली व या उत्पादित बियाणांचे अधिकृत विक्रेते जाबदार क्र.2 कडून एकूण 500 ग्रॅमची 10 पाकिटे दर रु.700/- प्रति बँग याप्रमाणे रु.700/-चे नाशिकलाल 3 या कांदयाचे बियाणे लॉट नं.1118 चे दि.11-3-2014 रोजी खरेदी केले व त्याची पेरणी बियाणे विस्कटून पेरणी करणे या पध्दतीने दि.17-7-2014 रोजी केली. सदर बियाणांचा खरेदीवेळी जाबदार क्र.1 यांचे वतीने जाबदार क्र.2 यानी सदर बियाणांच्या गुणवैशिष्टये तक्रारदारांनी सांगताना सांगितले की, त्याना या बियाणाचे वाणापासून अंदाजे हेक्टरी 20 टन उत्पन्न मिळेल व उत्कृष्ट उच्च प्रतीचा लालसर रंगाचा कांदा उत्पादन होईल असा विश्वास दिलेला होता. या व्यवहारावरुन जाबदार हे सेवापुरवठादार व तक्रारदार हे ग्राहक असे नाते येथे प्रस्थापित होते. त्यामुळे तक्रारदार हे जाबदारांचे ग्राहक असल्याचे निर्विवादरित्या शाबित होते त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी देतो.
6.3- तक्रारदारानी जाबदार क्र.2 यांनी विषयांकित कांदा बियाणाच्या उत्पादकतेबाबत व त्यांच्या निर्दोष निर्भेळपणाबाबत दिलेल्या आश्वासनास अनुसरुन त्यांचे शेतीमध्ये नाशिकलाल 3 कांदा पिकाची पेरणी केलेवर पिकाची उगवण चांगली झाली त्यामुळे तक्रारदारानी त्यावर प्रकरणी दाखल असलेल्या कृषी औषधांच्या पावत्या नि.5/5 ते 5/13 प्रमाणे निरनिराळे कृषी टॉनिक्स व द्रव्यमय खते खरेदी करुन त्याचा वापर पिकावर फवारण्या करुन वेळोवेळी खते, औषधे पुरवलेचे स्पष्ट होते. त्याच्या मूळ पावत्या नि.5/5 ते नि.5/13 कडे दाखल आहेत. त्याचप्रमाणे तक्रारदारानी विषयांकित कांदा पिकासाठी शेणखताचा वापर केला आहे. परिणामी शेतीमध्ये तण उगवते त्यामुळे किमान 3 ते 4 भांगलणी या पिकास करणे आवश्यक असते. ती भांगलण करणे म्हणजे पिकाची आंतरमशागत असते. त्याप्रमाणे याद्वारे तक्रारदारानी त्यांच्या कांदा पिकाची 3 ते 4 भांगलणी करुन आंतरमशागत केलेचे त्यांचे नि.2 चे प्रतिज्ञापत्रावरुन व नि.18 चे पुराव्याचे प्रतिज्ञापत्रावरुन स्पष्ट होते. तक्रारदारानी जाबदाराकडून खरेदी केलेली कांदा बियाणे पेरणीनंतर व्यवस्थित उगवून आलेनंतर जाबदारानी दिलेल्या विश्वासाप्रमाणे प्रत्यक्षात कांदा पिकाची वाढ आजिबात झाली नाही. याबाबत वेळोवेळी तक्रारदारानी फोन करुन पिकाची वस्तुस्थिती कळवली, प्रत्यक्ष भेटून सांगितली त्यावेळी दोन्ही जाबदारानी त्यांचे प्रतिनिधी पाठवून पिक पहाणी करु असे सांगितले परंतु प्रत्यक्षात यातील जाबदारांचा प्रतिनिधी प्रत्यक्ष जागेवर पीक पहाणी करणेस कधीच आला नाही. जाबदारांचे वकीलांनी याबाबत काहीही भाष्य केलेले नाही किंवा ही बाब नाकारलेली नाही. प्रत्यक्षात