अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर.
मा.अध्यक्ष - श्री. मिलींद. सा. सोनवणे,
मा.सदस्य – श्री.सी.एम.येशीराव.
------------------------------- तक्रार अर्ज क्र. – 1364/2010
तक्रार दाखल तारीख – 01/11/2010
तक्रार निकाली तारीख – 18/04/2013
जळगांव जिल्हा राज्य शासकीय सहकारी, ------ तक्रारदार
कर्मचारी पतपेढी लि. जळगांव,
गाळा नं. 33, दुसरा मजला, फुले मार्केट, जळगांव,
तर्फे सेक्रेटरी – श्री. डी.ई. सोनवणे.
विरुध्द
वसुंधरा ऑटोमेशन अॅण्ड सॉफटवेअर सोल्यूशन्स, ------ सामनेवाला
तर्फे भागीदार – चेतन येवलेकर, विनय येवलेकर,
ए- 23, अक्षय पॅलेस, वारजे फलायओव्हर जवळ
वारजे माळवाडी, पुणे.
कोरम –
श्री. मिलींद. सा. सोनवणे, अध्यक्ष,
श्री. सी.एम. येशीराव. सदस्य
तक्रारदार तर्फे - अॅड. जयंत लक्ष्मण फडके, सामनेवाला - एकतर्फा,
नि का ल प त्र
श्री. मिलींद. सा. सोनवणे, अध्यक्ष - प्रस्तुत तक्रार सेवेतील कमतरतेच्या कारणास्तव ग्राहक संरक्षण कायदा, 1986 च्या कलम 12 अन्वये दाखल करण्यात आलेली आहे.
2. तक्रारदाराचे म्हणणे थोडक्यात असे की, तक्रारदार नोंदणीकृत, सहकारी पतसंस्था आहे. सामनेवाले वसुधंरा ऑटोमेशन व सॉफटवेअर सोल्युशनस या नावाने संगणक सॉफटवेअर पुरविण्याचा व्यवसाय करतात. पतसंस्थेच्या सभासदांना चांगली, दर्जेदार व तात्काळ सेवा मिळण्यासाठी तक्रारदाराने कार्यालयीन कामकाजाचे रेकॉर्ड व फाईल चे संगणकीकरण करण्यासाठी आवश्यक ते सॉफटवेअर पुरविण्यासंबधी सामनेवाल्यांची सेवा घेतली, दि. 05.05.2007 रोजी सामनेवाले यांनी त्यासंबधी कोटेशन दिले त्याचा तपशिल खालील प्रमाणे आहे.
अ.क्र. | तपशिल | किंमत |
1. | पतपेढी ऑनलाईन मराठी आवृत्ती | 50,000/- |
2. | डाटा ऐन्ट्री | 5,000/- |
3. | प्रशिक्षण | 5,000/- |
4. | पतसंस्थेच्या गरजेनुसार रिपोर्ट इम्प्लीमेंटशन | 10,000/- |
5. | डिस्कॉऊंट ( लेस ) | 7,000/- |
| एकुण | 63,000/- |
3. तक्रारदाराचे असेही म्हणणे आहे की, वरील कोटेशनप्रमाणे सामनेवाल्यांची सेवा घेण्यात आली. त्यासाठी दि. 31/05/2007 रोजी रु. 36,600/- व 17/08/2007 रोजी रु. 15,000/- असे एकुण 51,600/- तक्रारदाराने सामनेवाल्यास अदा केलेले आहेत. सामनेवाल्याने कोटेशनमध्ये देऊ केलेल्या सेवा जळगांव येथे देण्याचेही उभय पक्षांमध्ये ठरले होते. तसे कमीटमेंट पत्रही सामनेवाल्यांनी पतसंस्थेस दिलेले आहे.
