द्वारा- श्री. एस. के. कापसे, मा. सदस्य यांचेनुसार,
:- निकालपत्र :-
दिनांक 30/09/2011
तक्रारदारांची तक्रार थोडक्यात खालीलप्रमाणे-
1. तक्रारदार डॉक्टर असून त्यांनी जाबदेणार कंपनीचे वॉशिंग मशिन दिनांक 7/12/1999 रोजी रक्कम रुपये 19,192/- ला खरेदी केले. दिनांक 27/5/2009 रोजी मशिन बंद पडले म्हणून तक्रारदारांनी दिनांक 27/5/2009 रोजी जाबदेणारांकडे तक्रार क्रमांक 048 नोंद केली. नंतर सर्व्हिस सेंटरच्या इंजिनिअरनी मशिन तपासणी केली असता मशिनचा पल्सेटर बेस क्रॅक जाऊन तुटला असून बदलण्यासाठी सुमारे रुपये 300/- ते 400/- खर्च येईल असे सांगण्यात आले. जाबदेणार यांची स्थानिक सर्व्हिस फ्रेंचायची अथर्व सेवा यांच्याकडे चौकशी केली असता कंपनीच्या पुणे शाखेत पल्सेटर ची मागणी नोंदवली आहे पण अजून उपलब्ध नसल्याचे तक्रारदारास सांगण्यात आले. वारंवार चौकशी करुनही पल्सेटर उपलब्ध होत नाही, झाला नाही असे तक्रारदारांना सांगण्यात आले, मशिन दुरुस्त करुन देण्यात आले नाही, पुणे कंपनीने औरंगाबाद येथील कपंनी मुख्यालयात पल्सेटर मागणी नोंदविण्यात आलेली आहे परंतू अजून उपलब्ध नाही अशी उत्तरे तक्रारदारांना मिळाली. दिनांक 19/7/2009 रोजी तक्रारदारांनी जाबदेणारांकडे पुन्हा तक्रार नोंदणी क्र.080 नोंद केली असता पल्सेटर पुणे शाखेकडे येत नसल्याने कंपनीकडे संपर्क साधण्यास सांगण्यात आले. नंतर दिनांक 24/8/2009 रोजी तक्रारदारांनी रजिस्टर्ड पोस्टाद्वारे क्रमांक 3233 जाबदेणार कंपनीला औरंगाबाद पत्त्यावर पत्र पाठविले, ते डिलीव्हर न होता दिनांक 1/9/2009 रोजी परत आले. म्हणून पुणे शाखेत जाऊन मशिन दुरुस्तीबाबत पत्र दिले, कार्बन कॉपीवर पोच घेतली. परंतू उपयोग झाला नाही. आधीचे परत आलेले पत्रच तक्रारदारांनी परत जाबदेणार कंपनीला पाठविले असता दिनांक 7/10/2009 रोजी “ पाठविणा-याला परत” शे-यासहित परत आले. जाबदेणारांनी तक्रारदारांना योग्य ती सेवा दिली नाही, स्पेअर पार्ट्स पुरविले नाही त्यामुळे तक्रारदार जे व्यवसायाने डॉक्टर आहेत त्यांना शारिरीक, मानसिक त्रास झाला, म्हणून तक्रारदारांनी प्रस्तूत तक्रार दाखल केली. मशिनचा पल्सेटर बदलून मिळावा, रुपये 10,000/- नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली. तक्रारीसोबत प्रतिज्ञापत्र, कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. तक्रारदारांची तक्रार व मागणी जाबदेणार यांना मान्य नाही. तक्रारदारांनी सेंन्ट्रल सर्व्हिस स्टेशन वर फोन करुन तक्रार नोंदविल्यानंतर कंपनीच्या सर्व्हिस इंजिनिअरला तपासणी अंती पल्सेटर खराब झालेला असून बेस मध्ये क्रॅक जाऊन तुटला असल्याचे कळले. मशिनला जवळ जवळ 10 वर्षे होत आलेली आहेत. मशिनची बॉडी रस्टी- डॅमेज झालेली असल्याचे तक्रारदारांना कळविण्यात आले होते. मशिनची दोन वर्षांची वॉरंटी 2001 मध्येच संपलेली आहे. तक्रारअर्जाच्या आधी जवळ जवळ आठ वर्षे मशिनची वॉरंटी संपलेली आहे. वॉरंटी कालावधीत सर्व्हिस देणे उत्पादक कंपनीवर बंधनकारक असते. वॉरंटी कालावधी संपलेला असल्याने तक्रारदारास मशिनचा कुठलाही स्पेअर पार्ट उपलब्ध करुन देण्यात, सेवा देण्यास जाबदेणार बांधील नाहीत. प्रस्तूत तक्रार खोटी असून खर्चासह रद्य करण्यात यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट मिळावी अशी मागणी जाबदेणार करतात.
