shri sachin shardchndar dhrmadhikari filed a consumer case on 28 Jan 2016 against vidhya digvijy gayakwad in the Satara Consumer Court. The case no is CC/14/35 and the judgment uploaded on 28 Jan 2016.
न्यायनिर्णय
(सदर न्यायनिर्णय मा.सौ.सविता भोसले, अध्यक्षा यानी पारित केला)
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रार अर्ज ग्राहक संरक्षण कायदा कलम 12 नुसार दाखल केला आहे. तक्रारअर्जातील थोडक्यात मजकूर पुढीलप्रमाणे-
तक्रारदार हे पुणे येथील रहिवाशी आहेत तर जाबदार सातारा येथे आर्या डेव्हलपर्स या नावाने बांधकाम व्यावसायीक म्हणून काम करतात. मिळकत विकत घेणे, विकसीत करणे, विकत घेतलेल्या मिळकती, विकसीत केल्यानंतर त्यातील फ्लॅट ग्राहकांना विकणे असा जाबदाराचा व्यवसाय आहे. डिस्ट्रीक्ट सातारा, सब डिस्ट्रीक्ट,सातारा येथील सातारा शहर नगरपरिषद हद्दीतील तसेच दुय्यम निबंधकसो यांचे कार्यक्षेत्रातील यादोगोपाळ पेठ येथील सि.स.नं. 63/64/65/66/68 व 69 या मिळकतीवर उभारण्यात आलेल्या ‘शुभवास्तु’ या गृहप्रकल्पातील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं.250 याचे क्षेत्रफळ 1116 चौ.फू. (103.68) चौ.मी. हा तक्रारीचा विषय आहे. तक्रारदाराची सातारा येथे फ्लॅट घेणेची इच्छा असल्याने त्यानी, जाबदार वर नमूद मिळकतीवर बांधत असले इमारतीमधील पहिल्या मजल्यावरील सदनिका क्र. 205 क्षेत्रफळ 103.38 चौ. मी. खरेदी घेणेसाठी, जाबदार यांचे तर्फे कुलमुखत्यारधारक, श्री. दिग्वीजय अनंतराव गायकवाड, मुंबई यांचेबरोबर करार मे. दुय्यम निबंधक, सातारा येथे Agreement for sale of flat हे करारपत्र अ. नं. 3387/12 दिनांक 27/6/2012 रोजी नोंदणीकृत केले. प्रस्तुत तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान अस्तित्वात आलेल्या सदर करारान्वये प्रस्तुत सदनिकेची किंमत रक्कम रु.15,60,000/- (रुपये पंधरा लाख साठ हजार मात्र) इतकी ठरली. प्रस्तुत रक्कम दिनांक 9/6/2012 रोजीचे अँलॉटमेंट लेटरने तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान मान्य व कबूल करणेत आली. प्रस्तुत करारास अनुसरुन तक्रारदार यांनी विसार (Advance) म्हणून रक्कम रु.3,00,000/- अदा केली व मोबदल्यापोटी रक्कम रु. 12,60,000/- स्टेट बँक ऑफ इंडिया, एम.आय.डी.सी. शाखा सातारा येथून घरकर्ज प्रकरण मंजूर करुन घेतले व सदर रकमेपैकी रक्कम रु.12,00,000/- (रुपये बारा लाख मात्र) सदर बँकेने तक्रारदार यांना दिली. अशाप्रकारे वादातीत फ्लॅटचे मोबदल्यापोटी तक्रारदाराने आजपर्यंत जाबदार यांना रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख मात्र) अदा केली आहे व जाबदाराने प्रस्तुत रक्कम स्विकारलेली आहे. तदनंतर तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान ठरलेनुसार मोबदल्याची उर्वरित रक्कम रु.60,000/- (रुपये साठ हजार मात्र) सदनिकेचा ताबा देतेवेळी तसेच बँकेच्या नियमानुसार देणेचे ठरले. तसेच तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान दि. 9/6/2012 रोजी अस्तित्वात आलेला अँलॉटमेंट लेटरनुसार सदर सदनिकेचा इतर खर्च म्हणजेच स्टँम्प डयुटी, रजिस्ट्रेशन फी तक्रारदाराने केलेला असून सदर सदनिकेचा ताबा देतेसमयी तक्रारदार यांनी व्हॅट, सर्व्हीस टॅक्सची रक्कम भरणेचे मान्य व कबूल केले आहे.