4. सामनेवाल्याने ठरल्याप्रमाणे सॉफटवेअर इन्स्टॉल केले. मात्र सभासदांच्या माहितीचा डाटा ऐन्ट्री करुन दिला नाही. त्यासंबंधीचे प्रशिक्षण ही सामनेवाल्याने पतसंस्थेच्या कर्मचा-यांना दिलेले नाही. सामनेवाल्यास अनेक विनंत्या करुनही त्याने ती जबाबदारी पार पाडण्यास टाळाटाळ केलेली आहे. डाटा ऐन्ट्री व प्रशिक्षण अभावी इन्स्टॉल केलेले सॉफटवेअर पतसंस्थेच्या काहीही कामाचे नाही. सामनेवाल्याने फसवणुक करुन तक्रारदारास सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. म्हणुन प्रस्तुत अर्ज तक्रारदारास दाखल करणे भाग पडले आहे.
5. सामनेवाल्यास नोटीस मिळूनही ते हजर न झाल्याने आमच्या पुर्वाधिका-यांनी दि. 08/04/20011 रोजी च्या आदेशान्वये तक्रार एकतर्फा चालविण्याचा हुकूम केला.
6. तक्रारदारातर्फे अॅड. श्री. कुलकर्णी यांचा युक्तीवाद ऐकण्यात आला.
7. निष्कर्षांसाठीचे मुद्दे व त्यावरील आमचे निष्कर्ष कारणांसहीत खालीलप्रमाणे आहेत.
मुद्दे निष्कर्ष
1. तक्रारदारास सामनेवांल्याचे ग्राहक आहेत काय ? होय
2. सामनेवाल्याने तक्रारदारास सेवा देण्यात
कमतरता केली आहे काय ? होय
3. आदेशाबाबत काय ? अंतिम आदेशाप्रमाणे
कारणमिमांसा
8. तक्रारदार सहकारी पतसंस्था आहे. ती व्यवसाय करते हे ध्यानी घेऊन, ती ग्राहक संरक्षण कायदा कलम 2(1) (ड) अन्वये ग्राहक ठरते काय, हा मुद्दा आम्ही स्वतःहून विचारात घेत आहोत.
9. तक्रारदार जरी व्यावसायिक पतसंस्था असली तरी, तिने संगणकीकरणासाठी आवश्यक असलेल्या सॉफटवेअर विषयी सेवा घेतलेली आहे. कलम 2 (1) (ड) अन्वये घेण्यात आलेली वस्तु अथवा सेवा जर व्यापार करण्याच्या हेतूने घेतलेली असेल तर ती वस्तु वा सेवा घेणारा व्यक्ती ग्राहक ठरत नाही, प्रस्तुत केस मधील पतसंस्थेने सॉफटवेअर व्यापार सुलभ व्हावा या हेतुने घेतलेले आहे. सॉफटवेअरचा वापर करुन पतसंस्थेच्या सभासदांकडून अधिक फायदा/नफा मिळावा, असा तक्रारदाराचा हेतू नव्हता व नाही. सबब, तक्रारदार ग्राहक संरक्षण कायदा कलम 2 (1)(ड) अन्वये ग्राहक ठरते.
मुद्दा क्र. 1 साठी
10. तक्रारदार सामनेवाल्यांचे ग्राहक आहे किंवा नाही. याबाबत तक्रारदाराने यादी नि.क्र. 03 लगत कोटेशन, नि. 3/2, वचनबध्दता पत्र, नि. 3/3, सामनेवाल्यास अदा केलेल्या रक्कमांच्या पावत्या, नि. 3/4 व 3/5 व इतर कागदपत्रे दाखल केलेली आहेत. तसेच तक्रारदार सामनेवाल्याची ग्राहक आहे, असे शपथपत्रात नमूद केलेले आहे. सामनेवाल्याने वरील पुरावा हजर होऊन नाकारलेला नाही. परिणामी तक्रारदार सामनेवाल्यांचे ग्राहक आहे, असा निष्कर्ष निघतो यास्तव मुद्या क्र. 1 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 2 साठी
11. तक्रारदाराने पुराव्याचे प्रतिज्ञापत्र नि. 5 मध्ये नमूद केले की, सामनेवाल्याने ठरल्याप्रमाणे सॉफटवेअर इन्स्टॉल केले. मात्र सभासदांच्या माहितीचा डाटा ऐन्ट्री करुन दिलेला नाही. त्यासंबंधीचे प्रशिक्षण ही सामनेवालयाने पतसंस्थेच्या कर्मचा-यांना दिलेले नाही. रिपोर्ट इम्लीमेंटशनही सामनेवाल्याने करुन दिलेले नाही, अनेक विनंत्या करुनही ते करण्यास त्याने टाळाटाळ केलेली आहे. डाटा ऐन्ट्री व प्रशिक्षणा अभावी इन्स्टॉल केलेल्या सॉफटवेअरचा काहीही उपयोग नाही. त्यामुळे सामनेवाल्याने फसवणुक करुन सेवा देण्यात कमतरता केलेली आहे.
