Complaint Case No. CC/16/129 |
| | 1. Prem Krupaldas Ahuja | R/o. Behind Baba Hardasram Bhavan, Sindhi Camp, Gandhi Nagar, Akola | Akola | Maharashtra |
| ...........Complainant(s) | |
Versus | 1. Vaibhav Laxmi Mobile Through Its Proprietor/Manager, Jalgaon | E-154,Ground Floor, Golani Market, Jalgaon | Jalgaon | Maharashtra | 2. Lenovo India Pvt. Ltd, Bangalor | Ferns Icon, Level2 Diddenakundi Village, Marathahalli Outer Ring Road, K.R.Puram Hobli, Bangalore | Bangalore | Karnataka | 3. Mobile Touch Through its Proprietor/ Manager Akola | Shop No.13, Padia Complex, Tower Square, Station Road Akola | Akola | Maharashtra |
| ............Opp.Party(s) |
|
|
Final Order / Judgement | ::: आ दे श ::: ( पारीत दिनांक :19.01.2017 ) आदरणीय सदस्या श्रीमती भारती केतकर, यांचे अनुसार तक्रारकर्ते यांनी सदरहु तक्रार, ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम 12 अन्वये, विरुध्दपक्षाने द्यावयाच्या सेवेत त्रुटी ठेवली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केला, म्हणून नुकसान भरपाई मिळण्यासाठी दाखल केली आहे. सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 1 यांना नोटीस बजावूनही ते मंचासमोर हजर न झाल्याने, त्यांचे विरुध्द ही तक्रार एकतर्फी चालवण्याचे आदेश दि. 11/11/2016 रोजी पारीत करण्यात आले. म्हणून तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांनी दाखल केलेले दस्त व त्यांचा तोंडी युक्तीवाद, यांचे आधारे काढलेल्या निष्कर्षाचा अंतीम आदेशाचे वेळी विचार करण्यात आला. - दाखल दस्तांवरुन तक्राररकर्ता हा विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचा ग्राहक असल्याचे दिसून येत असल्याने व यावर विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचा आक्षेप नसल्याने तक्रारकर्ता यांना विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांचे ग्राहक ग्राह्य धरण्यात येत आहे.
- तक्रारकर्त्याचे तक्रारीवरुन तक्रारकर्त्याने दि. 8/9/2015 रोजी विरुध्दपक्ष क्र. 1 यांचेकडून लिनोवो ए-6000 प्लस हा मोबाईल रु. 8000/- ला एका वर्षाच्या रिप्लेसमेंट वॉरंटीसह विकत घेतला. परंतु जानेवारी 2016 पासून त्या मोबाईल मध्ये तांत्रिक बिघाड असल्याचे जाणवायला लागले, जसे मोबाईल स्लो चालणे, बॅक की, होम की व मेन्यु की काम न करणे, फंक्शन हँग होणे, टचस्क्रीन योग्य प्रतीसाद न देणे. सदर त्रासाबद्दल विरुध्दपक्ष क्र. 1 यांना फोनवर कळविल्यावर त्यांनी फंक्शन पुर्णपणे रिसेट करावयाला लावले, परंतु त्रास दूर झाला नाही. म्हणून विरुध्दपक्ष क्र. 1 ला प्रत्यक्ष भेटून मोबाईल दाखविला असता, सदर मोबाईल मध्ये तांत्रिक दोष असल्याचे सांगीतले. विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सांगण्यावरुन विरुध्दपक्ष क्र. 3, जे सर्व्हीस सेंटर आहे, त्यांचेकडे मोबाईल दाखविला असता, त्यांनी कोणतेही जॉबशिट न बनविता अथवा कोणतीही पावती न देता, त्यांचेकडे ठेवून घेतला व दुसरे दिवशी सदर मोबाईल दुरुस्त केला, असे सांगून तक्रारकर्त्याला परत केला.परंतु सदर मोबाईल मध्ये पुन्हा त्रास जाणवल्यावर तक्रारकर्ता फे्ब्रुवारी 2016 च्या दुस-या आठवडयात विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्या दुकानात गेल्यावर विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी सदर मोबाईल दुरुस्त होऊ शकत नसल्याचे सांगुन, मोबाईल दुरुस्त करुन देण्यास नकार दिला. त्यामुळे तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 2, जी सदर मोबाईलची निर्माती कंपनी आहे, त्यांना दि. 24/2/2016 रोजी ई-मेल द्वारा कळविले. विरुध्दपक्ष क्र. 2 ने सुचविलेले सेटींग केल्यावरही तक्रारकत्याचा मोबाईल दुरुस्त होत नसल्याने, तक्रारकर्ता परत विरुध्दपक्ष क्र. 1 च्या सांगण्यावरुन विरुध्दपक्ष क्र. 3 कडे गेला. परंतु विरुध्दपक्ष क्र. 3 ने सदर मोबाईल स्विकारण्यास व पाहण्यास नकार दिला. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांना पाठविलेल्या नोटीसलाही विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी उत्त्र दिले नाही. परंतु विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी खोटे उत्तर पाठविले. आज रोजीही सदर मोबाईल संच तक्रारकर्त्याकडे, न वापरता पडला असल्याने, तक्रारकर्त्याला शारीरिक व मानसिक त्रास झाला असल्याने, सदर तक्रार मंचासमोर दाखल केली.
