नि.11 मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सातारा यांचेसमोर
तक्रार क्र. 107/2011 नोंदणी तारीख – 02/08/2011 निकाल तारीख – 19/11/2011 निकाल कालावधी – 109 दिवस श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष श्रीमती सुचेता मलवाडे, सदस्या ( श्री महेंद्र एम गोस्वामी, अध्यक्ष यांनी न्यायनिर्णय पारीत केला) --------------------------------------------------------------------------------
1. श्रीमती. भुजबळ मनिषा बबन, मु.पो. बोरगांव (पाटेश्वरनगर),ता.जि.सातारा जि.प.प्रा.शाळा पाटेश्वरनगर ----- अर्जदार (स्वतः) विरुध्द
1. वर्धमान कलेक्शन,सातारा 108,अ, भवनी पेठ, राजपथ, सातारा ---- विरुध्द पक्षकार (स्वतः) न्यायनिर्णय अर्जदार यांनी प्रस्तुतचा अर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 12 नुसार केलेला आहे. अर्जदार यांचे अर्जातील कथन थोडक्यात खालीलप्रमाणे -
1. अर्जदार हे पाटेश्वरनगर (बोरगाव) येथ राहत असून त्यांनी जाबदार यांचे सातारा येथील साडया विक्रीचे दुकानातून दि.4/4/2011 रोजी रक्कम रु.700/- ची साडी रु.650/- ला खरेदी केली. खरेदी केलेली साडी निकृष्ट दर्जाची असून किंमतीच्या मानाने खराब आहे. साडी खरेदी करताना साडीचा जो लुक व गेटअप होता तो पाण्यात साडी घालताच नाहीसा झालेला आहे तसेच साडीला कसर लागलेली आहे. विरुध्दपक्षकार यांनी खराब साडी देवून फसवणूक केलेली आहे. अर्जदार यांनी खराब साडीबाबत विरुध्दपक्ष दुकानाचे मालकाशी संपर्क साधला असता त्यांनी साडी एक वर्ष वापरल्यानंतर बदलून देवू असे सांगितले. अर्जदारांनी वेळोवेळी साडी बदलून मिळणेसाठी दुकानात हेलपाटे मारले त्यामुळे बोरगाव ते सातारा मारावे लागणारे हेलपाटे गाडीभाडे, रिक्षा भाडे, व होणारा मानसिकत्रास सहन करावा लागला व आर्थिक नुकसानही सहन करावे लागले. त्यामुळे अर्जदार यांनी साडीची किंमत व्याजासहीत आर्थिक व मानसिक त्रासासाठी रक्कम रु.4,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.1,000/- मिळणेसाठी सदरचा तक्रारअर्ज दाखल केला आहे. 2. विरुध्दपक्षकारांनी नि. 8 कडे आपले म्हणणे देवून अर्जदाराची तक्रार नाकारलेली आहे. या विरुध्दपक्षकारांचे कथनानुसार अर्जदार यांनी त्यांच्या पसंतीने व स्वखुषीने साडी खरेदी केली आहे. सदरहू साडी घेताना चेक करुन दिलेली आहे व तसे बिलावर नमूद केले आहे. अर्जदाराने घेतलेली साडी ही आर्ट सिल्क असल्याने त्यांना साडी ड्रायक्लिनिंग करण्यास सांगितले होते. परंतु सदरची साडी अर्जदारांनी घरी धुतली आहे. तसेच त्यांनी साडी कडक उन्हात वाळवली असल्यामुळे तिचा रंग उतरला असेल असे या विरुध्दपक्षकारांचे म्हणणे आहे. तसेच विरुध्दक्षाकाराकडून साडी दि.4/4/2011 रोजी नेल्यानंतर 117 दिवसांनी अर्जदार यांनी तक्रार केली आहे. 117 दिवसात साडी ब-याच वेळा उन्हामध्ये वाळविली असेल असेही त्यांचे म्हणणे आहे. तसेच विरुध्द पक्षकार यांचे दुकानात त्यांनी (कुठल्याही मालाची कसलीही गॅरंटी नाही असे लिहीलेले आहे) त्याचप्रमाणे प्राइज टॅगवरही नो गॅरंटी फॉर एनी गुडस असे म्हटले आहे. सबब अर्जदाराने केलेली तक्रार ही खोटी व लबाडीची आहे. अर्जदार यांनी दुकानात येवून वाटेल तसे बोलून मानसिकत्रास दिल्यामुळे या अर्जदाराची तक्रार रु. 10,000/- खर्चासह फेटाळण्यात यावी असे या विरुध्दपक्षकारांनी मागणी केली आहे. 3. अर्जदार यांनी अर्जाचे सत्यतेसाठी नि. 2 कडे शपथपत्र दाखल केले आहे. अर्जदार दाखल केलेले बील व जोडलेले शपथपत्र पाहीले. तसेच विरुध्दपक्षकार यांचे नि. 8 कडील शपथपत्रासह म्हणणे व नि.9 कडील अर्जदार यांचे रिजॉईंडर पाहीले तसेच उभयपक्षकारांचे एकत्रित युक्तिवाद ऐकला. 4. प्रस्तुत तक्रार प्रकरणाचे व सोबत जोडलेल्या बीलाचे अवलोकन करता, विरुध्द पक्षकार यांनी बिलाचे पाठीमागील बाजूस साडी पांढरी झाल्यास वर्षभरात बदलून देवू असे लिहून दिलेले आहे. तसेच अर्जदारांनी युक्तीवादाचेवेळी मे. मंचासमोर प्रत्यक्ष हजर केली असता साडी खराब झाली असल्याचे निदर्शनास आले. सबब विरुध्द पक्षकार यांनी खराब साडी बदलून खरेदी केलेल्या किंमतीची दुसरी साडी द्यावी या निर्णयाप्रत हा मंच आलेला आहे. त्यामुळे आम्ही तक्रारदाराची तक्रार अंशतः मंजूर करीत असून त्यादृष्टीकोनातून खालील आदेश करीत आहेत. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. 2. विरुध्दपक्षकार यांनी 650/- रुपये किंमतीची दुसरी नवीन साडी अर्जदार यांना बदलून द्यावी. 3. विरुध्द पक्षकार यांनी तक्रारदारास मानसिक व शारिरिक त्रासापोटी व तक्रारअर्जाचे खर्चापोटी एकत्रितपणे रक्कम रु.500/- देण्याचे आदेश पारीत करण्यात येत आहेत. 4. उपरोक्त आदेशाची अंमलबजावणी आदेशाच्या दिनांकापासून 30 दिवसाचे आत करण्यात यावी. 5. सदरचा न्यायनिर्णय खुल्या न्यायमंचात जाहीर करणेत आला. सातारा दि.19/11/2011 (श्री.महेंद्र एम गोस्वामी) (श्रीमती.सुचेता मलवाडे) अध्यक्ष सदस्या
| Smt.Sucheta A. Malwade, MEMBER | HONABLE MR. M.M.GOSWAMI, PRESIDENT | , | |