कांदा पिकाची वाढ सर्व बाबी माती, पाणी, खते, औषधे व द्रवरुप टॉनिक या सर्व बाबी व्यवस्थित असूनही विषयांकित कांदा पिकाची वाढ समाधानकारक नव्हती. कंद लहान आकाराचा व न पोसलेला व रंगहीन असलेचे दिसून आले व 100 दिवसामध्ये एकूण पिक असेच राहिले. त्यामुळे प्रस्तुत बियाणे हे भेसळयुक्त होते, दर्जेदार नव्हते असे स्पष्ट दिसते. तक्रारदारानी याबाबत रीतसर प्रथम गटविकास अधिकारी पंचायत समिती वडूज शेती विभाग यांचेकडे विषयांकित कांदा पिकाची पहाणी करुन नुकसानभरपाई मिळावी असा अर्ज केला, त्याची स्थळप्रत नि.5/14 कडे प्रकरणी आहे. त्यानंतर लगेच नि.5/15 प्रमाणे तालुका कृषी अधिकारी वडूज यानाही अर्ज दिला. या तक्रारीस अनुसरुन सातारा जिल्हा परिषद कृषी विभाग यानी जिल्हा बियाणे तक्रार निवारण समितीचे सचिव तथा मोहिम अधिकारी यानी जाबदाराना नोटीस पाठवली व विषयांकित कांदा पिकाच्या स्थळ पहाणीस येणेबाबत जाबदाराना कळवले. या बियाणे समितीने दि.28-10-2014 रोजी बियाणे तक्रार समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय कृषी अधिकारी सातारा, तालुका कृषी अधिकारी खटाव, सदस्य सचिव तथा कृषी अधिकारी पंचायत समिती खटाव तंत्र अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी सातारा या सर्वानी तक्रारदाराचे कांदा पिकास भेट दिली त्यावेळी यातील जाबदार क्र.2 हे प्रत्यक्ष हजर होते, त्यावेळी दोन पंचांचे समक्ष कांदा पिकाची वेगवेगळया ठिकाणी पहाणी करुन पिकाचा पंचनामा करणेत आला, तो प्रकरणी नि.5/21 कडे आहे. त्यामध्ये स्पष्ट नमूद केले आहे की, 'पिकाची उगवण चांगली आहे, परंतु वाढ कमी आहे, पिकावर किडीचा प्रादुर्भाव नाही, पिकामध्ये इतर पिकाची/वाणाची भेसळ नाही. कांदा पोसलेला आढळून आला नाही. वाढ अत्यंत असमाधानकारक, कांदयाला रंग नाही'. त्यानंतर जाबदार क्र.2 बियाणे विक्रेता यांची साक्ष नि.5/20 कडे आहे. जाबदार क्र.1 उपस्थित नव्हते. तक्रारदार शेतक-यांची साक्ष नि.5/12 कडे आहे व असा एकत्रिंत अहवाल नि.5/16 ते 5/18 कडे बियाणे तक्रार समितीने सादर केला आहे. त्यामध्ये वरील पिक पहाणीची वस्तुस्थिती नमूद केली असून नि.5/17च्या इतिवृत्तामध्ये तक्रारदारांच्या कांदा पिकाची स्थिती वर्णन व निष्कर्ष नोंदविलेले आहेत ते खालीलप्रमाणे-
बियाणे तक्रार समितीचे सर्व सदस्य, तक्रारदार शेतकरी, दोन पंच, जाबदार क्र.2 यांनी विषयांकित कांदा पिकाची पहाणी केली त्यावेळी-
1. कांदा पिकाची वाढ असमाधानकारक.
2. कंद लहान आकाराचा न पोसलेला.
3. कांदा रंगहीन.
4. तणयुक्त प्लॉट.
निष्कर्ष- बियाणे सदोष असल्या कारणने कमी प्रतीचे कांदा उत्पादन झाले आहे.
