::: निकालपत्र :::
( निकाल तारीख :12/03/2015)
(घोषित द्वारा: श्रीमती ए.जी.सातपुते, मा. अध्यक्षा.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदार हा शेतकरी असुन त्याची जमीन गट नं. 202 क्षेत्र 0.28 आर मौ. डिग्रस ता. उदगीर जि. लातूर येथे आहे. दि. 25/01/2011 रोजी अर्जदाराने सामनेवाला क्र. 1 यांचेकडून भेंडी बियाणे ओएच-597 या जातीचे खरेदी केले. खरेदी पावती सोबत सादर केले आहे. सामनेवाला क्र. 2 ह सदर बियाणाची उत्पादक कंपनी आहे. अर्जदाराने भेंडी लागवडीसाठी तीन पॉकेट प्रती पॉकेट 250 ग्रॅम एकुण 750 ग्रॅम बियाणे लागवडीसाठी वापरले. जमीन भिजवुन, खताची मात्रा इत्यादी पध्दतीने लावणी केली. सदर बियाणे अर्जदाराने त्याच्या शेतात 0 हे. 25 आर क्षेत्रावर कृषी शास्त्रीय पध्दतीने दि. 02.02.2011 रोजी पुर्ण केली. लावणी नंतर सुरुवातीच्या काळात भेंडी पिकाची देखभाल, मशागत, फवारणी, खत व्यवस्थापन व पाणी व्यवस्थापन व्यवस्थितपणे अर्जदाराने केले. पीक पक्वतेच्या अवस्थेत आले असता क्वचित फुले व अंदाजे 6-7 भेंडी फळे एका झाडाला आली होती या अगोदर प्रथम भेंडी लागली असता सुरुवातीचा तोडा100 किलो फक्त निघाला. ही भेंडी फुगीर व बी नसल्याने बाजारात कोणीच खरेदी करण्यास तयार झाले नाही या काळात भेंडीचा भाव एक किलोला रु. 20/- ते रु. 22/- प्रमाणे चालु होता. भेंडीचा आकार बुटका, गोलाकार झाला, योग्य पध्दतीचे भेंडीचे कुठलेच गुणधर्म दिसत नव्हते, व फळ धारणा सदर पिकास झाली नाही. फक्त झाडाची वाढच झाली, त्यामुळे अर्जदाराने दि. 12.05.2011 रोजी गट विकास अधिकारी (कृषी विभाग) उदगीर यांना तक्रारी अर्ज देऊन भेंडीची लागण न झाल्यामुळे योग्य ती चौकशी व पंचनामा करण्याची विनंती केली होती.
दि. 30.05.2011 रोजी गट विकास कृषी अधिकारी उदगीर यांनी संबंधीतांना नोटीस देऊन अर्जदाराच्या तक्रारी अर्जाप्रमाणे जिल्हा परिषद लातूर येथील मुख्य कृषी अधिकारी तसेच तज्ञ मंडळी व स्थापित समिती यांचेकडून रितसर चौकशी होऊन अर्जदाराच्या शेतातील सदर बियाणा बाबत परिक्षण केले. त्यानुसार परिक्षण अहवाल जा.क्र. जपला/कृषी/बीतक्रार/कावि890/2011 कृषी विभाग जि.प. लातूर यांनी दि. 18.07.2011 रोजी तक्रारदार यांना अहवालाची प्रत पाठवली आहे.
200 कि. भेंडी प्रत्येक तोडयास कमीत कमी निघते ( 15 ते 20 तोडे उत्पादनचालु झाले पासुन) म्हणुन साधारणत: 18 तोडे X 200 कि. भेंडी उत्पादन 3600 कि. म्हणुन 32600 कि. X साधारण भाव प्रती कि. 15 – 15 X 3600 = 54,000/- उत्पादन निश्चित निघते. ते अर्जदारास मिळाले नाही. म्हणुन 15 वेळा मार्केटचे भाडे रु. 200/- प्रमाणे रु. 3000/- खर्च व वरील प्रमाणे झालेला खर्च असा एकुण रु.6200/- वजा जाता रु. 47,800/- निश्चित उत्पादन बोगस बियाणे सामनेवाला यांनी दिले असल्या कारणाने अर्जदारास मिळाले नाही. त्यामुळे अर्जदाराची फसवणुक झाली आहे. म्हणुन अर्जदारास नुकसान भरपाई देण्यास सामनेवाला जबाबदार आहेत. म्हणुन अर्जदाराने विनंती केली की, अर्जदाराला सामनेवाला यांच्याकडून रु. 47,800/- उत्पादन नुकसान भरपाई म्हणुन मिळावेत, व मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 2000/- व दाव्याचा खर्च म्हणुन रु. 5000/- सामनेवाला यांचेकडून अर्जदारास मिळावेत.
