जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच,जळगाव यांचे समोर. . . . .
तक्रार क्रमांक 437/2011
तक्रार दाखल करण्यात आल्याची तारीखः-17/10/2011.
तक्रार निकाली काढणेत आली तारीखः- 07/09/2013.
प्रॅक्टीकल इंजीनियर वर्क्स,
तर्फे प्रोप्रायटर शरीफ गमीर पिंजारी,
उ.व. सज्ञान, धंदाः व्यापार,
रा.8, पोलन पेठ, कोहीनुर टी डेपो जवळ,
कोंबडी बाजार, जळगांव. .......... तक्रारदार.
विरुध्द
1. व्ही आर एल लॉजीस्टीक लि,
तर्फे व्यवस्थापकीय संचालक,
गिरीराज अनेक्स, सर्कीट हाऊस रोड,
हुबळी 580 029 (कर्नाटक)
2. व्ही आर एल लॉजीस्टीक लि,
2.तर्फे शाखाधिकारी, प्लॉट नं.सी-13,
2.एम आय डी सी, जळगांव. ......... विरुध्द पक्ष
कोरम-
श्री.विश्वास दौ.ढवळे अध्यक्ष
श्री.चंद्रकांत मो.येशीराव सदस्य.
श्रीमती पुनम नि.मलीक सदस्या.
तक्रारदार तर्फे श्री.केतन जयदेव ढाके वकील.
विरुध्द पक्ष क्र.1 व 2 तर्फे श्री.आर.बी.गाडगेकर वकील.(नो-से)
निकालपत्र
श्रीमती पुनम नि.मलीक, सदस्याः विरुध्द पक्षाने ट्रान्सपोर्ट मध्ये केलेल्या सेवेतील त्रृटीदाखल प्रस्तुतचा तक्रार अर्ज तक्रारदाराने या मंचासमोर दाखल केलेला आहे.
2. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की,
तक्रारदार यांनी दिल्ली येथील गर्ग सेल्स कंपनी यांचेकडे प्लॅस्टीक पेटलायझर मशीन एकुण 3 नग बनविण्याची ऑर्डर दिलेली होती. प्रत्येक मशीनची किंमत रक्कम रु.7,000/- अशी होती. सदर मशिनची होणारी एकुण रक्कमही तक्रारदाराने सदर कंपनीकडे आगाऊ अदा केलेली होती. तक्रारदाराने दिलेल्या मशीन आदेशानुसार बनवुन त्या तक्रारदाराकडे जळगांव येथे पोहोच करणेकामी विरुध्द पक्ष क्र. 1 चे दिल्ली येथील कार्यालयात दि.20/06/2011 रोजी जमा केल्या. तिनही मशीनचे वजन एकुण 168 किलोग्रॅम भरले. विरुध्द पक्षाचे नियमानुसार एकुण 170 किलोग्रॅम वजनाचे भाडे रक्कम रु.589/- आकारुन पावती क्र.252886707 सदर मालासोबत देण्यात आली. सदर पावतीप्रमाणे तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 चे जळगांव येथील कार्यालयात रक्कम जमा केल्यानंतर तक्रारदारास माल देण्यात येणार होता. त्याप्रमाणे तक्रारदार हे मशिन घेण्यासाठी विरुध्द पक्ष क्र. 2 कडे गेले असता त्यांना दोन मशीन आले असल्याची कल्पना देऊन त्या घेण्यासाठी एकुण खर्च रक्कम रु.620/- भरणा करण्याचे विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी सांगीतले. तक्रारदाराने तीन मशिन देण्याची विनंती केली असता विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी तक्रारदाराकडुन रक्कम रु.620/- वाहतुक खर्चापोटी स्विकारुन दि.1/7/2011 पावती क्र.17974 किंवा 9255252 तक्रारदारास देण्यात आली व त्यावर एकुण मालापैकी एक मशिन कमी असल्याबाबत लिहुन सुध्दा दिले. तक्रारदाराने विरुध्द पक्ष क्र. 1 चे वेबसाईटवरुन मालाची पाहणी केली असता दिल्ली येथुन प्रत्यक्षात तीन मशिन पाठविल्याचे दिसुन आले तथापी औरंगाबाद येथे आल्यानंतर तीन मशिन पैकी एक मशिन गहाळ होऊन तक्रारदारास प्रत्यक्षात दोन मशिन आल्याचे निर्दशनास आले. सदर एक मशिनचे गहाळ झालेकामी तक्रारदाराने दिल्ली स्थित विरुध्द पक्ष क्र. 1 चे कार्यालयात देखील अनेक वेळा समक्ष भेटी दिल्या, ई-मेल व नोटीसीव्दारे नुकसानीची मागणी केली तथापी विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदाराचे झालेल्या नुकसानी दखल न घेऊन सदोष सेवा प्रदान केली. सबब विरुध्द पक्ष कंपनीचे बेजबाबदारपणामुळे तक्रारदारास झालेल्या नुकसानी दाखल एका मशिनची किंमत रु.7,000/- + तक्रारदारास दिल्ली येथे जाणे – येणे यासाठी आलेला खर्च रु.13,000/- अशी एकुण नुकसान रक्कम रु.20,000/- द.सा.द.शे.16 टक्के व्याजासह मिळावा, नोटीस खर्च रु.2,500/- व मानसिक शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- , तक्रार खर्च रु.5,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे.
