(मंचाचे निर्णयान्वये, श्रीमती रोझा फु. खोब्रागडे, सदस्या)
(पारीत दिनांक : 25 फेब्रुवारी 2016)
अर्जदार यांनी सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 सह 14 अन्वये दाखल केली असून, तक्रारीचा आशय थोडक्यात येणे प्रमाणे.
1. अर्जदार ही ब-याच वर्षापासून शेती उपयोगाचे कामाकरीता पूर्वीपासून आयशर कंपनी ट्रॅक्टर वापरीत होते. अर्जदाराचे ट्रॅक्टर जुने झाल्याने त्याऐवजी नवीन ट्रॅक्टर खरेदी करण्याचे बेतात असतांना गैरअर्जदार क्र.4 नी अर्जदाराशी संपर्क साधला व त्यानुसार अर्जदाराने जुने ट्रॅक्टर गैरअर्जदारास परत देवून त्यापोटी येणारी किंमत वजा करुन त्याउपर नवीन ट्रॅक्टर आयशर 312 ची संपूर्ण किंमत अदाकरुन, आयशर 312 इंजिन क्र.522628805812, चेसीस क्र.922711714035 हा दिनांक 29.6.2015 रोजी सुपूर्द केला. अर्जदाराने शेती हंगामास सुरुवात केली असता 1 महिण्याचे आंत म्हणजेच दिनांक 28.7.2015 रोजी ट्रॅक्टरमध्ये तांञीक बिघाड आला. त्यामुळे ट्रॅक्टर दिनांक 1.8.2015 रोजी आरमोरी स्थित गैरअर्जदार क्र.3 यांचे आयशर शाखेच्या शोरुममध्ये दुरुस्तीस देण्यात आले. अर्जदार ट्रॅक्टर परत घेण्यास गेले असता, गैरअर्जदार क्र.1, 2 मार्फत 3 यांनी ट्रॅक्टरचे मुळ किंमतीतून रुपये 35,000/- पुन्हा घेणे असलेल्या कारणावरुन दुरुस्त असलेला ट्रॅक्टर परत करण्यास नकार दिला. अर्जदाराने ट्रॅक्टर देण्याची वारंवार विनंती केल्यावरही गैरअर्जदार यांनी ट्रॅक्टर परत दिला नाही. अर्जदाराने वकीलामार्फत दिनांक 3.10.2015 रोजी सर्व गैरअर्जदारांना नोटीस पाठविली, परंतु गैरअर्जदाराने नोटीसास कोणतेही उत्तर दिले नाही. गैरअर्जदारांचे अशा गैरवर्तनुकीमुळे अर्जदारास बदनामी, मानसिक व शारिरीक ञास सहन करावा लागला. त्यामुळे अर्जदार प्रार्थना करते की, गैरअर्जदाराने अर्जदाराच्या वरील उल्लेखीत वाहनाचे मुळ किंमतीपेक्षा अतिरिक्त पैशाची मागणी करु नये तसेच अर्जदाराचे वाहन त्यांना तातडीने परत करावे, अर्जदारास मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 7,00,000/- व आलेल्या खर्चापोटी असे एकूण 10,000/- प्रत्येक गैरअर्जदाराने द्यावे असे आदेश पारीत करावे.
2. अर्जदाराने नि.क्र.2 नुसार 9 दस्ताऐवज दाखल केले. अर्जदाराची तक्रार नोंदणी करुन गैरअर्जदार यांना नोटीस काढण्यात आले. गैरअर्जदार क्र.1 ते 4 ने हजर होऊन नि.क्र.13 नुसार प्रारंभिक आक्षेपासह लेखीउत्तर दाखल केले.
3. गैरअर्जदार क्र.1 ते 4 यांनी नि.क्र.13 नुसार दाखल केलेल्या लेखीउत्तरातील प्रारंभिक आक्षेपात नमूद केले की, फसवणूकीचा मामला ग्राहक संरक्षण कायद्याच्या समरी प्रोसीडींगमध्ये चालू शकत नाही व म्हणून अशी तक्रार विद्यमान सक्षम दिवाणी न्यायालयासमोरच चालू शकते म्हणून सदरची तक्रार फेटाळण्यास पाञ आहे. गैरअर्जदारांनी जबाबात अर्जदाराचे तक्रारीतील म्हणणे खोटे असल्याने तक्रार अमान्य केली आहे. गैरअर्जदारांनी पुढे लेखीउत्तरातील विशेष कथनात नमूद केली आहे की, अर्जदाराने सदर ट्रॅक्टर सर्विसिंगपोटी जॉबकार्ड दिनांक 20.9.2015 प्रमाणे आलेला खर्च रुपये 9205/- जमा करुन तीचे ट्रॅक्टर नेण्यास हरकत नाही. अर्जदाराने तिच्या बदलविलेल्या जुन्या ट्रॅक्टरचे दस्ताऐवज अजुनपर्यंत गैरअर्जदाराकडे जमा केलेले नाही, ज्यामुळे सदर जुना ट्रॅक्टरची विल्हेवाट करण्यास गैरअर्जदार क्र.2 ला कायदेशीर अडचण आली आहे व त्यामुळे गैरअर्जदार क्र.2 चे आर्थिक नुकसान झाले आहे. ट्रॅक्टरच्या सर्विसिंगच्या वेळेस फक्त लेबर चार्जेस मोफत आहे पण बाकी कामासाठी लागणारा खर्च देण्यास अर्जदार बाध्य आहे.
