तक्रारदारातर्फे – वकील – सी. एन. वीर.
सामनेवालेतर्फे – वकिल – एल. एम. काकडे.
सामनेवाले 2 तर्फे – एस. के. राऊत.
।। निकालपत्र ।।
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ही ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार हा सारणी ता. केज जि. बीड येथील रहिवाशी असून शेती व मजुरी करुन उपजिविका भागवतो. तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 एजन्सीकडून उपजिविका भागवण्यासाठी अपेरिक्षा घेतला आहे. तसेच हा रिक्षा घेण्यासाठी सामनेवाले नं. 2 कडून कर्ज घेतलेले आहे. सामनेवाले नं. 1 यांची सामनेवाले नं. 2 यांनी कर्ज वाटप करण्यासाठी प्रतिनिधी म्हणून नियुक्ती केलेली आहे.
तारीख 12/09/2006 रोजी अँपेरिक्षा क्र. एम.एच. 44 सी.5756 साठी रु. 1,16,000/- कर्ज मंजूर केले होते व तक्रारदाराने या कर्जापोटी सामनेवालेकडे रुपये 25,000/- डाऊन पेमेंट भरले आहे. सामनेवाले नं. 1 यांना रक्कम देतांना सामनेवाले नं. 2 ने गाडीच्या रक्कमेपोटी रु. 1,02,380/- चेकने दिले. म्हणजे सामनेवाले नं. 1 यांना 750/- रुपये सामनेवाले नं. 2 ने कमी दिले. परंतू तक्रारदारावर रक्कम रुपये 1,16,000/- चे कर्ज टाकण्यात आले व या कर्जाची परतफेड रु. 4,290/- प्रती महिना या प्रमाणे पुढील 33 महिने मुदतीमध्ये फेडण्याचे ठरले होते. पण गाडी घेताना तक्रारदाराचे तीन हप्ते रु. 12,870/- अगाऊ घेऊन उर्वरीत 33 हप्त्यामध्ये त्यास रु. 4,290/- प्रमाणे रक्कम डिलर सामनेवाले नं. 1 कडे भरण्याचे दि. 12/9/2009 रोजी निर्देश दिले व अगाऊ तीन हप्त्याची लोन प्रप्रोजल फॉर्मवर नोंद सामनेवालेंनी घेतली आहे.
सामनेवाले नं. 2 ने कर्ज वाटण्याचे, वाहन देण्याचे व कर्ज वसुल करण्याचे, पावती देण्याचे पूर्ण अधिकार सामनेवाले नं. 1 ला दिल्यामुळे व हप्ते सामनेवाले नं. 1 चे कडे भरणा करण्याचे निर्देश दिल्यामुळे तक्रारदार हा सामनेवाले नं. 1 यांचेकडे कर्जाचे हप्ते भरत असे व कर्जाचे हप्ते भरणा केल्यानंतर सामनेवाले नं. 1 हा सामनेवाले नं. 2 च्या नावाची जमा रशीद देऊन पोहच पावती ग्राहकांना देत असे. तशा पावत्या तक्रारदारास सामनेवाले यांनी दिलेल्या आहेत.
