द्वारा- मा. अध्यक्ष, श्रीमती अंजली देशमुख
:- निकालपत्र :-
दिनांक 27 डिसेंबर 2011
1. तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यात दिनांक 14/7/1994 रोजी सदनिका क्र.5, 300 चौ.फुट, औदुंबर अपार्टमेंट, ता. हवेली खरेदी संदर्भात नोंदणीकृत करारनामा झाला. सदनिकेची किंमत रुपये 1,65,500/- + रुपये 6000/- [वीजेसाठी] ठरविण्यात आलेली होती. तक्रारदारांचे आई-वडील वयोवृध्द असल्यामुळे चढ-उतार होणे शक्य नसल्यामुळे तक्रारदारांनी 1994 साली बाजारभाव रुपये 450/- प्रति चौ.फुट चालू असतांनासुध्दा तळमजल्यावरील जागा घेण्यासाठी अधिकच्या दराने म्हणजेच रुपये 635/- प्रति चौ.फुट प्रमाणे सदनिकेची नोंदणी केली होती. करारनाम्याच्याच दिवशी तक्रारदारांनी जाबदेणार यांना रक्कम रुपये 50,000/- अदा केली. करारनाम्यात सदनिका क्र.5 ऐवजी सदनिका क्र.15 चुकून लिहीलेला असल्यामुळे त्या चुकीची दुरुस्ती करण्यात आली. ज्या मिळकतीवर इमारतीचे बांधकाम होते ती मिळकत श्रीमती विमल पांडुरंग कदम यांची होती. बांधकाम झाल्यानंतर जाबदेणार तक्रारदारांना जी सदनिका क्र.5 देणार होते तिचा ताबा श्रीमती विमल पांडूरंग कदम यांनी बळजबरीने घरात घुसून घेतला. नंतर श्रीमती कदम यांनी जाबदेणार यांच्याविरुध्द सिव्हील कोर्टात दावा दाखल केला होता त्याचा निकाल दिनांक 18/11/2000 रोजी श्रीमती कदम यांच्या बाजूने लागला. हे सर्व होईपर्यन्त जाबदेणार यांनी तक्रारदारांना दिनांक 10/6/1996 रोजी पत्र लिहून सदनिका क्र.5 ऐवजी तिस-या मजल्यावरील सदनिका क्र.24 तात्पुरत्या स्वरुपात रहावयास दिली. जाबदेणार यांनी अदयापपर्यन्त तक्रारदारांना सदनिका क्र.5 चा ताबा दिलेला नाही. सदनिका क्र.24 चे वाढीव क्षेत्रफळ आहे. तक्रारदारांना दिनांक 28/8/2006 रोजी या सदनिकेचा कार्पोरेशन टॅक्स रुपये 25,090/- भरावा लागला. लाईट मिटर साठी रुपये 6000/-बिल्डरकडे भरावे लागले. परंतू बिल्डरने लाईट मिटरची सोय न केल्यामुळे परत रुपये 7000/- एम.एस.ई.बी कडे भरावे लागले. पिण्याच्या पाणी कनेक्शनसाठी व हातपंप बसविण्यासाठी रुपये 6000/- भरावे लागले. मोटार खर्चासाठी फेब्रु.2009 मध्ये रुपये 5000/- भरावे लागले. पिण्याचे पाणी व बोअरिंगचे पाण्यासाठी मिटर खर्च रुपये 6890/- आला. सिलींग दुरुस्ती, बाथरुम दुरुस्ती, खिडक्यांच्या काचांसाठी रुपये 8000/- खर्च आला. वयोवृध्द आई-वडिलांसाठी रुपये 45000/- खर्च आला. जाबदेणार यांनी दिनांक 10/6/1996 रोजीच्या पत्रान्वये सदनिका क्र.5 चा ताबा देऊ शकत नाही असे तक्रारदारांना कळविले. म्हणून तक्रारदारांनी जाबदेणार यांना नोटीस पाठविली, परंतू जाबदेणार यांनी त्यास उत्तर दिले नाही. म्हणून सदरील तक्रार. तक्रारदार जाबदेणार यांच्याकडून सदनिकेचा ताबा व खरेदीखत करुन मागतात. तसेच वर नमूद केलेली रक्कम खर्च करावी लागली ती व्याजासह परत मागतात, व इतर दिलासा मागतात. तक्रारदारांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
2. जाबदेणार यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. जाबदेणार यांच्या म्हणण्यानुसार तक्रारदार आणि जाबदेणार यांच्यात सदनिका क्र.5 खरेदीसाठी दिनांक 14/7/1994 रोजी करारनामा झाला. दिनांक 8/1/1996 रोजी करेक्शन डीड द्वारा सदनिका क्र.15 ऐवजी सदनिका क्र.5 दुरुस्ती करण्यात आली. सदनिका क्र.5 चे क्षेत्रफळ 300 चौ.फुट, किंमत रुपये 1,90,500/- निश्चित करण्यात आली होती. कराराच्या वेळी तक्रारदारांनी रुपये 50,000/- जाबदेणार यांना अदा केले होते. दिनांक 16/3/1996 पर्यन्त तक्रारदारांनी जाबदेणार यांना रुपये 1,65,500/- अदा केले होते. तक्रारदारांनी उर्वरित रक्कम रुपये 25000/- जाबदेणार यांना अदा केलेली नाही. कराराच्या कलम 6 नुसार जोपर्यन्त तक्रारदार सदनिकेची संपुर्ण किंमत अदा करीत नाहीत तोपर्यन्त सदनिकेचा ताबा मागू शकत नाहीत. दिनांक 15/3/1996 रोजी अॅड. अजित एकबोटे तर्फे तक्रारदारांना नोटीस पाठविण्यात आली होती. नोटीस मध्ये सदनिका क्र.5 तयार असून उर्वरित मोबदला देऊन सदनिकेचा ताबा घ्यावा असे त्यात नमूद करण्यात आलेले होते. दरम्यान श्रीमती विमल पांडुरंग कदम यांचा स्पेशल सिव्हील सुट क्र.577/1996 च्या निकालाद्वारे सदनिका क्र.5 वर अधिकार स्थापित झाला. हा आदेश एकतर्फा होता. त्यामुळे जाबदेणार तक्रारदारांना सदनिका क्र.5 चा ताबा देऊ शकत नाहीत. म्हणून जाबदेणार यांनी तक्रारदारांना सदनिका क्र.24 तात्पुरत्या स्वरुपात रहावयास दिली होती. सदनिका क्र.24 चे क्षेत्रफळ 450 चौ.फुट असल्यामुळे जाबदेणार यांचे रुपये 95,250/- चे नुकसान झालेले आहे. सदनिका क्र.24 चे क्षेत्रफळ अधिक असल्यामुळे व तक्रारदारांचे कुटूंब मोठे असल्यामुळे तक्रारदारांनी सदनिका क्र.24 ची मागणी जाबदेणार यांच्याकडे केली. त्यानुसार तक्रारदारांनी जाबदेणार यांना उर्वरित रुपये 25,000/- व सदनिकेचे अधिकचे असलेले 150 चौ.फुट क्षेत्रफळापोटी रुपये 95,250/- दयावेत असे ठरले. जाबदेणार यांनी तक्रारदारांना सदनिका क्र.5 चा करारनामा रद्य करुन सदनिका क्र.24 चा करारनामा उर्वरित रक्कम देऊन करावा अशी मागणी केली. परंतू तक्रारदारांनी ही मागणी अमान्य केली. तक्रारदारांना उर्वरित रक्कम दयावयाची नव्हती म्हणून त्यांनी करारनामा केला नाही. तक्रारदारांनी उर्वरित रक्कम 12 वर्षापासून दिलेली नाही. दिनांक 10/6/1996 पासून नोटीस दिनांक 18/2/2008 पर्यन्त 11 वर्षे व 7 महिने वेळ गेलेला आहे. तक्रार मुदतबाहय असल्यामुळे रुपये 10,000/- खर्चासह नामंजुर करावी अशी मागणी जाबदेणार करतात. जाबदेणार यांनी शपथपत्र व कागदपत्रे दाखल केली.
3. तक्रारदारांनी रिजॉईंडर दाखल करुन जाबदेणार यांचा लेखी जबाब नाकारला.
4. तक्रारदारांनी दिनांक 16/8/2010 रोजीच्या अर्जाद्वारे श्रीमती विमत पांडुरंग कदम यांना जाबदेणार क्र.2 म्हणून समाविष्ट करण्याबाबत अर्ज दाखल केला. तो अर्ज मंजूर करण्यात आला.
5. जाबदेणार क्र.2 यांनी लेखी जबाब दाखल करुन तक्रारदारांच्या मागणीस विरोध दर्शविला. लेखी जबाबामध्ये जाबदेणार क्र.2 यांचा तक्रारदारांशी काहीही संबंध नाही व विषयांकित मिळकतीच्या त्या मुळ मालक असून सदर मिळकतीमध्ये मालक म्हणून रहात आहेत व ती त्यांच्या मालकीची आहे असे त्यात नमूद केले. तसेच तक्रार खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मागणी केली.
6. उभय पक्षकारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. तक्रारदार व जाबदेणार क्र.1 यांना सदनिका क्र.5 संदर्भात करारानुसार तक्रारदारांनी रक्कम रुपये 25,000/- जाबदेणार क्र.1 यांना देणे आहेत हे मान्य आहे. तात्पुरता निवारा म्हणून जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना सदनिका क्र.24 दिलेली आहे हे सुध्दा उभय पक्षकारांना मान्य आहे. सदनिका क्र.24 चे क्षेत्रफळ सदनिका क्र.5 पेक्षा 150 चौ.फुट अधिक आहे. सदनिका क्र.24अधिकच्या क्षेत्रफळापोटी रक्कम रुपये 96,250/- व सदनिका क्र.5 चा उर्वरित मोबदला रुपये 25000/- जाबदेणार क्र.1 तक्रारदारांकडून मागतात. जाबदेणार युक्तीवादादरम्यान आजच्या बाजारभावाप्रमाणे सदनिका क्र.24 च्या वाढीव क्षेत्रफळाची किंमत तक्रारदारांकडून मागतात. तोंडी युक्तीवादाच्या वेळी तक्रारदारांनी सदनिका क्र.24 अधिकच्या क्षेत्रफळापोटी दीड ते पावणेदोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली. दिनांक 10/6/1996 रोजीच्या जाबदेणार यांच्या पत्राचे अवलोकन केले असता त्यांच्यात व मालक श्रीमती विमल पांडुरंग कदम यांच्यातील भांडणामुळे तक्रारदारांना त्यांच्या सदनिका क्र.5 चा ताबा मिळू शकलेला नाही, त्याचा उपभोग घेता आलेला नाही, तक्रारदारांना व त्यांच्या वयोवृध्द आई-वडिलांना तिस-या मजल्यावरील सदनिकेत 1996 पासून आजपर्यन्त रहावे लागले ही बाब स्पष्ट होते. सदनिकेचा ताबा जाबदेणार यांनी तक्रारदारांना न दिल्यामुळे तक्रारीस कारण घडत आहे, तक्रार मुदतीत आहे असे मंचाचे मत आहे. जाबदेणार यांच्यामुळे तक्रारदारांना, त्यांच्या वयोवृध्द आई-वडिलांना शारिरीक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागला. लाईट-पाणी, घर दुरुस्तीसाठी यासाठी अधिकची रक्कम खर्च करावी लागली. म्हणून तक्रारदार जाबदेणार क्र.1 यांच्याकडून नुकसान भरपाई पोटी रक्कम रुपये 25,000/- मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. सदनिका क्र.24 टॅक्स पोटी तक्रारदारांना रुपये 25000/- खर्च करावे लागले. ही रक्कमही तक्रारदार जाबदेणार क्र.1 यांच्याकडून मिळण्यास पात्र आहेत असे मंचाचे मत आहे. वर नमूद केल्याप्रमाणे तक्रारदारांनी सदनिका क्र.24 च्या अधिकच्या क्षेत्रफळापोटी रुपये 1,75,000/- जाबदेणार क्र.1 यांना दयावयाचे आहेत. तसेच सदनिका क्र.5 पोटी तक्रारदारांनी रक्कम रुपये 25,000/- जाबदेणार क्र.1 यांना दयावयाची आहे. म्हणजेच तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1 यांना एकूण रक्कम रुपये 2,00,000/- दयावयाची आहे. त्यातून उपरोक्त नमूद केलेली टॅक्सची रक्क्म रुपये 25,000/- व नुकसान भरपाईची रक्कम रुपये 25,000/- वजा जाता तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1 यांना रक्कम रुपये 1,50,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी व नंतर दोन आठवडयांच्या आत जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना सदनिका क्र.24 संदर्भात नोंदणीकृत खरेदी करारनामा करुन दयावा असाही आदेश देण्यात येतो.
वर नमूद विवेचनावरुन व दाखल कागदपत्रांवरुन खालीलप्रमाणे आदेश देण्यात येत आहे-
:- आदेश :-
1. तक्रार जाबदेणार क्र.1 यांच्याविरुध्द अंशत: मान्य करण्यात येत आहे.
2. तक्रारदारांनी जाबदेणार क्र.1 यांना सदनिका क्र.24, औदुंबर अपार्टमेंट, सिटी सर्व्हे नं 284/2, ता. हवेली, जिल्हा पुणे अधिकच्या क्षेत्रफळापोटी रक्कम रुपये 1,50,000/- आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून सहा आठवडयांच्या आत अदा करावी. रक्कम रुपये 1,50,000/- प्राप्त झाल्यानंतर दोन आठवडयांच्या आत जाबदेणार क्र.1 यांनी तक्रारदारांना उपरोक्त नमूद सदनिकेचे नोंदणीकृत खरेदीखत करुन दयावे व तक्रारदारांना तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रुपये 1,000/- अदा करावेत.
4. जाबदेणार क्र.2 यांच्याविरुध्द आदेश नाही.
आदेशाची प्रत उभय पक्षकारांना नि:शुल्क पाठविण्यात यावी.