रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग. तक्रार क्र.71/2008. तक्रार दाखल दि.9-9-2008. तक्रार निकाली दि.29-1-2009.
1. सौ.रंजना जयंत देशमुख. 2. शितल रमेश देशमुख. दोघेही रा.मौ.कांबळे तर्फे बिरवाडी, ता.महाड, जि.रायगड. ... तक्रारदार.
विरुध्द 1. अल अमीन को.ऑप.क्रेडिट सोसायटी लि. साळीवाडा नाका, मु.पो.ता.महाडतर्फे- 2. चेअरमन, श्री.हमीद इसाक माटवणकर, रा.मु.पो.दाभोळ, ता.महाड, जि.रायगड. 3. व्हाईस-चेअरमन, श्री.वजीर उस्मान कोंडीवकर, रा.देशमुख मोहल्ला, महाड, जि.रायगड. 4. मॅनेजिंग डायरेक्टर, श्री.गुलाम महंमद पटेल, मु.पो.वहूर, ता.महाड, जि.रायगड. 5. मॅनेजर, श्री.आदम ए.अंतुले, रा.टेमपाले, ता.माणगांव, जि.रायगड. 6. डायरेक्टर, श्री.हमीद मोहिद्दीन गोठेकर, रा.मु.पो.तळा, जि.रायगड. 7. श्री.अशरफ इब्राहिम कापडी, रा.फॅसीलीटीस मेडिकल, एफ-4, शॉप नं.2, सेक्टर-10, वाशी, नवी मुंबई. 8. श्री.निजमाउद्दीन ए.करीम अंतुले, रा.मु.चांढवे, ता.महाड, जि.रायगड. 9. श्री.आसफ महमूद पल्लवकर, रा.मजदा कॉम्प्लेक्स, देशमुख मोहल्ला, ता.महाड, जि.रायगड. 10. श्री.ए.रहमान इब्राहिम तांबु, रा.मु.राजेवाडी, ता.महाड, जि.रायगड. 11. श्री.अजीमुद्दीन महंमद साले जलाल, रा.मु.पो.टोळ, ता.महाड, जि.रायगड. 12. श्री.हुसनाबानु सलाउद्दीन कुपे, रा.काझी बिल्डिंग, देशमुख मोहल्ला,महाड, जि.रायगड. 13. श्री.मर्यबी हाजी असलम चाफेकर, रा.मु.जिते, ता.महाड, जि.रायगड. 14. श्री.लक्ष्मण रकमा साविनकर, रा.मु..साकडी, पो.कुसगांव,ता.महाड, जि.रायगड. ... विरुध्द पक्षकार.
उपस्थिती- मा.श्री.आर.डी.म्हेत्रस, अध्यक्ष. श्री.बी.एम.कानिटकर, सदस्य. तक्रारदारतर्फे वकील- श्री.व्ही.डी.कळके/ श्री.साबळे. सामनेवाले क्र.6,7 व 14 – एकतर्फा आदेश. सामनेवाले क्र.3,4,9, 11 ते 13 तर्फे वकील- श्री.देशमुख. -निकालपत्र -
द्वारा- मा.सदस्य, श्री.बी.एम.कानिटकर. 1. सदरची तक्रार तक्रारदारानी सामनेवालेंकडून दिलेल्या त्रुटीपूर्ण सेवेमुळे झालेल्या नुकसानभरपाईपोटी दाखल केली आहे. तक्रारदार हे देशमुख कांबळे येथील रहिवासी असून तक्रारदार क्र.2 यांचे पती कै.रमेश यांनी वेळोवेळी प्राप्त केलेली स्वसंपादित रक्कम ही सामनेवालेच्या क्रेडिट सोसायटीमध्ये गुंतवली होती. ही गुंतवणूक करण्यापूर्वी क्रेडिट सोसायटीच्या जबाबदार पदाधिका-यांनी त्यांची रक्कम सामनेवाले संस्थेकडे सुरक्षित राहील व त्यांना हवी तेव्हा सव्याज परत केली जाईल अशी ग्वाही दिली होती. त्यावर विसंबून तक्रारदारानी त्यांची रक्कम त्यांच्याकडे गुंतवलेली होती. ती खालीलप्रमाणे आहे- अ.क्र. | नांव | खाते क्र. | पावती क्र. | रक्कम गुंतवल्याचा दिनांक | गुंतवलेली रक्कम रु. | ठेवपूर्तीची दिनांक | 1. | सौ.रंजना जयंत देशमुख | 667 | 535 | 6-7-2001 | 1,00,000/- | 6-1-06 | 2. | सौ.रंजना जयंत देशमुख | 508 | 314 | 30-8-99 | 1,00,000/- | 30-8-04 | 3. | श्री.रमेश जयंत देशमुख | 658 | 1162 | 5-9-01 | 5,00,000/- | 5-6-02 |
