निकालपत्र :- (दि.27/10/2010) (श्री एम.डी.देशमुख,अध्यक्ष) 1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाले यांना नोटीसीचा आदेश झाला.सामनेवाला यांना नोटीस लागू होऊन ते सदर कामी वकीलांमार्फत हजर झाले व त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले. सुनावणीचे वेळेस उभय पक्षांच्या वकीलांनी युक्तीवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी :- यातील तक्रारदार व सामनेवाला क्र.1 हया महाराष्ट्र सहकारी कायदयाखाली नोंदलेली सहकारी संस्था असून सामनेवाला क्र.2 ही सामनेवाला क्र.1 ची शाखा आहे. सामनेवाला क्र. 3 ते 26 हे सामनेवाला क्र.1 संस्थेचे संचालक मंडळ सदस्य आहेत. तक्रारदार हे सदर सामनेवाला संस्थेचे ठेवीदार ग्राहक आहेत. (3) यातील तक्रारदार ही गडहिंग्लज तालुक्यातील भडगांव येथे स्थापन झालेली ग्रामीण बिगर शेती सहकारी संस्था असून सभासदांकडून ठेवी स्विकारुन आपल्या सभासदांना कर्जपुरवठा करणे हा तक्रारदार यांचा व्यवसाय आहे.तसेच ठेवी कर्जे यातील ताळमेळ राखण्यासाठी तक्रारदार संस्थेने सामनेवाला संस्थेमध्ये मुदत बंद ठेव पावती क्र.169710 अन्वये दि.11/11/2006 रोजी द.सा.द.शे.10 % दराने रक्कम रु.3,00,000/- ठेवले होते. तसेच ठेव पावती क्र.169731, 169732 व 169733 अन्वये दि.21/11/2006 रोजी प्रत्येकी रक्कम रु.4,00,000/- द.सा.द.शे.10 % दराने ठेवले होते. तसेच चालू खाते क्र.40 वर रक्कम रु.1,78,593/-इतके शिल्लक आहेत. सदर ठेव पावत्यांच्या मुदती संपुनसुध्दा सामनेवाला संस्थेने तक्रारदार संस्थेच्या ठेवीची रक्कम व चालू खातेवरील शिल्लक रक्कमांची मागणी करुनसुध्दा सामनेवाला संस्था सदर रक्कम परत देणेस टाळाटाळ केली व असमर्थता दर्शविली. (4) तक्रारदार आपल्या तक्रारीत पुढे सांगतात, सामनेवाला संचालकांच्या चुकीच्या व गैरव्यवस्थापनेमुळे तिचे व्यवस्थापन अडचणीत येऊन रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सामनेवाला संस्था अवसायानात घेतलेली आहे. सामनेवाला बँकेवर अवसायक यांची नेमणूक केली असलेचे सामनेवाला बँकेकडून सांगण्यात येत आहे. सामनेवाला संस्थेने ठेव रक्कम व चालू खातेवरील शिल्लक रक्कम व्याजासह परत करणेची असमर्थता दर्शविलेमुळे तक्रारदार संस्थेची आर्थिक कोंडी होऊ लागली आहे. अशाप्रकारे सामनेवाले यांनी तक्रारदाराची ठेवीची रक्कम व चालू खातेवरील रक्कम व्याजासह परत न करता आर्थिक नुकसान केले आहे. यामुळे सामनेवाला हे तक्रारदारांच्या ठेव पावतीवरील रक्कम व चालू खातेवरील शिल्लक रक्कम व्याजासहित परत करण्यास वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या जबाबदार आहेत. सबब, तक्रारदारांनी मुदत बंद ठेव रक्कम व व्याज तसेच चालू खातेवरील शिल्लक रक्कम व त्यावरील व्याज सामनेवाला यांचेकडून वसुल होऊन मिळणेकरिता या मंचासमोर सदरील तक्रार अर्ज दाखल केला आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत तक्रारदार संस्थेचा दि.16/05/2008 चा ठराव क्र.8 चा कारणापुरता उतारा, तक्रारदार संस्थेचे रिझर्व बँकेला दि.6/12/2008 रोजी पाठविलेले पत्र, सामनेवाला बँकेचे दि.16/12/2008 चे तक्रारदारांना दिलेले पत्र, ठेव पावत्यांच्या प्रती, चालू खाते क्र.40 चे पासबुकाचे उतारे, तक्रारदाराने सामनेवाला यांना पाठविलेली नोटीसची स्थळप्रत इत्यादी कागदपत्रे व शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच दि.31/05/2010 रोजी तक्रारदार संस्थेने सहा.निबंधक यांना गुंतवणूकीसाठी परवानगीबाबत दिलेल्या पत्राची प्रत दाखल केली आहे व रिजॉइन्डर दाखल केले आहे. (6) सामनेवाला क्र. 1 ते 26 यांनी दाखल केलेल्या लेखी म्हणणेमध्ये तक्रारदाराची ठेवीची रक्कम व चालू खातेवरील रक्कम वगळता इतर कथने नाकारलेली आहेत. प्रस्तुत सामनेवाला आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदार व सामनेवाला हया संस्था असलेने सदरची तक्रार मे. मंचासमोर दाखल करणे पूर्णत: कायदयास सोडून विसंगत आहे. तसेच सामनेवाला संस्था अवसायनात गेली असलेने अवसायनात असलेल्या संस्थेविरुध्द कोणतीही दाद तक्रारदारास मागता येणार नाही. तक्रारदार सारख्या ठेवीदारांचे पैसे मिळवून देणेसाठी अवसायक नेमले आहेत. सदर अवसायक मंडळास तक्रारदाराने पार्टी केलेले नाही. तसेच तक्रारदार हे ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कायदयातील कलम 2 मधील (डी) या व्याख्येमध्ये बसत नाही. त्यामुळे या कारणास्तव सदर कामी प्राथमिक मुद्दा काढून सदरचा तक्रार अर्ज फेटाळणेत यावा. सहकार कायदयातील तरतुदीप्रमाणे कोणतीही बिगर शेती सहकारी संस्थेने आपली ठेव कोणाकडे कशी ठेवावी याबाबतचे विस्तृतरित्या माहिती दिलेली आहे. तसेच अन्यत्र कोठेही ठेव ठेवण्याचे झालेस, सदर ठेव ठेवण्यापूर्वी निबंधक यांचेकडून योग्य ते आदेश घ्यावे लागतात. त्याबाबत तक्रारदाराने कोणताही पुरावा दाखल केलेला नाही. (7) सामनेवाला क्र. 1 ते 26 आपल्या लेखी म्हणणेत पुढे सांगतात, तक्रारदाराने सामनेवाला यांचेकडे ठेवलेल्या ठेवीच्या रक्कमेचे कर्ज वाटप केलेले आहे व सदर कर्ज वाटप केलेल्यांकडून कर्जाची परत फेड होवू शकत नसल्याने त्यांची ठेव देणे अडचणीचे झालेने सामनेवाला संस्थेवर अवसायक मंडळाची नेमणूक झालेली आहे. तसेच सामनेवाला यांचेविरुध्द सहकार कायदयाच्या तरतुदीप्रमाणे चौकशा सुरु आहेत. त्याचा अहवाल आलेनंतरच गैर कारभाराच्या बाबत स्पष्टोक्ती होऊ शकते.तसेच तक्रारदाराच्या ठेवीची रक्कम देत नाही असे अवसायक मंडळाने म्हटलेले नाही. त्यामुळे सामनेवाला यांचेविरुध्द तक्रार दाखल करणे योग्य व उचित नाही. सबब तक्रारदाराचा तक्रार अर्ज फेटाळून टाकावा अशी विनंती प्रस्तुत सामनेवाला यांनी सदर मंचास केली आहे. (08) सामनेवाला यांनी आपल्या लेखी म्हणणेच्या पुष्टयर्थ अवसायक मंडळ सभा दि.09/03/2009मधील ठराव क्र.23(2)व 23(3) चा लागूपुरता उतारा दाखल केला आहे. (09) तक्रारदारांचा शपथेवरील तक्रार अर्ज, दाखल कागदपत्रे तसेच सामनेवाला यांचे लेखी म्हणणे व दाखल कागदपत्रे यांचा साकल्याने विचार करता तक्रारदारांनी तक्रारीत नमुद केलेप्रमाणे सामनेवाला यांचेकडे मुदत बंद ठेव व चालू खाते स्वरुपात रक्कम ठेवल्याचे निदर्शनास येते. तथापि, सदर मुदत बंद ठेव पावतीवरील रक्कमांची व चालू खातेवरील रक्कमेची व्याजासह मागणी करुनही सामनेवाला यांनी व्याजासह सदर रक्कमा परत न केल्याने तक्रारदारांनी सदरील तक्रार अर्ज या मंचासमोर दाखल केलेला आहे. (10) सामनेवाला यांनी त्यांचे लेखी म्हणणेत तक्रारदार हे ग्राहक होत नाहीत. तसेच सामनेवाला संस्थेवर अवसायक यांची नेमणूक झालेली असलेने तक्रारदाराची ठेव रक्कम देणेची जबाबदारी अवसायक यांची आहे. तसेच तक्रारदार संस्थेने सहकार कायदयातील तरतुदीप्रमाणे मे.निबंधक, सहकारी संस्था, कोल्हापूर यांची परवानगी न घेता सामनेवाला संस्थेमध्ये ठेव रक्कमा ठेवलेल्या आहेत असे कथन केले आहे. परंतु तक्रारदाराने सामनेवाला संस्थेमध्ये गुंतवणूक करणेस सहाय्यक निबंधक,सहकारी संस्था गडहिंग्लज यांची परवानगी मागितलेबाबतचे दि.13/01/2005 चे पत्र दाखल केलेले आहे. तसेच सामनेवाला यांनी त्यांच्या म्हणण्यात तक्रारदारांच्या ठेवी मान्य केलेल्या आहेत. सदर ठेवींची मागणी केली असता सामनेवाला यांनी होणा-या व्याजासह त्या परत करणे आवश्यक होते. सदर सामनेवाला यांचे वर्तणूकीवरुन सामनेवाला यांनी तक्रारदारांच्या व्याजासह रक्कमा परत करण्याकरिता कोणतेही प्रामाणिक प्रयत्न केलेले नाहीत हे स्पष्ट दिसून येते. तथापि, सदरच्या ठेवींच्या रक्कमा तक्रारदारांना परत न करुन सामनेवाला यांनी सेवेत त्रुटी केली आहे. सबब सामनेवाला क्र.1 ते 23 व 26 यांना वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.24व 25 हे सामनेवाला संस्थेचे सेवक प्रतिनिधी म्हणजे कर्मचारी असलेने त्यांना फक्त संयुक्तिकरित्या तक्रारदाराच्या ठेव रक्कमा व्याजासहीत देणेस जबाबदार धरणेत यावे या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. (11) तक्रारदारांनी आपल्या तक्रारीच्या पुष्टी प्रित्यर्थ दाखल केलेल्या मुदत बंद ठेव पावती क्र.169710, 169731, 169732, 169733 चे अवलोकन केले असता सदर पावत्यांवरील रक्कम रु.3,00,000/-, 4,00,000/-, 4,00,000/-, 4,00,000/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर रक्कमेवर रक्कम ठेवले तारखेपासून ते मुदत संपले तारखेपर्यंत ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत व तदनंतर संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. तसेच सदर ठेव पावत्यांवर सामनेवाला यांनी काही व्याज अदा केले असलेस सदर व्याजाची रक्कम वजा करुन घेणेचा सामनेवाला यांचा अधिकार हे मंच सुरक्षित ठेवत आहे. तसेच तक्रारदाराचे चालू ठेव खाते क्र.40 वरील रक्कम रु.1,78,593/- मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदर रक्कमेवर दि.21/07/2008 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 3.5 टक्के व्याज मिळणेस तक्रारदार पात्र आहेत. सदर रक्कम सामनेवाला क्र. 1 ते 23 व 26 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.24 व 25 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदारास अदा करावी या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब हे मंच खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहे. आदेश 1) तक्रारदाराची तक्रार मंजूर करण्यात येते. 2) सामनेवाला क्र. 1 ते 23 व 26 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.24 व 25 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना ठेव पावती क्र.169710, 169731, 169732, 169733 वरील अनुक्रमेरक्कम रु.3,00,000/-(रु.तीन लाख फक्त), 4,00,000/-(रु.चार लाख फक्त), 4,00,000/-(रु.चार लाख फक्त), 4,00,000/-(रु.चार लाख फक्त) अदा करावी.तसेच सदर रक्कमेवर रक्कम ठेवले तारखेपासून ते मुदत संपले तारखेपर्यंत ठेव पावतीवर नमुद व्याजदराप्रमाणे व्याज अदा करावे व तदनंतर संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.6 टक्के व्याज अदा करावे. सामनेवाला यांनी सदर ठेव पावत्यांवर काही व्याज अदा केले असल्यास सदर व्याजाची रक्कम वजावट करुन घेणेचा सामनेवाला यांचा अधिकार सुरक्षीत ठेवणेत येतो. 3) सामनेवाला क्र. 1 ते 23 व 26 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.24 व 25 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना त्यांचे चालू ठेव खाते क्र.40 वरील शिल्लक रक्कम रु.1,78,593/-(रु.एक लाख अष्टयाहत्तर हजार पाचशे त्रयान्नव फक्त) अदा करावेत. सदर रक्कमेवर दि.21/07/2008 पासून ते संपूर्ण रक्कम अदा होईपर्यंत द.सा.द.शे. 3.5 टक्के व्याज अदा करावे. 4) सामनेवाला क्र. 1 ते 23 व 26 यांनी वैयक्तिकरित्या व संयुक्तिकरित्या व सामनेवाला क्र.24 व 25 यांनी संयुक्तिकरित्या तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चापोटी रक्कम रु.1,000/-(रु.एक हजार फक्त) दयावेत.
| [HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT | |