(पारीत व्दारा श्रीमती वृषाली गौरव जागीरदार, मा.सदस्या)
(पारीत दिनांक– 23 नोव्हेंबर, 2020)
01. तक्रारकर्त्याने ग्राहक संरक्षण अधिनियम-1986 चे कलम-12 खाली विरुध्दपक्षा विरुध्द जमा केलेले सोन्याचे दागीने दुरुस्त न करुन दिल्यामुळे प्रस्तुत तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल केलेली आहे. कोरोना रोगाच्या वाढत्या प्रार्दुभावामुळे मा.सर्वोच्च न्यायालयाचे आदेशाचा विचार करता आता या तक्रारी मध्ये निकालपत्र पारीत करण्यात येत आहे.
02. तक्रारीचा थोडक्यात आशय खालील प्रमाणे-
तक्रारकर्त्याचे तक्रारी प्रमाणे यातील विरुध्दपक्ष हा व्यवसायाने सोनार आहे. त्याने दिनांक-24.10.2018 रोजी विरुध्दपक्षाकडे दोन सोन्याच्या बांगडया एकूण वजन -48.660 ग्रॅम दुरुस्तीसाठी दिल्या होत्या आणि त्यामुळे तो विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे. विरुध्दपक्षाने सदर दोन सोन्याच्या बांगडया हया दिनांक-31.10.2018 पर्यंत देण्याचे कबुल केले होते व त्या संबधात दिनांक-24.10.2018 रोजी सोन्याच्या बांगडया जमा केल्या बाबत विरुध्दपक्षाने पावती सुध्दा दिली होती,त्या पावतीचा क्रमांक-626 असा आहे. तसेच सदर पावतीमध्ये सोन्याचा बाजार भाव रुपये-32,400/- असा नमुद केलेला आहे.
तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले की, त्याने वेळोवेळी विरुध्दपक्षाकडे सोन्याच्या बांगडया दुरुस्ती बाबत विचारणा केली असता विरुध्दपक्षाने त्यास उडवा-उडवीची उत्तरे दिलीत. त्यानंतर विरुध्दपक्षाने त्याचे सहीचा स्टेट बॅंक ऑफ इंडीया शाखा भंडारा येथील धनादेश क्रमांक-355821 त्यास दिला. त्याने वारंवार मागणी करुनही विरुध्दपक्षाने त्याला कोणताही प्रतिसाद न दिल्याने शेवटी त्याने वकीलाचे मार्फतीने विरुध्दपक्षास दिनांक-07.01.2009 रोजी नोंदणीकृत डाकेने नोटीस पाठविली परंतु सदर नोटीस प्राप्त होऊनही विरुध्दपक्षाने कोणतेही उत्तर दिले नाही वा तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे जमा केलेल्या दोन सोन्याच्या बांगडया परत केल्या नाहीत. म्हणून शेवटी त्याने विरुध्दपक्षाचे विरोधात प्रस्तुत ग्राहक तक्रार ग्राहक मंचा समोर दाखल करुन त्याव्दारे विरुध्दपक्षा विरुध्द खालील प्रमाणे मागण्या केल्यात-
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला दोन सोन्याच्या बांगडया एकूण वजन-48.660 ग्रॅम अधिकृत प्रमाणपत्रासह परत करण्याचे आदेशित व्हावे अथवा असे करणे विरुध्दपक्षास शक्य नसल्यास सदर दोन सोन्याच्या बांगडयाची बाजारभावा प्रमाणे येणारी रक्कम रुपये-1,72,000/- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास अदा करण्याचे आदेशित व्हावे.
- विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल नुकसान भरपाई रुपये-15,000 आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- देण्याचे आदेशित व्हावे.
- या शिवाय योग्य ती दाद तक्रारकर्त्याचे बाजूने मंजूर करण्यात यावी.
03. विरुध्दपक्षाने त्याचे लेखी उत्तर पान क्रं -19 ते 21 वर ग्राहक मंचात दाखल केले. तक्रारकर्त्याने त्याचेकडे दिनांक-24.10.2018 रोजी दोन सोन्याच्या बांगडया एकूण वजन-48.660 ग्रॅम दुरुस्तीसाठी दिल्या होत्या हा मजकूर चुकीचा असल्याने नामंजूर केला आणि त्यामुळे तक्रारकर्ता हा त्याचा ग्राहक होत नसल्याचे नमुद केले. परिच्छेद निहाय उत्तरे देताना विरुध्दपक्षाने संपूर्ण तक्रार ही चुकीची, खोटी व बनावट असल्याचे नमुद केले. आपले विशेष कथनात विरुध्दपक्षाने असे नमुद केले की, तो सोनार समाजाचा आहे परंतु त्यास सोन्याचे घटनावळीचे तसेच दुरुस्तीचे काम येत नसून तो सोन्याचे दागीने घडवित नाही वा दुरुस्त करणारा कारागीर नाही. विरुध्दपक्षाचा राशीचे खडे खरेदी विक्रीचा व्यवसाय असून त्याचेवरच त्याचा उदरनिर्वाह आहे. तक्रारकर्ता हा त्याचा मित्र असून तक्रारकर्त्याने त्याला अडचणीचे वेळी आर्थिक मदत केली होती. या बाबत विरुध्दपक्षाने मित्रत्वाचे संबध असल्याने व्याजाची रक्कम त्याला दिली नव्हती. तक्रारकर्त्याने व्याजाचे रकमेची मागणी त्याचेकडे केली होती परंतु त्यास त्याने नकार दिला होता व आपसात चर्चा करु असे ठरविले होते. परंतु तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षा विरुध्द पैसे उकळण्याचे दृष्टीने प्रस्तुत खोटी व बनावट ग्राहक तक्रार दाखल केलेली आहे. विरुध्दपक्षास सोन्याचे दागीने घडविणे वा दुरुस्त करण्याचे काम येत नसल्याने त्याचे कडे तक्रारकर्त्याने दोन सोन्याच्या बांगडया दुरुस्त करण्यासाठी देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. तक्रारकर्त्याने त्याला कुठल्याही प्रकारचा मोबदला दिलेला नसून त्याचे कडून आज पर्यंत कुठल्याही सोन्याच्या दागीन्याची खरेदी केलेली नसल्याने तक्रारकर्ता हा त्याचा ग्राहक होत नाही तसेच त्यांचे मध्ये खरेदीचा विक्रीचा व्यवहार झालेला नाही वा त्याचे कडून कुठल्याही प्रकारची सेवा तक्रारकर्त्याने मोबदला देऊन घेतलेली नाही त्यामुळे सेवेमध्ये त्रृटी होण्याचा प्रश्न उदभवत नाही. तथाकथीत व्यवहार हा ग्राहक मंचाचे कार्यक्षेत्रात येत नसून त्या बाबत तक्रारकर्त्याने सक्षम न्यायालयात जाऊन तेथे दाद मागावी या सर्व कारणास्तव तक्रार खारीज करण्याची विनंती विरुध्दपक्षाने केली.
04. तक्रारकर्त्याने पान क्रं 09 वरील दस्तऐवज यादी नुसार दस्तऐवजाच्या प्रती दाखल केल्यात, ज्यामध्ये प्रामुख्याने विरुध्दपक्ष प्रोप्रायटर असलेल्या श्री आर्ट ज्वेलर्सची तक्रारकर्त्याचे नावे दिलेली पावतीची प्रत, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास पाठविलेली रजिस्टर नोटीस, रजिस्टर नोटीस विरुध्दपक्षास मिळाल्या बाबत रजिस्टर पोस्टाची पोच, तक्रारकर्त्याला विरुध्दपक्षाने दिलेला भारतीय स्टेट बॅंक शाखा भंडारा येथील धनादेशाची प्रत अशा दस्तऐवजाच्या प्रतीचा समावेश आहे. तक्रारकर्त्याने पान क्रं-22 व 23 वर पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. तक्रारकर्त्याने पान क्रं 25 वरील दस्तऐवज यादी नुसार विरुध्दपक्षा तर्फे त.क.चे नावे दिलेला कॅश मेमो तसेच विरुध्दपक्षा व्दारे जारी बिल क्रं 821, 67 आणि क्रं-147 च्या प्रती दाखल केल्यात. तक्रारकर्त्याने पान क्रं 35 व 36 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. तक्रारकर्त्याने पान क्रं 41 वर पुरसिस दाखल करुन त्याने दाखल केलेल्या लेखी युक्तीवादालाच मौखीक युक्तीवाद समजावा असे नमुद केले.
05. विरुध्दपक्षाने त्याचे लेखी उत्तर पान क्रं -19 ते 21 वर ग्राहक मंचात दाखल केले. विरुध्दपक्षाने पान क्रं 32 ते 34 वर पुराव्याचे शपथपत्र दाखल केले. विरुध्दपक्षाने पान क्रं 38 ते 40 वर लेखी युक्तीवाद दाखल केला. विरुध्दपक्षाने पान क्रं 42 वर पुरसिस दाखल करुन त्याने दाखल केलेल्या लेखी युक्तीवादालाच मौखीक युक्तीवाद समजावा असे नमुद केले.
06. तक्रारकर्त्याची तक्रार, विरुध्दपक्षाचे लेखी उत्तर, तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज, उभय पक्षांचा शपथेवरील पुरावा आणि लेखी युक्तीवाद इत्यादीचे काळजीपूर्वक अवलोकन ग्राहक मंचाव्दारे करण्यात आले त्यावरुन ग्राहक न्यायमंचा समोर खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांचा निष्कर्ष खालील प्रमाणे आहे-
अक्रं | मुद्दा | उत्तर |
01 | तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होतो काय? | -होय- |
02 | विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याचे सोन्याचे दागीने दुरुस्त करुन दिले नाही व परत केले नाही या संबधात दोषपूर्ण सेवा आणि अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब केल्याची बाब पुराव्या निशी सिध्द होते काय? | -होय- |
03 | काय आदेश? | अंतिम आदेशा नुसार |
::कारणे व निष्कर्ष::
मुद्दा क्रं 1 बाबत-
07. प्रस्तुत तक्रारीतील तक्रारकर्त्याने दाखल केलेले दस्तऐवज आणि उभय पक्षांचे शपथे वरील कथन व लेखी युक्तीवादाचे ग्राहक मंचाव्दारे अवलोकन करण्यात आले. तक्रारकर्त्याने पान क्रं 10 वर त्याचे नावाने विरुध्दपक्षाने दिलेली पावती दाखल केलेली आहे,सदर पावतीचा क्रमांक-626 असा असून त्यावर दिनांक-24.10.2018 नमुद आहे. सदर पावती वर असे नमुद आहे की, विरुध्दपक्ष हा श्री आर्ट ज्वेलर्स, नोंदणी क्रं-2653 पत्ता देशबंधू वार्ड खाम तलाव रोड, भंडारा येथे राशीचे खडे, सोने व चांदीचे दागीने तयार करण्याचा व्यवसाय करतो. त्यामुळे सदर पावती वरील छापील मजकूरा वरुन ही बाब सिध्द होते की, विरुध्दपक्ष हा श्री आर्ट ज्वेलर्स या नोंदणीकृत फर्मचे नावाने सोने वा चांदीचे दागीने तयार करुन विक्री करण्याचा व्यवसाय करतो व त्याने तक्रारकर्त्या कडून 48.660 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगडया स्विकारलेल्या आहेत व सदर पावतीमध्ये सोन्याचा भाव रुपये-32,400/- सुध्दा नमुद केलेला असून सदर पावतीवर विरुध्दपक्षाची सही आहे. विरुध्दपक्षाने असा बचाव घेतलेला आहे की, तक्रारकर्त्याने त्याला कोणताही आर्थिक मोबदला दिलेला नसल्याने तो विरुध्दपक्षाचा ग्राहक होऊ शकत नाही परंतु तक्रारकर्त्याने सोन्याच्या बांगडया या दुरुस्तीसाठी विरुध्दपक्षाकडे जमा केलेल्या आहेत ही बाब पावती वरुन सिध्द झालेली आहे व त्या संबधात योग्य तो मोबदला तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाला देणार असल्याने तक्रारकर्ता आणि विरुध्दपक्ष यांचेमध्ये ग्राहक व सेवा देणारे असे संबध प्रस्थापित होतात. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक होतो आणि म्हणून आम्ही मुद्दा क्रं 1 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
मुद्दा क्रं 2 व 3 बाबत-
08. विरुध्दपक्षाने पान क्रं 32 वरील त्याचे शपथे वरील पुराव्यात असे नमुद केले की, तक्रारकर्त्याने त्याचे विरोधात खेाटी व बनावट तक्रार केलेली आहे. तसेच तक्रारकर्त्याने तक्रारी मध्ये दाखल केलेले संपूर्ण दस्तऐवज खोटे व बनावटी असल्याचे नमुद केले. त्याने शपथपत्रत पुढे असे नमुद केले की, तो सोनार समाजाचा आहे परंतु त्याला सोन्याचे घटनावळीचे व दुरुस्तीचे काम येत नसून तो कारागीर नाही, तो फक्त राशीचे खडे खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो. परंतु विरुध्दपक्षाचे हे कथन चुकीचे दिसून येते याचे कारण असे आहे की, पान क्रं 10 वरील विरुध्दपक्षाची श्री आर्ट ज्वेलर्स भंडारा या फर्मची पावती असून सदर पावतीवर त्याचे फर्मचा नोंदणी क्रमांक-2653 असा नमुद केलेला असून त्यावर त्याचा