- विरुध्दपक्ष क्र.2 यांनी त्यांचा जबाब इंग्रजीतुन सादर केला, त्याचा थोडक्यात आशय असा की, त्यांनी तक्रारकर्त्याची समस्या सोडवण्यासाठी सल्ला देण्याचा सर्वोत्तम प्रयत्न केला. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी तक्रारकर्ता यांना त्यांचा मोबाईल अधिकृत सेवा केंद्राच्या तंत्रज्ञाकडून दुरुस्त करण्याचा सल्ला दिला. परंतु तक्रारकर्ता विरुध्दपक्ष क्र. 2 यांचेशी संलग्न नसलेल्या सेवा केंद्रास भेटले. तक्रारकर्त्याने सप्टेंबर 2015 मध्ये मोबाईल खरेदी केला व सुमारे 4 महीने सदर मोबाईलमध्ये कोणतीही समस्या आली नाही. विरुध्दपक्षाने ईमेलद्वारे तक्रारकर्त्याच्या प्रश्नांचे पुर्णपणे समाधान करण्यासाठी प्रयत्न केला. जर केवळ विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे अधिकृत सेवा केंद्र दुरुस्ती किंवा संबंधीत मशीनचे भाग बदलण्यास सक्षम नसेल तर फक्त विरुध्दपक्ष क्र. 2 लिनोवो वॉरंटी कलमाच्या अटीनुसार पैसे परत देण्यास जबाबदार असेल. परंतु तक्रारकर्त्याच्या मोबाईलची दुरुस्तीच विरुध्दपक्ष क्र. 2 च्या अधिकृत सेवा केंद्राकडून झालेली नसल्याने तक्रारकर्त्याला पैसे परत देण्याचा किंवा मोबाईल बदलण्याची ऑफर लिनोवोच्या वॉरंटी मध्ये येत नाही.
- विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी त्यांच्या जबाबात त्यांचे संबंधीचे सर्व आरोप फेटाळून लावून तक्रारकर्ता कधीही कोणत्याही मोबाईल दुरुस्तीसाठी विरुध्दपक्ष क्र. 3 कडे गेलेला नाही व विरुध्दपक्ष क्र. 3 यांनी कधीही तक्रारकर्त्याचा मोबाईल पाहीलेला सुध्दा नाही, असे नमुद केले आहे. विरुध्दपक्ष क्र. 3 कडे कोणताही मोबाईल दुरुस्तीसाठी आल्यास बिलाची प्रत व मोबाईल दुरुस्तीकरिता मिळाल्याबाबतचा मेमो ग्राहकाला देऊनच मोबाईल दुरुस्ती करिता ताब्यात घेतो. दुरुस्ती मेमोवर मोबाईल मधील बिघाडाची सविस्तर माहीती मोबाईल मालकाकडून घेऊन, त्याची स्वाक्षरी घेण्यात येते व त्याची प्रत मोबाईल मालकाला देऊन मोबार्इल दुरुस्तीसाठी ताब्यात घेण्यात येतो. विरुध्दपक्ष क्र. 3 हे दि.18/2/2015 पर्यंत लिनोव्हो कंपनीच्या मोबाईलचे अधिकृत दुरुस्ती केंद्र होते, मात्र त्या दिवसापासून कंपनीसोबत झालेले करार रद्द झाल्याने विरुध्दपक्ष क्र. 3 हे विरुध्दपक्ष क्र. 2 चे अधिकृत दुरुस्ती केंद्र नाही. त्यामुळे तक्रारकर्त्याला झालेल्या नुकसानीस विरुध्दपक्ष क्र. 3 जबाबदार नाही, म्हणून विरुध्दपक्ष क्र. 3 विरुध्दची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
- उभय पक्षांचे म्हणणे ऐकल्यावर मंचाने दाखल दस्तांचे अवलोकन केले. तक्रारकर्त्याने त्यांच्या युक्तीवादाचे वेळी दस्त क्र. 2 (पृष्ठ क्र. 13) वरुन मंचाच्या असे निदर्शनास आणून दिले की, दि. 3/4/2016 रोजी विरुध्दपक्ष कंपनी लिनोव्हो चे सर्व्हीस प्रोव्हाईडरची यादी नेटवरुन डाऊनलोड केली असता, त्या यादीतही विरुध्दपक्ष क्र. 3 चे दुकानाचे नाव व पत्ता होता, त्यामुळे तक्रारकर्त्याने जानेवारी 2016 मध्ये त्यांचा मोबाईल विरुध्दपक्ष क्र. 3 कडे दुरुस्तीसाठी दिला, पहील्या वेळेस विरुध्दपक्ष क्र 3 ने मोबाईल एक दिवस ठेऊन घेतला, परंतु त्यानंतर त्यांनी तक्रारकर्त्याचा मोबाईल स्विकारण्यास नकार दिला, हे सत्य आहे. तसेच विरुध्दपक्ष क्र. 3 ने दि. 6/1/2017 रोजी मंचात दाखल केलेल्या ईमेलचा आधार घेऊन तक्रारकर्त्याने मंचाच्या असे निदर्शनास आणून दिले की, विरुध्दपक्ष क्र. 3 ने दि. 13/12/2015 रोजी पाठविलेला ईमेल, विरुध्दपक्ष क्र. 2 लिनोव्हो कंपनीला पाठविलेला नसून एच.सी.एल. सर्व्हीसेस लिमिटेड यांना पाठविलेला आहे. त्यामुळे सदर ईमेलवरुन विरुध्दपक्ष क्र. 2 व विरुध्दपक्ष क्र. 3 यांच्यातील संबंध संपुष्टात आल्याचे दिसून येत नाही.
- तक्रारकर्त्याने नमुद केलेल्या दस्तांचे अवलेाकन मंचाने केल्यावर मंचालाही तक्रारकर्त्याच्या युक्तीवादात तथ्य आढळून आले. विरुध्दपक्ष क्र. 3 च्या म्हणण्यानुसार ते दि. 18/2/2015 पर्यंतच विरुध्दपक्ष क्र. 2 चे अधिकृत दुरुस्ती केंद्र होते, पंरतु दस्त क्र. 2 वरुन दि. 3/4/2016 पर्यंत विरुध्दपक्ष क्र. 3 हे विरुध्दपक्ष क्र. 1 च्या संकेतस्थळावरील अधिकृत दुरुस्ती केंद्राच्या यादीत होते. त्यामुळे तक्रारकर्ता त्याची तक्रार घेऊन, विरुध्दपक्ष क्र. 3 कडे, ते विरुध्दपक्ष क्र. 2 चे अधिकृत सर्व्हीस सेंटर असल्याचे गृहीत धरुन गेला, हे ग्राह्य धरण्यात येते.