वरीलप्रमाणे एकूण रु.7,00,000/- तक्रारदार क्र.1 व तक्रारदार क्र.2 यांचे मयत पती यांचे नावे ठेवली होती. त्यापैकी प्रत्येकी रु.1,00,000/-च्या दोन मुदतठेवी दामदुप्पटीसाठी गुंतवल्या होत्या. त्यापैकी तिसरी ठेवपावती ही मासिक व्याज योजनेत ठेवली असून त्याचे व्याज त्यांच्या खात्यात जमा केले जात होते. परंतु काही महिने व्याजाची रक्कम वेळचेवेळी बचत खात्यावर जमा केली गेली. काही दिवसांनी तसे मासिक व्याज बचत खात्यात जमा केले गेले नाही. तक्रारदार पुढे म्हणतात की, सदर ठेवीवरील व्याजाची रक्कम ठेवीदारांच्या बचत खात्यात जमा न करता बचताखात्याच्या पासबुकात फक्त नोंदी केल्या. परंतु रक्कम काढतेवेळी मात्र पासबुकात दाखवलेली रक्कम देण्यास टाळाटाळ केली. तक्रारदार क्र.2 या ठेव क्र.3च्या ठेवीदारांच्या पत्नी असून ते ठेवीदार आता मयत आहेत. परंतु सर्व ठेवपावत्यांच्या मुदती संपल्यावरही त्यावरील व्याजाची रक्कम न मिळाल्यामुळे दि.12-1-08 रोजी त्यांनी सदर पतसंस्थेला कायदेशीर नोटीस पाठवली. सामनेवालेनी त्यांच्याकडे ठेवलेल्या रकमेचे मुद्दल व व्याज न दिल्यामुळे तक्रारदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांना पाठवलेल्या कायदेशीर नोटीसीलाही सामनेवालेनी काही प्रतिसाद न दिल्यामुळे त्यांनी मंचाकडे ही तक्रार दाखल केली आहे. सामनेवाले त्यांच्या दोषपूर्ण सेवेमुळे झालेल्या नुकसानीपोटी सामनेवालेनी तक्रारदारास रक्कम रु.50,000/- देण्याचा आदेश करण्याची विनंती केली आहे. तसेच तक्रारदारास सामनेवालेकडे ठेवलेल्या ठेवीची एकूण रक्कम रु.7,00,000/- मुद्दलापोटी व त्याच्या मुदत पूर्ण तारखेपासून मुद्दल मिळेपर्यंत त्यावर 15% दराने व्याज देण्याचे आदेश व्हावेत. त्याप्रमाणे न्यायिक खर्चापोटी योग्य ती रक्कम तक्रारदारास मिळण्याचे आदेश व्हावेत अशी विनंती केली आहे. 2. नि.1 अन्वये तक्रारदारानी तक्रार दाखल केली असून त्याच्या पृष्टयर्थ नि.2 अन्वये प्रतिज्ञापत्र दिले आहे. नि.4 अन्वये श्री.कळके यांचे वकीलपत्र दिले असून नि.6 अन्वये विविध कागदपत्रे दाखल केली आहेत ज्यात ठेवपावत्यांच्या व बचतखात्याच्या खातेपुस्तकांच्या प्रती जोडल्या आहेत, तसेच सामनेवालेना पाठवलेल्या नोटीसीचा समावेश आहे. नि.7 अन्वये सामनेवालेना नोटीसा पाठविल्या असून त्याच्या पोचपावत्या अभिलेखात दाखल आहेत. 3. नि.28 अन्वये सामनेवाले क्र.8 यांनी श्री.देशमुख यांचे वकीलपत्र दाखल कले आहे. नि.35 अन्वये प्रशासकीय अध्यक्ष यांनी सामनेवाले क्र.3,4,8,9, व 11 ते 13 यांचे वतीने लेखी जबाब दाखल केला आहे. त्यात त्यांनी तक्रारदारांचे सर्व आरोप नाकबूल केले आहेत. तक्रारदारानी सुरुवातीला व्याजाची रक्कम स्विकारलेली आहे. त्यानंतर सामनेवालेनी रक्कम देण्याचे बंद केले. त्यामुळे हा दिवाणी स्वरुपाचा दावा असल्याचे मान्य केले आहे. मंचाच्या कार्यकक्षेत हा विषय येत नसल्यामुळे तसेच सामनेवाले ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमांच्या तरतुदीप्रमाणे नोंदवलेली संस्था असल्यामुळे सदर अधिनियमांचे कलम 164 प्रमाणे निबंधकाला नोटीस पाठविणे अनिवार्य आहे. तक्रारदारानी तशी नोटीस काढली नसल्यामुळे ही तक्रार मंचाच्या अधिकारक्षेत्रात येत नाही, त्यामुळे ही तक्रार काढून टाकण्याची विनंती मंचाला केली आहे. आपल्या लेखी जबाबात सामनेवालेंचे पुढे असे म्हणणे आहे की, तक्रारदार हे कधीही सामनेवालेंच्या कार्यालयात आले नव्हते. तसेच ठेवपावती अ.