जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 69/2013 दाखल तारीख :10/05/2013
निकाल तारीख :26/02/2015
कालावधी : 01वर्षे 09 म. 16 दिवस
बस्वराज पिता गंगाराम बिरादार,
वय42 वर्षे, धंदा शेती,
रा.उदगीर ता.उदगीर जि. लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) विभागीय नियंत्रक,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ,
आगार लातूर, ता.जि. लातूर.
2) मुख्य व्यवस्थापक,
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मुख्य कार्यालय,
मुंबई . ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.एस.के.जोशी.
गै.अ.क्र.1 व 2 तर्फे : अॅड. एस.एस.नाईकवाडी.
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा. अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार हा उदगीर येथील रहिवाशी असून तो 42 वर्षे वयाचा आहे, व उदगीर येथे आरोग्य खात्यात तो शिपाई या पदावर कार्यरत आहे.
दिनांक 04.11.2012 रोजी गैरअर्जदार महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांची लातूर उदगीर नळेगाव मार्गे बस जिचा रजि. नं. एम.एच.20/ डी. 9322 मधुन तिकीट काढून प्रवास करीत असतांना, सदर बस नळेगाव बसस्टँडवर उभी राहीली, त्यावेळेस वाहकाच्या जवळ असलेले सर्व प्रवाशी आपआपल्या स्थानावर बसले होते. गाडीचा चालक बसस्टँडमध्ये एंट्री करावयाचे आहे असे सांगुन खाली उतरला, त्याच वेळेस चालकाच्या कॅबीन मधील रेडीएटरचे झाकन अचानक उघडले, व त्यामधील असलेले उकळते पाणी अर्जदाराच्या अंगावर व इतर प्रवाशांवर अतिशय दाबाने पडले; त्यावेळेस अर्जदार सिटवर बसलेला होता. त्यामुळे शरिराच्या पुर्ण डाव्या बाजुस व उजव्या पायावर रेडीएटरमधील उकळते पाणी पडल्यामुळे अर्जदाराचे शरीर भाजले व प्रचंड वेदना झाल्या. अर्जदारासह इतर 5 ते 6 व्यक्ती सदर घटनेत गंभीर भाजल्या गेले. सदर एस.टी.चा चालक केबीन सोडण्यापुर्वी इंजिनाची स्थिती याची खात्री करुन कॅबिनवरुन खाली उतरणे आवश्यक होते. परंतु तसे न झाल्याने, अर्जदार व इतर प्रवाशी दुखापतग्रस्त झाले. सदर घटने नंतर हजर असलेल्या व्यक्तीमार्फत प्रथम नळेगाव येथील सरकारी दवाखान्यात हलवण्यात आले व नंतर विवेकानंद वैदयकीय संशोधन व हॉस्पीटल लातूर येथे उपचार घेत आहे. सदर घटनेमुळे अर्जदारास कायम स्वरुपी अपंगत्व आलेले आहे. अर्जदाराचा पगार दरमहा रु. 15000/- होता, अजुन तो 16 वर्षे नौकरी करु शकत होता. सदर घटनेमुळे तो आज नौकरी करु शकत नाही. अर्जदार हा रु. 15000/- x 12 = 1,80,000 X 16 = 28,80,000/- मिळण्यास पात्र होता. परंतु गैरअजदाराच्या एस.टी.च्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे तो अपघात घडला, त्याला संबंधीत चालक, त्याचा निष्काळजीपणा एस.टी. गैरअर्जदाराचे नियंत्रन व लातूर मुख्य कार्यालय मुंबई हे जबाबदार आहेत. तसेच गैरअर्जदार यांनी अर्जदारास वैदयकीय उपचारासाठी कुठल्याही प्रकारची मदत केली नाही, व कोणताही मोबदला दिला नाही. अर्जदाराने गैरअर्जदारांना दि. 18.03.2013 रोजी नोटीस पाठवली. परंतु त्याचे उत्तर आले नाही, व रक्कम ही मिळाली नाही. म्हणुन अर्जदाराने सदरचे प्रकरण न्यायमंचात दाखल केलेले आहे. गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे, त्यामुळे शारिरीक व मानसिक त्रासापोटी रु. 20,00,000/- निकाल लागे पर्यंत, व त्यानंतर रक्कम मिळे पर्यंत 18 टक्के व्याजाने देण्याचा आदेश व्हावा.