वरील निरीक्षणावरुन हे स्पष्ट होते की, जाबदारानी फक्त नाशिकलाल 3 या निव्वळ निर्दोष कांदा बियाणांचा पुरवठा केला असता तर किमान तक्रारदारांचे कांदापिकावर भले ते लहान असो त्यावर लालसर रंग नक्कीच आला असता कारण विषयांकित कांदा बियाणापासून उत्पादित होणारा कांदा हा रंगाने लालसरच असतो, परंतु याठिकाणी उत्पादित झालेला कांदा वाणाशी साधर्म्य नसलेला हा रंगहीन व आकाराने लहान असलेचे दिसते म्हणजे यातील जाबदार क्र.1 यांनी त्यांच्या व्यवसायात अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन नाशिकलाल 3 म्हणून उत्पादित केलेले व जाबदार क्र.2 यांनी विक्री केलेले बियाणे हे जाबदारानी नाशिकलाल 3 चे आहे असे भासवून भेसळयुक्त बियाणे तक्रारदारास विक्री केले होते हे निर्विवादरित्या शाबित होते व अशा प्रकारे जाबदारानी तक्रारदाराना नाशिकलाल 3 या वाणाचे कांदा बियाणे असलेचे भासवून भेसळयुक्त बियाणे विक्री करुन परिणामी तक्रारदाराना नुकसान सोसावे लागले यावरुन जाबदारानी तक्रारदाराना सदोष सेवा दिली असल्याचे सुर्यप्रकाशाइतके स्पष्ट होते त्यामुळे मुद्दा क्र.2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
6.4- तक्रारदारांचे तक्रारीस जाबदारानी घेतलेले आक्षेप विचारात घेता जाबदार कथन करतात त्याप्रमाणे जाबदारानी तक्रारदाराना पुरविलेले/विक्री केलेले बियाणे नाशिकलाल 3 या कांदयाच्या वाणाचे असून ते निर्दोष, भेसळयुक्त होते, यासाठी त्यानी पुराव्यासाठी नि.21/1 कडे विजय सिडस् कंपनी- जाबदार क्र.1 यांचे सर्टिफिकेट क्र. V.O 2015-109/4-3-2015 Standard II दाखल केले असून त्यामध्ये लॉट नं.1118 चे कांदा पिकाचे नाशिकलाल 3 या प्रकारचे बियाणे हे बियाणे कायदा 1966 प्रमाणे ज्या गुणवत्तेवर असावे लागते त्याप्रमाणे तयार करुन ते उच्च प्रतीचे व निर्दोष असलेचे खात्री करुन घेतलेले आहे असे स्टेटमेंट आहे, त्यामध्ये लेबल क्र.उगवण क्षमता, उत्पादन क्षमता, तयार करणेची तारीख, मुदत संपलेची तारीख नमूद आहे, परंतु नि.21/1 कडील हे जाबदार क्र.1 चे स्टेटमेंट आहे, परंतु आमचे मते प्रस्तुत बियाणांचा निर्मात्याने विषयांकित वाणाचे कांदा बियाणे विक्रीस ठेवणेपूर्वी The Seeds Act 1966 प्रमाणे जादबारानी विक्री केलेले बियाणे हे योग्य त्या यंत्रणेकडून कायदयाप्रमाणे प्रमाणित करुन घेतलेले नव्हते असे आमचे स्पष्ट मत आहे. ते प्रस्तुत जाबदार बियाणे निर्मात्यानी पुणे येथील किंवा तत्सम कोणत्याही मान्यताप्राप्त प्रयोगशाळेत योग्य व गुणवत्तापूर्ण असलेचे प्रमाणित करुन घेणे आवश्यक होते व आहे व मगच ते ग्राहकासाठी विक्रीस उपलब्ध करुन देणे योग्य झाले असते. प्रस्तुत प्रकरणी विषयांकित कांदा वाण नाशिकलाल 3 हे अशा प्रकारे कायदेशीररित्या प्रमाणित केलेबाबत कोणताही पुरावा किंवा मान्यताप्राप्त प्रयोगशाळेचा दाखला आमचेपुढे जाबदारानी सादर केलेला नाही, त्यामुळे जाबदार क्र.1 यानी उत्पादित केलेले विषयांकित कांदा बियाणे हे भेसळयुक्त सदोष असून दर्जेदार, उच्च प्रतीचे नव्हते हे निर्विवादरित्या शाबित होते व जाबदारांचा आक्षेप खोटा ठरतो हाच महत्वाचा मुद्दा या प्रकरणाचा गाभा