निकालपत्र
(द्वारा- मा.सदस्या - सौ.के.एस.जगपती)
(१) सामनेवाले यांच्या विभा नं.५३ ज्वारी बियाण्याची उगवण न झाल्यामुळे सामनेवाले यांच्याकडून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी तक्रारदार यांनी सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा कलम १२ अन्वये या मंचात दाखल केली आहे.
(२) तक्रारदार यांची तक्रार थोडक्यात अशी आहे की, तक्रारदार हे शेतकरी असून सामनेवाले क्र.१ हे शेतीचे बि-बियाणे उत्पादनाचा व्यवसाय करतात व सामनेवाले क्र.२ हे सामनेवाले क्र.१ कंपनीचे बि-बियाणे वितरक आहेत. तक्रारदार यांनी दि.२८-०६-२०१० रोजी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून विकत घेतलेल्या ज्वारीच्या बि-बियाण्याची आपल्या शेतात पेरणी केलेली होती. सदर पेरणी करतेवेळी तक्रारदारांनी शेणखत दोन ट्रॅक्टर रक्कम रु.३,०००/-, १८.१८.१८ चे तीन बॅग रक्कम रु.१,३५०/- तसेच युरिया १०० किलो रक्कम रु.६००/- आपल्या शेतामध्ये टाकून एकूण रक्कम रु.४,९५०/- मात्र चा खर्च केला आहे. तक्रारदार यांनी दि.३०-०६-२०१० रोजी विभा ५३ कंपनीच्या एकूण दोन बॅगा पेरणी केली होती. पेरणी केली तेव्हा उपयुक्त असा पाऊस पडलेला होता. तसेच तक्रारदारांचे पुढे असे म्हणणे आहे की, पेरणी केल्यानंतर पिकाची उगवणक्षमता मोठया प्रमाणात झाली व पिशटयासारखे कणसे आले. त्यामुळे तक्रारदारांनी दि.०५-१०-२०१० रोजी लेखी अर्जाने पिकांच्या छायाचित्रांसह जिल्हापरिषद धुळे यांच्याकडे तक्रार केली. त्यानुसार जिल्हापरिषद धुळे कृषि विभागा तर्फे लागवड केलेल्या क्षेत्राची पाहणी करण्यासाठी दि.१५-१०-२०१० रोजी तक्रारदार यांना हजर राहण्याचे कळविले. सदर कृषि अधिका-यांनी बि-प्रमाणीकरण धुळे यांचे अधिकारी श्री.सी.पी.साठे., कृषिअधिकारी श्री.आर आर. नेमणराव, कृषिअधिकारी पंचायत समिती ए.एन.कोर यांनी पेरणी केलेल्या क्षेत्रात तपासणी व पिक परिस्थितीचा पंचनामा पंचांसमक्ष करुन त्यांचा अहवाल दिला आहे. अहवालानुसार पेरणी केलेले बियाणे भेसळयुक्त असून तक्रारदार यांना अपेक्षीत उत्पन्न येणार नाही असे मत प्रदर्शीत केलेले आहे.
तक्रारदारांचे पुढे असे म्हणणे आहे की, शेत जमीन पेरणी उपयुक्त करण्यासाठी तिची नांगरणी, वखरणी, बियाणे, रासायणीक खत, शेतमजूरी यासाठी सुमारे रु.७,९५०/- मात्र खर्च झालेला आहे. सदर बियाण्यात मुलत: उत्पादन दोष असल्यामुळे बियाण्याची उगवण होऊनसुध्दा उत्पादन आलेले नाही. सदर बियाणे विकत घेतांना सामनेवाले क्र.२ यांनी तक्रारदारास असे सांगितले होते की, एकरी १५ – १८ पोते ज्वारीचे उत्पन्न येईल. त्यामुळे तक्रारदारांनी दोन एकर क्षेत्रात ३०-३५ क्विंटल ज्वारीचे उत्पन्न घेतले असते. त्याची बाजारभाव किंमत रु.१,०००/- प्रति क्विंटल प्रमाणे एकूण रु.३५,०००/- नुकसान झालेले आहे. या सर्व बाबीचा विचार करता, एकूण रु. ४२,९५०/- मात्र चे नुकसान झालेले आहे. या नुकसानीस सामनेवाले क्र.१ व २ हे संयुक्तिक व वैयक्तिक रित्या जबाबदार आहेत.
तक्रारदारांनी आपल्या मागणीत, नुकसान भरपाईसाठी रक्कम रु.४२,९५०/- ची मागणी केली. मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल रक्कम रु.१०,०००/- सामनेवाले क्र.१ व २ यांचेकडून मिळावेत अशी मागणी केली आहे.