12. वर नमूद शपथपत्रातील पुरावा सामनेवाल्याने हजर होऊन आव्हानीत केलेला नाही. परिणामी तो त्यास मान्य आल्यानेच आव्हानीत केलेला नाही, असा प्रतिकुल निष्कर्ष आम्ही सामनेवाल्याविरुध्द काढत आहोत. यास्तव मुद्दा क्र. 2 चा निष्कर्ष आम्ही होकारार्थी देत आहोत.
मुद्दा क्र. 3 साठी
13. मुद्दा क्र. 1 व 2 चे निष्कर्ष होकारार्थी दिलेले आहेत, ही बाब स्पष्ट करते की, तक्रारदार सामनेवाल्याचे ग्राहक आहे व त्याने सेवा देण्यात कमतरता केलेली आहे. परिणामी तक्रारदाराचा अर्ज मंजुर करण्यास पात्र ठरतो. तक्रारदाराने सामनेवाल्यास 30 दिवसांच्या आत सभासदांच्या तपशिलाचा डाटा ऐन्ट्री करुन दयावा व कर्मचा-यांना प्रशिक्षण दयावे, असा आदेश दयावा अशी विनंती केलेली आहे. मात्र कोटेशन नि.क्र. 3/2 अन्वये त्यांनी सामनेवाल्यास रु. 61,000/- देणे असतांना केवळ रु. 51,600/- अदा केलेले आहेत. त्यामुळे तक्रारदारांच्या विनंती प्रमाणे आदेश देतांना त्यांनी सामनेवालयास रक्कम रु. 9400/- (उर्वरित रक्कम) देण्याचा आदेश न्यायोचित ठरेल. पर्यायी सामनेवाल्याने तक्रारदारास प्रशिक्षण रु. 5000/- डाटा ऐन्ट्री रु. 5000/- व रिपोर्ट इम्प्लीमेंटेशन रक्कम रु. 10,000/- असे एकुण रु. 20,000/- (सॉफटवेअर किंमत रु. 50,000/- चे सॉफटवेअर मिळाले असल्याने) द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने परत करावेत हा आदेश देखील न्यायोचित ठरेल. प्रस्तुत केसच्या फॅक्टस व सरकमस्टंटेस विचारात घेता सामनेवाल्याने तक्रारदारास प्रस्तुत अर्जाचा खर्च म्हणुन रु. 3,000/- देण्याचा आदेश न्यायास धरुन होईल. यास्तव आम्ही खालील आदेश देत आहोत.
आदेश
1. सामनेवाल्यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदाराच्या
सर्व सभासदांच्या तपशिलाचा भरणा संगणक सॉफटवेअर प्रणालीत अपिल कालावधी उलटल्यानंतर 30 दिवसाच्या आत करुन दयावा.
2. सामनेवाल्यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारास पुरविलेल्या संगणक सॉफटवेअर प्रणालीचे 3 आठवडयांचे प्रशिक्षण तक्रारदाराच्या अपिल कालावधी उलटल्यावर दयावे.
3. प्रशिक्षण न दिल्यास सामनेवाल्यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या एकुण खर्च रु. 20,000/-, द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने तक्रार दाखल तारखेपासुन दयावे.