गैरअर्जदाराच्या म्हणणेनुसार, अर्जदार हा उदगीर येथे आरोग्य खात्यात नौकरी करतो ही बाब सत्य आहे, तसेच तो दिनांक 04.11.2012 रोजी एम.एच 20/ डी 9322 मध्ये लातूर उदगीर नळेगाव मार्गे प्रवास करीत होता हे गैरअर्जदारास मान्य आहे. तसेच बस ही नळेगाव बसस्टँडवर उभी राहीली असता, वाहक हा बसस्टँडवर एंट्री करण्या करीता गेला होता, त्यावेळेस रेडीएटरचे झाकन अचानक पणे उघडले गेले व त्यामुळे त्यातील उकळते पाणी अर्जदाराच्या अंगावर पडले, ही गोष्ट गैरअर्जदारास मान्य आहे. परंतु इतर 6 व्यक्ती सुध्दा गंभीर भाजल्या गेल्या ही गोष्ट मान्य नाही. चालक हा एस.टी. कॅबिन सोडण्यापुर्वी इंजिनाची स्थिती याची खात्री न करता, त्याने दुर्लक्ष केले हे म्हणणे गैरअर्जदारास अमान्य आहे. सर्व गोष्टी पाहुनच वाहक हा खाली उतराला होता, या घटनेस वाहक जबाबदार नाही. सदरच्या घटने नंतर गैरअर्जदाराने अर्जदारास विविकानंद हॉस्पीटल येथे उपचार घेण्यासाठी हलवले हे बरोबर आहे. परंतु तो दैनंदिन कामकाज करु शकत नाही, व कायम स्वरुपी अपंगत्व आलेले आहे, ही बाब अमान्य आहे, व त्यासाठी अर्जदारास गैरअर्जदाराने रु. 28,80,000/- मिळण्यास पात्र आहे हे म्हणणे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना मान्य नाही. तसेच अर्जदाराच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी आली होती हे मान्य नाही. खरी हकीकत अशी की दि. 04.11.2012 रोजी अर्जदार हा प्रवास करीता असतांना, त्यांने कॅबिन मध्ये रेडीएटरजवळ बसले नाही पाहिजे, अर्जदाराने ती काळजी घेतली नाही. तसेच अर्जदाराच्या निष्काळजीपणामुळे सदरची घटना घडली आहे, तो त्यास संपुर्ण जबाबदार आहे. म्हणुन त्याला रु. 28,80,000/- च काय परंतु साधे त्याला रु.2,00,000/- सुध्दा मागता येत नाही. त्याने कागदोपत्री दवाखान्याची बिले, दाखल केलेली नाहीत. त्यामुळे सदरची तक्रार फेटाळण्यात यावी.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? होय
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? होय .
