( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आ दे श
( पारित दिनांक : 30 एप्रिल 2012 )
तक्रारकर्तीने हे प्रकरण ग्राहक सरंक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये या मंचात दाखल केले आहे.
यातील तक्रारकर्ती श्रीमती मालती मुलचंदानी यांची थोडक्यात तक्रार अशी आहे की, त्यांनी गैरअर्जदार यांचे कडुन दिनांक 18/9/2008 रोजी एक दूरचित्रवाणी संच 34 इंच फ्लॅट जम्बो मॉडल 8600 क्यु एस विकत घेतला त्याची वॉरन्टी 12 महिन्यांची होती. त्यावेळेस गैरअर्जदाराची योजना अशी होती की, असा दूरचित्रवाणी संच विकत घेतल्यानंतर 2 वर्षे 11 महिन्यानंतर संबंधीत तक्रारदाराला एक प्लास्मा 32 इंच दूरचित्रवाणी संच ग्राहकाला देण्यात येईल. पुढे तक्रारकर्तीने अनेकदा गैरअर्जदाराशी संपर्क केला असता व्हिडीओकॉन प्लास्मा दूरचित्रवाणी संच निर्मीती बंद केली आहे व त्यांनी तो दूरचित्रवाणी संच बदलवुन देण्यात आला नाही व जास्तीचे 7000/- रुपये देऊन तक्रारकर्तीला 32 इंच एलसीडी दूरचित्रवाणी संच घ्यावा असे सांगीतले. ते तक्रारकर्तीस मान्य नव्हते म्हणुन तक्रारकर्तीने गैरअर्जदार यास नोटीस दिली ती गैरअर्जदारास प्राप्त झाली. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीची मागणी पुर्ण केली नाही म्हणुन त्यांनी ही तक्रार दाखल केली व ती द्वारे गैरअर्जदाराने योजनेनुसार 32 इंच प्लास्मा दूरचित्रवाणी संच देण्यात यावा. नुकसानीपोटी रुपये 50,000/- व मानसिक व शारिरिक त्रासापोटी रुपये 10,000/- मिळावे अशी मागणी केली.
सदर प्रकरणात गैरअर्जदार यांना नोंदणीकृत डाकेद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त झाली मात्र गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला नाही म्हणुन त्यांचे विरुध्द प्रकरणत एकतर्फी चालविण्याचा आदेश दिनांक 2.3.2012 रोजी पारीत केला.
तक्रारकर्तीने आपली तक्रार शपथपत्रावर दाखल केली असुन दस्तऐवज यादी नुसार 13 कागदपत्रे दाखल केली.
####- का र ण मि मां सा -####
यात गैरअर्जदार यांनी जवाब दाखल केला नाही व तक्रारकर्तीची कोणतीही विधाने खोडुन काढले नाही. तक्रारकर्तीने संबंधीत प्रकरण दाखल केले त्यामधील योजने नुसार 2 वर्षे 11 महीन्यानंतर 32 इंच प्लास्मा दूरचित्रवाणी संच देण्यात येईल मात्र तक्रारकर्तीने मागणी करुनही त्यांना दूरचित्रवाणी संच दिला नाही. तक्रारकर्तीला जास्तीचे पैसे मागीतले. नविन दूरचित्रवाणी संच देण्याकरिता योजना दिली ते तक्रारकर्तीने मान्य करण्याचे कारण नाही. ही गैरअर्जदार यांचे सेवेतील त्रुटी व अनुचीत व्यापारी प्रथेचा अवलंब आहे म्हणुन आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला योजनेनुसार प्लास्मा 32 इंच दूरचित्रवाणी संच दयावा ते शक्य नसल्यास तक्रारकर्तीस रुपये 10,500/- व या रक्कमेवर दिनांक 27.8.2011 पासुन द.सा.द.शे 9 टक्के दराने व्याजासह मिळुन येणारी रक्कम प्रत्यक्ष अदायगी पावेतो परत करावी.
3. गैरअर्जदाराने तक्रारकर्तीस मानसिक त्रासापोटी रुपये 5,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रुपये 2,000/-असे एकुण 7000/- रुपये (रुपये सात हजार) द्यावे.
वरील आदेशाचे पालन गैरअर्जदार यांनी आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसांचे आत करावे न पेक्षा 9 टक्के ऐवजी 12 टक्के व्याज देय ठरतील.