Final Order / Judgement | ::: नि का ल प ञ ::: (आयोगाचे निर्णयान्वये, सौ. कल्पना जांगडे (कुटे), मा. सदस्या,) (पारीत दिनांक ०८/०२/२०२३ ) - प्रस्तुत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा, २०१९ चे कलम ३५ सह ३८ अन्वये दाखल केली असून तक्रारीचा थोडक्यात आशय खालिलप्रमाणे.
- विरुध्द पक्ष यांचा सोने चांदिचे दागिणे विकण्याचा व मागणीनुसार दागिणे बनवून देण्याचा व्यवसाय आहे. तक्रारकर्ता यांनी दिनांक ४/११/२०२० रोजी विरुध्द पक्ष यांना १० ग्रॅम सोन्याची चेन व २ ग्रॅम सोन्याचे लॉकेट बनविण्यास दिले होते. त्याकरिता विरुध्द पक्ष यांनी घडणावळीच्या दरासह प्रतिग्रॅम ५,१००/- असा दर सांगितला. तक्रारकर्त्याने त्याचेकडे असलेले ५ ग्रॅम सोने विरुध्द पक्षाकडे जमा केले व ७ ग्रॅम सोन्याकरिता विरुध्द पक्षाने रुपये ३५,७००/- आकारले. तेव्हा तक्रारकर्त्याने रक्कम कमी करण्याची विनंती केली असता विरुध्द पक्षाने घडणावळीचा खर्च रुपये १,७००/- कमी करुन रुपये ३४,०००/- मध्ये सोन्याची चेन व लॉकेट बनवून देण्याचे ठरले. त्यानुसार तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे त्यादिवशी रुपये २०,०००/- जमा केले. विरुध्द पक्ष हे दिनांक २४/११/२०२० रोजी सोन्याची चेन व लॉकेट देणार होते परंतु त्यादिवशी तक्रारकर्ता हे विरुध्द पक्षाकडे गेले असता त्यांना चेन व लॉकेट तयार नसल्याने ४ दिवसानंतर येण्यास सांगितले. तक्रारकर्त्याचे घरी पुतण्याचे दिनांक ३०/११/२०२० रोजी लग्न असल्याने त्यांना दागिण्याची आवश्यकता होती त्यामुळे तक्रारकर्त्याने पुन्हा दिनांक २७/११/२०२० रोजी विरुध्द पक्ष यांना १० ग्रॅमची अंगठी बनविण्यास सांगितले असता त्यांनी १० ग्रॅम अंगठीकरिता प्रतिग्रॅम रुपये ५,०४०/- प्रमाणे एकूण रक्कम रुपये ५०,४००/- आकारले. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडे रुपये ४०,०००/- जमा केले असता विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास दिनांक २८/११/२०२० रोजी दागिणे घेऊन जाण्यास सांगितले असता त्यादिवशी तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाकडे उर्वरित रक्कम घेऊन दागिणे घेण्यास गेले असता पुन्हा ३ ते ४ दिवसाने येण्यास सांगितले. विरुध्द पक्ष यांनी दिलेल्या तारखेस सोन्याचे दागिणे न दिल्याने तक्रारकर्त्यास पुतण्याचे लग्नात ते वापरता आले नाही. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास लग्नानंतर सुध्दा दागिणे दिले नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास वारंवार मागणी केल्यानंतर तिच्या मुलाने एका आठवड्यात रक्कम रुपये ८५,०००/- पैकी रुपये ४०,०००/- परत देण्याची हमी दिली व रक्कम विहीत मुदतीत न दिल्यास तिच्या मुलाने दिनांक १९/०१/२०२१ रोजी अॅक्सीस बॅंकेच्या खात्याचा रुपये ४०,०००/- चा धनादेश क्रमांक ०१४१०७ तक्रारकर्त्यास देऊन त्याचेकडून दिनांक २७/११/२०२० चे देयक परत घेतले परंतु दिलेल्या मुदतीत रक्कम देण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारकर्त्याने उपरोक्त धनादेश वटविण्याकरिता त्याचे भारतीय स्टेट बॅंकेत असलेल्या खात्यात टाकला असता तो अपूर्ण रक्कम या शे-यासह अनादरीत होऊन परत आल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना सांगितले असता त्यांनी रुपये ६०,०००/- व ५ ग्रॅम सोन्याची रक्कम रुपये २५,०००/- परत करण्याचे आश्वासन दिले व तक्रारकर्त्याच्या मुलाने परत अनुक्रमे दिनांक २६/०६/२०२१ व दिनांक १/७/२०२१ रोजीचे दोन धनादेश क्रमांक ०१४१६७ व ०१४१६८ रक्कम रुपये ४०,०००/- व रुपये ४५,०००/- सही करुन तक्रारकर्त्यास दिले. तक्रारकर्त्याने त्याचे खात्यात उपरोक्त दोन्ही धनादेश वटविण्याकरिता दिले असता दिनांक २३/०७/२०२१ रोजी खातेबंद अशा शे-यासह धनादेश अनादरीत होऊन बॅंकेत परत आले. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास जाब विचारला असता त्यांनी तक्रारकर्त्यास फक्त रुपये २७,०००/- परत दिले व उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ करीत होते त्यामुळे तक्रारकर्त्याने अधिवक्ता योगेश इटनकर यांचे मार्फत विरुध्द पक्षास नोटीस पाठविला. त्यास विरुध्द पक्षाने अधिवक्ता श्री कुल्लरवार यांचे मार्फत खोटे उत्तर दिले. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास दागिणे दिले नाही तसेच रक्कमही परत न करुन तक्रारकर्त्याप्रति न्युनतापूर्ण सेवा दिल्याने तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाविरुध्द आयोगासमक्ष तक्रार दाखल करुन त्यामध्ये अशी मागणी केली आहे की विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास रक्कम रुपये ५८,०००/- व त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये ३५,०००/- द्यावे अशी प्रार्थना केली.
- तक्रारकर्त्याची तक्रार दाखल करुन विरुध्द पक्षास आयोगामार्फत नोटीस काढण्यात आली. विरुध्द पक्ष हजर होऊन त्यांनी आपले लेखी उत्तर दाखल करुन त्यामध्ये विरुध्द पक्ष यांचा सोने चांदिचे दाग-दागिणे विकण्याचा व ग्राहकांच्या मागणीनुसार दागिणे घडवून देण्याचा व्यवसाय आहे, ही बाब मान्य करुन तक्रारकर्त्याचे तक्रारीतील उर्वरित कथन अमान्य केले व पुढे नमूद केले की, तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष यांचेकडून रुपये २७,०००/-घेणे बाकी होते व विरुध्द पक्ष यांनी रक्कम रुपये २७,०००/- तक्रारकर्त्यास दिले आहेत, ही बाब तक्रारकर्त्याने नोटीस तसेच तक्रारीमध्ये मान्य केलेली आहे व रुपये २७,०००/- मिळाल्यानंतर तक्रारकर्त्यास विरुध्द पक्ष यांचेकडून कोणतीही रक्कम घेणे बाकी नाही अथवा सोने सुध्दा घेणे बाकी नाही. विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याने पाठविलेल्या नोटीसला अधिवक्ता श्री कुल्लरवार यांचे मार्फत उत्तर नोटीस पाठवून खरी व सत्य परिस्थिती स्पष्ट केली. तक्रारकर्त्याची मागणी ही रक्कम वसुली करिता ला आहे व रक्कम वसुलीकरिता चा वाद ग्राहक न्यायालयात होऊ शकणार नाही. सबब तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
- तक्रारकर्तीने दाखल केलेली तक्रार, दस्तावेज, शपथपञ आणि तक्रारकर्तीची तक्रार व शपथपञ यालाच लेखी युक्तिवाद समजण्यात यावे अशी पुरसीस दाखल, विरुध्द पक्ष यांचे लेखी उत्तर, शपथपञ व लेखी कथन व शपथपञ यातील मजकुरालाच विरुध्द पक्षाचे लेखी युक्तिवाद समजण्यात यावे अशी पुरसीस तसेच उभयपक्षांचा तोंडी युक्तिवाद आणि परस्पर विरोधी कथनावरुन खालिल मुद्दे आयोगाच्या विचारार्थ घेण्यात आले व त्याबाबतची कारणमीमांसा आणि निष्कर्ष पुढीलप्रमाणे.
कारणमीमांसा - तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांचेकडून दिनांक ४/११/२०२० रोजी सोन्याचे लॉकेट व चेन बनविण्याकरिता दिले व तेव्हा रक्कम रुपये ३४,०००/- जमा केले. त्यानंतर दिनांक २७/११/२०२० रोजी सोन्याची अंगठी बनविण्याकरिता दिली. त्याबाबत विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दोन पावत्या दिल्या. सदर पावत्या तक्रारकर्त्याने प्रकरणात दाखल केल्या आहेत. यावरुन तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाचा ग्राहक आहे, हे सिध्द होते. प्रस्तुत तक्रारीत तक्रारकर्त्याने विरुध्द पक्ष यांना उपरोक्त दागिणे बनविण्यास दिले असता त्यांनी काही रक्कम घेऊनही दिलेल्या तारखेस दागिणे बनवून दिले नाही. तसेच संपूर्ण रक्कम व जमा केलेले सोने सुध्दा परत न करता फक्त रुपये २७,०००/- तक्रारकर्त्यास दिले, याबाबत उभयपक्षात वाद आहे. तक्रारीत दाखल दस्तऐवजांचे अवलोकन केले असता असे निदर्शनास येते की, तक्रारकर्त्याने दिनांक ४/११/२०२० रोजी विरुध्द पक्षाकडे १० ग्रॅम सोन्याची चेन व २ ग्रॅम सोन्याचे लॉकेट बनविण्यास दिले तसेच त्याकरिता विरुध्द पक्षाकडे ५ ग्रॅम सोने जमा केले असता विरुध्द पक्षाने घडणावळीसह प्रति ग्रॅम रुपये ५,१००/- या दरानुसार रक्कम रुपये ३५,७००/- सांगितले व त्यामधून रुपये १,७००/- कमी करुन एकूण रक्कम रुपये ३४,०००/- मध्ये चेन व लॉकेट बनवून देण्याचे ठरले आणि तक्रारकर्त्याने रुपये ३४,०००/- पैकी रुपये २०,०००/- विरुध्द पक्षाकडे दिनांक ४/११/२०२० रोजीच जमा केले व दागिणे देण्याची दिनांक २४/११/२०२० पावतीवर नमूद केले. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास नमूद तारखेस दागिणे बनवून न दिल्याने मुदत वाढवून दिली. त्यानंतर दिनांक २७/११/२०२० रोजी तक्रारकर्त्याने परत विरुध्द पक्षाकडे १० ग्रॅम सोन्याची अंगठी बनविण्याकरिता दिली. त्याकरिता विरुध्द पक्षाने प्रती ग्रॅम ५,०४०/- दरानुसार रुपये ५०,४००/- सांगितले. त्याबाबत तक्रारकर्त्याने रुपये ४०,०००/- विरुध्द पक्षाकडे जमा केले व सोन्याची अंगठी देण्याची दिनांक २८/११/२०२० रोजी पावतीवर नमूद आहे. परंतु विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास दिलेल्या दोन्ही पावतीमध्ये नमूद तारखेला दागिणे बनवून दिले नाही तसेच रक्कम सुध्दा परत केली नाही. तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षास रक्कम मागीतली असता तिने दिनांक १९/१/२०२१ रोजी रक्कम रुपये ४०,०००/- चा धनादेश क्रमांक ०१४१०७ तक्रारकर्त्यास दिले परंतु सदर धनादेश ‘अपूर्ण निधी’ म्हणून परत आला. त्यानंतर तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे परत रकमेची मागणी केली असता त्यांनी अनुक्रमे दिनांक २६/६/२०२१ रोजी रुपये ४०,०००/- व दिनांक १०/०७/२०२१ रोजी रुपये ४५,०००/- चे दोन धनादेश तक्रारकर्त्यास दिले परंतु दोन्ही धनादेश तक्रारकर्त्याने त्याच्या एस.बी.आय. मध्ये असलेल्या खात्यामध्ये जमा केले असता तो खाता ‘बंद ’ या शे-यासह न वटविता परत आले. विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास फक्त रुपये २७,०००/- दिले होते, ही बाब तक्रारकर्त्याने मान्य केली आहे. परंतु तक्रारीत दाखल दोन्ही पावतीवरुन तक्रारकर्त्याने विरुध्द पक्षाकडे दागिणे बनविण्याकरिता सुरवातीला रुपये २०,०००/- व नंतर रुपये ४०,०००/- असे एकूण रक्कम रुपये ६०,०००/- जमा केले होते व दागिणे बनवितांना तक्रारकर्त्याने त्यांच्याकडील ५ ग्रॅम सोने विरुध्द पक्षाकडे जमा केले होते, ही बाब दिनांक ४/११/२०२० चे पावतीवरुन स्पष्ट होते. याबाबत तक्रारकर्त्याने पावत्या व शपथपञ दाखल केले. दिनांक ४/११/२०२० ची पावती विरुध्द पक्षाची नव्हती वा त्यांनी दिली नाही ही बाब कोणताही दस्तावेज/पुराव्यासह खोडून काढली नाही त्यामुळे तक्रारकर्त्याचे कथन ग्राह्य धरणे योग्य आहे. तक्रारकर्त्याने जेव्हा विरुध्द पक्षाकडे जमा केलेली रक्कम रुपये ६०,०००/- व जमा केलेले सोने परत मागीतले असता त्यांनी ५ ग्रॅम सोन्याची रक्कम रुपये २५,०००/- अशी एकूण रक्कम रुपये ८५,०००/- तक्रारकर्त्यास देण्याकरिता त्या अनुषंगाने विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास रुपये ४०,०००/- व रुपये ४५,०००/- चे दोन उपरोक्त धनादेश दिल्याचे स्पष्ट होते व हे दोन्ही धनादेश हे वटविल्या गेले नाही त्यामुळे विरुध्द पक्ष हा तक्रारकर्त्यास रक्कम देणे लागत होता त्यापैकी विरुध्द पक्षाने तक्रारकर्त्यास फक्त रक्कम रुपये २७,०००/- परत दिले परंतु उर्वरित रक्कम रुपये ५८,०००/- मागणी करुनही परत न करुन तक्रारकत्याप्रती न्युनतापूर्ण सेवा दिल्याचे स्पष्ट होते, या निष्कर्षाप्रत आयोग आले आहे. त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्द पक्षाकडून उर्वरित रक्कम रुपये ५८,०००/- आणि शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम आणि तक्रारीचा खर्च मिळण्यास पाञ आहे. सबब आयोग खालिलप्रमाणे आदेश पारित करीत आहे.
अंतिम आदेश - तक्रारकर्त्याची तक्रार क्र. ०३/२०२२ अंशतः मंजूर करण्यात येते.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्यास उर्वरित रक्कम रुपये ५८,०००/- परत द्यावे.
- विरुध्द पक्ष यांनी तक्रारकर्त्याला झालेल्या शारीरिक व मानसिक ञासापोटी नुकसान भरपाई रक्कम रुपये ५,०००/- व तक्रारीचा खर्च रुपये ५,०००/- द्यावे.
- उभयपक्षांना आदेशाची प्रत विनामुल्य देण्यात यावेत.
| |