आहे कारण मुळातच प्रस्तुत जाबदार हे विषयांकित जाबदाराना पुरविलेले नाशिकलाल 3 कांदा बियाणे कायदेशीररित्या दर्जेदार व निर्भेळ, उच्च प्रतीचे असलेचे शाबित करु शकलेले नाहीत त्यामुळे आम्ही तक्रारदारानी सदर प्रकरणी नि.5/16 ते 5/21 कडील अध्यक्ष बियाणे तक्रार समिती तथा उपविभागीय कृषी अधिकारी सातारा यानी तक्रारदाराचे विषयांकित कांदा वाण नाशिकलाल 3 या पिकाच्या प्रत्यक्ष पहाणीवरुन दिलेला अहवाल आम्हांस अत्यंत विश्वसनीय व स्विकारणेयोग्य वाटतो व वरील पुराव्यावरुन प्रस्तुत जाबदार हे पुराव्यानिशी शाबित करु शकलेले नाहीत की, त्यांनी तक्रारदाराना विकलेले बियाणे दर्जेदार व निर्भेळ होते. विषयांकित बियाणे हे भेसळयुक्त असून गुणवत्तापूर्ण नव्हते हे नि.5/16, नि.5/17 ते 5/21 च्या रेकॉर्डवरील पुराव्यावरुन स्पष्ट होते. जाबदारांचा हाच मूळ आक्षेप नाशाबित झालेने जाबदारानी त्यांच्या कैफियतीत घेतलेले इतर आक्षेप हे आपोआपच रद्दबातल ठरतात कारण ते जाबदारांचे उत्पादित केलेली बियाणे हे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण आहे या मूलभूत विधानावर अवलंबून आहेत. वरील दर्जेदार व गुणवत्तापूर्ण बियाणाच्या सकंल्पनेबाबत मा.राष्ट्रीय आयोग नवी दिल्ली यानी Revi. Pet.No.1227/2004 निकाल दि.19-1-2009 नॅशनल सिडस् कॉर्पोरेशन लि. विरुध्द अब्दुल अजीज मो.इनामदार या न्यायनिवाडयामध्ये बियाणांच्या दर्जेदारपणाबाबत त्यांच्या विक्रीची पध्दत, न्यायनिकष काय असावेत याबाबत उहापोह केला आहे.
The Central Government has enacted The Seeds Act 1966 (hereinafter referred to as the Act for short) with a broad objective to regulate the quality of certain seeds for sale and for matters connected herewith. Under the Act, the procedures and sellers of the seeds are legally bound to get the seeds certified and tested from appropriate laboratories before they are put for sale in the market. Under Section 7 of the Act which reads as under, the producer and distributor company, such as the petitioner, could not sell the seeds unless the same were certified:-
“7. Regulation or sale of seeds of notified kinds or varieties- No person shall, himself or by any other person on his behalf, carry on the business of selling, keeping for sale, offering to sell, bartering or otherwise supplying any seed of any notified kind or variety, unless-
a) such seed is identifiable as to its kind or variety.
b) such seed conforms to the minimum limits of germination and purity specified under clause (a) of section 6,
c) the container of such seed bears in the prescribed manner, the mark or label containing the correct particulars thereof specified under clause (b) of section 6, and
d) he complies with such other requirements as may be prescribed.”
In the present case, the seeds sown have been found to be uncertified by the Laboratory at Pune.
