सातारा जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच यांचेसमोर
उपस्थिती - मा.सौ.सविता भोसले,अध्यक्षा
मा.श्री.श्रीकांत कुंभार,सदस्य.
मा.सौ.सुरेखा हजारे, सदस्या.
तक्रार अर्ज क्र. 151/2015
तक्रार दाखल दि.02-07-2015.
तक्रार निकाली दि.19-09-2015.
अमोल आबाजी जगताप
रा.मु.पो.उडतारे,ता.जि.सातारा
सध्या रा.प्लॉट नं.11, सत्यमनगर,
खेड,ता.जि.सातारा. .... तक्रारदार.
विरुध्द
विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन तर्फे प्रोप्रा/पार्टनर,
1) श्रीकांत अविनाश माने,
2) सौ. प्रज्ञा श्रीकांत माने,
दोघे रा. गोडाऊन नं.17/18, गुलमोहर प्लाझा,
पुष्कर मंगल कार्यालयासमोर, सातारा-कोरेगांव रोड,
गोडोली, विसावा नाका, सातारा. .... जाबदार.
तक्रारदारांतर्फे –अँड.ए.आर.कदम.
जाबदार क्र. 1 व 2 तर्फे – एकतर्फा.
न्यायनिर्णय
सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे मौजे उडतारे, ता जि. सातारा येथील कायमस्वरुपी रहिवासी असून तक्रारदाराने सरनाम्यात नमूद केले पत्त्यावर ते भाडयाने कुटूंबासह राहतात. जाबदार ही प्रोपायटरी/भागीदारी संस्था असून जाबदार क्र.1 व 2 हे त्यांचे प्रोप्रायटर भागीदार आहेत. सदर जाबदार हे विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन्स या नावाने बांधकाम व्यवसाय करतात. जाबदार हे विशेष करुन सातारा शहरात वेगवेगळया मिळकती विकत घेवून सदरच्या विकत घेतलेल्या मिळकती विकसीत करुन त्यावर निवासी व अनिवासी सदनिका बांधून त्यांची विक्री वेगवेगळया ग्राहकांना करण्याचे विघ्नहर्ता कन्स्ट्रक्शन्स या माध्यमातून करत असतात. जाबदार क्र. 1 व 2 यांनी सातारा शहरात सर्व्हे नं. 62/1 विकासनगर, संगमनगर, खेड, ता.जि.सातारा या मिळकतीवर ‘भवानीनगर’ या नावाचे निवासी संकुल उभारत असून सदर बाबत तक्रारदार व जाबदार यांचेत झाले चर्चेतून तक्रारदाराने जाबदार यांचेकडून सदर ‘भवानीनगर’ संकुलातील ‘बी’ बिल्डिंगमधील सदनिका नंबर 208 याचे क्षेत्रफळ 657.17 चौ.फू. ही सदनिका खरेदी करण्याचे ठरविले. त्यानुसार दि.7/10/2012 रोजी वर नमूद सदनिकेच्या बुकींगसंदर्भात जाबदार यांचेकडे बोलणी करण्यास गेले असता, तक्रारदार व जाबदार यांचेमध्ये झालेल्या चर्चेनुसार जाबदाराने सदर सदनिका तक्रारदार यांना रक्कम रु.14,04,000/- एवढया किंमतीस विक्री करण्याचे मान्य व कबूल केले. तक्रारदाराने त्याचदिवशी म्हणजेच दि.7/10/2012 रोजी जाबदार यांना सदर सदनिका खरेदीपोटी अँडव्हान्स म्हणून रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) चा मालोजीराजे सहकारी बँकेचा चेक नं.209600 हा दि. 8/10/2012 या तारखेचा अदा केला. प्रस्तुत चेक सदनिका बुकींगसाठी मिळालेची पावती जाबदाराने पावती नंबर 008 ही जाबदाराचे सहीने तक्रारदाराला दिलेली आहे. प्रस्तुत तक्रारदाराने दिले चेकची रक्कम जाबदाराला मिळालेली आहे. सदनिका बुकींग करतेवेळी बुकींग केले तारखेपासून 6 महिन्याच्या आत सदर सदनिकेचे नोंदणीकृत साठेखत करुन देण्याचे व खुषखरेदीपत्र सदनिका बुक केलेपासून 18 महिन्याचे आत करुन देण्याचे जाबदार यांनी मान्य व कबूल केले होते. तक्रारदाराने सदनिकेचे बुकींगपोटी दि.7/10/2012 रोजी रक्कम रु.50,000/- जाबदाराला दिली आहे. त्यानंतर 6 महिन्यानंतर तक्रारदाराने जाबदार यांना वारंवार सदर सदनिकेचे नोंदणीकृत साठेखत करुन देणेबाबत विनंती केली असता, जाबदाराने खोटी आश्वासने देऊन वेळ मारुन नेली व तक्रारदार यांचेकडून सदर सदनिकेपोटी रक्कम स्विकारुन देखील जाबदाराने तक्रारदार यांना सदनिकेचे नोंदणीकृत साठेखत अगर खरेदीपत्र आजतागायत करुन दिलेले नाही. त्यानंतर तक्रारदार हे मे,2013 पासून आजअखेर पर्यंत जाबदार यांचेकडे अनेकवेळा प्रत्यक्ष