अशी वस्तुस्थिती असताना जाबदाराने तक्रारदाराला दि. 5/10/2013 रोजी नोटीस पाठविली. नोटीस पाहून तक्रारदाराला धक्काच बसला. कारण तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान झालेल्या करारामध्ये नमूद नसतानाही जाबदार यांनी जादा सुविधा पुरविल्याबद्दल तक्रारदाराकडे जादा रक्कम पुरविल्याबद्दल तक्रारदाराकडे जादा रक्कम रु.8,63,243/- मागणी केली व सदरची रक्कम तक्रारदाराने अदा न केलेस दि. 27/6/2012 रोजी अस्तित्वात आलेला नोंदणीकृत करार (Agreement to sale) रद्द करणेत येईल असे तक्रारदार यांना धमकावले. इतकेच नव्हे तर जाबदाराने तक्रारदार यांना दि. 5/12/2013 रोजी पत्र पाठवून रक्कम रु.8,63,243/- न दिलेस सदर नोंदणीकृत करार रद्द करणेची पुन्हा धमकी दिली. तदनंतर तक्रारदाराने जाबदार यांना दि. 16/12/2013 रोजीचे पत्राने सर्व गोष्टी खुलासेवार नमूद केल्या व तक्रारदार हे दि. 27/6/2012 रोजीचे करारातील शर्ती व अटींची पूर्तता करणेस कधीही तयार होते व आहेत. तसेच ऊर्वरीत मोबदल्याची रक्कम रु.60,000/- देणेस तयार होते व आहेत. पुन्हा जाबदाराने दि. 28/12/2013 रोजी तक्रारदाराला बेकायदेशीरपणे व एककल्ली विचाराने कळविले की, तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान अस्तित्वात आलेला नोंदणीकृत करार रद्द करणेकामी मे. दुय्यम निबंधक, सातारा यांचे कचेरीत येवून प्रस्तुत करार रद्द करणेचा करार करावा असे कळविले. परंतू प्रस्तुत नोटीस मूळातच बेकायदेशीर व अन्यायकारक आल्याचे व अशारितीने झालेला करार रद्द करणेचा अधिकार जाबदार यांना नाही. वास्तविक तक्रारदार यांनी जाबदार यांना दि. 2/1/2014 रोजीची नोटीस पाठवून जाबदार यांना तक्रारदारकडून देय असलेली रक्कम रु.60,000/- (रुपये साठ हजार मात्र), ऊर्वरित मोबदल्यापोटी, तसेच सर्व्हीस टॅक्स, व्हॅट रक्कम रु.63,804/- एम.एस.ई.बी. व पाणी व इतर चार्जेस करीता रक्कम रु.64,760/-, ट्रान्सफॉर्मर चार्जेस म्हणून रक्कम रु.12,500/- अशी एकूण रक्कम रु.2,02,064/’ देणे बंधनकारक होते. पैकी रक्कम रु.60,000/- वजा जाता ऊर्वरित रक्कम रु.1,41,064/- (रुपये एक लाख एक्केचाळीस हजार चौसष्ट मात्र) जाबदार यांना देणेस तक्रारदार यांनी प्रस्तुत रकमेचा चेक नं. 001903 दि.4/01/2014 रोजीचा स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा टिळक रोड, पुणे हा जाबदाराला अदा केला.
तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान अस्तित्वात आलेल्या करारानुसार जादाचे काम म्हणजेच सिक्युरिटी सिस्टीम, डी. 2 एच, वॉटर प्युरिफायर करणेचे कधीही ठरले नव्हते व नाही. सबब त्या कामासाठी रक्कम रु.90,000/- तक्रारदाराकडून वसूल करणेचा किंवा मागणेचा अधिकार जाबदार यांना नाही. करारामध्ये कोणत्याही अटी व शर्तीनुसार ठरले नसतानाही जाबदार बळजबरीने अवास्तव रकमेची मागणी करत आहेत व तक्रारदाराची मानसीक व शारिरीक पिळवणूक करत आहेत. तक्रारदाराने प्रस्तुत सदनिका खरेदीसाठी बँकेचे कर्ज घेतले असल्याने तक्रारदाराला दरमहा हप्ता भरणेचा नाहक भुर्दंड होत आहे. त्यातूनच वारंवार विनवण्या करुनही जाबदार यांनी अद्यापही प्रस्तुत सदनिकेचा ताबा तक्रारदार यांना दिलेला नाही. उलटपक्षी अवास्तव जादा रकमेची मागणी करुन तक्रारदार यांना नाहक त्रास जाबदार देत आहेत.
तक्रारदाराने सदनिकेची नोंदणी केली त्यावेळी शुभवास्तु गृहप्रकल्पाचे ब्रोशरमध्ये नमूद केलेल्या सुविधा म्हणजेच व्यायामशाळा, ध्यानमंदिर, मैदान, रेन वॉटर हार्वेस्टींग सिस्टीम, फायर फायरींग सिस्टिम प्रत्येक सदनिकाधारकास वैयक्तिक वाहनतळ उभारलेले नाही. तसेच तक्रारदार या गृहप्रकल्पास वारंवार भेट देत असून सदर गृहप्रकल्पाची इमारत बांधून झाली आहे. मात्र वर उल्लेख केलेल्या सुविधा जाबदार यांनी पुरविल्या नसल्याने ग्राहक तक्रार निवारण कायद्यान्वये सेवा पुरवण्यात कसूर केली आहे. तसेच सदनिकेचे बांधकाम पूर्ण होऊनही जाबदार हे जादा पैशाच्या लोभाने व सदनिकांची किंमत वाढल्याने तक्रारदार यांना प्रस्तुत सदनिकेचा ताबा देणेस हेतुपूर्वक टाळाटाळ करत आहेत. सबब प्रस्तुत जाबदार यांचेकडून अपूर्ण राहीलेली काम पूर्ण करुन सदनिकेचा ताबा लवकरात लवकर मिळणेसाठी प्रस्तुत तक्रार अर्ज तक्रारदाराने य मे. मंचात दाखल केला आहे.
