संयुक्त निकालपत्र :- (दि.05.10.2010)(द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुत ग्राहक तक्रार केस नं.241/10 व 242/10 या दोन्ही तक्रारींच्या विषयांमध्ये साम्य आहे. तसेच, सामनेवाला हे देखील एकच असल्याने हे मंच दोन्ही प्रकरणांमध्ये एकत्रित निकाल पारीत करीत आहे. (2) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला क्र.5 यांनी म्हणणे दाखल केले. उर्वरित सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केलेले नाही. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सामनेवाले गैरहजर आहेत. (3) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, यातील तक्रारदारांनी सामनेवाला पतसंस्थेकडे दामदुप्पट ठेवीच्या स्वरुपात रक्कमा ठेवलेल्या आहेत, त्यांच्या तपशील खालीलप्रमाणे :- अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | ठेव रक्कम | ठेव तारीख | मुदतपूर्ण तारीख | मुदतपूर्ण रक्कम | 1. | 241/10 | 117 | 12000/- | 24.12.2003 | 24.06.2009 | 24000/- | 2. | 242/10 | 116 | 10000/- | 01.09.2003 | 01.03.2009 | 20000/- |
(4) सदर ठेवींची मुदत संपल्यावर तक्रारदारांनी सामनेवाला संस्थेकडे रक्कमांची वारंवार मागणी केली आहे. तथापि, वारंवार मागणी करुनही सामनेवाला यांनी रक्कमा देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे तक्रारदारांनी दि.18.03.2010 रोजी वकिलामार्फत नोटीस देवून व्याजासह ठेवींच्या रक्कमांची मागणी केली. तरीदेखील सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या ठेव रक्कमा अदा केल्या नाहीत. त्यामुळे तक्रारदारांनी व्याजासह ठेव रक्कमा, मानसिक त्रासापोटी नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळणेकरिता प्रस्तुतची तक्रार दाखल केली आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत ठेव पावत्या व वकिलामार्फत पाठविलेली नोटीस इत्यादींच्या सत्यप्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (6) सामनेवाला क्र.5 यांनी त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांच्या तक्रारीतील कथने नाकारली आहेत. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुत सामनेवाला यांनी सन 2006-07 या साली फक्त पेंडींग कामकाज पूर्ण करणेसाठी हंगामी कर्मचारी म्हणून काम केले आहे. प्रस्तुत सामनेंवाला यांनी सामनेवाला संस्थेच्या कामकाजाबाबत कोणत्याही प्रकारचे बंधपत्र सहकार कायद्याप्रमाणे लिहून दिलेले नाही अगर कोणत्याही प्रोसिडींगवर जबाबदार व्यक्ती म्हणून सही केलेली नाही. तक्रारदारांच्या ठेवी या प्रस्तुत सामनेवाला यांच्या कर्मचारी म्हणून कालावधीतील नाहीत. त्यामुळे प्रस्तुत सामनेवाला यांना कायद्याने जबाबदार धरता येणार नाही. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह नामंजूर करणेत यावी अशी विनंती केली आहे. (7) प्रस्तुत प्रकरणी तक्रारदाराने तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत; सदर ठेव पावत्यांचे अवलोकन या मंचाने केलेले आहे. सामनेवाला संस्थेमध्ये तक्रारदार यांनी ठेवलेली रक्कम सामनेवाला यांनी नाकारलेली नाही. सदर ठेव रक्कमांच्या मुदती संपून गेलेल्या आहेत व सदर रक्कमांची तक्रारदारांनी व्याजासह मागणी केली आहे. ग्राहक संरक्षण कायदा, 1986 मधील तरतुदींचा विचार करता प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत आहे. सामनेवाला क्र.1 ते 4 व 6 ते 12 यांना या मंचाने संधी देवूनही त्यांनी आपली बाजू शाबीत केलेली नाही. सदर सामनेवाला यांचे वर्तणुकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या व्याजासह रक्कमा परत करण्याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. तसेच, सामनेवाला यांनी सदर प्रकरणी म्हणणे दाखल न करुन सामनेवाला यांना तक्रारदारांची तक्रार मान्य असल्याचे दाखवून दिले आहे. सबब, तक्रारदारांच्या व्याजासह ठेव रक्कमा सामनेवाला यांनी न देवून त्यांच्या सेवेत त्रुटी केली आहे. सबब, तक्रारदारांच्या ठेव रक्कमा देण्याची सामनेवाला क्र. 1 ते 3 व 6 ते 12 यांची वैयक्तिक व संयुक्तिक जबाबदारी तर सामनेवाला क्र.4 व 5 हे संस्थेचे कर्मचारी असल्याने त्यांची केवळ संयुक्तिक जबाबदारी आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (8) तक्रारदारांनी प्रस्तुत प्रकरणी दाखल केलेल्या ठेव पावत्यांचे अवलोकन केले असता सदर ठेव पावत्या या दामदुप्पट ठेवींच्या असून त्यांच्या मुदती संपलेल्या आहेत असे दिसून येते. त्यामुळे तक्रारदार हे दामदुप्पट ठेव पावत्यांवरील मुदतपूर्ण रक्कमा मुदत संपलेल्या तारखेपासून द.सा.द.शे.6 टक्के व्याजासह मिळणेस पात्र आहेत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (9) तक्रारदारांनी ठेव रक्कमांची मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह रक्कमा परत न दिल्याने सदर रक्कमा मिळणेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे तक्रारदार हे मानसिक त्रासापोटी रक्कमा मिळणेस पात्र आहेत याही निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालीलप्रमाणे एकत्रित आदेश पारीत करीत आहे. आदेश (1) तक्रारदारांच्या तक्रारी मंजूर करणेत येतात. (2) सामनेवाला क्र.1 ते 3 व 6 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.4 व 5 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना खालील कोष्टकातील दामदुप्पट रक्कमा द्याव्यात. सदर कोष्टकात नमूद तारखांपासूनपासून तक्रारदारांना संपूर्ण रक्कमा मिळपावेतो द.सा.द.शे. 6 टक्के व्याज द्यावे. अ.क्र. | तक्रार क्र. | ठेव पावती क्र. | देय मुदतपूर्ण रक्कम | व्याज देय तारीख | 1. | 241/10 | 117 | 24000/- | 24.06.2009 | 2. | 242/10 | 116 | 20000/- | 01.03.2009 |
(3) सामनेवाला क्र.1 ते 3 व 6 ते 12 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या तर सामनेवाला क्र.4 व 5 यांनी केवळ संयुक्तिकरित्या तक्रारदारांना प्रत्येक तक्रारीकरीता मानसिक त्रासापोटी रुपये 1000/- व तक्रारीचा खर्च रुपये 1000/- द्यावा.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |