श्री. प्रदीप पाटील, सदस्य यांचे कथनांन्वये.
- आदेश -
(पारित दिनांक – 20/05/2013)
1. तक्रारकर्तीने ग्राहक संरक्षण अधिनियम, 1986 च्या कलम 12 अन्वये प्रस्तुत तक्रार दाखल केली आहे. तक्रारकर्तीच्या तक्रारीचा आशय थोडक्यात असा आहे की, तिने ‘मानो या ना मानो’ या योजनेंतर्गत गैरअर्जदार क्र. 2 कडून, गैरअर्जदार क्र. 1 निर्मित, जंबो 34’’टीव्ही रु.12,990/- अधिक रु.7,000/- असे एकूण रोख रु.19,990/- मध्ये खरेदी केला. तक्रारकर्तीला गैरअर्जदाराने त्याबाबत कॅश मेमो व एनटायटल सर्टिफिकेट क्र. 150489 दि.08.04.2008 रोजी दिले. गैरअर्जदार क्र. 2 द्वारा या योजनेंतर्गत जंबो 34’’टीव्ही खरेदी केल्यास प्लाझमा 32’’ (81 सेमी) 35 महिन्यानंतर विनामोबदला टीव्ही देण्यात येणार अशी आकर्षक माहिती पुस्तिका दिली. काही दिवसांनी तक्रारकर्तीला विडीयोकॉन कंपनीतर्फे एक माहिती पुस्तिका पाठविण्यात आली, त्यात ‘समयसे पहले हकसे ज्यादा’ नावाची योजना देण्यात आली होती. त्यानुसार एनटायटल सर्टिफिकेट ची दोन वर्षानंतरची मुदत संपल्यानंतरचा प्रस्ताव/ऑफर देण्यात आला होता. त्यामध्ये सहा प्रकारचे ऐच्छिक पर्याय दिले होते. त्यामध्ये सर्टिफिकेटरची मुदत 2 वर्षे 11 महिन्यानंतर ‘मानो या ना मानो’ अंतर्गत देण्यात आलेली प्रस्तुती जोडण्यात आली होती. त्यानुसार तक्रारकर्तीने 2 वर्षे 11 महिन्याचे मुदतीनंतर प्लाझमा 32’’ (81 सेमी) टीव्ही विना अतिरिक्त मोबदल्याशिवाय ‘मानो या ना मानो’ या योजनेंतर्गत घेण्याचे ठरविल्याने, ‘समयसे पहले हकसे ज्यादा’ या योजनेकडे लक्ष दिले नाही.
2 वर्षे 11 महिन्यांची मुदत संपल्यानंतर 09.03.2011 रोजी तक्रारकर्ती गैरअर्जदाराचे स्थानीय कार्यालयात सर्टिफिकेट जमा करण्यास गेली व ‘मानो या ना मानो’ या योजनेची विचारणा केली तेव्हा, योग्य ती माहिती मिळाली नाही व त्यांनी कुठल्याच बाबीला प्रतिसाद दिला नाही, म्हणून तक्रारकर्तीने गैरअर्जदार कंपनीला वारंवार पत्र पाठविले, त्यांनीही सदर पत्रांना प्रतिसाद दिला नाही, म्हणून तक्रारकर्तीने सदर तक्रार मंचासमोर दाखल केलेली आहे. सदर तक्रारीद्वारा तक्रारकर्तीने सर्टिफिकेट स्विकारुन गैरअर्जदाराने प्लाझमा 32’’ टीव्ही मोफत द्यावा, शारिरीक व मानसिक त्रासाची नुकसान भरपाई व तक्रारीचा खर्च मिळावा अशा मागण्या केलेल्या आहेत.
2. सदर तक्रारीची नोटीस दोन्ही गैरअर्जदारांवर बजावली. टपाल विभागाने सदर नोटीस तामिल झाल्याचा अहवाल दिला. गैरअर्जदारांना नोटीस प्राप्त होऊनही ते गैरहजर राहिले व त्यांनी तक्रारीला लेखी उत्तर दाखल केले नाही, म्हणून मंचाने सदर प्रकरणी एकतर्फी कारवाई चालविण्याचा आदेश पारित केला.
