तक्रारदार : त्यांचे प्रतिनीधी श्री कृष्णचंद्र पांडे हजर
यांचे मार्फत हजर
सामनेवाले : गैरहजर.
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
निकालपत्रः- श्रीमती दिपा बिदनुरकर, सदस्या, ठिकाणः बांद्रा
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*
न्यायनिर्णय
तक्रारीचे संक्षिप्त स्वरुप खालील प्रमाणे आहे.
1. सा.वाले हे टेलीकॉम सेवा देणारी कंपनी आहे.
2. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार तक्रारदारांनी सा.वाले यांचेकडून तक्रारदारांचा भ्रमणध्वनीसंच क्रमांक 8828172839 यासाठी प्री-पेड सेवा घेतली.
3 सा.वाले यांचे असे म्हणणे आहे की, सा.वाले यांनी V-Music ही योजना आयोजीत केली होती. परंतू तक्रारदारांनी या योजनेचा लाभ कधीही घेतला नाही किंवा त्यासाठी संमती दाखविली नव्हती. परंतू सा.वाले यांनी स्वतःहून तक्रारदारांच्या भ्रमणध्वनीसंचासाठी ही सेवा सुरू केली व त्यासाठी सा.वाले यांनी तक्रारदारांच्या खात्यामधून 14 ऑक्टोंबर 2011 व 13 नोव्हेंबर 2011 रोजी प्रस्तुत सेवेबद्दलची आकारणी रक्कम वळते करून घेतले व त्यानंतर 13 नोव्हेंबर 2011 रोजी पुन्हा तक्रारदारांना एक SMS पाठवूनV-Music सेवाचे नुतनीकरण तीन दिवसात करण्यात येईल जर ती सेवा रद्द करायची असेल तर VMDCT to 50,000/-( toll free) असा संदेश दिला. त्यानंतर तक्रारदारांनी लगेचच V-Musicसेवा रद्दकरणेबाबत सा.वाले यांना SMSपाठविले व त्याच दिवशी V-Musicसेवा रद्द झाल्याबद्दलचे सा.वाले यांचेकडून SMS आले. परंतू सा.वाले यांनी आधी V-Music बद्दल घेतलेली रक्कम परत करण्यास नकार दिला. म्हणून तक्रारदारांनी लगेचच कस्टमर केअरकडे तक्रार नोंदविली परंतू सा.वाले यांनी तक्रारदारांच्या तक्रारीस दाद दिली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना 14 नोव्हेंबर 2011 रोजी नोटीस पाठविली परंतू त्यासही सा.वाले यांनी प्रतिसाद दिला नाही.
4. शेवटी तक्रारदारांनी ग्राहक मंचापूढे तक्रार अर्ज दाखल करून सा.वाले यांनी अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करू नये असे आदेश द्यावेत तसेच सा.वाले यांनी V-Music साठी वसुल केलेली रक्कम रू.60/-, तक्रारदारांना परत करावी. मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई रू.40,000/-, तक्रार अर्ज खर्च रू.5,000/-,आणि संपर्क खर्च रू.2,000/-,तक्रारदारांना द्यावेत अशी मागणी केली.
5. सा.वाले यांनी हजर राहून तक्रार अर्जास उत्तर द्यावे अशी नोटीस मंचाकडुन पाठविण्यात आली. सा.वाले यांना नोटीस मिळाल्याची पोचपावती अभिलेखात दाखल आहे.तक्रारदार यांनी सा.वाले यांना नोटीस पाठविल्याबद्दलचे शपथपत्र दाखल केले.नोटीस मिळूनही सा.वाले हजर झाले नाही. म्हणून सा.वाले क्र 1 यांचेविरूध्द तक्रार अर्ज एकतर्फा चालविण्यात यावा असा आदेश पारीत करण्यात आला.
6. तक्रारदारांचा तक्रार अर्ज, अनुषंगिक कागदपत्रे, पुराव्याचे शपथपत्र, याची पडताळणी करून पाहिली व तक्रारदारांचा तोंडीयुक्तीवाद ऐकला असता निकालासाठी खालील मुद्दे कायम करण्यात येतात.
क्र.. | मुद्दे | उत्तर |
1 | सा.वाले यांनी, V-Music योजनेबद्दल संमती दिलेली नसतांनाही सा.वाले यांनी ही सेवा सुरू करून त्याबद्दल दरमहा 30/-,आकारणी करून सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे तक्रारदार सिध्द करतात काय? | होय. |
2 | तक्रार अर्जात केलेल्या मागणीस तक्रारदार पात्र आहेत काय? | होय अंशतः |
3. | अंतीम आदेश | तक्रार अर्ज अंशतः मान्य करण्यात येते. |
कारण मिमांसा
7. सा.वाले हे टेलिकॉम सेवा पुरविणारी कंपनी आहे. तक्रारदारांनी भ्रमणध्वनीसंचासाठी सा.वाले यांचेकडून टेलिकॉम सेवा घेतली.