4. अर्जदार व गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी बयान, दस्ताऐवज, शपथपञ, लेखी व तोंडी युक्तीवादावरुन खालील मुद्दे निघतात.
मुद्दे : निष्कर्ष
1) अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? : होय.
2) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती सेवेत न्युनतापूर्ण : नाही.
व्यवहार केला आहे काय ?
3) गैरअर्जदाराने अर्जदाराप्रती अनुचित व्यवहार पध्दतीची : नाही.
अवलंबना केली आहे काय ?
4) अर्जदाराचा तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : अंतिम आदेशाप्रमाणे
- कारण मिमांसा –
मुद्दा क्रमांक 1 बाबत :-
5. अर्जदाराने गैरअर्जदाराकडून जुने ट्रॅक्टर देवून नवीन ट्रॅक्टर विकत घेतले त्याबाबत दोन्ही पक्षाचे कोणतेही वाद नसल्याने व दोन्ही पक्षांना मान्य असल्यामुळे अर्जदार ही गैरअर्जदाराची ग्राहक आहे असे सिध्द होते. सबब, मुद्दा क्र.1 चे उत्तर होकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 2 बाबत :-
6. अर्जदाराने दिनांक 1.8.2015 रोजी आरमोरी स्थित गैरअर्जदार क्र.3 यांच्या आयशर शाखेच्या शोरुममध्ये ट्रॅक्टर दुरुस्तीकरीता देण्यात आले होते. याबाबत अर्जदार व गैरअर्जदारांचे वाद नाही. अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदर ट्रॅक्टर सर्विसिंग करीता दिलेले होते व गैरअर्जदाराकडे आलेले अर्जदाराचे ट्रॅक्टर सर्विसिंग होऊन तयार आहे व अर्जदाराने त्यावर आलेला खर्च रुपये 9205/- गैरअर्जदाराकडे जमा करुन त्याचे ट्रॅक्टर मिळण्यास गैरअर्जदाराची हरकत नाही. परंतु, सदर रक्कम अर्जदाराने भरली नाही. सदर सर्विसींग वेळी फक्त लेबर चार्जेस मोफत असतात बाकीचे कामाकरीता लागणारा खर्च अर्जदाराला भरावा लागतो असे गैरअर्जदाराने त्यांच्या लेखी जबाबात कथन केलेले आहे. अर्जदाराकडून गैरअर्जदाराने सदरहू ट्रॅक्टर दुरुस्तीकरीता रुपये 35,000/- ची मागणी केलेली होती याबाबत अर्जदाराने कोणताही साक्षी पुरावा प्रकरणात दाखल केलेला नाही. गैरअर्जदार अर्जदाराला आजही सदरहू ट्रॅक्टरवर सर्विसींग करीता आलेला खर्च भरल्यावर ट्रॅक्टर देण्यास तयार आहे. यावरुन असे सिध्द होते की, गैरअर्जदाराने अर्जदाराला कोणतीही न्युनतमपूर्ण सेवा दिलेली नाही किंवा अर्जदाराप्रती कोणतीही अनुचित व्यवहार पध्दतीची अवलंबना केलेली नाही. सबब, मुद्दा क्र.2 व 3 चे उत्तर नकारार्थी नोंदविण्यात येते.
मुद्दा क्रमांक 4 बाबत :-
7. मुद्दा क्र.1 ते 3 चे विवेचनावरुन मंच खालीलप्रमाणे अंतिम आदेश पारीत करीत आहे.
- अंतिम आदेश -
(1) अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते.
(2) अर्जदाराने गैरअर्जदाराकडे दिलेला ट्रॅक्टर वर सर्विसींगकरीता आलेला खर्च रुपये 9205/- आदेशाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत जमा करावे व रक्कम जमा केल्यावर गैरअर्जदाराने अर्जदाराचे ट्रॅक्टर अर्जदाराला परत करावे.
(3) उभय पक्षांनी आप-आपला तक्रारीचा खर्च स्वतः सहन करावे.
(4) उभय पक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
(5) सदर निकालपञाची प्रत संकेतस्थळावर टाकण्यात यावी.
गडचिरोली.
दिनांक :- 25/2/2016