2. तक्रारदाराने प्रस्तुत कामी जाबदार यांचेकडून तक्रारदाराला नमूद सदनिकेचा ताबा लवकरात लवकर देणेबाबत जाबदाराला आदेश व्हावेत, तसेच विहीत मुदतीत तक्रारदाराला जाबदाराने प्रस्तुत सदनिकेचा ताबा न दिलेने जाबदारकडून तक्रारदाराने अदा केली. रक्कम रु.15,00,000/- वर रक्कम जाबदाराला अदा केलेपासून सदनिकेचा प्रत्यक्ष कब्जा तक्रारदाराला मिळेपर्यंत द.सा.द.शे. 24 टक्के व्याज देणेबाबत जाबदाराला हुकूम व्हावेत. जाबदाराने गृहप्रकल्पात ध्यानमंदीर, व्यायामशाळा, रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टिम, फाय फायरींग सिस्टिम, प्रत्येक सदनिकाधारकास वैयक्तिक वाहनतळ, खेळण्यासाठी मैदान, अशा सुविधा पुरविणेचे आदेश जाबदार यांना करावेत, जाबदाराने गृहप्रकल्पाचा बांधकाम पूर्णत्वाचा दाखला येणेबाबत जाबदाराला आदेश व्हावेत, तक्रारदाराला नाहक खर्चात पाडून तक्रार अर्ज दाखल करणेस भाग पाडलेबाबत रक्कम रु.50,000/- खर्च तक्रारदाराला देणेबाबत जाबदाराला आदेश व्हावेत, मानसीक व शारीरिक त्रासाबाबत तक्रारदार यांना रक्कम रु.1,00,000/- देणेचे आदेश जाबदाराला करावेत अशी विनंती तक्रारदाराने याकामी केली आहे.
3. तक्रारदाराने याकामी नि.2 व 3 कडे अँफीडेव्हीट, नि.4 चे कागदयादीसोबत नि. 4/1 ते नि.4/7 कडे अनुक्रमे के.पी.लॅन्ड अँन्ड लिगल सोल्यूशन्स एल.एल.पी सातारा यांची चेकच्या झेरॉक्स प्रतीसह आलेली नोटीस दि. 19/2/2014, प्रस्तुत नोटीसला जाबदाराने पाठवलेले उत्तर, फ्लॅट टर्मिनेशनबाबत जाबदाराने तक्रारदाराला दिलेली नोटीस/प्रत्र, प्रस्तुत पत्रास तक्रारदाराने दिलेले उत्तर, जाबदाराने तक्रारदाराला साठवलेली रक्कम मागणीची पत्रे, मे. दुय्यम निबंधक,सातारा यांचेपुढे करार व जाबदार यांचे दरम्यान नोंदणीकृत झालेले करारपत्र [Agreement to sale] ची झेरॉक्स जाबदाराने तक्रारदाराला दि.9/6/2012 रोजी दिलेले Allotment letter ची प्रत, नि.21 कडे लेखी युक्तीवाद, नि. 22 कडे जाबदाराने दिले कमीशन अर्जात तक्रारदाराचे म्हणणे, नि.25 चे कागदयादीसोबत मे. दिवाणी न्यायाधिश, वरिष्ठ स्तर, सातारा येथील स्पे.दि.मु. नं.204/14 चे कामी दाखल केले कैफीयतची प्रत, नि.10 कडे जाबदाराचे म्हणण्यावर तक्रारदाराचे रिजॉईंडर, नि. 14 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 14 अ कडे पुरावा संपलेची पुरसिस, वगैरे कागदपत्रे याकामी तक्रारदाराने दाखल केली आहेत.
4. प्रस्तुत कामी जाबदाराने नि. 7 कडे म्हणणे/कैफीयत, नि. 8 चे कागदयादीसोबत नि.8/1 ते नि.8/16 कडे अनुक्रमे अँलॉटमेंट लेटर, करारपत्राचा ड्राफ्ट, नोंदणीकृत करारपत्र, तक्रारदारकडून रक्कम, मिळालेबाबत माहिती,सी.ए.चे प्रमाणपत्र, जाबदाराने तक्रारदार यांना पाठवलेले पत्र, तक्रारदाराने जाबदाराला पाठवलेले पत्र, तक्रारदाराने उर्वरित रक्कम अदा न केलेस अँलॉटमेंट रद्द करणेत येईल असे जाबदारांचे पत्र, जाबदाराने तक्रारदाराला करारपत्र कॅन्सल करणे संदर्भात दिलेली नोटीस, जाबदाराने जादा काम तक्रारदाराचे सदनिकेमध्ये केलेची यादी, ब्राऊचर, परिशिष्ट III (करारातील) व प्रत्यक्ष साईटचे/ईमारतीचे फोटोग्राफ्स, ऑक्यूपेशन सर्टीफिकेट, तक्रारदाराने जाबदाराला वकीलांमार्फत पाठवलेली नोटीस, प्रस्तुत नोटीसला जाबदाराने दिलेले उत्तर, जाबदाराने केले जादा कामाची यादी, नि. 24 कडे लेखी युक्तीवाद, नि. 16 कडे पुराव्याचे शपथपत्र, नि. 17 कडे पुरावा संपलेची पुरसिस वगैरे कागदपत्रे जाबदार यांनी याकामी दाखल केली आहेत. जाबदार यांनी त्यांचे म्हणणे कैफीयतमध्ये पुढीलप्रमाणे आक्षेप नोंदविले आहेत.
1. तक्रारदाराचा तक्रार अर्ज व त्यातील मजकूर मान्य व कबूल नाही.
