निकालपत्रः- श्रीमती सुमन प्र.महाजन, अध्यक्षा ठिकाणः बांद्रा निकालपत्र तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालीलप्रमाणेः- तक्रारदाराने सामनेवाले क्र.2 यांचेकडून व्हिडिओकॉन वॉशिंग मशीन मॉडेल क्र.व्हीडीएम 65 जेडीआर नं.304585 (6.5 के.जी.) संपूर्ण अटोमॅटिक मशीन खरेदी केली, त्याचे बिल सोबत जोडण्यात आले आहे. मशीन बिघडल्याबाबत दि.28.09.2010 रोजी तक्रार क्र.एमयुएम 2909100410 नुसार तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर, त्यांचा प्रतिनिधी आठ दिवसांत आलेला नाही म्हणून पुन्हा दि.06.10.2010 रोजी त्या कंपनीकडे नोंदणी क्र.एमयुएम 726 नुसार पुन्हा तक्रार नोंदविण्यात आली. त्यानंतर तांत्रिक कर्मचारी चार वेळा येऊन गेला. त्याने प्रत्येकवेळेला दुरुस्तीबाबत वेगवेगळी कारणं सांगितली परंतु प्रत्यक्षात दुरुस्ती केलेली नाही. दि.27.10.2010 रोजी सामनेवाले क्र.2 यांच्याकडे लेखी तक्रार करण्यात आली, त्याची प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे. दि.28.10.2010 रोजी मंत्रालयातून दूरध्वनीवरुन कंपनीचे व्यवस्थापक श्री.सागर यांचेशी बोलणे झाले, त्यांनी तक्रार नोंदवून घेतली, त्याचा क्र.2810100843 असा आहे. दि.03.11.2010 रोजी कंपनीच्या मुलूंड शाखेमधून श्री.उमेश व्यवस्थापक यांचा फोन आला, त्यांनी फोनवरुन मशीनचे खराब झालेले पार्ट बदलून देण्यात येईल असे सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे कंपनीच्या प्रतिनिधीकडे बिलाची झेरॉक्स प्रत देण्यात आली. दि.12.11.2010 रोजी व्हिडिओकॉन कंपनीच्या औरंगाबाद येथील मुख्य कार्यालयात स्पिड पोस्टाने पत्र पाठवून मशीन सात दिवसांत नुकसानभरपाईसह बदलून देण्यात द्यावी असे कळविण्यात आले, त्याची प्रत सामनेवाले क्र.2 यांना देण्यात आली, त्याची पोच पृष्ठ क्र.13 वर आहे. तक्रारीच्या परिच्छेद क्र.7 मध्ये तक्रारदाराने या प्रकरणी सामनेवाले यांचेशी दूरध्वनीवरुन संपर्क साधल्याबाबतचा तपशील दिलेला आहे. 2 तक्रारदाराचे म्हणणे की, त्याची पत्नी स्पॉंडेलीसीसने आजारी असून वॉशिंग मशीन बंद झाल्याच्या कारणाने कपडे धुऊन तिचा आजार वाढला व त्यामुळे रुग्णालयाचा खर्च करावा लागला. सामनेवाले कंपनीकडे वारंवार तक्रारीं करुन, पाठपुरावा करुन, त्यांचेकडून तक्रारदाराला प्रतिसाद मिळालेला नाही, यामध्ये त्यांचे सेवेत कमतरता असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. तक्रारदाराने नविन धुलाई मशीन घेऊन देखील मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे, व तो बिघाड सामनेवाले यांचेकडून दुरुस्त करुन न देण्यात आल्यामुळे त्यांना बराच मानसिक त्रास सहन करावा लागला. तक्रारी करुन सामनेवाले यांचेकडून प्रतिसाद न मिळाल्यामुळे तक्रारदाराला या मंचाकडे दि.23.11.2010 रोजी तक्रार दाखल करावी लागली, त्यानुसार त्यांनी खालीलप्रमाणे विनंत्या केलेल्या आहेत. अ सामनेवाले यांचेकडून वॉशिंगमशीन सात दिवसांत बदलून मिळावी. ब पत्नीचे आजारपण वाढणे, सदर कामासाठी सुट्टी घालविणे, शारिरीक धावपळ, अनावश्यक टपालखर्च, मनस्ताप, कोर्टखर्च, इत्यादींसाठी नुकसानभरपाईची रक्कम रु.50,000/- मागितली. 3 सामनेवाले यांनी कैफियत दाखल करुन सदर तक्रार खोटी, बिनबुडाची, बेकायदेशिर, दिशाभूल करणारी असल्यामुळे ती खर्चासह रद्द करण्यात यावी अशी त्यांची विनंती आहे. तक्रारदाराने मंचापासून बरेच मुद्दे लपवून ठेवले आहेत. तक्रारदार यांना दि.16.11.2010 रोजी नविन मशीन बदलून दिल्याचा उल्लेख तक्रारीत केलेला नाही. नविन बदली मशीन मिळाल्याची पोच तक्रारदाराने दिली आहे ही मशीन सुस्थितीत असून त्याचा वापर तक्रारदार यांचेकडून करण्यात येतो. नविन मशीन ताब्यात घेतल्यानंतर दोन दिवसानंतर त्यांनी तक्रार दाखल केली आहे, त्यामुळे वादाचे कारण संपल्यानंतर तक्रारदाराने तक्रार दाखल केली ही त्यांची कृती बरोबर नाही. नविन मशीन देताना वॉरंटीचा कालावधी दोन वर्षे अधिक सहा महिने असा देण्यात आला. सामनेवाले यांनी तक्रारीतील आरोप नाकारले असून त्यांच्या सेवेत कमतरता नाही असे कैफियतीत नमूद केले आहे. तक्रारदार यांच्या पत्नीला स्पॉंडेलीसीसचा आजार मशीन बंद पडल्यामुळे वाढला हे सामनेवाले यांनी नाकारले आहे. तक्रारदार यांना तक्रार दाखल करण्यापूर्वीच दि.16.11.2010 रोजी नविन सुस्थितीत असलेली मशीन देण्यात आलेली असल्यामुळे या प्रकरणी तक्रार करण्याचा प्रश्न उदभवत नाही, म्हणून सदर तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी अशी त्यांची विनंती आहे. 4 तक्रार अर्ज, त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषांगिक कागदपत्रं, तक्रारदाराचे प्रतिज्ञापत्र, पुरावा शपथपत्र, सामनेवाले यांची कैफियत व त्यासोबत जोडण्यात आलेली अनुषांगिक कागदपत्रं यांची पाहणी व अवलोकन करुन वाचन केले. उभय पक्षकारांचा युक्तीवाद ऐकला. 5 तक्रारदाराने दि.23.11.2010 रोजी सामनेवाले यांचेविरुध्द प्रतिज्ञापत्रांसह तक्रार दाखल केलेली असून सामनेवाले यांचेकडून वॉशिंग मशीन खरेदी केल्याचे बिल, त्यांचेकडे केलेला पत्रव्यवहाराच्या प्रतीं सोबत जोडलेल्या आहेत. तक्रारदाराने सामनेवाले यांचे बिल क्र.1660 दि.06.04.2010 अन्वये सामनेवाले यांचेकडून व्हिडिओकॉन वॉशिंगमशीन खरेदी केल्याचे दिसून येते. वॉशिंगमशीन खरेदी केल्यानंतर त्यामध्ये बिघाड झाल्याची तक्रार तक्रारदाराने दि.28.09.2010, दि.20.10.2010, दि.28.09.2010, दि.06.10.2010, दि.20.10.2010 व दि.03.11.2010 रोजी केलेल्या असून त्या दिवशीं नोंद केलेल्या तक्रारींचे क्रमांक दिलेले आहेत. तक्रारदाराने तक्रारीबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केलेले असून सामनेवाले यांच्याकडून दि.15.12.2010 रोजी नविन मशीन बदलून दिल्याचे मान्य केलेले आहे. परंतु तक्रारदाराने दि.28.09.2010 रोजी प्रथमतः सामनेवाले