क्र.3 वर श्री.रमेश जयंत देशमुख यांच्या नावे गुंतवलेली रक्कम रु.5,00,000/- च्या ठेवपावतीची मुदत दि.5-6-02 रोजी पूर्ण होत असल्याचे म्हटले आहे. परंतु सदर श्री.जयंत देशमुख हे तक्रारदार नाहीत व ते मयत असल्यामुळे दिवाणी न्यायालयाकडून वारसा दाखला मिळाल्याशिवाय सदर ठेवपावतीची रक्कम इतर कोणालाही मागण्याचा अधिकार नाही. तशा प्रकारचा दाखला अर्जासोबत दाखल केलेला नाही. सदर ठेवपावतीची रक्कम दि.5-6-02 रोजी मुदत पूर्ण होत असल्यामुळे आता 6 वर्षानंतर केलेल्या या अर्जाला मुदतीची बाधा येत आहे. त्यांनी पुढे असे कथन केले आहे की, तक्रारदार क्र.1 चे पती श्री.जयंत देशमुख यांनी त्यांच्या जवळच्या दोन निकटवर्तीयांना सामनेवाले क्र.1 या संस्थेकडून कर्ज मिळवून दिले होते व त्या कर्जाच्या परतफेडीच्या हप्त्याची रक्कम सदर तथाकथित ठेवीच्या व्याजापोटी वसूल केली जात होती. सबब व्याजापोटी कोणतीही रक्कम देणे बाकी राहिलेले नाही. तक्रारदाराचे पती श्री.जयंत चंद्रकांत देशमुख यांनी त्यांचा सखा भाऊ श्री.राजेंद्र चंद्रकांत देशमुख यांनी रक्कम रु.1,15,000/- चे कर्ज सामनेवाले क्र.1 या संस्थेकडून मिळवून दिले होते व सदर कर्ज परतफेड अर्जातील पावत्यांची रक्कम त्यांच्या अर्जात वळती करुन घेण्यास सांगितले होते. त्यामुळे सदर पावत्यांवर सामनेवाले क्र.1 यांचा बोजा होता. एकंदरीत तक्रारदारानी व्यवस्थित अर्ज दिलेला नाही व त्यातील मजकूर बनावट आहे. त्यांनी अर्जात नमूद केलेली कोणतीही नोटीस सामनेवालेना मिळालेली नाही. 4. वरील सर्व कायदेशीर मुद्दयांचा विचार करुन तक्रारदारांचा अर्ज फेटाळण्यात यावा अशी विनंती त्यांनी मंचाला केली आहे. 5. सदर तक्रारीच्या निराकरणार्थ मंचापुढे खालील मुद्दा उपस्थित होतो- मुद्दा क्र.1 – सदरची तक्रार योग्य प्रकारे दाखल झाली आहे काय? उत्तर - नाही. विवेचन मुद्दा क्र.1 – 6. तक्रारदारानी ही तक्रार अतिशय मोघम स्वरुपात दाखल केली आहे. त्यांनी ठेवलेल्या ठेवपावत्यांच्या प्रती दाखल केल्या आहेत, परंतु त्या ठेवपावत्यासाठी केलेल्या मूळ अर्जात त्याबाबत काही नामांकन केले आहे किंवा नाही याबाबत काहीही खुलासा केलेला दिसून येत नाही. तक्रारदार क्र.2 चे पती यांच्या नावे ठेवपावती दिसून येत आहे. ते मयत असल्याचे अर्जावरुन दिसत असले तरी त्यांच्या मृत्यूचा दाखला तसेच तक्रारदार क्र.2 यांच्या पत्नी असल्याचा कोणताही पुरावा त्यांनी सदर तक्रारीत दिलेला नाही. तक्रारदार हे 2 असून त्यांनी बचतखात्याचे खातेपुस्तक मात्र श्री.राकेश जयंत देशमुख यांचे जोडले आहे, तर एक खातेपुस्तक श्रीमती रंजना जयंत देशमुख व जयंत चंद्रकांत देशमुख यांची जोडली आहेत. श्री.