2. तक्रारदाराने प्रस्तुत इमारतीचे ब्राऊझर पाहून त्याला तो प्लॅन पसंत पडल्याने प्रस्तुत इमारतीतील ‘शुभवास्तु’ या इमारतीमधील फ्लॅट घेणेस तक्रारदार यांनी तयारी दाखवली व तक्रारदाराचे संमतीनेच प्रस्तुत कामी करारपत्र, [Agreement to sale] झालेले आहे. तक्रारदारवर जाबदाराने फ्लॅटखरेदीसाठी कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. त्याकरीता फ्लॅट बुकींगसाठी तक्रारदाराने रक्कम रु.3,00,000/- चा धनादेश नं.570577 ता.15/6/2014 रोजीचा दिलेला होता. त्यानंतर जाबदाराने Agreement to sale चा (करारपत्राचा) ड्राफ्ट जाबदार यांना ई-मेल ने पाठवली. तक्रारदाराला प्रस्तुत मेल मिळाल्यावर 14 दिवसांनी तक्रारदार जाबदारकडे आले व प्रस्तुत करारपत्र [Agreement to sale] नोंदणीकृत करणेची विनंती केली. त्याप्रमाणे तक्रारदार व जाबदार या उभयतांनी सब रजिस्ट्रार ऑफीस,सातारा येथे प्रस्तुत करारपत्र नोंदणीकृत केले. करारपत्र नं. 3387/2012 ता. 27 जून,2012 अशाप्रकारे बादातीत फ्लॅट तक्रारदार यांना खरेदी देणेसाठीचे करारपत्र झाले व प्रस्तुत फ्लॅटची खरेदी किंमत रु.15,60,000/- (रुपये पंधरा लाख साठ हजार मात्र) ठरली अधिक इतर चार्जेस,टॅक्स,व्याज इत्यादी तक्रारदाराने हे सर्व जार्जेस द्यायला तयारी दाखवली. करारपत्रातील पॉईंट नं.1,6,7,8,10,11,14,15,16,17,18,23 व 34 प्रमाणे सर्व चार्जेस तक्रारदाराने द्यायचे होते व तक्रारदाराची त्यास संमत्ती होती. प्रस्तुत चार्जेसची रक्कम ठरले किंमतीत रु.15,60,000/- मध्ये जमा नव्हती तर ते चार्जेस प्रस्तुत ठरले किंमत सोडून तक्रारदाराने भरायचे होते व आहेत. करारपत्रात नमूद केलेप्रमाणे तक्रारदाराने करारात ठरलेप्रमाणे पूर्ण रक्कम जाबदाराला अदा केलेनंतरच फ्लॅटचा ताबा तक्रारदाराला जाबदाराने द्यायचा होता. परंतू तक्रारदाराने फक्त 15 लाख रुपये जाबदाराला अदा केले आहेत. तक्रारदाराचे कथनाप्रमाणे फक्त रक्कम रु.60,000/- (रुपये साठ हजार मात्र) जाबदाराला या वादातीत सदनिकेच्या खरेदीपोटी देणे बाकी आहे हे मान्य व कबूल नाही. तक्रारदार वाढीव क्षेत्राची रक्कम देणेस तसेच, ऊर्वरीत देणे रकमेवरील व्याज, सर्व्हीस टॅक्स व व्हॅट, इलेक्ट्रीकसीटी चार्जेस, पाणीपुरवठा कनेक्शन चार्जेस, ट्रान्स्फॉर्मर चार्जेस, सदनिकेचे जादा सुविधा व काम केलेबाबतचे चार्जेस अशी सर्व रक्कम तक्रारदाराकडून जाबदाराला येणे आहे. प्रस्तुत सर्व येणे रक्कम तक्रारदाराने जाबदाराकडे जमा करणेसाठी जाबदाराने तक्रारदाराला नोटीस दिली आहे. तक्रारदाराने सर्व्हीस टॅक्स व व्हॅटची रक्कम भरली नसलेने जाबदाराने ती सरकारकडेजमा केली आहे. परंतु प्रस्तुत सर्व्हीस टॅक्स व व्हॅटची व्याजासह रक्कम तक्रारदाराने जाबदाराला देणेबाकी आहे. तक्रारदाराने करारपत्रात वाढीव कामाचे व सोयीसुविधांचेपोटी जादा रक्कम जाबदाराला देणेचे मान्य केले आहे. अशी एकूण रक्कम रु.8,63,243/- (रुपये आठ लाख त्रेसष्ट हजार दोनशे त्रेचाळीस मात्र) तक्रारदाराने जाबदाराला देणे बाकी आहे व तक्रारदाराला योग्य मुदत प्रस्तुत रक्कम भरणेस जाबदाराने जमा करणेसाठी देऊनसुध्दा तक्रारदाराने सदरची रक्कम जाबदाराकडे जमा केलेली नाही. प्रस्तुत देणे रक्कम जाबदाराला अदा करुन तक्रारदाराने फ्लॅटचा ताबा घ्यायचे सोडून तक्रारदाराने सदर रक्कम जाबदाराला देणेचे टाळले आहे. त्यामुळे जाबदाराने प्रस्तुत फ्लॅट/सदनिकेचे तक्रारदाराला दिलेली अँलॉटमेंट रद्द करणेसाठी तक्रारदाराला नोटीस पाठवली आहे. कारण करारात ठरलेप्रमाणे रक्कम जाबदारांना तक्रारदाराने अदा केलेली नाही. त्यामुळे जाबदाराने तक्रारदाराला फ्लॅटचा ताबा दिलेला नाही. यामध्ये जाबदाराने तक्रारदाराना कोणतीही सेवात्रुटी दिलेली नाही. परंतू तक्रारदाराने मे मंचात विनाकारण तक्रार अर्ज दाखल केला आहे. करारपत्रात ठरलेप्रमाणे तक्रारदार वागलेले नाहीत व ठरलेप्रमाणे जादा सोयीसुविधा व जादा क्षेत्राची रक्कम तक्रारदाराने जाबदाराला अदा केली नाही. तसेच व्हॅट व टॅक्स, तसेच पाणी कनेक्शन चार्जेस, इलेक्ट्रीकसिटी चार्जेस, ट्रान्स्फॉर्मर चार्जेस वगैरे करारात ठरलेप्रमाणे कोणतीही रक्कम तक्रारदाराने जाबदाराला अदा केलेली नाही. यामुळे तक्रारदाराला तक्रार अर्ज खर्चासह फेटाळणेत यावा असे म्हणणे जाबदाराने दाखल केले आहे. तक्रारदाराने प्रस्तुत सदनिका ही गुंतवणूकीच्यादृष्टीने खरेदी केली आहे. त्यांच्या स्वतःच्या उपयोगासाठी नाही तर गुंतवणूकीसाठी बुक केली असल्याने प्रस्तुत तक्रारदाराने व्यापारी हेतूने बुक केली असलेने तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक होत नाहीत. त्यामुळे प्रस्तुत तक्रार अर्ज या मे. मंचात चालणेस पात्र नाही व या मे मंचास सदरचा तक्रार अर्ज चालविणेचे अधिकार नाहीत. तरी तक्रार अर्ज खर्चासह फेटाळावा व तक्रारदाराकडून जाबदारालाच रक्कम रु.2,00,000/- कॉम्पेनसेटरी कॉस्ट देणेचे आदेश व्हावेत असे म्हणणे जाबदाराने दिले आहे.
5. वर नमूद तक्रारदार व जाबदार यांनी दाखल केले सर्व कागदपत्रांचे काळजीपूर्वक अवलोकन करुन मे. मंचाने प्रस्तुत तक्रार अर्जाच्या निराकरणार्थ पुढील मुद्दयांचा विचार केला.
अ.क्र. मुद्दा उत्तर
1. तक्रारदार व जाबदार यांचेत ग्राहक व सेवापुरवठादार
असे नाते आहे काय? होय.
2. जाबदार यांनी तक्रारदार यांना अनुचित व्यापारी प्रथेचा
अवलंब करुन सदोष सेवा पुरविली आहे काय? होय.
3. तक्रारदार हे जाबदार यांचेकडून सदनिकेचा ताबा
व नुकसानभरपाई मिळणेस पात्र आहेत काय ?
4. अंतिम आदेश? खालील आदेशात
नमूद केलेप्रमाणे
विवेचन-
6. वर नमूद मुद्दा क्र.1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- तक्रारदार यांनी जाबदार यांनी सातारा नगरपरिषद हद्दीतील यादोगोपाळ पेठ, सातारा येथील सि.स.नं. 63/64/65/66/68 व 69 या मिळकतीवर उभारणेत येणा-या ‘शुभवास्तु’ या गृहप्रकल्पातील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. 205 याचे क्षेत्र 1116 चौ.फूट म्हणजेच 103.68 चौ.मी. खरेदी घेणेसाठी जाबदारतर्फे कुलमुखतयार दिग्वीजय अनंतराव गायकवाड यांचेबरोबर करार केला. सदरचा करार [ Agreement to sale ] मे. दुय्यम निबंधक, सातारा यांचेकडे अनुक्रमांक 3387/12 अन्वये दि. 27/6/2012 रोजी नोंदणीकृत झाला. तक्रारदार व जाबदार यांचेदरम्यान अस्तित्वात आलेल्या सदर करारान्वये या सदनिकेची किंमत रक्कम रु.15,60,000/- (रुपये पंधरा लाख साठ हजार मात्र) ठरली होती. सदर रक्कम दि.9/6/2012 रोजीचे अँलॉटमेंट पत्राने तक्रारदार व जाबदार यांचेत मान्य व कबूल झाली. प्रस्तुत करारास अनुसरुन सदनिकेच्या मोबदल्यापोटी विसारा म्हणून तक्रारदाराने जलाबदाराला रक्कम रु.3,00,000/- (रुपये तीन लाख मात्र) अदा केली व मोबदल्याच्या उर्वरीत रकमेसाठी रक्कम रु.12,60,000/- करीता तक्रारदाराने स्टेट बँक ऑफ इंडिया एम.आय.डी.सी. शाखा सातारा येथून गृहकर्ज मंजूर करुन घेतले व सदर रकमेपैकी रक्कम रु.12,00,000/- (रुपये बारा लाख मात्र) सदर बँकेने जाबदार यांना अदा केले आहेत. अशाप्रकारे तक्रारदाराने जाबदार यांना सदनिकेच्या ठरलेली किंमत रक्कम रु.15,60,000/- पैकी रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख मात्र) अदा केलेले आहेत व उर्वरीत रक्कम रु.60,000/- सदनिकेचा जाबदार घेतेवेळी देणेचे ठरले होते. त्यामुळे प्रस्तुत रक्कम तक्रारदारने जाबदाराला दिलेली नाही. प्रस्तुत बाबी जाबदाराने मान्य केल्या आहेत. तसेच उभयतांमध्ये झाले कराराची सत्यप्रत याकामी दाखल आहे. त्यामुळे तक्रारदार हे जाबदाराचे ग्राहक म्हणून जाबदार हे सेवापुरवठादार आहेत हे निर्विवादपणे स्पष्ट होते म्हणून आम्ही मुद्दा क्र. 1 चे उत्तर होकारार्थी दिले आहे.