यांचेकडे तक्रार केल्यानंतर सामनेवाले यांचेकडून टाळाटाळ करण्याची भूमिका अवलंबिल्याचे दिसून येते. सामनेवाले यांनी सुमारे दोन महिन्याने मशीन बदलून देण्याची कार्यवाही केली, तीच कार्यवाही या आदीच केली असती तर तक्रारदाराला या मंचासमोर तक्रार दाखल करण्याची वेळ आली नसती. सामनेवाले यांनी सप्टेंबर, 2010 मध्ये व्हिडिओकॉन मशीनची तपासणी करुन त्याचवेळी मशीन बदलून द्यायला हवी होती, परंतु त्यांनी वेळकाढू धोरण अंवलंबिले यामध्ये सामनेवाले यांचे सेवेत कमतरता झाल्याचे म्हणता येईल. 6 सामनेवाले यांनी तक्रारदाराने दि.18.09.2010 रोजी व त्यानंतर सातत्याने सामनेवाले यांचेकडे तक्रारीं केल्यानंतर दि.15.12.2010 रोजी म्हणजे सुमारे दोन महिन्यानंतर मशीन तक्रारदाराला बदलून दिली. ही बाब तक्रारदाराने प्रतिज्ञापत्रात नमुद केलेली आहे. त्यामुळे तक्रारदाराला तक्रार अर्जात नमूद केल्याप्रमाणे मशीन बदलून देण्याच प्रश्न उदभवत नाही. 7 तक्रारदाराने सामनेवाले यांच्या सेवेत कमतरता असल्याचे दाखवून दिलेले आहे. तक्रारदाराने प्रथमतः दि.28.09.2010 रोजी सामनेवाले यांचेकडे वॉशिंगमशीन बिघडल्याची तक्रार दाखल केली. परंतु प्रतिसाद मिळालेला नाही. त्यानंतर सातत्याने पाठपुरावा केल्याचे तक्रारील परिच्छेद क्र.7 वरुन दिसून येते. त्यानंतर सुमारे दोन-अडिच महिन्याच्या कालवधीनंतर वॉशिंग मशीन बदलून दिली. याचा अर्थ मशीन सदोष आहे हे सामनेवाले यांना मान्य आहे. म्हणून हीच मशीन सुरुवातीच्याच कालावधीमध्ये बदलून दिलली असती तर तक्रारदाराला या मंचासमोर दाखल करण्याचा प्रश्न उदभवला नसता. तक्रार दाखल करुन तक्रारदाराला तिचा पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराला वेळोवेळी मंचासमोर हजर रहावे लागले. सामनेवाले यांनी तक्रारदाराने केलेल्या तक्रारींसाठी त्यांनी त्यांना काहीही प्रतिसाद दिलेला नाही म्हणून त्याला मानसिक त्रास झाला. तक्रारदाराला शारिरीक त्रास, धावपळ व मनस्ताप सहन करावा लागला. त्यामुळे नुकसान भरपाईची रक्कम रु.1,000/- देणे योग्य राहील असे मंचाचे मत आहे. तसेच या अर्जाचा खर्च रु.1,000/- देणे उचित राहील. उक्त विवेचन लक्षात घेता, या प्रकरणी खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे. आदेश (1) तक्रार क्र.84/2011(623/2010)अंशतः मान्य करण्यात येते. (2) तक्रारदाराला झालेल्या मानसिक व शारिरीक त्रासापोटी सामनेवाले क्र.1 व 2 यांनी संयुक्तिकरित्या किंवा वैयक्तिकरीत्या नुकसान भरपाई रु.1,000/- व या अर्जाचा खर्च रु.1,000/- मिळून एकूण रुक्कम रु.2,000/- या आदेशाची प्रत मिळाल्यानंतर एक महिन्यात द्यावी अन्यथा विलंबापोटी द.सा.द.शे.9 दराने व्याज देण्याची जबाबदारी सामनेवाले यांची राहील. (3) आदेशाच्या प्रमाणित प्रतीं दोन्हीं पक्षकारांना विनामुल्य पाठविण्यात याव्या.
| [HONABLE MR. G L Chavan] Member[HONABLE MRS. S P Mahajan] PRESIDENT | |