3. सदर प्रकरणी तक्रारकर्तीचा युक्तीवाद ऐकला व तक्रारीसोबत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता, मंचाचे विचारार्थ खालील मुद्दे उपस्थित झाले.
मुद्दे निष्कर्ष
1) गैरअर्जदाराने सेवा प्रदान करतांना कमतरता ठेवली काय व
अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला काय ? होय.
2) तक्रारकर्ती नुकसान भरपाई मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
निष्कर्ष-
3. मंचाने तक्रारकर्तीने तक्रारीसोबत दाखल ‘मानो या ना मानो’ या योजनेंतर्गत गैरअर्जदार क्र. 2 कडून, गैरअर्जदार क्र. 1 निर्मित, जंबो 34’’टीव्ही रु.12,990/- अधिक रु.7,000/- असे एकूण रोख रु.19,990/- मध्ये खरेदी केला. तक्रारकर्तीला गैरअर्जदाराने त्याबाबत कॅश मेमो व एनटायटल सर्टिफिकेट क्र. 150489 दि.08.04.2008 रोजी दिले आणि या योजनेंतर्गत जंबो 34’’टीव्ही खरेदी केल्यास प्लाझमा 32’’ (81 सेमी) टीव्ही 2 वर्षे 11 महिन्यानंतर मोफत देण्यात येणार अशी माहिती पुस्तिका दिली होती. मंचाने तक्रारकर्तीने वि.प.ला पाठविलेल्या नोटीसचे व योजनेसंबंधी दस्तऐवजांचे अवलोकन केले असता, तक्रारकर्तीचे शपथपत्रावरील कथन सदर दस्तऐवजाचे आधारे सत्य समजण्यास मंचाला हरकत वाटत नाही. वारंवार पत्रव्यवहार व नोटीस पाठवूनही गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला आश्वासित केलेल्या योजनेंतर्गत सेवा प्रदान केली नाही व जंबो 34’’टीव्ही खरेदी केल्यानंतर प्लाझमा 32’’ (81 सेमी) टीव्ही दिला नाही. तक्रारीचे पृष्ठ क्र. 16 नुसार, ‘समयसे पहले हकसे ज्यादा’ या जाहिरातीनुसार, सदर टीव्हीची किंमत रु.31,990/- दर्शविण्यात आलेली आहे. गैरअर्जदाराने सदर टीव्ही तर दिला नाही किंवा त्याची किंमतही अदा केली नाही. सुनावणी दरम्यान मंचाने विचारणा केल्यावर, तक्रारकर्तीने सांगितले की, प्लाझमा 32’’ (81 सेमी) टिव्हीचे उत्पादन बंद झालेले आहे. सदर गैरअर्जदाराची सदर कृती सेवेतील उणिव दर्शविते. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्याकरीता नव-नविन जाहिराती करुन त्यावर अंमल न करणे म्हणजे गैरअर्जदाराने अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केल्याचे यावरुन निष्पन्न होते. त्यामुळे साहजिक तक्रारकर्तीला मानसिक व शारिरीक त्रास सहन करावा लागला व पर्यायाने मंचासमोर येऊन दाद मागावी लागली. याकरीता तक्रारकर्ती नुकसान भरपाई मिळण्यास पात्र ठरते, म्हणून मंच खालील आदेश पारित करीत आहे.
-आदेश-
1) तक्रारकर्तीची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
2) तक्रारकर्तीला गैरअर्जदाराने रु.19,990/- ही गैरअर्जदाराकडे जमा असलेली रक्कम, द.सा.द.शे.12% व्याजासह, दि.08.04.2008 पासून प्रत्यक्ष रक्कम अदा होईपर्यंत द्यावी.
3) गैरअर्जदाराने तक्रारकर्तीला मानसिक व शारिरीक त्रासाची भरपाई म्हणून रु.5,000/- व तक्रारीचा खर्च म्हणून रु.5,000/- द्यावे.
4) गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी सदर आदेशाची अंमलबजावणी संयुक्तपणे किंवा पृथ्थकपणे आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावी.