न्यायनिर्णय
(द्वारा सौ. माधुरी एस. विश्वरुपे- मा. सदस्या)
- तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 व 2 यांचेकडे वाहन विकत घेण्यासाठी चौकशी केली असता सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दि. 30/05/2009 रोजी रक्कम रु. 7,92,213/- असचे कोटेशन दिले. तक्रारदारांनी सामनेवाले यांचेकडे बस बुकींगची रक्कम रु. 50,000/- चेकद्वारे भरणा केली. सामनेवाले यांनी याबाबतची पोच पावती दिली आहे. सामनेवाले क्र. 2 यांनी सदर बसचे उत्पादन पूर्ण झालेले नसल्यामुळे बसची डिलेव्हरी जून 2009 मध्ये देण्याचे आश्वासित केले. तथापि त्याप्रमाणे बसची डिलेव्हरी दिली नाही.
-
- सामनेवाले यांनी दि. 20/07/2009 रोजी दुसरे कोटेशन दिले. दुस-या कोटेशनप्रमाणे वाहनाची किंमत रु. 7,605/- एवढी वाढविण्यात आली होती. तक्रारदारांना वाढीव किंमतीबाबत कोणताही आक्षेप नव्हता.
- तक्रारदारांनी सदर वाहन खरेदी करण्यासाठी मे. सुंदरम फायनान्स लि. यांचेकडून वाहन कर्जाची सुविधा घेतली व दि. 21/07/2009 रोजी सामनेवाले यांना वाहनाची संपूर्ण रक्कम जमा केली. सामनेवाले क्र. 2 यांनी दि. 30/07/2009 रोजी जामनगर येथे संध्याकाळी उशिराने वाहनाची डिलेव्हरी दिली.
- तक्रारदारांनी वाहनाचा ताबा घेतल्यानंतर सदर बस 4000 कि.मी. पर्यंत चालविल्याचे लक्षात आले तसेच इन्श्युरन्स सर्टिफिकेटनुसार बसचे उत्पादन सन 2006 दर्शविले होते. तक्रारदारांनी वाहनाचे रजिस्ट्रेशन R.T.O. यांचेकडे केले. वाहन नोंदणीची रक्कम भरणा केल्याची पावती मंचात दाखल आहे.
- तक्रारदारांनी सदर वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये बरेच दोष आढळले. सामनेवाले क्र. 2 यांना यासंदर्भात ई-मेलद्वारे माहिती दिली, वाहनाचे फोटो पाठवले. परंतु सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी प्रतिउत्तर दिले नाही.
- तक्रारदारांनी दि. 08/08/2009 रोजीच्या ई मेल पत्राद्वारे सामनेवाले क्र. 1 यांचेकडे सदोष वाहनाबाबत तक्रार केली. सामनेवाले क्र. 1 यांचे तज्ञ इंजिनिअर यांनी वाहनाची तपासणी केली. परंतु अदयापपर्यंत या संदर्भात अहवाल दिला नाही.
- तक्रारदारांनी सामनेवाले यांचे कार्यालयात यासंदर्भात संपर्क केला असता दि. 14/08/2009 रोजीचा उभय पक्षांच्या चर्चेनुरुप तक्रारदारांना सदर वाहन दि. 22/08/2009 रोजी बदलून देण्याचे निश्चित झाले. यासाठी जुन्या वाहनचे रजिस्ट्रेशन रद्द करणे आवश्यक असल्याचे सामनेवाले क्र. 2 यांनी सूचित केले.
- तक्रारदारांनी त्यांचे एजंटला जुन्या वाहनाची नोंदणी रद्द करण्यास सांगितले. याकरीता सामनेवाले क्र. 1 यांनी RTO जामनगर यांना वाहनाच्या बदलाबाबत (Replacement) लेखी निवेदन देणे तसेच तक्रारदारांच्या फायनान्स कंपनीने वाहनाच्या बदलाबाबत NOC देणे आवश्यक होते. तथापि, सामनेवाले क्र. 1 यांनी RTO यांना यासंदर्भातील पत्र देण्यास नकार दिला अशी तक्रारदारांची तक्रार आहे.
- सामनेवाले क्र. 1 व 2 यांचे म्हणण्यानुसार तक्रारदारांना सदर वाहनाचा रंग आवडत नसल्यामुळे वाहन बदल करुन देण्याची त्यांनी सामनेवाले यांचेकडे मागणी केली. तक्रारदारांचे वाहनाची वॉरंटी कालावधी चालू असून तक्रारदारांना राजकोट येथील सर्व्हीस सेंटर येथे वाहन तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत तथापि अदयापपर्यंत तक्रारदारांनी सर्व्हीस सेंटरला वाहन तपासणीसाठी आणले नाही. त्यामुळे सदर वाहनामध्ये कोणताही दोष नसल्याचे स्पष्ट होते.
- तक्रारदारांची तक्रार, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद तसेच सामनेवाले यांची लेखी कैफियत, पुरावा शपथपत्र, लेखी युक्तीवाद यांचे मंचाने वाचन केले. तसेच उभय पक्षांनी त्यांचा लेखी युक्तीवाद हाच तोंडी युक्तीवाद समजण्यात यावा अशी पुरसिस दिली. सबब उपलब्ध कागदपत्रांआधारे मंच खालीलप्रमाणे निष्कर्ष काढीत आहेः
कारणमिमांसाः
- तक्रारदार कंपनीला सामनेवाले क्र. 1 यांनी दि. 30/05/2009 रोजी वाहनाचे Proforma Invoice रु. 7,92,213/- एवढया रकमेचे दिले आहे. तसेच 40,000/- रुपयांचा डिस्काऊंट देऊन वाहनाची किंमत रु. 7,52,213/- नमूद केली आहे. त्याचप्रमाणे तक्रारदारांनी रु. 50,000/- अॅडव्हान्स दिल्याचे दर्शवले आहे.
ब. सामनेवाले क्र. 2 यांनी तक्रारदार कंपनीला दि. 27/07/2009 रोजी दिलेल्या वाहनाची किंमत रु. 8,09,818.00/- नमूद केली असून रक्कम रु. 50,000/5 डिस्काऊंट देऊन रु. 7,59,818/- वाहनाची किंमत दर्शविली आहे. सदर इनव्हाईसची प्रत मंचात दाखल आहे.
क. तक्रारदार कंपनीने सदर वाहन विकत घेण्यासाठी रु. 6,50,000/- एवढया रकमेचे द.सा.द.शे. 12% व्याजदाराने कर्ज घेतल्याबाबतचा खातेउतारा मंचात दाखल केला आहे. तसेच सदर वाहनाची Royal Sundaram कंपनीकडे रक्कम रु. 27,267/- प्रिमियमची रक्कम भरणा करुन विमा पॉलिसी घेतली आहे. विमा पॉलिसीची प्रत मंचात दाखल आहे. सदर विमा पॉलिसीमध्ये वाहनाचे date of manufacturing सन 2009 दर्शविण्यात आली आहे.
ड. तक्रारदारांनी सामनेवाले क्र. 1 व यांना दि. 04/08/2009 रोजी पाठविलेल्या पत्रामध्ये तक्रारदार कंपनीने सदर वाहनाची डिलेव्हरी दि. 11/08/2009 रोजी प्राप्त झाली असून वाहनाचा ब-याच ठिकाणी पॅचवर्क केल्याचे दिसून येते. तसेच वाहनाचे मिटर रिडींग 4000 कि.मी. दर्शविण्यात आल्याचे नमूद केले आहे. तसेच सामनेवाले यांना सदर वाहन बदली करुन देण्याची मागणी केली. तक्रारदारांनी यासंदर्भात डिलीव्हरी चलनवर सदर वाहनाचा प्रवास दाखवला आहे.
इ. तक्रारदारांनी दि. 14/07/2010 रोजी वाहनाचे फोटो दाखल केले आहेत. तक्रारदारांनी सदर वाहनाची डिलेव्हिरी दि. 30/07/2009 रोजी घेतली आहे. एक वर्षाच्या कालावधीत वाहनाच्या बाहय भागावर बाहेरील वातावरणामुळे तसेच गाडीच्या वापरामुळे काही भाग खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तक्रारदारांनी वाहनातील दोष दर्शविण्याकरीता वॉरंटी कालावधीत सदर वाहन सामनेवाले यांचे गॅरेजला पाठवणे आवश्यक होते. तक्रारदारांच्या वाहनाचा वॉरंटी कालावधी त्यावेळी चालू असल्यामुळे सामनेवाले यांचे इंजिनिअरने वाहनाची तपासणी करुन अहवाल दिला असता तर वाहनाच्या सदयस्थितीबाबतची माहिती ज्ञात झाली असती. परंतु तक्रारदारांनी वाहन सामनेवाले यांचेकडे दुरुस्ती अथवा तपासणीकरीता पाठवले नाही. तक्रारदारांच्या वाहनामध्ये वॉरंटी कालावधीत काही उत्पादकीय दोष आढळून आला असता तर त्याप्रमाणे तक्रारदारांना पुढील कार्यवाही करणे शक्य झाले असते. तक्रारदारांच्या वाहनामध्ये वॉरंटी कालावधीत उत्पादकीय दोष असल्याबाबतचा पुरावा मंचासमोर नाही.
ड. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी लेखी युक्तीवादात नमूद केल्यानुसार वाहनाचा चेसिस नंबर हा वाहनाची (Manufacturing year & month) उत्पादित वर्षे व महिना यावरुन ARAI (The Automotive Research Association of India) सर्टिफिकेट दिले जाते. सामनेवाले यांना ARAI यांनी सदर वाहनाचे सर्टिफिकेट दिले असून त्यामध्ये जून, 2008 मध्ये वाहनाचे उत्पादन केल्याचे दिसून येते.
इ. सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी पुरावा शपथपत्रासोबत खालीलप्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेतः
1. Copy of Tax invoice dated 28/07/2009
2. Certificate of Registration issued by Jamnagar RTO on
21/11/2014
3. Consolidate certificate mentioning the details of Tax paid on
Vehicle no from 2010 to 2015
4. The details of Particulars showing the Chassis & Engine No of
the vehicle
सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी दाखल केलेल्या वरील कागदपत्रांवरुन तक्रारदारांचे वाहन 2009 मध्ये उत्पादित केल्याचे स्पष्ट होते. तसेच तक्रारदारांनी दि. 31/03/2015 पर्यंत वाहनाचा टॅक्स भरणा केला आहे.
वरील परिस्थितीचे अवलोकन केले असता तक्रारदारांनी त्यांचे वाहनामध्ये उत्पादकीय दोष असल्याबाबतची बाब तज्ञ अहवाल देऊन शाबित केली नाही. तक्रारीतील दाखल पुराव्यावरुन सदर वाहन सदोष असल्याची बाब स्पष्ट होत नाही. तसेच तक्रारीतील दाखल कागदपत्रांनुसार सदर वाहन जून, 2009 मध्ये उत्पादित केल्याचे स्पष्ट होते. सबब सामनेवाले क्र. 1 व 2 यांची सेवेतील त्रुटी स्पष्ट होत नाही.
तक्रारदारांनी सदर प्रकरणात ICICI LOMBARD यांची सदर वाहनाकरीताची transit policy पॉलिसी दाखल केली आहे. सामनेवाले यांचे म्हणण्यानुसार सदर पॉलिसी चुकीची आहे. तक्रारीतील वाहनाची विमा पॉलिसी RTO particulars वगैरे कागदपत्रांवरुन सदर वाहन 2009 मध्ये उत्पादित झाल्याचे स्पष्ट होत असल्यामुळे सामनेवाले क्र. 1 व 2 यांनी जुन्या व सदोष वाहनाची विक्री तक्रारदारांना केल्याची बाब स्पष्ट होत नाही असे मंचाचे मत आहे.
सबब मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करत आहेः
आ दे श
- तक्रार क्र. 704/2009 नामंजूर करण्यात येते.
- खर्चाबाबत आदेश नाही.
- आदेशाच्या प्रती उभय पक्षांना विनाविलंब व विनामुल्य पोष्टाने पाठविण्यात याव्यात.
- संचिकेच्या अतिरिक्त प्रती असल्यास तक्रारदारांना परत करण्यात याव्यात.