4. सामनेवाल्यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारास अर्ज खर्चापोटी रु. 5,000/- अपिल कालावधी उलटल्यावर अदा करावेत.
5. उभय पक्षास निकालपत्राची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
दि. 18/04/2013
जळगांव.
(श्री.सी.एम.येशीराव) (श्री.मिलींद.सा.सोनवणे)
सदस्य अध्यक्ष
अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.
श्री. चंद्रकांत एम. येशीराव, सदस्य – मा. अध्यक्ष यांनी पारीत केलेल्या परिच्छेद क्र. 1 ते 13 यात करण्यात आलेल्या विवेचना बाबत मी सहमत आहे. पंरतू न्यायनिर्णयाच्या आदेशातील बिंदू क्र. 1, 2 व 4 बाबत मी आदरपुर्वक असहमत आहे. माझा मते आदेश दिनांकापासून 30 दिवसात अदा करणे न्यायोचित ठरेल. यास्तव प्रस्तुत प्रकरणात अंतिम आदेश खालील प्रमाणे असावा.
आदेश
1. सामनेवाल्यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदाराच्या
सर्व सभासदांच्या तपशिलाचा भरणा संगणक सॉफटवेअर प्रणालीत आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसात करुन दयावा.
2. सामनेवाल्यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारास पुरविलेल्या संगणक सॉफटवेअर प्रणालीचे 3 आठवडयांचे प्रशिक्षण आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसात करुन दयावे.
3. प्रशिक्षण न दिल्यास सामनेवाल्यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या एकुण खर्च रु. 20,000/-, द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने तक्रार दाखल तारखेपासुन दयावे.
4. सामनेवाल्यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारास अर्ज खर्चापोटी रु. 3,000/- आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसात करुन दयावे.
5. उभय पक्षास निकालपत्राची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
दि. 18/04/2013
जळगांव.
(श्री.सी.एम.येशीराव)
सदस्य
पुनम नि. मलीक, सदस्य - मा. राज्य आयोग, मुंबई. यांच्या दि. 16/12/2013 रोजीच्या आदेशान्वये, मा. अध्यक्ष व सदस्य यांच्यात अंतिम आदेशाच्या बिंदू क्र. 2 च्या आदेशाबाबत असहमती असल्यामुळे त्या मुदयावर मला माझा निर्णया देण्याच्या संदर्भात आदेश देण्यात आलेला आहे. त्यानुसार मी संपूर्ण न्यायनिर्णयाच्या अवलोकन करता मी मा. सदस्य, श्री. चंद्रकांत एम. येशीराव यांनी पारीत केलेल्या निकालपत्राशी सहमत आहे. यास्तव निकालपत्राचा अंतिम आदेश खालील प्रमाणे आहे.
आदेश
1. सामनेवाल्यांना आदेशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदाराच्या
सर्व सभासदांच्या तपशिलाचा भरणा संगणक सॉफटवेअर प्रणालीत आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसात करुन दयावा.
2. सामनेवाल्यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारास पुरविलेल्या संगणक सॉफटवेअर प्रणालीचे 3 आठवडयांचे प्रशिक्षण आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसात करुन दयावे.
3. प्रशिक्षण न दिल्यास सामनेवाल्यांनी वैयक्तीक व संयुक्तीकरित्या एकुण खर्च रु. 20,000/-, द.सा.द.शे. 6 टक्के व्याजाने तक्रार दाखल तारखेपासुन दयावे.
4. सामनेवाल्यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारास अर्ज खर्चापोटी रु. 3,000/- आदेश प्राप्त झाल्यापासुन 30 दिवसात करुन दयावे.
5. उभय पक्षास निकालपत्राची प्रत विनामुल्य देण्यात यावी.
दि. 27/12/2013
जळगांव.
(श्रीमती. पुनम नि.मलीक) (श्री.सी.एम.येशीराव)
सदस्या सदस्य
अति. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.