निकाल
पारीत दिनांकः- 20/04/2012
(द्वारा- श्रीमती अंजली देशमुख, अध्यक्ष)
1] तक्रारदारांच्या सासरे श्री सुधाकर नारायण कुलकर्णी यांनी जाबदेणारांकडे काही रक्कम ठेवलेली होती, त्यांचा मृत्यु दि. 23/8/2004 रोजी झाला. त्यानंतर तक्रारदारांचे पती यांचाही अपघाती मृत्यु झाला. तक्रारदारांनी 2008 साली त्यांच्या सासर्यांनी बँकेत ठेवलेल्या रकमेची पावती श्री प्रथम कोकिळ यांना दिली, तरीसुद्धा जाबदेणारांनी ठेवींची रक्कम त्यांना दिली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी सन 2009 साली पुन्हा जाबदेणारांकडे अर्ज दाखल केला, परंतु अद्यापपर्यंत जाबदेणारांनी त्यांच्या सासर्यांनी ठेवलेली रक्कम त्यांना दिलेली नाही. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, सदरच्या ठेवीची मुदत केव्हाच संपून गेली तरीही बँकेने त्यांच्याशी कोणताच पत्रव्यवहार केलेला नाही. तक्रारदार बँकेमध्ये पावती घेऊन गेल्या असता, त्याची बँकेत कोठेही लेखी नोंद नाही किंवा त्यांना चेक दिल्याचीही कुठे नोंद नाही, त्याचप्रमाणे तक्रारदारांच्या खात्यामध्येही रक्कम दिल्याची कुठेही नोंद नाही. तक्रारदारांचे व्याजासहित एकुण रक्कम रु. 2,00,000/- बँकेमध्ये आहेत, त्याची पावती नाही, परंतु व्याजाची पावती आहे. या सर्वाबद्दल विचारणा केली असता, जाबदेणारांनी त्यांना मुंबईस जाण्याचा सल्ला दिला, सक्सेशन सर्टीफिकिटची मागणी केली आणि उडवाउडवीची उत्तरे दिली. शेवटी गेल्या दहा वर्षांचे रेकॉर्ड नाही, म्हणून रक्कम दिली नाही असे उत्तर तक्रारदारांना देण्यात आले. म्हणून तक्रारदार जाबदेणारांकडून सदरची रक्कम मागतात.
2] तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीच्या पुष्ठ्यर्थ शपथपत्र व कागदपत्रे दाखल केले.
3] जाबदेणारांना नोटीस पाठविली असता, नोटीस मिळूनही ते मंचामध्ये गैरहजर राहिले म्हणून मंचाने त्यांच्याविरुद्ध एकतर्फा आदेश पारीत केला.
5] तक्रारदारांनी दाखल केलेल्या कागदपत्रांची मंचाने पाहणी केली. जाबदेणारांनी दि. 22/9/2008 रोजी त्यांच्या ठेवीदारास पत्र पाठवून त्यांची रक्कम रु. 45,022/- दि. 25/9/2001 रोजी मॅच्युअर झाली आहे आणि 15 दिवसांत जर त्यांनी सदरचे डिपॉजिट रिन्यु केले नाही किंवा घेऊन गेले नाही, तर सदरची रक्कम IEPF क़डे जमा करण्यात येईल असे कळविले. म्हणजेच तक्रार ही मुदतीत आहे. त्यापूर्वीच तक्रारदारांच्या सासर्यांचे सन 2004 मध्ये निधन झाले व त्यांच्या पतीचे सन 2007 मध्ये निधन झाले. म्हणून तक्रारदारास याबद्दलची माहिती असणे अपेक्षित नाही, असे मंचाचे मत आहे. या पत्रानंतर दि. 27/2/2009 रोजी आणि त्याआधी तक्रारदार सासर्यांची पावती घेऊन रक्कम मागण्यासाठी जाबदेणारांकडे गेल्या, परंतु तक्रारदारांनी रक्कम दिली नाही. त्यानंतर तक्रारदारांनी ही रक्कम मागण्यासाठी जाबदेणारांच्या पुणे आणि मुंबईच्या ऑफिसशी अनेकवेळा पत्रव्यवहार केला. परंतु जाबदेणारांनी रक्कम दिली नाही. मंचाच्या मते तक्रारदारांजवळ जर मुळ पावती नसेल तर जाबदेणारांनी योग्य ती कायदेशिर प्रोसिजर अवलंबून तक्रारदारास सदरची रक्कम मिळेल अशी व्यवस्था करावी. तक्रारदार या एका लहान मुलीची आई आहेत, त्यांच्या सासर्यांचे आणि पतीचे निधन झालेले आहे, त्याचप्रमाणे कुटुम्बाची सर्व जबाबदारी त्यांच्यावर आहे, बँकेची प्रोसिजर जर त्यांना माहित नसेल तर जाबदेणार बँकेने त्यांना पूर्ण सहकार्य करावे. त्याचप्रमाणे जाबदेणारांच्या दि. 22/9/2008 रोजीच्या पत्रानुसार जर त्यांनी रक्कम IEPF क़डे जमा केली असेल तर ती काढून त्यांनी तक्रारदारास द्यावी.
6] वरील सर्व विवेचनावरुन व कागदपत्रांवरुन मंच खालील आदेश पारीत करते.
** आदेश **
1. तक्रारदारांची तक्रार अंशत: मंजूर करण्यात येते.
2. जाबदेणारांनी तक्रारदारास त्यांच्या सासर्यांची
जी काही डिपॉजिटची रक्कम असेल ती व्याजासह
तक्रारदारास या आदेशाची प्रत मिळाल्यापासून
चार आठवड्यांच्या द्यावी.
3. निकालाच्या प्रती दोन्ही बाजूंना नि:शुल्क
पाठविण्यात याव्यात.