8. तक्रारदारांच्या म्हणण्यानूसार सा.वाले यांनी V-Music योजना सुरू केली होती.परंतू तक्रारदार यांनी सा.वाले यांचेकडून या सेवेचा लाभ घेतला नाही.किंवा त्यासाठी संमती दिली नाही तरीही सा.वाले यांनी दरमहा रू.30/-,याप्रमाणे दोन वेळा या सेवेसाठी आकारणी केली व 14 ऑक्टोंबर 2011 व 13 नोव्हेंबर 2011 या महिण्याकरीता रू.30/-,प्रमाणे तक्रारदारांच्या खात्यामधून वळते करून घेतले. त्यानंतर सा.वाले यांनी दिनांक 13 नोव्हेंबर 2011 रोजी SMS पाठवूनV-Music सेवा तीन दिवसात पुर्नजिवीत केली जाईल व जर ही सेवा रद्द करायची असेल तर VMDCT to 50,000/-,(toll free)SMS पाठवावे असा संदेश दिला. हा संदेश मिळाल्यानंतर तक्रारदारांनी लगेचच सा.वाले यांनाV-Music सेवा रद्द करण्याबद्दल कळविले. परंतू सा.वाले यांनी या सेवेबद्दल आधी आकारलेली रक्कम परत देण्यास नकार दिला. त्यानंतर तक्रारदारांनी सा.वाले यांना लेखी नोटीसही पाठविली त्यासही सा.वाले यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.
9. तक्रारदारांच्या तक्रार अर्जातील वरील कथनास सा.वाले यांनी हजर राहून उत्तर दाखल करून नाकारले नाही त्यामूळे सा.वाले यांचे म्हणणे ग्राहय धरण्यात येते.
10. V-Music योजनेस तक्रारदारांनी संमती दिलेली नसतांना सा.वाले यांनी तक्रारदारांच्या संमतीशिवाय ही सेवा सुरू केली व त्यासाठी दरमहा रू.30/-,याप्रमाणे आकारणी केली यावरून सा.वाले हे अनुचित व्यापारी प्रथेचा अवलंब करतात असे म्हणावे लागेल. सा.वाले यांनी यापुढे तक्रारदारांची संमती न घेता प्रस्तुत सेवा पुरवु नये व त्याबद्दल आकारणी करू नये तसेच न घेतलेल्या सेवेबद्दल आकारणी करून पैसे वसुल केले म्हणून सा.वाले यांनी सेवासुविधा पुरविण्यात कसुर केली हे सिध्द होते.त्यामूळे सा.वाले यांनी न घेतलेल्या सेवेबद्दल वसुल केलेली रक्कम परत देण्यास जबाबदार राहतील.तसेच न घेतलेल्या सेवेबद्दल आकारणी लावल्याबद्दल पाठपूरावा करण्यामध्ये तक्रारदारांना मानसिक त्रास झाला नाही असे म्हणता येणार नाही.त्यामूळे तक्रारदारांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल नुकसान भरपाई देण्यास सा.वाले हे जबाबदार राहतील परंतू तक्रारदारांनी याबद्दल नुकसान भरपाई रू.40,000/-,ची मागणी केली आहे परंतू ही मागणी अवास्तव वाटते.सा.वाले यांनी तक्रारदारांना नुकसान भरपाई म्हणून रू.5,000/-,व तक्रार अर्ज खर्च व संपर्क खर्च मिळून रू.1,000/-,द्यावे. असा आदेश देणे मंचास उचीत वाटते.
11. वरील विवेचनावरून खालील आदेश पारीत करण्यात येतो.
आदेश
1. तक्रार क्रमांक 535/2011 अंशतः मान्य करण्यातयेते.
2. सा.वाले यांनी सेवा सुविधा पुरविण्यात कसुर केली व अनुचित व्यापारी
प्रथेचा अवलंब केला असे जाहीर करण्यात
3. सा.वाले यांनी तक्रारदारांना रू.60/-,परत करावे
4. सा.वाले यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासापोटी रू.5,000/-,द्यावेत
5. सा.वाले यांनी तक्रारदारांना तक्रार अर्ज खर्च व संपर्क खर्च असे एकुण
रू.1,000/-, तक्रारदारांना द्यावेत
6. वरील आदेशाची पूर्तता 6 आठवडयाच्या आत करावी. अन्यथा वरील
रक्कमेवर 9% व्याजदराने पैसे देईपर्यंत व्याज द्यावे.
7. आदेशाच्या प्रमाणित प्रती उभय पक्षकारांना विनामुल्य
पाठविण्यात याव्यात.
.