गैरअर्जदार क्र. 2 यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले त्यात, अर्जदाराने वस्तुस्थिती विपरीत विधाने करुन कोणताही कायदेशिर सक्षम पुरावा दाखल न करता प्रस्तुतचे प्रकरण विदयमान न्यायमंचात दाखल केलेले असल्याने अर्जदार याचा सदरचा अर्ज खर्चासह खारिज होण्यास पात्र आहे. अर्जदार याचे शेतीचे क्षेत्र 0 हे 28 आर दर्शवुन भेंडी पिकाची पेरणी 25 आर क्षेत्रात केल्याचे दिसून येते. मात्र अर्जदार याने तक्रार अर्जाचे पुष्टयर्थ अर्जासोबत या गैरअजदार यांचे गैरहजेरीत व कायदेशिर तरतुदीचे पालन न करता केल्या गेलेल्या दि. 30/05/2011 रोजीच्या पाहणी मध्ये भेंडी लागवडीचे क्षेत्रफळ हे 40 आर दर्शविले आहे. ही बाब विचारात घेता अर्जदार यांचेच शेताची कथीत पाहणी झाली की इतर कोणाचे तरी शेत हे दि. 30.05.2011 रोजी पाहिले. अर्जदार हा त्याचे अर्जामध्ये भेंडीची लागवड ही 25 आर क्षेत्रात केल्याचे नमुद करत असला तरी प्रत्यक्षात कथित विशेष तज्ञांनी सदर पेरणी 40 आर केल्याचे नमुद केलेले दिसून येते. अर्जदार यांने अर्जासोबत संलग्नीत केलेले दस्तऐवजा वरुन अर्जदार याने दिनांक 25/01/2011 रोजी भेंडी बियाणाची 3 पाकीटे विकत घेतले व दिनांक 02.02.2011 रोजी त्याची पेरणी केली. मात्र प्रत्यक्षात बियाणे लागवडीनंतर 2 ते 3 दिवसात उगवण होऊन सदर बियाणाची फेर लागवड कधी केली. त्याबाबतचा तज्ञांचा अहवालात त्याचप्रमाणे तक्रार अर्जात कोणताही खुलासा नाही.
भेंडीचे बियाणे पेरणी केल्यानंतर 2 ते 9 दिवसात पानावर व पेरणीपासुन 8 दिवसात फुलावर येऊन पेरणी नंतर 40 ते 45 दिवसात फळवाढीची प्रक्रिया भेंडी हे वाण तोडणी करीता तयार होते. साधारणात: पेरणी नंतर 6 व्या आठवडयात पहिली तोडणीची प्रक्रिया पुर्ण होते. संपुर्ण पिकाचे वय हे 85 ते 100 दिवसापेक्षा जास्त नसते. वरील शास्त्र शुध्द परिणामावर अर्जदार यांचे प्रकरणाचा विचार केल्यास अर्जदार यांनी दि. 02.02.2011 रोजी पेरणी केल्यानंतर 7 आठवडे म्हणजे साधारणत: मार्च महिन्याचे शेवटच्या आठवडयापासुन भेंडीची तोडणी सुरु होऊन एप्रिल महिन्यामध्ये संपुर्ण कालावधी पुर्ण झालेला असेल. अशा परिस्थितीमध्ये अर्जदार याने पेरणी केल्यानंतर 30 ते 40 दिवसात भेंडीच्या पिकामध्ये दोष दिसला असेल तर तक्रार कृषी अधिकारी यांचेकडे करणे अपेक्षित होते. मात्र अर्जदार याने अर्जासोबत दाखल केलेल्या दस्तऐवजाचे अवलोकन केल्यास अर्जदार याने सर्वप्रथमदि. 12.05.2011 रोजी तक्रार केल्याचे दिसून येते. याचा अर्थ संपुर्ण पिकाचे वय पुर्ण होऊन भेंडी तोंडणीचा कालावधी संपल्यानंतर अर्जदार याने तक्रार केली असल्याचे कथीत तज्ञ व्यक्तींनी अर्जदार याचे शेतातील भेंडी पेरण्याची तारिख, तक्रारीची तारिख व पाहणीची तारिख व पाहणीची तारिख व भेंडी पिकाचे वय या बाबी विचारात घेऊन सदर पिक हे पाहणी योग्य नाही असा अहवाल देणे क्रमप्राप्त असतांना, केवळ शेतीच्या वस्तुस्थिती प्रमाणे असलेल्या बाबीचा उल्लेख न करता शेतक-या सोबत झालेल्या चर्चेवरुन कथित अहवाल तयार केल्याने सदर कथीत अहवालास कायदेशिर स्वरुप प्राप्त होऊ शकत नाही.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही.