- परंतु तक्रारकर्त्याच्या म्हणण्यावरुन विरुध्दपक्ष क्र. 3 ने त्याचा मोबाईल दुरुस्तीसाठी जानेवारी 2016 मध्ये प्रथम स्विकारला, तेंव्हा कुठलीही जॉबशीट दिली नाही व त्यानंतर तक्रारकर्त्याचा मोबाईल दुरुस्तीसाठी स्विकारला सुध्दा नाही, तर विरुध्दपक्ष क्र. 3 ने तक्रारकर्ता कधीही त्यांच्याकडे मोबाईल घेऊन आला नाही व विरुध्दपक्ष क्र. 3 ने तक्रारकर्त्याचा मोबाईल कधीच पाहीलेला नाही,असे म्हटले आहे. तक्रारकर्त्याच्या तक्रारी व्यतिरिक्त तक्रारकर्त्याच्या मेाबाईल मधील तक्रारी संबंधी कुठल्याही तज्ञाचा पुरावा अथवा अधिकृत सर्व्हीस सेंटरचे जॉबशीट मंचासमोर दाखल नाही. त्याच प्रमाणे विरुध्दपक्ष क्र. 2 च्या म्हणण्यानुसार तक्रारकर्त्याने वादातील मोबाईल खरेदी केल्यापासून कुठल्याही समस्येशिवाय 4 महीने वापरला आहे. तसेच जर केवळ विरुध्दपक्ष क्र. 2 यांचे अधिकृत सेवा केंद्र दुरुस्ती करण्यास अथवा संबंधीत मोबाईलचे भाग बदलण्यास असमर्थ असतील तरच लिनोवो कंपनीच्या वॉरंटी कलमाच्या अटीनुसार पैसे परत देण्यास अथवा मोबाईल बदलुन देण्याची ऑफर देता येईल.
- सदर प्रकरणात विरुध्दपक्ष क्र. 2, लिनोवो कंपनीच्या कुठल्याही अधिकृत सर्व्हीस सेंटरकडून त्यांच्या अटी शर्तीच्या अधीन राहून तक्रारकर्त्याचा मोबाईल तपासल्या गेला नाही व दुरुस्त केला गेला नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याच्या मोबाईल मध्ये उत्पादन दोष असल्याचे व सदर मोबाईल दुरुस्त करण्याच्या क्षमतेबाहेर असल्याचे सिध्द होत नसल्याने, तक्रारकर्त्याची मोबाईलची किंमत परत मिळावी अथवा नवीन मोबाईल मिळणेची मागणी मंचाला मंजुर करता येणार नाही, तर केवळ मोबाईल दुरुस्ती संबंधी आदेश करता येईल.
- परंतु तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांना पाठविलेल्या नोटीसचे उत्तर विरुध्दपक्ष क्र. 1 व 3 यांनी दिले नाही व विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी विरुध्दपक्ष क्र. 3 हे त्यांचे सर्व्हीस सेंटर नसल्याचा खुलासा त्यांच्या दि. 16/5/2016 च्या नोटीसच्या उत्तरात केला नसल्याने, तक्रारकर्ता शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसान भरपाईसह प्रकरणाचा खर्च मिळण्यास पात्र असल्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच आले आहे.
- सबब अंतीम आदेश येणे प्रमाणे...
-
- तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येत आहे.
- वादातील मोबाईल मध्ये उत्पादन दोष असल्याचे व सदर मोबाईल दुरुस्त होण्याच्या क्षमते पलीकडे असल्याचे कोणत्याही तज्ञाकडून तक्रारकर्त्याने सिध्द न केल्याने, विरुध्दपक्ष क्र. 2 व 3 यांनी वैयक्तीक व संयुक्तीपणे तक्रारकर्त्याचा वादातील मोबाईल, आदेश प्राप्त झाल्यापासून 15 दिवसात निःशुल्क दुरुस्त करुन द्यावा.
- विरुध्दपक्ष क्र. 2 च्या अधिकृत सर्व्हीस सेंटर बद्दल योग्य तो खुलासा प्रकरण दाखल होईपर्यंत न केल्याने विरुध्दपक्ष क्र. 1 ते 3 यांनी शारीरिक, मानसिक व आर्थिक नुकसानीपोटी रु. 2000/- ( रुपये दोन हजार फक्त ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 1000/- ( रुपये एक हजार फक्त ) वैयक्तीक व संयुक्तीपणे तक्रारकर्त्याला निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसाचे आंत, द्यावे.
सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या. | |