व प्रस्तुत जाबदारानी नि.21/1 कडे दाखल केलेले स्टेटमेंट-2 हे जाबदार क्र.1 यानी तक्रारदाराना पुरविलेले नाशिक तांबडा 3 हे कांदा बियाणाचे वाण अत्यंत चांगले असलेचे प्रमाणपत्र त्यानी स्वतःच दिले आहे परंतु जाबदार क्र.1 यानी तक्रारदाराना विक्री केलेले कांदा बियाणे तक्रारदारास विक्री करणेपूर्वी ते मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून तपासून घेऊन ते निर्दोष व दर्जेदार असलेचा दाखला घेणे आवश्यक होते असा केंद्र सरकारने याबाबतीत अंमलात आणलेल्या The Seeds Act 1966 मधील तरतुदी सांगतात व त्याप्रमाणे जाबदार क्र.1 यानी तक्रारदाराना विक्री केलेले बियाणे हे शासकीय मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून त्यांची विक्री करणेपूर्वी तपासून तसा दाखला घेऊन मगच विक्री केली हे शाबित केलेले नाही वा तसा कोणताही निर्णायक पुरावा मे.मंचात दाखल करुन जाबदारानी त्यांच्या उत्पादित कांदा बियाणांचा दर्जेदारपणा सिध्द केलेला नाही त्यामळेही जाबदार क्र.1 यानी उत्पादित केलेले व जाबदार क्र.2 यानी तक्रारदाराना विक्री केलेले कांदा बियाणे हे भेसळयुक्त होते हे निर्विवादरित्या शाबित होते.
6.5- त्याचप्रमाणे जाबदार हे असा आक्षेप नोंदवतात की विषयांकित कांदा बियाणे हे पूर्णतः तयार होणेस 145 ते 150 दिवस लागतात. प्रस्तुत जाबदार क्र.1 यानी नि.27/5 कडे हरितपाने 2000-01 या मासिकातील डॉ.कि.ए.लवांडे यांचा लेख वरील आक्षेपाचे पृष्टयर्थ जोडला आहे परंतु या लेखाची अधिकृतता कोणती हा प्रश्न पडतो, तरी परंतु त्यांचे पान क्र.101(अ) मधील कथनानुसार कांदयाची काढणी ही कांदा लागवडीपासून 100 ते 110 दिवसात होते, मग भले तो कांदा संबंधित शेतक-याने लेखकाचे पान 195 वरील 'ती पेरुन कांदा लागवड' या सदरात नमूद केलेल्या कोणत्याही पध्दतीने केलेली असो वा कांदा उत्पादन प्रति हेक्टरी 250 ते 300 क्विंटल इतकी येते असे नमूद केले आहे. नि.27/5 कडील डॉ.लवांडे यांचा लेख प्रस्तुत जाबदार क्र.1 याना मान्य आहे व त्यावर ते विसंबून असून सदर लेख जाबदार क्र.1 यांनीच दाखल केला आहे, त्यावरुन पाहिले तर तक्रारदाराचे शेतात पेरलल्या जाबदार क्र.1 यांचे कांदा बियाणापासून अंदाजे 300 क्विंटल उत्पन्न येणेस काहीच हरकत नाही. याठिकाणी तक्रारदाराचे जमिनीचा पोत, उत्पादनक्षमता, तिची सुपीकता याचा विचार करता तक्रारदारांचा संपूर्ण पट्टा हा कांदा उत्पादन करणारा आहे असे दिसते, त्यामुळे कांदा पिकास तक्रारदाराची जमीन पोषक आहे हे प्रथमदर्शनी दिसते. तरीही जमिनीतील सुपीकतेमध्ये थोडा फरक रहाणार हे जरी गृहित धरले तरी जाबदारांचे प्रकरणातील डॉ. लवांडे यांचे लेखातील कांदा उत्पादन हेक्टरी 250 ते 300 क्विंटल होते. प्रत्यक्षात प्रकरणातील नि.5/16 ते 5/21 या दाखल पुराव्यावरुन जाबदार क्र.1 यानी तक्रारदारांना पुरवलेले बियाणे सदोष असून त्याद्वारे कांदा उत्पादन हे दर्जाहीन व टाकाऊ स्वरुपाचा कांदा उत्पादित होण्यामध्ये झाला हे स्पष्ट होते. त्यामुळे वरील उत्पादनातून 50 क्विंटल कांदा उत्पादन सोडले तरी एकूणात किमान 250 क्विंटल कांदयाचे उत्पादनाचे नुकसान तक्रारदारांचे झाले आहे हे निर्विवादरित्या उपलब्ध पुराव्यावरुन शाबित होते. या नुकसानीसोबतच त्यांचे पिकवर्ष वाया गेले. मेहनत, खते, मशागत वाया गेली, त्याचा खर्च वाया गेला या सर्वतोपरी नुकसानीस तक्रारदारास सामोरे जावे लागले हे अत्यंत स्पष्टपणे आम्हांस दिसून आले. प्रस्तुत जाबदारांचा असाही आक्षेप होता की, त्यांनी सन 2014 साली कांदा पिक केले नव्हते परंतु प्रकरणी दाखल असलेल्या नि.5/3 कडील मे.गावकामगार तलाठी, मौ.चितळी, ता.खटाव, यानी दिलेला दाखला पहाता तकारदाराने त्यांच्या मालकीच्या शेतात 2014 साली 1 हेक्टर कांदयाचे पिक घेतले होते हे पूर्णतः शाबित होते. प्रस्तुत पुरावा जाबदारानी नाकारलेला नाही किंवा कृषी अधिका-यांचा तपासणी अहवाल चॅलेंज केलेला नाही व जाबदार क्र.1 हे प्रत्यक्ष पहाणीसाठी कधीही तक्रारदारांचे कांदा पिक उत्पादन स्थळी नोटीस देऊनही आलेले नव्हते व नाही त्यामुळे तक्रारदारानी त्यांची तक्रार पुराव्यानिशी शाबित केली असल्याचे सिध्द होते व प्रस्तुत तक्रारदार त्याच्या मागणीप्रमाणे कांदा उत्पादनाची नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत व प्रस्तुत जाबदारानी त्यांचे आक्षेप पुराव्यानिशी शाबित केलेले नाहीत त्यामुळे मुद्दा क्र.3 चे उत्तर आम्ही नकारार्थी देतो व मुद्दा क्र.4 चे उत्तर आम्ही होकारार्थी देतो.
6.6- जाबदारानी त्यांचे आक्षेपापृष्टयर्थ मा.राज्य आयोग, मुंबई यांचेकडील अपील क्र.1587/2007 महिको सिडस विरुध्द यशवंत वसाटे, अपील क्र.1139/2009 अंकुर सिडस वि. गणेश बालू धांडे, अपील क्र.1475/2007 महिको सिडस् विरुध्द हिराकांत वाडकर व मा.राष्ट्रीय आयोग, नवी दिल्ली यांचेकडील अपील क्र.538/1996 इंडो अमेरिकन हायब्रीड विरुध्द ब्रिजकुमार शंकरराव व इतर इ.न्यायनिवाडे दाखल केले असून आमचे परिक्षणातून असे स्पष्ट झाले आहे की, प्रस्तुत न्यायनिवाडयातील परिस्थिती व प्रस्तुत तक्रारीतील परिस्थिती ही भिन्न स्वरुपाची आहे, शिवाय जाबदारानी त्यांचे आक्षेप ठोस पुराव्यानिशी शाबित केलेले नाहीत. त्यामुळे प्रस्तुत न्यायनिवाडे या प्रकरणी लागू पडत नाहीत हे स्पष्ट होते. त्यामुळे त्याचा विचार मंचाने या प्रकरणी केलेला नाही.