3. तक्रारदारांनी रिजॉईंडर दाखल करुन जाबदेणारांचा लेखी जबाब नाकारला.
4. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन – इनव्हॉईस चलनवरुन त्यांनी दिनांक 7/12/1999 रोजी रक्कम रुपये 19,192/- ला जाबदेणार कंपनी उत्पादित वॉशिंग मशिन खरेदी केल्याचे दिसून येते. मशिनची वॉरंटी 2001 पर्यन्तच होती. वॉरंटी कालावधी संपल्यानंतर 27/5/2009 रोजी मशिन बंद पडले म्हणून तक्रारदारांनी दिनांक 27/5/2009 रोजी जाबदेणारांकडे तक्रार क्रमांक 048 नोंद केली. नंतर सर्व्हिस सेंटरच्या इंजिनिअरनी मशिन तपासणी केली असता मशिनचा पल्सेटर बेस क्रॅक जाऊन तुटला असून बदलण्यासाठी सुमारे रुपये 300/- ते 400/- खर्च येईल असे सांगण्यात आले. मशिनचा पल्सेटर - स्पेअर पार्ट स्वखर्चाने बदलून मिळण्यासाठी, तक्रारदारांनी जाबदेणार उत्पादक कंपनीकडे वारंवार पाठपुरावा करुनही, लेखी तोंडी चौकशी करुनही, रजिस्टर्ड पोस्टाने पत्रे पाठवून देखील जाबदेणार कंपनीने त्याची दखल घेतली नसल्याचे दिसून येते. तक्रारदारांनी जाबदेणार कंपनीला औरंगाबाद येथे रजिस्टर्ड पोस्टाने पाठविलेल्या पत्रांची “R. to sender” शेरा असलेले, “left address” शेरा असलेले पोस्टाची पोहोच पावती रेकॉर्डवर दाखल केलेली आहे. तक्रारदारांना मशिनचा पल्सेटर - स्पेअर पार्ट त्यांनी मागणी करुनही, तक्रारदारांच्या स्वखर्चानेही, उपलब्ध करुन दिला नाही, यावरुन जाबदेणार यांच्या सेवेतील त्रुटी दिसून येते. जाबदेणार ही वॉशिंग मशिनची उत्पादक कंपनी आहे. मशिनची वॉरंटी जरी संपलेली असली तरीही मशिनचे स्पेअर पार्ट्स जाबदेणार यांनी उपलब्ध करुन दयावयास हवे होते. स्पेअर पार्ट्स - पल्सेटर अभावी तक्रारदार वॉशिंग मशिन वापरु शकले नाहीत, त्यामुळे तक्रारदारांना निश्चितच शारिरीक, मानसिक त्रास सहन करावा लागला आहे असे मंचाचे मत आहे. म्हणून तक्रारदार नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे.
वर नमूद विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश पारीत करण्यात येतो-
:- आदेश :-
1. तक्रार अंशत: मान्य करण्यात येते.
2. जाबदेणार क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या अथवा वैयक्तिकरित्या तक्रारदारास नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 2000/- व तक्रारीचा खर्च रक्कम रुपये 1000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत दयावेत.
3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.