7. वर नमूद मुद्दा क्र. 2,3 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत. कारण- वर मुद्दा क्र. 1 मध्ये नमूद केलेप्रमाणे तक्रारदार व जाबदार यांचे दरम्यान रजिस्टर करारपत्र (Agreement to sale ) झाले आहे. परंतू प्रस्तुत करारात ठरलेप्रमाणे सदनिकेच्या किंमतीपोटी रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख मात्र) तक्रारदाराने जाबदाराला अदा करुनही जाबदाराने तक्रारदाराचे सदनिकेमध्ये जादाच्या सोयी सुविधा (ज्या करारामध्ये नमूदच नाहीत) अशा सुविधांची पुरविलेचे सांगून तक्रारदारकडून जादा कामासाठी रक्कम रु.90,000/- (रुपये नव्वद हजार मात्र) तसेच एक्सलेशन चार्जेस म्हणून रक्कम रु.1,56,000/-, फ्लॅटची ऊर्वरीत रक्कम रु.3,66,800/- (रुपये तीन लाख सहासष्ट हजार आठशे मात्र), प्रस्तुत रकमेवरील व्याज रक्कम रु.95,963/- (रुपये पंच्यानऊ हजार नऊशे त्रेसष्ट मात्र), सर्व्हीस टॅक्स व व्हॅट रक्कम रु.77,220/- (रुपये सत्तयाहत्तर हजार दोनश वीस मात्र), एम.एस.ई.बी. व पाणी व इतर चार्जेस रक्कम रु.64,760/- (रुपये चौसष्ट हजार सातशे साठ मात्र), ट्रान्स्फॉर्मर चार्जेस रक्कम रु.12,500/- असे एकूण रक्कम रु.8,63,243/- (रुपये आठ लाख त्रेसष्ट हजार दोनशे त्रेचाळीस मात्र) जादा रकमेची मागणी जाबदाराने तक्रारदार यांचेकडे केली आहे.
वास्तविक तक्रारदाराने सदनिकेच्या किंमतीपैकी म्हणजेच रक्कम रु.15,60,000/- पैकी रक्कम रु.3,00,000/- विसारा म्हणून व रक्कम रु.12,00,000/- स्टेट बँकेतून कर्ज काढून असे एकूण रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख मात्र) जाबदाराला अदा केले आहेत व ऊर्वरीत रक्कम रु.60,000/- तसेच सर्व्हीस टॅक्स व व्हॅट रक्कम रु.63,804/- (रुपये त्रेसष्ट हजार आठशे चार मात्र) एम.एस.ई.बी. चार्जेस व पाणी व इतर चार्जेस साठी रक्कम रु.64,760/- (रुपये चौसष्ट हजार सातशे साठ मात्र), ट्रान्सफॉर्मर चार्जेस रक्कम रु.12,500/- (रुपये बारा हजार पाचशे मात्र) अशी एकूण रक्कम रु.2,01,064/- (रुपये दोन लाख एक हजार चौसष्ट मात्र) तक्रारदाराने जाबदाराला देणे बंधनकारक आहे. मात्र सदनिकेच्या किंमतीपैकी ऊर्वरीत रक्कम रु.60,000/- (रुपये साठ हजार मात्र) स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडून कर्जाऊ घेतले रकमेतून जाबदाराला मिळणार आहेत. सबब ऊर्वरित रक्कम रु.1,41,060/- (रुपये एक लाचा एकेचाळीस हजार साठ मात्र) चा चेक क्र. 001903 हा दि. 4/1/2014 स्टेट बँक ऑफ इंडिया, टिळक रोड, शाखा पुणे चा चेक ही जाबदाराला तक्रारदाराने अदा केला, परंतू जाबदाराने तो स्विकारला नाही.
तक्रारदार व जाबदार यांचेत झाले करारामध्ये जादा काम म्हणजेच सिक्यूरिटी सिस्टिम, डी 2 एच, वॉटर प्युरिफायर करणेचे कधीच ठरलेले नव्हते व नाही. तसेच त्यामुळे प्रस्तुत रक्कम रु.90,000/- (रुपये नव्वद हजार मात्र) जादा कामाचा मोबदला जाबदार मागू शकत नाहीत. तसेच सदर करारपत्र करताना ‘शुभवास्तु’ गृहप्रकल्पाचे ब्रोशरमध्ये नमूद केलेल्या सुविधा म्हणजेच ध्यानमंदीर, व्यायामशाळा, मॅदान, रेनवॉटर हार्वेस्टींग सिस्टीम, फायर फायरींग सिस्टिम, प्रत्येक सदनिका धारकास वैयक्तिक वाहनतळ या सुविधा तक्रारदार यांना जाबदाराने पुरविलेल्या नाहीत. तसेच जी जादा कामांची यादी जाबदाराने दाखल केली आहे त्यातील नमूद कामे ही करारपत्रामध्ये नमूद नाहीत. तसेच प्रस्तुत जादा कामे करताना किंवा करणेपूर्वी तक्रारदाराची संमत्ती घेतलेली नाही व अशी करारात नमूद नसलेली कामे विनासंमत्ती करुन तक्रारदारकडून करारात ठरलेपेक्षा जादा रक्कम उकळणेसाठी व जादा रक्कम मागणीप्रमाणे तक्रारदाराने जाबदाराला अदा करणेस नकार दिलेने सदनिकेचे करारपत्र रद्द करणेचा व अँलॉटमेंट रद्द करणेचा जाबदाराने घातलेला घाट हा अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराचा पिळवणूक व फसवणूक करुन तक्रारदारकडून जादा रक्कम उकळणेसाठी केलेला प्रकार असून वास्तवीक जाबदाराने प्रस्तुत कामी तक्रारदारकडून ऊर्वरीत रक्कम रु.1,41,064/- (रुपये एक लाख एक्केचाळीस हजार चौसष्ट मात्र) चा दिलेला धनादेश स्विकारुन तक्रारदाराला वादातीत सदनिकेचा ताबा देणे न्यायोचीत व कायदेशीर असतानाही जाबदाराने जादा पैशाच्या अभिलाषेने तक्रारदाराला प्रस्तुत सदनिकेची अँलॉटमेंट रद्द करु पहात आहेत म्हणजेच तक्रारदार यांना जाबदार यांनी सदोष सेवा पुरविलेचे स्पष्ट होत आहे.