तक्रारदाराने कर्जाचे संपूर्ण हप्ते वेळेवर भरले असून रु. 4,290/- गुणिले 18 हप्ते नगदी सामनेवाले नं. 1 कडे भरले आहेत. तसेच रु. 4,290/- गुणिले 13 हप्ते डी. डी.ने सामनेवाले नं. 2 कडे भरले आहेत व शेवटचे 2 हप्ते भरुन एन. ओ. सी. घेण्याच्या विचाराने तक्रारदार हा दि. 14/07/2009 रोजी पुणे येथे गेला व त्याने उर्वरीत 2 हप्ते नगदी भरले व काडीचे कागदपत्रांची मागणी केली असता सामनेवाले नं. 2 त्यास म्हणाले की, आणखी 4 हप्ते तुमचेकडे बाकी आहेत. सदर बाकी बद्दल त्यास ता. 24/7/2009 रोजी पत्र दिले. त्यावेळी तक्रारदाराने सामनेवाले नं. 2 यास सांगितले की, मी संपूर्ण कर्जाचे हप्ते तुमचा प्रतीनिधी सामनेवाले नं. 1 कडे तारीख 12/9/2006 रोजी दिलेल्या पत्राप्रमाणे हप्ते भरलेले असल्याचे तक्रारदाराने सांगितले. मात्र सामनेवाले नं. 2 ने सामनेवाले नं. 1 कडे भरलेल्या हप्त्यापैकी 4 हप्ते दिनांक 31/12/2007 पावती क्र. 3737, दि. 22/1/2008 पावती क्र. 3781, दि. 25/2/08 पावती क्रं. 3840, व दि. 28/3/08 पावती क्र. 3901 प्रत्येकी रु. 4,290/- प्रमाणे भरलेल्या 4 पावत्यांची रक्कम सामनेवाले नं. 2 यांना सामनेवाले नं. 1 ने पाठवली नसल्याचे सामनेवाले नं. 2 ने कळविले. सदरची रक्कम सामनेवाले नं. 1 कडून परत घेवून डी.डी. ने पाठवा असा सल्ला सामनेवाले नं. 2 ने तक्रारदारास दिला.
भरलेले हप्ते जमा झालेले नसल्याचे कळाल्यावर तक्रारदाराने चार वेळा सामनेवाले नं. 1 कडे जाऊन गाडीची एन.ओ.सी. मागितली पण त्याने त्याचे म्हणण्याकडे टाळाटाळ केली. त्यानंतर तक्रारदाराने पुणे येथे जाऊन सामनेवाले नं. 2 ची भेट घेउन एन.ओ.सी. मागितली पण त्यांनी एन.ओ.सी. दिली नाही. परिणामी तक्रारदाराने सामनेवालेकडे 33 हप्ते नगरी व डी.डी.ने भरलेले आहेत.
तक्रारदाराने सामनेवाले नं. 2 चे निर्देशाप्रमाणे सामनेवाले नं. 1 कडे संपूर्ण रक्कम भरलेली आहे व ज्या पावती बुकामधील रक्कम सामनेवाले 2 कडे सामनेवाले नं. 1 ने पाठवली आहे त्याच पावती बुकातील इतर चार पावत्या 4,290/- चे चार हप्ते सामनेवाले नं. 1 कडे भरले आहेत. पण सामनेवाले नं. 1 ने क्रं. 2 कडे रक्कम भरली नसल्यामुळे तक्रारदारास सामनेवाले नं. 2 ने गाडीची एनओसी दिली नाही, म्हणून दोघांनीही तक्रारदारास सेवा देण्यास कसूर केला आहे.
तारीख 05/12/2009 रोजी वकिलामार्फत तक्रारदारास नोटीस दिली की तुमच्याकडे 54,700/- बाकी आहे व ही रक्कम 7 दिवसाचे आत भरण्याचे आदेश दिले. याउलट सामनेवाले नं. 2 ने दि. 24/7/2009 रोजी पत्र दिले आहे की, तुमच्याकडे रु. 4,290/- प्रमाणे 4 हप्ते बाकी आहेत. त्यामुळे या दोन्हीही नोटीस मधील रक्कम कोठेही जुळत नाही.
तक्रारार 4 वेळा पुणे येथे गेला असल्यामुळे त्याचा 10,000/- रुपये खर्च झालेला आहे. तसेच त्याला पॅसेंजर रिक्षापासून मिळणारे रु.1500/- प्रतीदिन प्रमाणे रु. 6,000/- उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे मानसिक त्रासापोटी रु. 15,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु. 5,000/- नुकसान भरपाई मागण्यास तक्रारदार हक्कदार झालेला आहे.