भेटून सदर सदनिकेचे नोंदणीकृत साठेखत करुन देणेबाबत विनंती केली असता, जाबदाराने खोटी आश्वासने देवून वेळ मारुन नेली व तक्रारदार यांना आजअखेर सदनिकेचे नोंदणीकृत साठेखत करुन दिलेले नाही. जाबदाराचे पत्रात सरकारी दर वाढल्याने पैशाची लालच निर्माण झालेनेच जाबदार याकामी चालढकल करुन वेळ मारुन नेत आहेत. तसेच दि.4/5/2015 रोजी तक्रारदार जाबदार यांस प्रत्यक्ष भेटून विचारणा करणेस गेले असता जाबदार यांनी ‘मी तुझा फ्लॅट बांधलाच नाही, इमारत बांधलेली नाही, तुझे रक्कम रु.50,000/- परत घेवून जा, येथून पुढे माझे दारात पाय ठेऊ नको’ म्हणून जाबदाराने त्याचे भारतीय स्टेट बँक, शाखा प्रतापगंज पेठ, सातारा येथील रक्कम रु.50,000/- चा चेक नंबर 487695 तक्रारदाराचे अंगावर फेकून दिला व तक्रारदाराला हाकलून दिले, त्यामुळे तक्रारदाराला प्रचंड मानसिक धक्का बसला. तक्रारदार यांचेकडून जाबदाराने रक्कम रु.50,000/- अँडव्हान्स तक्रारअर्जात नमूद सदनिका बुकींग पोटी स्विकारुनही जाबदाराने तक्रारदार यांना ठरले वेळेत नोंदणीकृत साठेखत करुन दिलेले नाही व खरेदीपत्रही करुन दिले नाही ही सेवेतील त्रुटी असलेने तक्रारदाराने प्रस्तुत जाबदार यांचेकडून प्रस्तुत सदनिकेचे नोंदणीकृत खरेदीपत्र करुन मिळावे म्हणून प्रस्तुत तक्रार अर्ज या मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदार यांनी प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून तक्रार कलम 3 मध्ये नमूद केले सदनिकेचे खरेदीपत्र व ताबा 2 महिन्याच्या आत करुन देणेबाबत जाबदाराला हुकूम व्हावा, सदर सदनिकेचे खरेदीपत्र व ताबा जाबदाराने तक्रारदाराला न दिल्यास तक्रारदाराला झाले नुकसानीपोटी रक्कम रु.15,00,000/- जाबदाराने तक्रारदार यांना द.सा.द.शे. 15 टक्के व्याजासह देणेबाबत हुकूम व्हावेत, जाबदाराने तक्रारदार यांना वर दिले मुदतीत सदनिकेचा ताबा व खरेदीपत्र करुन न दिलेस तक्रारदार यांना जाबदाराने तक्रारदाराने बुकींगपोटी जाबदाराला अदा केलेली रक्कम रु.50,000/- दि. 7/10/2012 पासून ते रक्कम प्रत्यक्ष हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 15 टक्के व्याजाने तक्रारदाराला परत देणेचा आदेश व्हावा. जाबदाराकडून तक्रारदाराला झाले मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.2,00,000/- देणेत यावेत, तक्रार अर्जाचा खर्च रक्कम रु.50,000/- जाबदारांकडून वसूल होवून मिळावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदार यांनी याकामी नि.2 कडे प्रतिज्ञापत्र, नि.5 चे कागदयादीसोबत नि.5/1 ते नि.5/7 कडे अनुक्रमे जाबदाराचे माहीतीपत्रक, जाबदाराने तक्रारदाराला द्यावयाच्या ठरले सदनिकेचा नकाशा, भवानीनगर संकुलाचा मंजूर झालेला नकाशा, तक्रारदाराने जाबदाराला सदनिका बुकींगसाठी दिले अँडव्हान्सची जाबदाराने तक्रारदाराला दिलेली पावती, जाबदाराने तक्रारदाराला दिले चेकची सत्य प्रत, जाबदाराचा चे बाऊन्स झालेचा बँकेचा रिटर्न मेमो, नि.8 कडे जाबदार क्र. 1 व 2 यांना नोटीस पोहोचल्याच्या पावत्या, नि.9 कडे तक्रारदाराने दिलेले कागदपत्रे व तक्रार अर्जासोबत दिलेले शपथपत्र हाच तक्रारदाराचा पुरावा समजणेत यावा म्हणून दिलेली पुरसीस, नि. 10 कडे तक्रारदाराला लेखी युक्तीवाद वगैरे कागदपत्रे तक्रारदाराने मे मंचात दाखल केले आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदार यांना नोटीस लागू होवूनही ते मे. मंचात गैरहजर राहीलेने जाबदार यांचेविरुध्द नि. 1 कडे एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. जाबदार हे याकामी हजर झाले नाहीत व त्यांनी तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन जाबदार यांनी खोडून काढलेले नाही.
5. वर नमूद तक्रारदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाचे निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.नं. मुद्दा निष्कर्ष
1. तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत काय ? होय
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सदोष सेवा पुरविली आहे काय ? होय
3. अंतिम आदेश काय ? खालील नमूद
आदेशाप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 व 2 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदाराने जाबदार यांचेकडे सातारा शहरातील सर्व्हे नं.62/1, विकासनगर, संगमनगर, खेड, ता.जि.सातारा या मिळकतीवर जाबदार उभारत असले भवानीनगर संकुल या इमारतीमधील ‘बी’ बिल्डिंग मधील सदनिका क्र. 208 याचे क्षेत्रफळ 656.17 चौ.फूट ही सदनिका खरेदी करणेचे उभयतांमध्ये ठरलेवर बुकींगसाठी म्हणून अँडव्हान्स रक्कम रु.50,000/- चा मालोजीराजे सहकारी बँकेचा चेक नं. 209600 हा दि.8/10/2012 या तारखेचा चेक तक्रारदाराने जाबदाराला अदा केला. चेकची रक्कम जाबदाराला मिळालेली आहे. सदर चेक तक्रारदाराकडून मिळणेबाबतची पावती क्र. 008 जाबदाराने तक्रारदाराला दिली आहे. प्रस्तुत पावतीवर सदनिकेचे वर्णन व किंम नमूद आहे. तसेच जाबदाराची सही आहे. सदरची पावती तक्रारदाराने नि.5 चे कागदयादीसोबत नि. 5/4 कडे दाखल आहे. यावरुन तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक आहेत व जाबदार हे तक्रारदाराचे सेवापुरवठादार आहेत हे निर्वादितपणे सिध्द होते. तसेच प्रस्तुत कामी जाबदाराने तक्रारदाराला तक्रार अर्जात नमूद केले वर नमूद वर्णनाचे सदनिकेचे बुकींगपोटी तक्रारदारकडून अँडव्हान्स रक्कम रु.50,000/- (रुपये पन्नास हजार मात्र) स्विकारुनही आजअखेर तक्रारदाराला त्याचे नोंदणीकृत साठेखत जाबदाराने करुन दिले नाही. तसेच खरेदीपत्रही करुन दिलेले नाही व तक्रारदार हे जाबदाराला वारंवार भेटून साठेखत करुन देणेबाबत व खरेदीपत्र करुन देणेबाबत विनंती केली असता जाबदाराने केवळ खोटी आश्वासने दिली व वेळ मारुन नेली. तसेच तक्रारदार हे दि.4/5/2015 रोजी जाबदाराला भेटून सदनिकेचे साठेखत करुन देणेबाबत विनंती केली असता जाबदार यांनी तक्रारदार यांना आम्ही तुझी सदनिका बांधलीच नाही, इमारत बांधली नाही, तुझे अँडव्हान्स दिलेले पैसे परत देतो घेऊन जा’ म्हणून रक्कम रु.50,000/- चा भारतीय स्टेट बँक शाखा प्रतापगंज पेठ, सातारा येथील जाबदारांचे खातेवरील चेक नं.487695 हा तक्रारदाराचे अंगावर फेकून दिला व तक्रारदाराला हाकलून दिले. सदरच्या चेकची व्हेरिफाईड प्रत तक्रारदाराने नि. 5 चे कागदयादीसोबत नि. 5/5 कडे दाखल केले आहेत. तसेच प्रस्तुत चेक बँकेत भरला असता ‘फंड्स इनसफीसियंट’ या शे-याने न वटता परत आलेचे बँकेचे मेमो तक्रारदाराने नि. 5/6 व 5/7 कडे दाखल केले आहेत. या सर्व कागदपत्रांचा विचार केला असता जाबदाराने तक्रारदार यांचेकडून तक्रार अर्जात नमूद केली सदनिका स.नं.62/1 वरील ‘भवानीनगर’ संकूलातील ‘बी’ इमारतीमधील सदनिका नं. 208 चे क्षेत्रफळ 656.17 चौ. फूट ही सदनिका तक्रारदार यांना विकणेचे मान्य व कबूल करुन प्रस्तुत सदनिकेचे बुकींगपोटी अँडव्हान्स म्हणून रक्कम रु.50,000/- तक्रारदाराकडून चेकने स्विकारले. चेकची रक्कम जाबदाराला मिळाली परंतु वर नमूद केलेप्रमाणे तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान कॉंन्ट्रक्ट झाला आहे हे नि. 5/4 कडील पावतीवरुन सिध्द होते. परंतु ठरलेप्रमाणे जाबदाराने नमूद सदनिकेचे नोंदणीकृत साठेखत करुन दिले नाही. परंतु, पावतीवर ठरले व्यवहाराबाबत सर्व उल्लेख केलेला आहे, त्यामुळे आता रजि.साठेखत करुन देणे गरजेचे वाटत नाही. पण खरेदीपत्रही करुन देणे गरजेचे वाटते. तक्रारदाराने जाबदाराला दिले अँडव्हान्स रक्कम रु.50,000/- पोटी जाबदाराने तक्रारदाराला दिलेला चेकही बाऊन्स झाला आहे. अशारितीने जाबदाराने तक्रारदार यांची घोर फसवणूक करुन तक्रारदाराला देय असणा-या सेवेमध्ये त्रुटी व कमतरता केली असलेचे स्पष्ट व सिध्द होत आहे. प्रस्तुत कामी जाबदार यांना तक्रार अर्जाची नोटीस लागू होऊनही जाबदार या कामी हजर झाले नाहीत व म्हणणे दिलेले नाही. त्यांचेविरुध्द नि. 1 वर एकतर्फा आदेश पारीत झालेला आहे. जाबदाराने तक्रारदाराचे तक्रार अर्जातील कोणतेही कथन खोडून काढलेले नाही. सबब तक्रार अर्जात तक्रारदाराने केलेली सर्व विधाने विश्वासार्ह आहेत असे म्हणणे न्यायोचीत होणार आहे. सबब मुद्दा क्र. 1 व 2 चे उत्तर होकारार्थी दिलेले आहे.
प्रस्तुत कामी तक्रारदाराने नि. 10 कडे लेखी युक्तीवाद दाखल केला आहे. त्यांचा तोंडी युक्तीवाद ऐकला. तक्रारदाराने नि. 10 कडे लेखी युक्तीवादात म्हटले आहे की, सदरची सदनिका ही दि.7/10/2012 रोजी रक्कम रु.14,04,000/- एवढया रकमेस विक्री करण्याचे जाबदाराने मान्य व कबूल केले होते. त्यावेळी तक्रारदाराने सदर सदनिकेचे अँडव्हान्स बुकींगपोटी रक्कम रु.50,000/- चा चेक तक्रारदाराने जाबदाराला अदा केला होता ती रक्कम जाबदाराला मिळालेली असूनही जाबदाराने तक्रारदाराला सदर सदनिकेचे नोंदणीकृत साठेखत तयार करुन दिले नाही. तसेच तक्रारदार यांना रक्कम रु.50,000/- चा भारतीय स्टेट बँकेचा चेक नं.487695 हा जाबदाराने दिलेला चेक न वटता ‘फुडस् इनसफीसियंट’ म्हणून बँकेच्या रिटर्न मेमोने परत आला आहे. यावरुन जाबदाराने तक्रारदाराला देय असलेल्या सेवेमध्ये कमतरता/त्रुटी केलेचे स्पष्ट होत आहे.
