::: गैरअर्जदार यांचे प्राथमिक आक्षेप अर्जावर आ दे श :::
( पारित दिनांक : 24/07/2017 )
माननिय अध्यक्षा सौ. एस. एम. उंटवाले, यांचे अनुसार : -
ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 27 अन्वये दाखल केलेल्या या दरखास्त प्रकरणात गैरअर्जदार यांनी दाखल केलेल्या प्राथमिक आक्षेप अर्जावर उभय पक्षांचा युक्तिवाद एैकला.
सदर फिर्याद प्रकरणात, फिर्यादीने या फिर्यादीच्या आधी मंचात फिर्याद क्र. 05/2014 या गैरअर्जदाराविरुध्द दाखल केली होती. मंचाने दिनांक 27/02/2015 रोजी सदर फिर्याद निकाली काढून खालीलप्रमाणे आदेश पारित केला होता.
1. तक्रारकर्ते यांची तक्रार खारीज करण्यात येते.
2. तक्रारकर्ते यांनी आपली तक्रार अवसायक मंडळ यांच्याकडे दाखल करावी व आपली मागणी मागावी.
3. आदेशाची प्रत उभय पक्षकारांना निःशुल्क देण्यात यावी.
4. तक्रारीतील सदस्याच्या प्रतिचा संच तक्रारकर्ते यांना देण्यात यावा.
त्यानंतर फिर्यादीने विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था अमरावती यांचेसमोर महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 107 अन्वये गैरअर्जदार वत्सगुल्म अर्बन क्रेडीट सहकारी संस्था मर्या. वाशिम तर्फे अवसायक यांचेविरुध्द अर्ज दाखल केला असता, त्यात दिनांक 31/03/2016 रोजी खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात आला होता. . . . .
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 107 अन्वये मला प्रदान केलेल्या अधिकारानुसार, अर्जदार यांनी ग्राहक तक्रार निवारण मंच, वाशिम येथे संस्थेविरुध्द दाखल केलेल्या फिर्यादीमध्ये गैरअर्जदार, वत्सगुल्म अर्बन क्रेडीट सहकारी संस्था मर्या. वाशिम तर्फे अवसायक यांना प्रतिवादी म्हणून समाविष्ट करण्याची परवानगी खालील अटी व शर्तीस अधिन राहून देण्यात येत आहे.
अटी व शर्ती –
- सदर वादाचा अवसायकाशी अथवा अवसायनाच्या कार्यवाहीशी कसलाही वैयक्तीक संबंध नसल्यामुळे अर्जदाराने वैयक्तिकरित्या अवसायकाविरुध्द दाद (relief) मागू नये. तसेच तत्कालीन पदाधिका-यांनी केलेल्या कृती व अकृतीस अवसायक थेट जबाबदार ठरु शकणार नाही.
- सदर वादातुन उद्भवणारी कोणतीही जबाबदारी / देयता ( Liability ) ही अवसायकास वैयक्तिकरित्या बंधनकारक राहणार नाही.
- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 अंतर्गत अवसायकास प्राप्त असलेल्या अधिकारांना व अवसायन कार्यवाहीस कसलीही बाधा पोहोचणार नाही.
त्यानंतर फिर्यादीने ही फिर्याद क्र. 11/2016 मंचासमोर, गैरअर्जदाराविरुध्द दाखल केली आहे. परंतु या फिर्यादीच्या आधी, फिर्यादीची फिर्याद या गैरअर्जदाराविरुध्द खारीज झाली होती. त्यातील आदेश फिर्यादीने मा. वरिष्ठ न्यायालयात आव्हानीत न करता, मा. विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था अमरावती यांचेसमोर तक्रार अर्ज दाखल करुन, गैरअर्जदार – अवसायकाविरुध्द त्यांची मुळ आदेशीत रक्कम वसुल करण्याची परवानगी मागीतली होती परंतु विभागीय सहनिबंधक यांच्या दिनांक 31/03/2016 च्या आदेशाचे अवलोकन केले असता, त्यांनीही अवसायकाविरुध्द दाद मागु नये, त्यांना थेट जबाबदार धरु नये, या आशयाचा आदेश वरीलप्रमाणे पारित केला आहे, त्यामुळे मुळ तक्रार प्रकरणातील विरुध्द पक्ष – संचालक मंडळ राहिलेले नाही व अवसायकाला जबाबदार धरता येत नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता, गैरअर्जदाराच्या आक्षेप अर्जात मंचाला तथ्य आढळते. त्यामुळे गैरअर्जदाराचा आक्षेप मंजूर करण्यात येवून, फिर्यादीची फिर्याद खारिज करण्यांत येते.
सबब, अंतिम आदेश पारित केला तो खालीलप्रमाणे. . . . . .
:: अंतिम आदेश ::
- गैरअर्जदार यांचा प्राथमिक आक्षेप गृहीत धरुन, फिर्यादीची फिर्याद खारिज करण्यांत येते.
- न्यायिक खर्चाबाबत कोणताही आदेश पारित करण्यांत येत नाही.
- उभय पक्षांना या आदेशाच्या प्रती निशुल्क पुरवाव्या.
(श्री. कैलास वानखडे ) ( सौ. एस.एम. उंटवाले )
सदस्य. अध्यक्षा.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, वाशिम.
svGiri