जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 266/2008. प्रकरण दाखल तारीख - 30/07/2008 प्रकरण निकाल तारीख - 20/09/2008 समक्ष – मा.सतीश सामते - अध्यक्ष (प्र.) मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्य डॉ. सजीवन पि. नारायणराव लखमावार वय 27 वर्षे धंदा, नौकरी, अर्जदार. रा. मयुरनगर, नाईक नगर रोड नांदेड जि. नांदेड. विरुध्द. प्रो. प्रा. विजय मेन्स वेअर दुकान नंबर 12,15 व 14, गैरअर्जदार गुरुनानक मार्केट, नांदेड. अर्जदारा तर्फे वकील - अड. आर. ए. तूप्पेकर गैरअर्जदारा तर्फे वकील - स्वत. निकालपञ (द्वारा - मा.श्री.सतीश सामते, अध्यक्ष (प्र.) ) गैरअर्जदार विजय मेन्स वेअर यांनी अर्जदार यांना दूयम दर्जाचा सूट देऊन फसवणूक केली म्हणून रु.10,000/- नूकसान भरपाई गैरअर्जदाराकडून मिळावी यासाठी हा तक्रार अर्ज दाखल केला आहे. दि.7.6.2006 रोजी गैरअर्जदार यांच्याकडे अर्जदार यांनी चांगल्या कंपनीचा सूट खरेदी केला, त्यांची किंमत रु.4195/- असून पावती नंबर 159 होता. सूटमध्ये एक कोट जाकीट व पन्टचे कापड असा सेट होता. पन्ट ही गैरअर्जदार यांनी शिऊन दिली आहे. सूटची पन्ट ही खरेदी केल्यानंतर 4 -5 दिवसातंच एका वापरामध्ये उसवली. त्यामूळे दि.12.6.2006 रोजी गैरअर्जदार यांना हा सूट चांगल्या दर्जाचा नाही तो उसवला आहे म्हणून बदलून दयावा अथवा किंमत परत करावी अशी विनंती केली पण गैरअर्जदाराने नकार दिला. यानंतर गैरअर्जदाराने आजपर्यत शिवलेला कोट परत केला नाही. अर्जदार यांनी दावा खर्चापोटी रु.2,000/- व सूट बदलून मिळावा किंवा त्यांची किंमत मिळावी अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार हे स्वतः हजर झाले, त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. याप्रमाणे अर्जदार यांनी दि.7.6.2006 रोजी रु.3800/- देऊन सूट व कपडा खरेदी केला. सूट खरेदी करताना अर्जदार यांची कोणताही तक्रार नव्हती. कारण त्यांनी सूट हा ट्रायल घेऊन खरेदी केला होता. सदरचा सूट घेऊन अर्जदार यांनी अंदाजे दोन वर्ष झालेले आहेत व दोन वर्ष त्यांनी सूटचा वापर केलेला आहे व आज तो जूना झालेला आहे. गैरअर्जदारांनी चांगल्या प्रतिचा सूट विक्री केलेला आहे. अर्जदार यांनी पूर्णपणे सूट वापरल्यानंतर आज दूकानामध्ये तो सूट आणून दिलेला आहे. गैरअर्जदार हे सदर सूट संबंधी तक्रार दूर करण्यास तयार आहेत, पण अर्जदार हा सूट घेऊन जात नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचे विरुध्द खोटी तक्रार दाखल केलेली आहे म्हणून ही तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ, तसेच गैरअर्जदार यांनी देखील पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केलेले आहे. दोन्ही पक्षकारांनी केलेला यूक्तीवाद व दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार यांची तक्रार मूदतीत आहे काय आहे. 2. गैरअर्जदाराच्या सेवेत अनूचित प्रकार आहे काय हे अर्जदार सिध्द करतात काय होय. 3. काय आदेश अंतिम आदेशाप्रमाणे. कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी जे विजय मेन्स वेअर चे बिल दाखल केलेले आहे ते दि.6.7.2006 रोजीचे आहे व तक्रार ही दि.31.7.2008 रोजी दाखल करण्यात आलेली आहे. ग्राहक संरक्षण कायदा,1986 प्रमाणे तक्रार ही दोन वर्षात दाखल करायला पाहिजे परंतु येथे साधारणतः एक महिन्याचा विलंब झालेला आहे. व अर्जदार यांचा विलंब माफीचा अर्ज देखील नाही. गैरअर्जदार यांनी आपले म्हणण्यात सूट विक्री केला आहे व तो दोन वर्षे वापरुन तक्रार दाखल केली आहे. असे जरी म्हटले असले तरी मूदतीवीषयी त्यांना कायदयाची माहीती नसल्याकारणाने बहूतेक आक्षेप घेतलेला दिसत नाही. यांच कारणावर ते प्रकरण खारीज होऊ शकले असते परंतु गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी जवाबात अर्जदाराची तक्रार आजही ते दूर करण्यास तयार आहेत असे म्हटल्यामूळे ही तक्रार खारीज न करता गैरअर्जदार यांना सेवेतील ञूटी दूर करण्यास संधी देण्यात येते. सबब या मूददयावर अर्जदार यांचा विलंब माफ करण्यात येऊन हे प्रकरण मूदतीत घेण्यात येते. मूददा क्र. 2 ः- अर्जदार यांनी आपल्या लेखी तक्रार अर्जातील परिच्छेद क्रंमाक 4 मध्ये खरेदी केलेल्या सूटची पन्ट शिऊन आल्यानंतर फक्त एकदाच वापरली असता ती उसवली आहे असे म्हटले आहे. व दि.12.6.2006 रोजी सूट चांगल्या दर्जाचा नाही तो उसवला आहे त्यामूळे बदलून दयावा त्यामूळे गैरअर्जदाराकडे परत केलेला आहे.तसे गैरअर्जदार यांनी बिलाच्या मागे सूट दि.12.6.2006 रोजीला मिळाल्या बददल उल्लेख केलेला आहे. जर तक्रार ही फक्त पन्ट वीषयी असेल तर पूर्ण सूट बदलून देण्यावीषयीची त्यांची मागणी अयोग्य आहे. गैरअर्जदार यांनी आपल्या लेखी म्हणण्यात अर्जदाराने तो सूट दोन वर्ष वापरला आहे व आज ते सूट वापस करुन बदलून मागत आहेत तरी ते तक्रार दूर करण्यास तयार आहेत असे म्हटले आहे, तेव्हा अर्जदार यांच्या सूटवरची पन्ट जी उसवली ती परत व्यवस्थित शिऊन अर्जदार यांना वापस देता येईल. पूर्ण सूटची वीषयीची अर्जदार यांची तक्रार नाही. त्यामूळे पुर्ण सूट बदलून मिळणार नाही. शिवाय कंपनीचा सुट असेल तर त्यास पार्टी केले नाही. म्हणून वरील सर्व बाबीचा विचार करुन आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदार यांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो. 2. गैरअर्जदार यांनी हा निकाल लागल्यापासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांच्या सूटवरील उसवलेली पन्ट परत योग्यरित्या शिऊन अर्जदारास दयावा व घेतलेला सूट परत करावा. 3. मानसिक ञासाबददल रु.250/- मंजूर करण्यात येतात. 4. दावा खर्च म्हणून रु.250/- मंजूर करण्यात येतात. 5. पक्षकारांना निकाल कळविण्यात यावा. श्रीमती सुजाता पाटणकर श्री.सतीश सामते सदस्या अध्यक्ष (प्र.) जे.. यु. पारवेकर लघूलेखक |