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे, अर्जदाराने गैरअर्जदाराकडून एम.एच.20/डी 9322 लातूर उदगीर नळेगाव मार्गेजाणा-या बसचे तिकीट काढलेले होते.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर होय असून, अर्जदाराचा दि. 04.11.2012 रोजी गैरअर्जदार यांचे आगाराची लातूर उदगीर नळेगाव मार्गे बस जिचा रजि. नं. एम.एच.20/डी9322 मधुन तिकीट काढुन प्रवास करत असतांना सदर बस नळेगाव बस स्टँडवर उभी राहीली, त्यावेळेस वाहकाच्या जवळ असलेले सर्व प्रवाशी आप आपल्या स्थानावर बसले होते. गाडीचा चालक बस स्टँडमध्ये एन्ट्री करावयाची आहे असे सांगुन खाली उतरला, त्याच वेळेस चालकाच्या केबीन मधील रेडीयटरचे झाकन अचानक उघडले गेले व त्यामधील असलेले उकळते पाणी अर्जदाराच्या अंगावर शिवाय इतर प्रवाशांच्या अंगावर अतिशय दाबाने पडले. म्हणुन अर्जदार हा न्यायमंचात तक्रार दाखल केली आहे. सदर केसमध्ये अर्जदार हा वाहकाच्या कॅबीन मध्ये बसण्याची जागा नाही. परंतु तो तेथे बसला ही अर्जदाराची चुक आहे, असे गैरअर्जदार क्र. 1 व 2 चे म्हणणे आहे. त्यांना अर्जदाराच्या अंगावर उकळते पाणी पउले ही बाब देखील मान्य आहे. गैरअर्जदारा सारखा विचार केला तर अर्जदाराने वाहकाच्या कॅबिनमध्ये बसावयास पाहिजे नव्हते, ही बाब योग्य जरी असली तरी वाहकाला देखील एंट्री करुन जाण्या अगोदर आपण गाडी पुर्णत: व्रूवस्थित इंजीन बंद वगैरे करुन जावयास पाहिजे. समजा हाच धोका वाहका बरोबर झाला असता तर त्यास महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाने त्याच्या अशा जखमांच्या इलाजाचा खर्च दिला असता, ही बाब ही तेवढीच स्पष्ट आहे. जरी अर्जदार तिथे बसला तर हे रेडिएटरचे झाकण उघडावयास पाहिजे नव्हते. याचा अर्थ गाडीचे इंजिन एवढे गरम झाले होते ते अचानक रेडिएटरचे पाणी गरम झाल्यामुळे त्याचे झाकण उडाले याचाच अर्थ गैरअर्जदाराने आपल्या गाडीचे इंजिन गरम झाले व त्यास थंड होण्यासाठी वेळ दिला नाही व अशी अवस्था ही गाडीची माहित असतांना गैरअर्जदार हा एन्ट्री करण्यासाठी बसस्टँड मध्ये गेला व अर्जदारावर व इतर प्रवाशांवर हे उकळते पाणी पडल्यामुळे त्यास ती तात्काळ दवाखान्यात न्यावे लागले व त्यामुळे त्यास अत्यंत त्रास भोगावा लागला. परंतु अर्जदाराने आपण नौकरी करत नाही सदयस्थितीत असा एकही पुरावा दिलेला नाही नुसते मी नौकरी करु शकत नाही असे म्हटलेले आहे, याचाच अर्थ अर्जदार हा कायमचा अपंग झाल्याचे प्रमाणपत्र अर्जदाराने देणे क्रमप्राप्त होते. परंतु अर्जदाराने असा कोणताही कागदोपत्री पुरावा दिलेला नाही. फक्त अर्जदाराची उदगीर येथील आरोग्य खात्यातील कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यावरुन त्याच्या पगाराची नोंद केलेली आहे. त्याचा पगार पत्रक 2014 चे दाखल केलेले आहे त्यात रु. 21000/- असून त्यास रु. 17740/- नगदी मिळतात्. परंतु त्याने रु.15000/- मिळतात व 16 वर्ष नौकरी करु शकत होतो असे म्हटलेले आहे. परंतु त्याने सध्या मी नौकरीवर नाही असे शपथपत्र मंचात दाखल केलेले नाही. म्हणुन हे न्यायमंच अर्जदाराच्याजखमांचा व त्यास झालेल्या त्रासाचा पुर्णता: सहानुभूतीर्वुक विचार करुन रु. 2,50,000/- मंजुर करत आहे. तसेच शारिरीक व मानसकि त्रासापोटी रु. 25,000/- व दाव्याच्या खर्चापोटी रु.2000/- मंजुर करत आहोत.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
- अर्जदाराचा अर्ज अंशत: मंजुर करण्यात येत आहे.
- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी अर्जदारास रक्कम रु. 2,50,000/- (रुपये दोन लाख पन्नास हजार फक्त) , आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत अदा करावेत.
- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी आदेश क्र. 2 चे पालन मुदतीत न केल्यास, त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के देणे बंधनकारक राहील.
- गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी मानसिक व शारिरीक त्रासापोटी रक्कम रु.् 25,000/- (रुपये पंचवीस हजार फक्त) तसेच दाव्याच्या खर्चापोटी रु. 2000/- (रुपये दोन हजार फकत) आदेश प्राप्ती पासुन 30 दिवसाचे आत दयावेत.
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.
**//राजूरकर//**