राकेश जयंत देशमुख यांचे खातेपुस्तक सदर प्रकरणात जोडण्याचा काही संबंध दिसून येत नाही. मयत रमेश यांच्या मृत्यूचा दाखला व तक्रारदार क्र.2 या त्यांच्या वारस असल्याचा पुरावा देणे आवश्यक होते. सामनेवालेंच्या वतीने दाखल केलेल्या लेखी जबाबाप्रमाणे तक्रारदाराची सामनेवालेंकडे असलेली ठेव ही तारण म्हणून असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले आहे. त्यानी सुध्दा तक्रारदाराच्या ठेवपावत्यांचे अर्जाची व्हाऊचर्स किंवा ठेवपावत्यावर नामनिर्देशन केले आहे किंवा नाही याबाबत काहीही म्हटलेले नाही. तसेच ते आपल्या जबाबात, सदर ठेवपावत्यांवर बँकेचा बोजा असल्याचे म्हणत असले तरी सदर ठेवपावत्यांवर तसा उल्लेख दिसत नाही तसेच त्यांनी आपल्या जबाबासोबत जोडलेल्या लेजरशीटवरुन 1698 क्रमांकाचे बचतखाते तक्रारदार क्र.1 व त्यांचे पती यांच्या संयुक्त नावे असल्याचे दिसून येत आहे. त्याचे अवलोकन केले असता दरमहिन्याला दामदुप्पट ठेव योजना व्याज या नावे खाती दि.30-4-04 ते दि.30-4-05 पर्यंत नियमितपणे व्याज दिल्याचे दाखविले आहे. वास्तविकतः दामदुप्पट ठेव जेव्हा असते तेव्हा त्यापोटी मासिक व्याज देता येत नाही. व्याजावर व्याज दिल्याशिवाय दामदुप्पट होऊ शकत नाही, त्यामुळे याबाबत सामनेवालेनी त्यांच्या लेखी जबाबात काहीही उल्लेख केलेला नाही. आपल्या जबाबात सामनेवाले जरी सदर ठेवपावत्यांवर सामनेवालेंचा बोजा होता तरी त्यासंदर्भातील कर्जाचे पुरावे या ठेवपावत्या व त्यापोटी तारण घेतले असल्याचा कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. सबब एकंदरीत विचार करता तक्रारदारानी सदरची तक्रार योग्य प्रकारे दाखल केलेली नाही तसेच त्यांना सामनेवालेकडून कोणती त्रुटीपूर्ण सेवा दिली गेली याबाबत सुस्पष्ट माहिती दिलेली नाही. त्यांना सामनेवालेनी कशी त्रुटीपूर्ण सेवा दिली याबाबतचे आवश्यक ते दस्तऐवज त्यांनी अभिलेखात दाखल केलेले नाहीत. तक्रारदार क्र.2 चे पती मयत आहेत असे जरी तक्रारीत म्हटले असले तरी त्यांच्या मृत्यूचा दाखला व वारस दाखला सुध्दा दाखल केलेला नाही. तक्रारदारानी मंचात तक्रार दाखल करताना ती योग्य प्रकारे दाखल करणे ही त्यांची जबाबदारी आहे. तसेच त्याबाबतीतील अनुषंगिक पुरावे तक्रारीसोबत जोडणे अनिवार्य आहे, परंतु ही त्यांची जबाबदारी त्यांनी योग्य प्रकारे पार पाडलेली दिसून येत नाही. त्यामुळे उभय पक्षकारांकडून सादर केलेल्या कागदपत्रांचे अवलोकन करुन व सामनेवालेंचा जबाब वाचून अपु-या व अर्धवट माहितीमुळे या तक्रारीच्या निराकरणार्थ मंचास आदेश देता येत नाही. त्यामुळे ही तक्रार काढून टाकण्याच्या निष्कर्षाप्रत मंच आले आहे. 7. सबब खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारित करण्यात येत आहेत- -ः आदेश ः- 1. अपु-या व अयोग्य माहितीअभावी सदर तक्रार काढून टाकण्यात येत आहे. 2. खर्चाबाबत कोणताही आदेश नाही. 3. सदर आदेशाच्या सत्यप्रती उभय पक्षकारांना पाठविण्यात याव्यात.
ठिकाण- रायगड-अलिबाग. दिनांक- 29-1-2009. (बी.एम.कानिटकर) (आर.डी.म्हेत्रस) सदस्य अध्यक्ष रायगड जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, अलिबाग.
......................Hon'ble Shri R.D.Mhetras ......................Shri B.M.Kanitkar | |