विनंती की, तक्रारदाराने भरलेली डाऊन पेमेंटची रक्कम रु. 25,000/-, सुरुवातीस अतिरिक्त भरलेली तीन हप्त्याची रक्कम रु. 12,870/-, पुणे येथे जाण्यासाठी झालेला खर्च रु. 10,000/-, मानसिक त्रासापोटी रु. 15,000/-, तक्रारीचा खर्च रु. 5,000/- नुकसान भरपाई देण्याबाबत सामनेवालेंना आदेश व्हावा. अपेरिक्षा क्रं. एमएच-44-5756 या गाडीची एनओसी देण्याचा आदेश सामनेवालेंना व्हावा.
सामनेवाले नं. 1 यांनी त्यांचा खुलासा ता. 12/08/2010 रोजी दाखल केला. सामनेवालेंनी तक्रारीतील त्यांचे विरुध्दचे सर्व आक्षेप नाकारलेले आहेत. तारीख 31/05/2006 रोजी तक्रारदाराने या सामनेवालेकडून आपेरिक्षा खरेदी केली व त्याबद्दल रक्कम रु. 35,500/- जमा केले व उर्वरीत रक्कम सामनेवाले नं. 2 कडून कर्ज म्हणून तक्रारदाराने घेतली आहे. त्याची परतफेड एकूण 33 हप्त्यात, दरमहा रु. 4,450/- प्रमाणे परत करावयाचे सांगितले होते. तक्रारीत नमूद केलेला ठराव या सामनेवाले समक्ष कधीही व केव्हाही झालेला नाही. सामनेवाले नं. 2 चा सामनेवाले नं. 1 शी कोणत्याही प्रकारचा अथाअर्थी संबंध नाही. केवळ या सामनेवालेस पक्षकार करण्यासाठी व जाणूनबुजून खर्चात टाकण्यासाठी तक्रारीत खोटे काल्पनिक आक्षेप तक्रारदाराने घेतलेले आहेत. सामनेवाले नं. 1 कडे हप्त्याची रक्कम जमा करण्याचा व सदरची रक्कम सामनेवाले नं. 2 कडे जमा करण्याचा प्रश्नच येत नाही. या सामनेवालेकडे तक्रारदाराने रक्कमा जमा केलेल्या नाहीत व पावत्या देखील दिलेल्या नाहीत.
वस्तुस्थिती अशी आहे की, तक्रारदारास आपेरिक्षाची गरज असल्याने सामनेवाले नं. 1 कडे आपेरिक्षाची तक्रारदाराने मागणी केली. सामनेवालेने आपेरिक्षाची रोख किंमत रु. 1,47,500/- सांगितलेली होती. त्यामध्ये गाडी अधिक टॅक्स अधिक इन्शुरन्स इत्यादी काढण्याचेही सांगितलेले होते. एवढी रक्कम तक्रारदाराकडे उपलब्ध नसल्याने, कर्जाऊ रक्कमेवर गाडी विकत घेण्याची तक्रारदाराने सहमती दर्शविली. त्यावेळी सामनेवाले नं. 2 कडे कर्जाऊ रक्कम मिळते, परंतू त्यांचा व या सामनेवाले नं. 1 चा कोणताही आर्थिक संबंध नाही. केवळ सामनेवाले नं. 2 हे सामनेवाले नं. 1 चे शोरुममध्ये खुर्ची व टेबल टाकून बसत होते. तसेच इतरही कंपनीचे फायनान्सर कर्जाऊ रक्कम देण्यासाठी बसत होते. त्यांचा आणि सामनेवालेचा कोणताही दुरान्वये संबंध येत नव्हता. तक्रारदाराच्या कर्ज रक्कमेबदल व कराराबद्दल माहिती नाही. कर्ज प्रकरणात ठराव सामनेवाले नं. 1 मार्फत किंवा समक्ष केव्हाही झालेला नाही. तक्रारदाराने कर्ज रक्कमेचा हप्ता कधीही या सामनेवालेकडे जमा केलेला नाही. या सामनेवालेस आर्थिक, मानसिक शारिरीक त्रास देण्याच्या हेतुने तक्रारीत सामनेवाले करण्यात आलेले आहे, त्यामुळे हे सामनेवाले तक्रारदाराकडून खर्चाची रक्कम रु. 10,000/- मागण्यास हक्कदार झालेले आहेत.
विनंती की, तक्रार खर्चासह नामंजूर करण्यात यावी व या सामनेवालेंना खर्चाची रक्कम रु. 10,000/- देण्याबाबत आदेश व्हावा.
सामनेवाले नं. 2 यांनी त्यांचा खुलासा तारीख 28/06/2010 रोजी दाखल केला. तक्रारीतील त्यांचे विरुध्दचे सर्व आक्षेप सामनेवालेने नाकारलेले आहेत. तक्रारदाराने अँपेरिक्षासाठी सामनेवाले नं. 2 कडून कर्ज घेवून सामनेवाले नं. 1 कडून रिक्षा विकत घेतलेली आहे व सदर कर्जाची परतफेड 33 हप्त्यात दरमहा रु. 4,290/- प्रमाणे करावयाची होती. तक्रारदाराने दरमहा तीन हप्ते भरलेले नाहीत त्यामुळे सदर हप्त्याची रक्कम रु. 12,870/- व त्यावरील देय होणारे व्याजाची रक्कम रु. 54,770/- जी रक्कम तक्रारदाराकडे घेणे निघत आहे, त्यामुळे तक्रारदार थकबाकीदार झाला आहे. तक्रारदाराने कर्जाची रक्कम पूर्ण फेडल्याशिवाय तक्रारदारांना नाहरकत प्रमाणपत्र किंवा गाडीची मुळ कागदपत्रे देता येणार नाहीत. याबाबत सामनेवालेने तक्रारदारांना तारीख 03/12/2010 रोजी नोटीस दिलेली आहे. तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत सामनेवालेने कोणताही कसूर केलेला नाही. तक्रारदार स्वत: थकबाकीदार आहे, त्यामुळे त्यांना सदरची तक्रार करण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही.
तक्रारदार आणि सामनेवाले यांच्यातील व्यवहार हा पूणे येथे झालेला असल्याने सदरची तक्रार ही न्याय मंचाच्या अधिकार क्षेत्रात येत नाही. तक्रार खर्चासह रद्द करण्यात यावी व सामनेवालेंना रक्कम रु. 50,000/- खर्चाचे देण्याबाबत तक्रारदारांना आदेश व्हावा.
न्याय निर्णयासाठी मुद्दे उत्तरे
1. तक्रारदाराने अँपेरिक्षासाठी घेतलेली रक्कम
पूर्ण परतफेड होवूनही सामनेवालेने या
तक्रारदारांना नाहरकत प्रमाणपत्र न देवून
दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब
तक्रारदाराने सिध्द केली काय ? होय.
2. तक्रारदार दाद मिळण्यास पात्र आहे काय ? होय.
3. अंतिम आदेश ? निकालाप्रमाणे.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे, तक्रारदाराचे शपथपत्र, सामनेवाले 1 व 2 यांचा खुलासा, शपथपत्र, दाखल कागदपत्रे यांचे सखोल वाचन केले. तक्रारदाराचे विद्वान अँड. वीर यांचा युक्तिवाद ऐकला. सामनेवाले नं. 1 चे विद्वान अँड. काकडे व सामनेवाले नं. 2 चे विद्वान अँड. राऊत यांचा युक्तिवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 कडून आपेरिक्षा विकत घेतलेली आहे व त्यासाठी सामनेवाले नं. 1 मार्फत सामनेवाले नं. 2 कडून कर्ज घेतलेले आहे व सदर कर्जाची पूर्ण परतफेड करुनही सामनेवाले यांनी तक्रारदारांना नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही, अशी तक्रारदाराची प्रमुख तक्रार आहे. सामनेवाले नं. 1 यांनी त्यांच्याकडून तक्रारदाराने आपेरिक्षा विकत घेतल्याची बाब मान्य केलेली आहे परंतू सदर रिक्षासाठी सामनेवाले नं. 1 मार्फत सामनेवाले नं. 2 कडून तक्रारदाराने कर्ज घेतल्याची बाब सामनेवाले नं. 1 ने नाकारली आहे. सामनेवाले नं. 2 कडून घेतलेल्या कर्जाने रिक्षा विकत घेतल्याची बाब सामनेवाले नं. 1 यांना मान्य आहे परंतू यात सामनेवाले नं. 1 व 2 यांचा काडीमात्र संबंध नाही.