वरील सर्व विवेचन व कागदपत्रे यांचे अवलोकनावरुन, तक्रारदार यांनी तक्रार अर्जात केलेली कथने सिध्द केलेली आहेत. सबब तक्रारदारांचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करणे न्यायोचीत होणार आहे व जाबदार यांनी तक्रारदाराला नमूद सदनिकेचे नोंदणीकृत खरेदीपत्र करुन देणे न्यायोचित होणार आहे. परंतु तक्रारदाराने उभयतांमध्ये ठरलेली फ्लॅटची उर्वरीत रक्कम जाबदाराला अदा करणे आवश्यक आहे. जाबदारांनी मुदतीत खरेदीपत्र व ताबा तक्रारदाराला करुन न दिलेस जाबदार यांनी तक्रारदाराने अदा केलेली बुकींगची रक्कम रु.50,000/- बुकींग तारखेपासून रक्कम हाती पडेपर्यंत द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने तक्रारदाराला अदा करणे न्यायोचित होणार आहे या निष्कर्षातप्रत मे. मंच येत आहे. तसेच तक्रारदार यांनी सदनिका बुक करुनही जाबदाराने आजअखेर नोंदणीकृत साठेखत करुन दिले नाही व रक्कमही तक्रारदाराला परत दिली नसलेने जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे व तक्रारदाराची फसवणूक केली आहे. त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून जाबदार यांनी रु.50,000/- तक्रारदाराना अदा करणे न्यायोचीत होणार आहे.
7. सबब आम्ही खालीलप्रमाणे अंतीम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना सातारा शहर येथील स.नं.62/1, विकासनगर,
संगमनगर, खेड, ता.जि.सातारा या मिळकतीवरील ‘भवानीनगर’ या बांधणेत
येणा-या संकुलातील ‘बी’ बिल्डींग मधील सदनिका नं. 208 याचे क्षेत्रफळ
656.17 चौ.फू. याचे नोंदणीकृत खूषखरेदीपत्र आदेश पारीत तारखेपासून 2
महिन्यात व उर्वरीत रक्कम तक्रारदाराकडून स्विकारुन करुन द्यावे.
तक्रारदाराने ठरले रकमेपैकी ऊर्वरीत रक्कम जाबदाराला अदा करावी. सदर
इमारतीमधील वर नमूद ‘बी’ बिल्डींग मधील सदनिका नं.208 ची तक्रारदार व
जाबदार यांचेत ठरलेली रक्कम रु.14,40,000/- - रु.50,000/- = रु.13,54,000/-
तक्रारदाराने जाबदाराला अदा करावी.
3. प्रस्तुत कामी तक्रारदाराने विनंती कलम ब कडे केलेली विनंती कायद्यानुसार
योग्य नसलेने ती मान्य करता येत नाही.
4. जाबदाराने तक्रारदार यांना विहीत मुदतीत नमूद स.नं.62/1,
विकासनगर,संगमनगर खेड या मिळकतीवरील ‘भवानीनगर’ या संकुलातील
बी बिल्डिंग मधील सदनिकानं.208 चे क्षेत्रफळ 657.17 चौ.फू.चे खरेदीपत्र व
ताबा तक्रारदाराला करुन न दिलेस जाबदार यांनी तक्रारदाराने अदा केलेली
बुकींगची रक्कम रु.50,000/- बुकींग तारखेपासून रक्कम हाती पडेपर्यंत
द.सा.द.शे. 9 टक्के व्याजाने तक्रारदाराला अदा करावी.
5. तक्रारदार यांनी सदनिका बुक करुनही जाबदाराने आजअखेर नोंदणीकृत
साठेखत करुन दिले नाही व रक्कमही तक्रारदाराला परत दिली नसलेने
जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे व तक्रारदाराची फसवणूक
केली आहे. त्यामुळे नुकसानभरपाई म्हणून तक्रारदाराला जाबदार यांनी
रु.50,000/- (रुपये पन्नास हजार फक्त) तक्रारदाराना अदा करावेत..
6. तक्रारदाराला झाले मानसिक व शारिरीक त्रासापोटी जाबदार यांनी तक्रारदार
यांना रक्कम रु.10,000/-(रुपये दहा हजार फक्त) अदा करावेत.
7. तक्रार अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/-(रुपये तीन हजार मात्र) जाबदार
यांनी तक्रारदार यांना अदा करावेत.
8. वर नमूद सर्व आदेशाचे पालन/पूर्तता जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून
60 दिवसांत करावे.
9. विहीत मुदतीत आदेशाचे पालन न केल्यास तक्रारदार यांना ग्राहक संरक्षण
कायदा कलम 25 व 27 नुसार जाबदारांविरुध्द कारवाई करणेची मुभा राहील.
10. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
11. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 19-09-2015.
सौ.सुरेखा हजारे श्री.श्रीकांत कुंभार सौ.सविता भोसले
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.