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही.
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे त्याने दि.25/01/2011 रोजी Bhendi -597 Batch No. 48242 TF नग 3 वजन 250 ग्रॅम दर 300 नुसार रु. 900/- चे तीन बॅग खरेदी केल्या होत्या. यामुळे तो वैभव कृषी सेवा केंद्र उदगीर यांचा ग्राहक होतो.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असे असून, अर्जदाराने भेंडी दि. 25/01/2011 रोजी बी खरेदी केली दि. 02.02.2011 रोजी पेरणी केली. त्यानंतर सुरुवातीचा तोडा 100 किलो फक्त निघाला व या काळात रु. 20/- ते 22/- प्रमाणे त्याचा भावा होता, सदर भेंडी फुगीर होती, त्यात बी नसल्यसाने कोणीच बाजारात खरेदी करत नव्हते असे अर्जदाराचे म्हणणे आहे. यावरुन त्यांनी दि. 12.05.2011 रोजी गट विकास अधिकारी कृषी विभाग यांच्याकडे तक्रार दिली व त्या तक्रारीच्या पाहणी नंतर दि. 08.06.2011 रोजी डिग्रस ता. उदगीर येथे भेंडी बियाणे अहवाल जिल्हा बियाणे तक्रार निवारण समिती जिल्हा परिषद लातूर यांच्या एकटयाच्या सहीने सदरचा अहवाल निघालेला आहे. सदरचा बियाणे अहवाल देतांना गळीत धान्य संशोधन केंद्र लातूर, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी, मोहिम अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, व बियाणे विक्रेता मे. वैभव कृषी सेवा केंद्र उदगीर हे सर्व हजर असल्याचे नावे दिलेली आहेत. मात्र सदरच्या अहवालावर केवळ एकाच अधिका-याची सही आहे. तसेच तक्रार निवारण समितीचा निष्कर्ष हा संबंधीत शेतक-याने लागवड केलेली भेंडी OH-597 बियाणे लागवड क्षेत्राची पाहणी केली असता, सदर भेंडी पिकाची वाढ समाधानकारक झाली . तसेच संबंधीत शेतक-याने खत, पाणी व किड नियंत्रण व्रूवस्थापन वेळोवेळी व योग्य पध्दतीने करुन ही चांगल्या प्रतीची भेंडी फळाची लागण न झाल्याने शेतक-याचे नुकसान झाले असे समितीच्या सदस्यांशी केलेल्या चर्चेतून स्पष्ट झाले. तसेच सदर लॉटच्या इतर शेतक-यांच्या तक्रारी बाबत निश्चित माहिती उपलब्ध होऊ शकली नाही. सदर बियाणामुळे शेतक-याचे नुकसान झालेले आहे. असा तक्रार समितीचा निष्कर्ष दिसतो, इतर जातीच्या भेंडीस चांगली भेंडी असल्याचे सदर अहवालात दिसून येते. तसेच दि. 18/07/2011 चा भेंडी बियाणे तक्रारी बाबतचा अर्ज आहे दि.30.05.2011 रोजीचा पंचनामा असून सदर पंचनाम्यावर पंच उदगीर व कृषी अधिकारी उदगीर यांच्या सहया आहेत. परंतु सदर पंचनाम्यावर इतरही साक्षीदारांच्या सहया आहेत मात्र सदर कागदावर तहसीलदार यांचा कोणतीही सही व शिक्का दिसून येत नाही. तसेच सदरचा कागद हा झेरॉक्स स्वरुपाचा असल्यामुळे त्यावर अवलंबुन राहता येत नाही. तसेच तो 25 आर क्षेत्रात भेंडी लावली म्हणतो, पाहणी करतांना मात्र 40आर क्षेत्रात भेंडी दिसून येते. त्यामुळे अर्जदाराचे भेंडी या बियाणाचे गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांच्या बियाणामुळे नुकसानझाले असले तरी अर्जदार ही बाब सिध्द करु शकला नाही. म्हणुन हे न्यायमंच सदरचा सर्व कागदोपत्री पुरावा पाहता, अर्जदाराने स्वत:ची तक्रार अर्ज सिध्द करु शकला नाही. म्हणुन हे न्यायमंच अर्जदाराचा अर्ज खारीज करीत आहे.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- अर्जदाराचा तक्रार अर्ज खारीज करण्यात येत आहे.
- खर्चा बाबत आदेश नाही.