6.7- वरील सर्व कारणमीमांसा पहाता तक्रारदारांनी त्यांची तक्रार जाबदारांचे सर्व आक्षेप खोडून काढून पुराव्यानिशी शाबित केली आहे व तक्रारदारांचे कांदा उत्पादनाचे एकूण 75 ते 80 टक्के नुकसान झालेचे स्पष्ट होते. जाबदारांचे नि.27/5 कडील डॉ.लवांडे यांचे लेखाप्रमाणे जाबदार क्र.1 यानी तक्रारदारास पुरवलेल्या बियाणापासून अंदाजे 250 ते 300 क्विंटल उत्पादन एका हेक्टरमध्ये होते. प्रस्तुत तक्रारदारांचे झालेले कांदा पिकाचे नुकसान अंदाजे 75 ते 80% आहे. त्याचा विचार करता किमान 225 क्विंटल (75%धरुन) उत्पन्नाचे नुकसान झाले आहे असे स्पष्ट होते. याच प्रकरणी नि.27/5 पान क्र.212 वरती जाबदारानी भारतातील प्रमुख बाजारपेठातील कांदयाचे मासिक, घाऊक बाजारभावाचा जानेवारी ते डिसेंबर 1998 चा तक्ता हजर केला. त्यातील कांदा भावाच्या तपशीलाचे अवलोकन केले असता त्यावर्षी नाशिक कांदयाचा सरासरी किमान भाव रु.1300 व कमाल भाव रु.2700/- असलेचा व त्यानंतर कांदा पिकाचे भाव चढेच राहिले आहेत. याचा विचार करता तक्रारदारांचे सरासरी प्रतिक्विंटल रु.1200/- प्रमाणे एकूण 225 क्विंटल उत्पादनाची नुकसानी धरुन एकूण नुकसानी रु.2,70,000/- (रु.दोन लाख सत्तर हजार मात्र) इतकी होते व सदर नुकसानी व त्यावर दि.11-7-2014 पासून द.सा.द.शे.10 टक्के दराने होणारे व्याजासह संपूर्ण रक्कम जाबदाराकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहे, त्याचप्रमाणे शारिरीक मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व अर्जाचा खर्च रु.5,000/- जाबदाराकडून मिळणेस तक्रारदार पात्र आहेत व तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर होणेस पात्र आहे या निष्कर्षाप्रत हा मंच येत आहे.
7. वरील सर्व कारणमीमांसा व विवेचन याना अधीन राहून खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करणेत येत आहेत-
आदेश
1. तक्रारदारांचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे.
2. प्रस्तुत जाबदारानी तक्रारदाराना सदोष व अप्रमाणित भेसळयुक्त कांदाबियाणांची विक्री करुन त्यांना कांदा उत्पादनामध्ये नुकसान होण्यासाठी कारणीभूत होऊन तक्रारदाराना सदोष सेवा दिली असल्याचे घोषित करणेत येते.
3. प्रस्तुत जाबदार क्र.1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या प्रस्तुत तक्रारदारांना कांदा उत्पादनाची 225 क्विंटल कांदयाची प्रतिक्विंटल रु.1200/-प्रमाणे होणारी नुकसानी रु.2,70,000/- (रु.दोन लाख सत्तर हजार मात्र) व त्यावर दि.11-7-14 पासून द.सा.द.शे.10 टक्के दराने होणा-या व्याजासह संपूर्ण रक्कम सदर आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावी.
4. प्रस्तुत जाबदार 1 व 2 यानी वैयक्तिक व संयुक्तीकरित्या तक्रारदाराना शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु.25,000/- व अर्जाचे खर्चापोटी रु.5000/- आदेश प्राप्त झालेपासून 4 आठवडयाचे आत तक्रारदाराना अदा करावेत.
5. यातील जाबदारानी वरील न्यायनिर्णयाची अंमलबजावणी मुदतीत न केलेस प्रस्तुत तक्रारदार हे जाबदाराविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 अन्वये दाद मागू शकतील.
6. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
7. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- सातारा.
दि. 30-6-2015.
(श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.