करातपत्रात (Agreement to sale ) मध्ये अशी कोणतीही जादा सुविधा/कामे नमूद नसताना तसेच नमूद करारपत्रात ‘जादा सुविधा व जादा काम जाबदाराला योग्य वाटेल ते जाबदारांना करणेचा अधिकार आहे व त्या जादा कामाचा मोबदला तक्रारदार यांनी जाबदाराला देणे बंधनकारक आहे अशी बेकायदेशीर कलमे करारपत्रात नमूद करुन ती तक्रारदारावर बंधनकारक आहेत असे म्हणणे ही जाबदाराने तक्रारदाराची केलेली शुध्द फसवणूक असून प्रस्तुत करारपत्रातील (Agreement to sale ) मधील बेकायदेशीर कथने किंवा अटी व शर्थी या तक्रारदारावर बंधनकारक आहेत असे म्हणणे न्यायोचीत होणार नाही. त्यामुळे प्रस्तुत करारातील बेकायदेशीर अटी व शर्थींचा दुरुपयोग करुन जाबदाराने तक्रारदाराकडून जादा रक्कम उकळणे व त्यासाठी सदनिकेचा ताबा तक्रारदाराला न देणे, करारपत्र व अँलॉटमेंट रद्द करणेसाठी तक्रारदाराला नोटीस पाठवणे व तक्रारदाराची पिळवणूक करणे म्हणजे जाबदाराने वापरलेली अनुचित व्यापारी प्रथा (Unfair trade practice) असून जाबदाराने तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे हे निर्विवादपणे स्पष्ट व सिध्द होत आहे. तसेच तक्रारदाराने करारपत्रामध्ये नमूद केलेप्रमाणे ज्या सुविधा करारपत्रात नमूद नाहीत अशा सुविधांची तक्रारदाराने कधीही मागणी केली नसताना जादा सुविधा पुरवून जादा कामाचे पैसे अनाधिकाराने उकळणे ही जाबदाराने दिलेली सेवात्रुटीच म्हणावे लागेल.
याकामी आम्ही मे. वरिष्ठ न्यायालयांचे पुढीलप्रमाणे न्यायनिवाडे व त्यातील दंडकांचा आधार घेतला आहे.
IV (2014) CRT 758 (NC) Kwality Coloniserx Pvt.Ltd., V/s. Sunita Bali & Ors.
Head Note:- Consumer Protection Act]1986- Sec.2(1)(g)] 2(1)(r)] 2(a)(ii) Housing-Booking of shop-Consideration deposited-Non delivery of possession- loss suffered-Mental agony- Deficiency in service-Unfair Trade Practice- State Commission Partly allowed complaint- Hence appeal- Buyer’s agreement is executed by authorized signatory as well as director or appellant company- ‘appellant by not delivering legal Physical Possession of fully developed units to the respondents No.1 till date even after having received 90 % of price, is guilty of indulging into unfair trade practice- Appellant being builder is enjoying Possession of unit as well as substantial amount of consideration- Unscrupulous builder should not be spared – punitive damages of Rs. 2,50,000/- imposed.
सबब प्रस्तुत जाबदार यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करुन तक्रारदाराला सदोष सेवा पुरविली आहे हे स्पष्ट होते.
प्रस्तुत कामी तक्रारदार हे जाबदार यांना देणेसाठी असलेली सदनिकेच्या मोबदल्याची रक्कम रु.60,000/- (रुपये साठ हजार मात्र) स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडे केले कर्ज प्रकरणातून जाबदार याना मिळणार आहेत. मात्र सर्व्हीस टॅक्स व व्हॅटची रक्कम रु.63,804/-, एम.एस.ई.बी. चार्जेस, पाणी कनेक्शन व इतर चार्जेस करीता रक्कम रु.64,760/- व ट्रान्सफॉर्मर चार्जेस रक्कम रु.12,500/- अशी एकूण रक्कम रु.1,41,064/- (रुपये एक लाख एक्केचाळीस हजार चौसष्ट मात्र) एवढी रक्कम तक्रारदार व जाबदार यांना देणे लागतात व प्रस्तुतची रक्कम जाबदार यांना अदा करणे तक्रारदार यांचेवर बंधनकारक आहे व प्रस्तुत तक्रारदार सदरची रक्कम देणेस तयार आहेत. एवढेच नव्हे तर प्रस्तुत रक्कम रु. 1,41,064/- वर धनादेश क्र. 001903 हा दि. 4/1/2014 रोजीचा स्टेट बँक ऑफ इंडिया, टिळक रोड, शाखा पुणे हा धनादेश जाबदाराला तक्रारदाराने दिला होता. परंतू तो मान्य नसलेने जाबदाराने स्विकारला नाही असे स्पष्ट होते. म्हणजेच तक्रारदार सदरची रक्कम रु.1,41,064/- (रुपये एक लाख एक्केचाळीस हजार चौसष्ट मात्र) जाबदार यांना देणेस तयार होते व आहेत. सबब प्रस्तुत रक्कम तक्रारदाराकडून जाबदार यांना मिळणे न्यायोचित होणार आहे. मात्र जाबदाराने करारात नमूद नसलेली जादा कामे व सोयीसुविधा यासाठी तक्रारदारकडून मागणी केलेली जादाची रक्कम देणे तक्रारदारावर बंधनकारक नाही व प्रस्तुत रक्कम तक्रारदारकडून मिळणेसाठी सदनिकेचा ताबा न देणे ही तक्रारदाराची घोर फसवणूक आहे. तसेच जाबदाराने मे. दिवाणी न्यायालयात स्पे.दि.मु.नं. 204/2014 हा दावा तक्रारदारकडून ऊर्वरीत रक्कम वसुलीसाठी व उभयतांमध्ये करारपत्र (साठेखत) रद्द होवून मिळणेसाठी केलेला आहे असे असले तरीसुध्दा प्रस्तुत मे मंचास जाबदाराने तक्रारदाराला दिले सेवात्रुटी बाबत (Deficiency in service) बाबतचा प्रस्तुत तक्रार अर्ज चालविणेचे अधिकार आहेत असे या मे मंचाचे स्पष्ट मत आहे.
सबब तक्रारदार यांचेकडून ऊर्वरित रक्कम रु.1,41,064/- तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा पुणे यांचेकडील कर्जप्रकरणातून मिळणारे रक्कम रु.60,000/- मिळणेस जाबदार पात्र आहेत व तक्रारदार यांचेवर प्रस्तुत रक्कम रु.1,41,064/- जाबदारांना देणे बंधनकारक आहे. सबब जाबदार यांनी तक्रारदारकडून रक्कम रु.1,41,064/- तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडून सदनिकेची ऊर्वरीत रक्कम र.60,000/- स्विकारुन प्रस्तुत सदनिकेचा प्रत्यच ताबा तक्रारदार यांना देणे न्यायोचीत होणार आहे.
9. सबब प्रस्तुत कामी आम्ही खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करत आहोत.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. तक्रारदार यांनी जाबदार यांना देणे असलेली रक्कम रु.1,41,064/- (सर्व्हीस टॅक्स व व्हॅट, इलेक्ट्रीक चार्जेस, ट्रान्सफॉर्मर चार्जेस व पाणी चार्जेस, वगैरेसाठीची रक्कम) आदेश पारीत तारखेपासून 60 दिवसात अदा करावी.
3. तसेच कर्ज रकमेतून स्टेट बँक ऑफ इंडिया यांचेकडून सदनिकेची ऊर्वरित रक्कम रु.60,000/- जाबदार यांना देणेसाठी तक्रारदाराने बँकेचा पाठपुरावा करावा व प्रस्तुत रक्कम जाबदार यांना अदा करणेसाठी योग्य ती तरतूद करावी.
4. जाबदार यांनी प्रस्तुत आदेश पारीत तारखेपासून 60 दिवसांचे आत म्हणजेच तक्रारदाराकडून येणे असलेली वर नमूद रक्कम रु.1,41,064/- व बँकेकडील रक्कम रु.60,000/- स्विकारुन रक्कम मिळताच तक्रारदाराचे वादातीत सदनिकेचा ताबा तक्रारदाराला जाबदाराने तात्काळ द्यावा.
5. जाबदाराने गृहप्रकल्पाचे ब्रोशरमध्ये नमूद केलेप्रमाणे व्यायामशाळा, ध्यानमंदीर, मैदान, रेनवॉटर हार्वेस्टींग सिस्टीम, फायर फायरींग सिस्टीम, वैयक्तिक वाहनतळ, वगैरे सुविधा तक्रारदाराला पुरविणेत याव्यात.
6. जाबदाराने नि. 8 चे कागदयादीसोबत अ.नं.15 कडे बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दाखल केला आहे. त्यामुळे प्रस्तुतबाबतची विनंती विचारात घेत येत नाही. ती अमान्य करणेत येते.
7. जाबदार यांनी तक्रारदारकडून रक्कम रु.15,00,000/- (रुपये पंधरा लाख मात्र) स्विकारुन सुध्दा सदनिकेचा ताबा अद्याप दिला नसलेने जाबदाराने प्रस्तुत रकमेवर अर्ज दाखल तारखेपासून रक्कम प्रत्यक्ष वादातीत फ्लॅटचा ताबा तक्रारदाराला मिळेपर्यंत 9 टक्के व्याज तक्रारदाराला अदा करावे.
8. तक्रारदार यांना जाबदार यांनी मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु,50,000/-(रुपये पन्नास हजार मात्र) व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.5,000/-(रुपये पाच हजार मात्र) अदा करावेत.
9. वरील सर्व आदेशांची पूर्तता जाबदार यांनी आदेश पारीत तारखेपासून 60 दिवसात करावी.
10. विहीत मुदतीत आदेशाचे पालन जाबदार यांनी न केलेस तक्रारदार यांना
यांना जाबदारांविरुध्द ग्राहक संरक्षण कायदा कलम 25 व 27 प्रमाणे कारवाई
करणेची मुभा राहील.
11. सदर न्यायनिर्णयाच्या सत्यप्रती उभय पक्षकाराना विनामूल्य पाठवणेत याव्यात.
12. सदर न्यायनिर्णय खुल्या मंचात जाहीर करणेत आला.
ठिकाण- सातारा.
दि. 28-01-2016.
(सौ.सुरेखा हजारे) (श्री.श्रीकांत कुंभार) (सौ.सविता भोसले)
सदस्या सदस्य अध्यक्षा
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा.
Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes
Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.