भ्रमणध्वनी क्रं-9326911422 सुध्दा नमुद आहे. विरुध्दपक्षाने पावती वरील फर्मचा नोंदणी क्रमांक व भ्रमणध्वनी क्रमांक नाकारलेला नाही. तसेच विरुध्दपक्षाचे सदर दिनांक-24.10.2018 रोजीचे पावतीवर सोन्याचे दागीने परत करण्याचा दिनांक-31.10.2018 नमुद केलेला असून पावती वरील विरुध्दपक्षाची सही आणि त्याचे लेखी उत्तरावरील आणि पुराव्यावरील सही यांचे ग्राहक मंचाव्दारे काळजीपूर्वक अवलोकन केले असता या सर्व विरुध्दपक्षाच्या स्वाक्ष-या हया एकमेकांशी ताळमेळ खात असून सदर सहयां मध्ये एकसारखेपणा दिसून येतो. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाचे फर्मच्या खोटया व बनावट पावत्या तयार केलेल्या आहेत या विरुध्दपक्षाचे कथनात ग्राहक मंचास कोणतेही तथ्य दिसून येत नाही. तसेच विरुध्दपक्षाव्दारे जारी दिनांक-24.10.2018 रोजीचे पावती क्रं-626 वर स्पष्टपणे नमुद आहे की, राशीचे खडे, सोने व चांदीचे दागीने ऑर्डर प्रमाणे तयार करुन मिळतात, त्यामुळे विरुध्दपक्षाचे असे कथन की, तो फक्त राशीचे खडे खरेदी व विक्रीचा व्यवसाय करतो परंतु तो सोन्याचे दागीने दुरुस्ती करणारा कारागीर नाही या त्याचे म्हणण्यात ग्राहक मंचाला कोणतेही तथ्य दिसून येत नाही.
09. विरुध्दपक्षाने त्याचे लेखी उत्तरात आणि शपथे वरील पुराव्यात आणखी एक असा बचाव घेतलेला आहे की, त्याचे आणि तक्रारकर्त्या मध्ये मित्रत्वाचे संबध होते आणि त्यामुळे तक्रारकर्त्याने मित्रत्वाचे नात्याने त्यास आर्थिक मदत केली होती व त्याची परतफेड विरुध्दपक्षाने केली होती परंतु त्यावरील व्याज तक्रारकर्त्याला दिले नव्हते म्हणून तक्रारकर्त्याने व्याजाचे रकमेची मागणी त्याचेकडे केली होती व त्याने व्याज देण्यास नकार दिल्याने तक्रारकर्त्याने त्याचे विरोधात प्रस्तुत खोटी व ग्राहक तक्रार दाखल केली असल्याचे नमुद केले परंतु विरुध्दपक्षाचे याही कथनात योग्य त्या पुराव्या शिवाय (Substantial evidence) कोणतेही तथ्य ग्राहक मंचास दिसून येत नाही. नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करता आम्ही मुद्दा क्रं 02 चे उत्तर होकारार्थी नोंदवित आहोत.
10. विरुध्दपक्षाव्दारे तक्रारकर्त्यास दिलेल्या दिनांक-24.10.2018 रोजीचे पावती क्रं-626 वर तक्रारकर्त्याचे नाव श्रीमान आर.के.माकडे साहेब असे नमुद केलेले आहे तसेच विवरण म्हणून 48.660 सो.बांगडया वजन सो.जमा व त्याचे खाली संक्षीप्त सही व दिनांक-24.10.2018 देखील नमुद आहे तसेच पावतीचे विवरणाचे रकान्यामध्ये खाली भाव 32400 नमुद असून संक्षीप्त स्वाक्षरी केलेली आहे परंतु विरुध्दपक्षाने पावतीचे रक्कम रकान्यामध्ये रक्कम दर्शविलेली नाही तसेच पावतीचे खाली विरुध्दपक्षाने सही सुध्दा केल्याचे दिसून येते. विरुध्दपक्षाने पावतीचे रक्कम या रकान्यामध्ये रक्कम नमुद केलेली नाही यावरुन त्याचे सदहेतू बद्दल सांशकता निर्माण होते. मुद्दा क्रं 01 व क्रं-02 चे उत्तर होकारार्थी नोंदविल्याने आम्ही मुद्दा क्रं 03 नुसार खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
11. सोन्याचे व्यवहारात 1 तोळा म्हणजे 10 ग्रॅम असा हिशोब होतो. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्यास निर्गमित केलेल्या पावती वरुन असे दिसून येते की, तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे एकूण 48.660 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगडया जमा केलेल्या आहेत आणि सदर पावतीवर भाव रुपये-32,400/- नमुद केलेला आहे. येथे हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, सदर भाव हा एक तोळयासाठीचा म्हणजे 10 ग्रॅमसाठीचा असतो. तक्रारकर्त्याने एकूण 48.660 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या बांगडया या विरुध्दपक्षाकडे दुरुस्तीसाठी दिलेल्या असल्याने सोन्याचा 10 ग्रॅमसाठी आजचा बाजार भाव रुपये-52,260/- हिशोबात धरल्यास तक्रारकर्त्याने जमा केलेल्या सोन्याच्या बांगडयाची एकूण रक्कम ही रुपये-2,54,297/- एवढी येते. सध्या कोराना रोगाचे प्रार्दुभावा मुळे सोन्याच्या किमतीचा जागतिक पातळीवर प्रभाव झालेला दिसून येतो आणि सोन्याचे भाव दिवसें दिवस वाढत आहेत. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे सोन्याच्या बांगडया दुरुस्तीसाठी जमा केलेल्या आहेत. आज त्या सोन्याच्या बांगडया तक्रारकर्त्या जवळ असत्या तर त्याला निश्चीतच जास्त रकमेचा फायदा झाला असता ही बाब येथे लक्षात घेणे गरजेची आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यास रुपये-52,260/- प्रमाणे त्यास रुपये-2,54,297/- एवढी रक्कम मंजूर करणे योग्य व न्यायोचित आहे आणि सोन्याचे दर दिवसें दिवस वाढत असल्यामुळे सदर रकमेवर रक्कमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने व्याज मंजूर करणे योग्य व न्यायोचित आहे असे ग्राहक मंचाचे स्पष्ट मत आहे. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याने जमा केलेल्या बांगडया दुरुस्त करुन दिल्या नाहीत वा जमा केलेल्या सोन्याचे मुल्य तक्रारकर्त्यास परत न करुन अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब तसेच दोषपूर्ण सेवा दिलेली आहे आणि त्यामुळे तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,000/- आणि प्रस्तुत तक्रारीचा खर्च म्हणून रुपये-5000/- मंजूर करणे योग्य व न्यायोचित होईल असे ग्राहक आयोगाचे मंचाचे मत आहे.
12. उपरोक्त नमुद सर्व वस्तुस्थितीचा विचार करुन आम्ही प्रस्तुत तक्रारी मध्ये खालील प्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहोत-
:: अंतिम आदेश ::
01) तक्रारकर्ता श्री रामनाथ वल्द क्रिष्णा माकडे यांची तक्रार विरुध्दपक्ष श्री विजय वल्द दत्तात्रय ढोमणे, प्रोप्रायटर श्री आर्ट ज्वेलर्स, देशबंधु वार्ड भंडारा यांचे विरुध्द अंशतः मंजूर करण्यात येते.
02) विरुध्दपक्षाला आदेशित करण्यात येते की, त्याने पावती क्रं-626, पावती दिनांक-24.10.2018 प्रमाणे तक्रारकर्त्याच्या जमा असलेल्या सोन्याच्या बांगडया एकूण वजन-48.660 अधिकृत प्रमाणपत्रासह तक्रारकर्त्याला परत कराव्यात.
किंवा
विरुध्दपक्षाला असे करणे शक्य नसल्यास त्याला आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्त्यास पावती क्रं 626, दिनांक-24.10.2018 प्रमाणे तक्रारकर्त्याने जमा केलेल्या सोन्याच्या बांगडयाचे मुल्य रुपये-2,54,297/- (अक्षरी रुपये दोन लक्ष चौपन हजार दोनशे सत्यानऊ फक्त) परत करावे.
03) विरुध्दपक्षाला आदेशित करण्यात येते की, त्याने तक्रारकर्त्यास झालेल्या शारिरीक व मानसिक त्रासा बद्दल रुपये-10,,000/- (अक्षरी रुपये दहा हजार फक्त) आणि तक्रारीचा खर्च रुपये-5000/- (अक्षरी रुपये पाच हजार फक्त) अशा रकमा तक्रारकर्त्याला दयाव्यात.
04) सदर आदेशाचे अनुपालन विरुध्दपक्षाने निकालपत्राची प्रथम प्रमाणित प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासून 30 दिवसाचे आत करावे. न केल्यास आदेश दिनांकापासून रकमेच्या प्रत्यक्ष अदायगी पावेतो द.सा.द.शे.-7 टक्के दराने येणारी व्याजाची रक्कम तक्रारकर्त्याला दयावी.
05) निकालपत्राची प्रथम प्रमाणित उभय पक्षकारांना निःशुल्क उपलब्ध करुन दयावी.
06) तक्रारीची ‘ब’ व ‘क’ प्रत तक्रारकर्त्यास परत करावी.