सामनेवाले नं. 2 यांनी कर्ज दिल्याची बाब मान्य केलेली आहे व कर्ज परतफेड ही झालेली आहे. तथापि, एकूण फेडलेल्या 33 हप्त्यापैकी शेवटचे 4 हप्ते तक्रारदाराकडून किंवा सामनेवाले नं. 1 कडून सामनेवाले नं. 2 कडे जमा झालेले नसल्याने सामनेवाले नं. 2 यांनी तक्रारदारांना नाहरकत प्रमाणपत्र दिलेले नाही. सामनेवाले नं. 2 च्या दप्तरात तक्रारदार हे आजही थकबाकीदार आहेत.
तक्रारीतील कागदपत्रे पाहता तक्रारदाराने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे 18 हप्ते सामनेवाले नं. 1 कडे व 13 हप्ते सामनेवाले नं. 2 कडे भरलेले आहेत व शेवटचे 2 हप्ते पुणे येथे भरलेले आहेत. अशा त-हेने तक्रारदाराने 33 हप्त्याची परतफेड केलेली आहे. तसेच सामनेवाले नं. 2 चे तक्रारदाराकडे थकीत असलेले 4 हप्ते तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 कडे भरलेले आहेत व त्याबाबत सामनेवाले नं. 1 ने तक्रारदारांना पावत्याही दिलेल्या आहेत, परंतू सदरचे हप्ते हे सामनेवाले नं. 1 कडून सामनेवाले नं. 2 कडे जमा न झाल्याने ते थकीत दिसत आहेत व त्यावर सामनेवाले नं. 2 यांची व्याज आकारणी चालू आहे. यासंदर्भात तक्रारदाराने सामनेवाले नं. 2 यांना नोटीसीद्वारे कळविलेले आहे व संपूर्ण हप्ते भरल्याच्या पावत्या सामनेवाले नं. 2 यांना दाखविलेल्या आहेत. यासंदर्भात सामनेवाले नं. 2 यांची कोणतीही कर्ज रक्कम तक्रारदाराकडे दाखल कागदपत्रांवरुन थकीत असल्याचे दिसत नाही. केवळ सामनेवाले नं. 1 यांनी खुलाशात नमूद 4 हप्ते सामनेवाले नं. 2 कडे तक्रारदाराने वेळेवरती हप्ते भरुन जमा न केल्याने सदरचे हप्ते थकबाकी दिसत आहेत.
यासंदर्भात सामनेवाले नं. 1 यांचा सामनेवाले नं. 2 च्या कर्जास किंवा कर्ज व्यवहारास कुठलाही संबंध नाही असा बचाव घेतलेला आहे, तथापि, तक्रारीत दाखल असलेल्या पावत्यावरुन सदरच्या हप्त्याचे पैसे हे तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 कडे जमा केलेले आहेत व त्यावरुन सामनेवाले नं. 1 ने सामनेवाले नं. 2 च्या कर्जापोटी हप्ता जमा केल्याच्या व्ही.ए.ए. एजन्सी या नावाच्या व नंबरच्या पावत्या दिलेल्या आहेत. त्यावरुन सामनेवाले नं. 1 आता जरी सदर कर्ज व्यवहाराशी संबंध नसल्याचे म्हणत असले तरी सदरच्या पावत्या या सामनेवाले नं. 1 च्या आहेत, त्यामुळे सामनेवाले नं. 1 चे वरील विधान या ठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही, असे न्याय मंचाचे मत आहे. सामनेवाले नं. 1 कडे कर्ज रक्कम जमा करण्याबाबत दिलेल्या सामनेवाले नं. 2 चे तारीख 13/6/2007 चे पत्रावरुन स्पष्ट होते. त्यामुळे सदरच्या पावत्या या तक्रारदाराने सामनेवाले नं. 1 कडे हप्ता जमा केल्याच्या पावत्या आहेत. सामनेवाले नं. 1 यांनी हप्ते जमा करुन घेवूनही सामनेवाले नं. 2 कडे रक्कम पाठवलेली नाही. यात तक्रारदाराचा कोणताही दोष दिसत नाही. रक्कम स्विकारुन ती जमा करण्याची बाब ही सामनेवाले नं. 1 व 2 यांच्यातील अंतर्गत व्यवहाराची बाब आहे. त्या व्यवहाराचा संबंध सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदाराशी जोडणे योग्य होणार नाही. सामनेवाले नं. 1 यांनी रक्कम स्विकारल्यानंतर ती रक्कम सामनेवाले नं. 2 कडे भरण्याची जबाबदारी सामनेवाले नं. 1 ची आहे, त्यामुळे सामनेवाले नं. 1 व 2 यांनी यांनी तक्रारदाराचे कर्जखाती व्यवहाराची नोंद न घेतल्याने तक्रारदाराकडे 4 हप्त्याची थकबाकी दिसत आहे. यात तक्रारदाराचा कोणताही दोष नाही. त्यामुळे तक्रारदाराने सर्व हप्ते वेळेवरती भरुन देखील तक्रारदारांना नाहरकत दाखला न मिळाल्याने सामनेवाले नं. 1 व 2 यांनी तक्रारदारांना दयावयाच्या सेवेत कसूर केल्याची बाब स्पष्ट होते, असे न्याय मंचाचे मत आहे.
सामनेवाले नं. 2 यांनी सामनेवाले नं. 1 कडून सदर रक्कम जमा करुन घेण्याची जबाबदारी सामनेवाले नं. 1 बरोबर सामनेवाले नं. 2 चीही आहे. यात तक्रारदाराचा कसलाही संबंध येत नाही व थकीत कर्ज रक्कमेसाठी सामनेवाले नं. 2 हे तक्रारदाराचा नाहरकत दाखला अडवून शकत नाहीत. सामनेवाले नं. 2 यांनी तक्रारदारांना नाहरकत दाखला देणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
कर्ज परतफेड होवूनही नाहरकत दाखला न मिळाल्याने निश्चितच तक्रारदारांना मानसिक त्रास झालेला आहे, त्यामुळे सामनेवाले नं. 1 व 2 तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम प्रत्येकी रु. 3,000/- व तक्रारीच्या खर्चाची रक्कम प्रत्येकी रु. 2,000/- देणे उचित होईल, असे न्याय मंचाचे मत आहे.
सबब, न्याय मंच खालील प्रमाणे आदेश देत आहे.
आ दे श
1. सामनेवाले नं. 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना आपेरिक्षा क्रमांक एमएच-44 सी-5756 चे नाहरकत प्रमाणपत्र आदेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत दयावे.
2. सामनेवाले नं. 1 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजर फक्त) आदेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत अदा करावेत.
3. सामनेवाले नं. 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी तक्रारदारांना मानसिक त्रासाची रक्कम रु. 3,000/- (अक्षरी रुपये तीन हजार फक्त) व तक्रारीच्या खर्चाची रक्कम रु. 2,000/- (अक्षरी रुपये दोन हजार फक्त) आदेश मिळाल्यापासून एक महिन्याच्या आत अदा करावी.
4. सामनेवाले नं. 1 व 2 यांना आदेश देण्यात येतो की, त्यांनी वरील रक्कमा विहीत मुदतीत अदा न केल्यास त्यावर द.सा.द.शे. 9 टक्के प्रमाणे व्याज देण्यास ते जबाबदार राहतील.
5. ग्राहक संरक्षण कायदा 1986 अधिनियम 2005 मधील कलम 20 (3) प्रमाणे
तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदारांला परत करावेत.
(सौ.एम.एस.विश्वरुपे) ( पी.बी.भट )
सदस्या, अध्यक्ष,
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, बीड जि.बीड
चुनडे/स्टेनो