(३) आपल्या तक्रारीच्या पुष्टयर्थ तक्रारदार यांनी, नि.नं.५ वर दस्तऐवज यादी दाखल केली आहे. त्यामधील नि.नं.५/१ वर योगेश्वर कृषि सेवा केंद्र यांच्याकडून बियाणे खरेदी केल्याची पावती, नि.नं.५/२ वर जिल्हा कृषि विकास अधिकारी यांना पाठविलेले पत्र, नि.नं.५/३ वर जिल्हा परिषद धुळे यांनी तक्रारदार यांना उपस्थित राहणेबद्दल पाठविलेले पत्र, नि.नं.५/४ वर पिक परिस्थिती पंचनामा, नि.नं.५/५ वर पिक पाहणी अहवालाची माहिती, नि.नं.५/६ वर तक्रारदार शेतक-याची साक्ष, नि.नं.५/७ वर सामनेवाले क्र.१ व २ यांना पाठविलेली नोटीस या कागदपत्रांच्या छायांकीत प्रती दाखल केल्या आहेत.
(४) सामनेवाले क्र.१ व २ हे हजर होऊन त्यांनी संयुक्त कैफियत नि.नं.१९ वर दाखल केली आहे. सामनेवाले क्र.१ व २ यांनी तक्रारदार यांची तक्रार मान्य केलेली नाही. सदर तक्रारदार यांना कोणतीही नुकसान भरपाई देण्यास अमान्य केलेले आहे. सामनेवाले यांनी आपल्या बचावाचे पुष्टयर्थ असे कथन केले आहे की, तक्रारदार यांनी आवश्यकतेपेक्षा जास्त युरीया पिकास दिलेला आहे. त्यामुळे पिकाची वाढ अनावश्यक वाढली. खुप कमी क्षेत्रात जास्त बियाण्याची पेरणी केली. दाट पेरणीमुळे पिकास सुर्यप्रकाश मिळू शकला नाही. त्यामुळे कणीस लहाण पडते व दाणे भरले गेले नाहीत. सामनेवालेंनी तक्रारदारांचे संपूर्ण म्हणणे नाकबूल केले आहे.
(६) तक्रारदार यांची तक्रार, त्यासोबत दाखल केलेली कागदपत्रे, सामनेवाले क्र.१ व २ यांचा खुलासा यांचा विचार करता, आमच्यासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्यांची उत्तरे आम्ही सकारण देत आहोत.
मुद्देः | निष्कर्षः |
(अ) तक्रारदार हे सामनेवाले यांचे ग्राहक आहेत काय ? | : होय |
(ब) सामनेवाले यांनी तक्रारदारास सदोष बियाणे विक्री केले हे तक्रारदारांनी सिध्द केले आहे काय ? | : नाही |
(क) आदेश काय ? | : अंतिम आदेशाप्रमाणे |
| | | |
विवेचन
(७) मुद्दा क्र. ‘‘अ’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.२ यांच्याकडून सामनेवाले क्र.१ यांनी उत्पादीत केलेले ज्वारी बियाणे विकत घेतल्याचे दाखल नि.नं.५/१ वरील पावतीवरुन सिध्द होते. तसेच ही बाब सामनेवाले यांनी नाकारलेली नाही. यावरुन तक्रारदार हे सामनेवाले यांचे “ग्राहक” आहेत हे सिध्द होते. म्हणून मुद्दा क्र. ‘‘अ’’ चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
(८) मुद्दा क्र. ‘‘ब’’ – तक्रारदार यांनी सामनेवाले क्र.१ व २ यांच्याकडून ज्वारीचे बि-बियाणे विकत घेतले होते, त्या संबंधीत पावती दाखल केलेली आहे. तसेच दाखल केलेला पिक परिस्थिती पंचनामा, यावरुन असे दिसून येते की, पिकाची उगवण चांगली, पिकाची वाढ चांगली, पिकावर किडीचा प्रादुर्भाव नाही, पिकात आंतर मशागत व्यवस्थित, तसेच सदर पंचनाम्यात असे दिसून येते की, ज्वारी विभा ५३ पिकामध्ये सरासरी २३.८ टक्के इतर वाणाची भेसळयुक्त झाडे आढळून आली. झाडे व केलेली पेरणी भेसळयुक्त असल्याचे समितीने मत व्यक्त केलेले आहे. तथापि, तक्रारदाराने सामनेवाले यांच्याकडून घेतलेले बियाणे सदोष किंवा भेसळयुक्त होते याबाबतचा कोणताही उल्लेख समितीने केलेला नाही. त्याचबरोबर तक्रारदाराने बियाणे प्रयोगशाळेत तपासणी करुन अहवाल दाखल केलेला नाही. सदर बियाण्यामध्ये दोष आहे असा अहवाल दिसून येत नाही. त्यामुळे तक्रारदाराचे दोषीत बियाण्यामुळे झालेले नुकसान दिसून येत नाही. त्यामुळे सदर ज्वारी बियाणे दोषयुक्त आहे असे म्हणता येणार नाही, असे मंचाचे मत आहे. म्हणून मुद्दा क्र. ‘‘ब’’ चे उत्तर आम्ही नकारार्थी देत आहोत.
(९) मुद्दा क्र. ‘‘क’’ – सबब आम्ही पुढील प्रमाणे आदेश पारित करीत आहोत.
आदेश
(अ) तक्रारदार यांची तक्रार नामंजूर करण्यात येत आहे.
(ब) तक्रार अर्जाचे खर्चाबाबत कोणताही आदेश नाही.
धुळे.
दिनांक : १६-१०-२०१४