नि.18 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर तक्रार क्र. 152/2010 नोंदणी तारीख – 9/6/2010 निकाल तारीख – 11/8/2010 निकाल कालावधी – 62 दिवस श्री विजयसिंह दि. देशमुख, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या श्री सुनिल कापसे, सदस्य (श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या यांनी न्यायनिर्णय पारीत केला) ------------------------------------------------------------------------------------ श्री कुलदिप अशोक भोसले रा.भोसलेमळा, राधिका रोड, सातारा ता.जि.सातारा ----- अर्जदार (अभियोक्ता श्री ए.एस.यादव) विरुध्द 1. व्यवस्थापक उदय परांजपे व्हीजन इलेक्ट्रॉनिक्स, नोकिया केअर सेंटर शाहू स्टेडियम, सातारा 2. व्यवस्थापक महेश कुलकर्णी चैतन्य मोबाईल शॉपी, गोविंद प्लाझा, सातारा-कोरेगाव रोड, जिल्हा परिषदेसमोर, सातारा ----- जाबदार (अभियोक्ता एस.व्ही.होनराव) न्यायनिर्णय 1. अर्जदार हे वकीली व्यवसाय करतात. जाबदार क्र.1 हे नोकीया कंपनीचा मोबाईल दुरुस्तीचा व्यवसाय करतात व जाबदार क्र.2 हे नोकिया कंपनीचे अधिकृत डिलर आहेत. अर्जदार यांनी जाबदार क्र.2 यांचेकडून नोकिया कंपनीचा 3110-सी या मॉडेलचा मोबाईल हॅण्डसेट दि.6/8/2009 रोजी खरेदी केला. सदरचे मोबाईल संचास एक वर्षाची वॉरंटी दिली होती. सदरचा मोबाईल सुरुवातीस 4/5 महिने व्यवस्थित चालला परंतु त्यानंतर तो वारंवार बंद पडू लागला. म्हणून अर्जदार यांनी जाबदार क्र.2 यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी जाबदार क्र.1 यांचेकडे हॅण्डसेट दुरुस्तीसाठी देण्यास सांगितले. त्यानुसार अर्जदार यांनी जाबदार क्र.1 यांचेकडे हॅण्डसेट दुरुस्तीसाठी दिलेनंतर जाबदार क्र.1 यांनी तो दुरुस्त करुन दिला. परंतु तरीही तो वारंवार बंद पडत होता. जाबदार क्र.1 यांचे म्हणण्यानुसार त्यातील सॉफटवेअरही अर्जदार यांनी बदलून घेतले. परंतु तरीही तो वारंवार बंद पडत होता. शेवटी दि.28/4/2010 रोजी हॅण्डसेट पूर्ण बंद पडला म्हणून अर्जदार यांनी तो बदलून घेण्यासाठी जाबदार क्र.1 यांचेकडे दिला. जाबदार क्र.1 यांनी एका आठवडयाचे आत तो बदलून देतो असे सांगितले. परंतु आजतागायत तो बदलून अगर दुरुस्त करुन दिलेला नाही. सबब जाबदार यांचेकडून मोबाईल संचाची किमत रु.4,200/- व्याजासह परत मिळावी, तसेच नुकसान भरपाईपोटी, मानसिक त्रासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळावी म्हणून अर्जदार यांनी या मंचासमोर दाद मागितली आहे. 2. जाबदार क्र.2 यांनी नि. 13 कडे म्हणणे देऊन तक्रार नाकारली आहे. जाबदार यांचे कथनानुसार जाबदार क्र.2 यांनी अर्जदार यांना सेवा देणेमध्ये कोणतीही त्रुटी केलेली नाही. वॉरंटी कालावधीमध्ये वस्तूमध्ये दोष असलेस तो दूर करणेची जबाबदार जाबदार क्र.1 यांची आहे. अर्जदार यांनी जाबदार क्र.2 यांचेकडे हॅण्डसेट दुरुस्तीची वा बदलून देण्याची मागणी केलेली नव्हती. अर्जदार यांनी विनाकारण जाबदार क्र.2 यांना याकामी सामील केलेले आहे. सबब तक्रारअर्ज फेटाळणेत यावा असे जाबदार यांनी कथन केले आहे. 3. जाबदार क्र.1 यांनी प्रस्तुत तक्रारअर्जाची नोटीस स्वीकारली नाही. नोटीस न स्वीकारलेबाबतचा पोस्टाचा शेरा असलेला लखोटा नि.7 पाहिला. जाबदार क्र.1 हे याकामी हजर झाले नाहीत तसेच त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे व शपथपत्र दाखल केले नाही. अर्जदार यांनी याकामी दाखल केलेले शपथपत्र नि.10 पाहिले. सबब जाबदार क्र.1 यांचेविरुध्द एकतर्फा आदेश करणेत आला. 4. अर्जदारतर्फे तोंडी युक्तिवाद ऐकणेत आला, जाबदार क्र.2 तर्फे दाखल लेखी युक्तिवाद पाहिला. तसेच अर्जदार व जाबदार यांची दाखल कागदपत्रे पाहणेत आली. 5. जाबदार क्र.2 यांनी नि.13 कडे म्हणणे तसेच शपथपत्र देवून अर्जदारची तक्रार नाकारली आहे व जाबदार क्र.2 यांनी सेवा देणेत कोणतीही कमतरता केली नाही. जाबदार क्र.1 ने सेवेत त्रुटी केली असल्यास जाबदार क्र.2 जबाबदार नाहीत असे कथन केले आहे. 6. अर्जदारची तक्रार पाहता अर्जदारने दि.6/8/2009 रोजी जाबदार क्र.2 कडून मोबाईल खरेदी केला. परंतु तो वारंवार बंद पडू लागला. जाबदार क्र.1 यांनी वारंवार दुरुस्त करुन दिला. अर्जदारने सॉफटवेअर बदलून घेतले. तरीसुध्दा तो बंद पडत होता, असे 4-5 वेळा घडले असे कथन केले आहे. परंतु सदर कथनाचे पृष्ठयर्थ अर्जदारचे स्वतःचे कथनाव्यतिरिक्त कोणताही पुरावा नाही. जाबदार क्र.1 हे नोकिया कंपनीचे अधिकृत केअर सेंटर आहे. मोबाईल जर जाबदार क्र.1 यांनी दुरुस्तीसाठी घेतला असेल तर जॉबशीट अर्जदारचे असणे आवश्यक आहे. सॉफटवेअर बदललेसंबंधीत कागदपत्रे असणे आवश्यक आहे. नि.4/2 कडे जाबदार क्र.1 चे जॉबशीट असून ते दि.28/4/2010 चे आहे. म्हणजे अर्जदार म्हणतात की, दि.28/4/2010 रोजी मोबाईल जाबदार क्र.1 कडे दुरुस्तीसाठी दिला हे खरे आहे हे दिसते व अद्याप त्यांना तो दुरुस्त करुन मिळाला नाही अशी अर्जदारची तक्रार आहे. सबब जाबदार क्र.1 यांनी त्वरित अर्जदारचा मोबाईल दुरुस्त करुन द्यावा असा आदेश होणे न्याय होणार आहे. 7. अर्जदारने तक्रारअर्जात दि.1/6/2010 रोजी जाबदार क्र.1 यांचेकडे मोबाईल संच बदलून मागणेस गेले असता बदलून देत नाही असे उत्तर दिले असे कथन केले आहे. निर्विवादीतपणे जाबदार क्र.1 केअर सेंटर आहे. जुना नादुरुस्त मोबाईल संच घेवून नवीन मोबाईलचा संच देण्याची जबाबदारी केअर सेंटरची नाही. 8. अर्जदारचा मोबाईल संच दुरुस्त होणारच नाही असे अर्जदारचे दाखल कागदपत्रांवरुन दिसून येत नाही. अर्जदारने वॉरंटी कार्ड दाखल केले नाही. नि.4/2 कडील सर्व्हिस जॉबशीट वरुन मोबाईल संच वॉरंटी पिरियडमध्ये आहे हे दिसते. जाबदार क्र.2 यांची सेवेत त्रुटी येत नाही, सबब त्यांचेविरुध्द तक्रार रद्द करणेत येत आहे. सबब जाबदार क्र.1 नोकिया केअर सेंटर यांनी त्वरित अर्जदारचा मोबाईल संच दुरुस्त करुन द्यावा असा आदेश होणे न्याय आहे या निर्णयाप्रत हा मंच आला आहे. 9. निर्विवादीतपणे अर्जदारचे दाखल कागदपत्रांवरुन दि.28/4/2010 रोजी संच दुरुस्तीसाठी दिला व केवळ 34 ते 40 दिवसांत दि.9/6/2010 रोजी तक्रार दाखल केली आहे. सबब नुकसान भरपाई किंवा शारिरिक त्रासासाठी किंवा तक्रारीचे खर्चासाठी रक्कम अर्जदारास मिळावी असे मंचास वाटत नाही. 10. सबब आदेश. आदेश 1. अर्जदारचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येत आहे. 2. जाबदार क्र.1 यांनी अर्जदारास नोकिया कंपनीचा 3110 सी या मॉडेलचा मोबाईल संच त्वरित दुरुस्त करुन द्यावा. 3. खर्चाबाबत आदेश नाही. 4. जाबदार यांनी वरील आदेशाचे अनुपालन त्यांना या न्यायनिर्णयाची सत्यप्रत मिळाल्यापासून 30 दिवसात करावे. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि. 11/8/2010 (सुनिल कापसे) (सुचेता मलवाडे) (विजयसिंह दि. देशमुख) सदस्य सदस्या अध्यक्ष
| Smt. S. A. Malwade, MEMBER | HONABLE MR. Vijaysinh D. Deshmukh, PRESIDENT | Mr. Sunil K Kapse, MEMBER | |