3. सदरची तक्रार दाखल करुन, विरुध्द पक्ष यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 13(1) ब प्रमाणे नोटीसा काढण्यात आल्या. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 हे वकीलामार्फत हजर झाले तथापी त्यांनी मुदतीत लेखी म्हणणे दाखन न केल्याने त्यांचेविरुध्द नो-से आदेश पारीत करुन तक्रार निकालासाठी घेतली.
4. तक्रारदार यांची तक्रार, त्यांनी दाखल केलेले कागदपत्रे, व तक्रारदाराचा युक्तीवाद इत्यादीचे सुक्ष्म अवलोकन केले असता न्यायनिवाडयासाठी पुढील मुद्ये उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालीलप्रमाणे देत आहोत.
मुद्ये उत्तर
1) विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना द्यावयाच्या
सेवेत त्रृटी केली आहे काय ? होय.
2) आदेश काय ? खालीलप्रमाणे.
वि वे च न
5. मुद्या क्र.1 - तक्रारदाराची तक्रार व त्यासोबत दाखल कागदपत्रे व तक्रारदाराचा युक्तीवाद इत्यादी विचारात घेता तक्रारदाराने दिल्ली येथील कंपनीकडुन प्लॅस्टीक पेलस्टर मशिन एकुण तीन नगर प्रत्येक नगाची किंमत रक्कम रु.7,000/- प्रमाणे एकुण रक्कम रु.21,000/- अधिक व्हॅट चार्जेस रु.1,050/- अशी एकुण रक्कम रु.22,050/- रोख स्वरुपात भरणा करुन मशिन्स दि.20/06/2011 रोजी पावती क्र.161 अन्वये खरेदी केल्याचे नि.क्र.3/1 लगत दाखल पावतीचे छायाप्रतीवरुन स्पष्ट होते. तसेच सदरचे मशिन तयार झाल्यानंतर तक्रारदारास पोहोच करणेकामी विरुध्द पक्ष क्र. 1 चे दिल्ली स्थित कार्यालयाकडे सुपूर्द केले त्याबाबतची पावती नि.क्र.3/2 वर दाखल असुन त्यात नमुद मजकुरानुसार एकुण तीन मशिन वजन एकुण 160 किलोग्रॅम तथापी 170 किलोग्रॅम करिता रक्कम रु.589/- आकारल्याचे दाखल पावतीवरुन स्पष्ट होते. जळगांव येथे सदर मशिन आल्यानंतर तक्रारदाराकडुन तीन मशिनचे वाहतुकीपोटी एकुण रक्कम रु.589/- घेण्याचे निश्चित ठरलेले असतांनाही विरुध्द पक्ष क्र. 2 यांनी एकुण रक्कम रु.620/- तक्रारदाराकडुन स्विकारुन सदर पावतीवर एक मशिन शॉर्ट असल्याचे लिहुन दिलेले आहे. तसेच तक्रारदाराला मशिनची डिलेव्हरी होतांना प्रत्यक्षात दोन मशिन आल्या व एक मशिन आली नसल्याबाबत ई-मेल व्दारे तक्रार केल्याचे नि.क्र.3/5,3/7 लगत दाखल कागदपत्री पुराव्यावरुन स्पष्ट होते. तसेच तक्रारदाराने मशिनची ऑर्डर दिलेल्या संबंधीत प्रॅक्टीकल इंजिनिअरींग वर्क्स यांनी विरुध्द पक्ष क्र. 2 व्ही आर एल लॉजीस्टीक लि यांना दि.12/07/2011 रोजीचे पत्राव्दारे लेखी कळवुन तक्रारदाराला तीन मशिनपैकी दोनच मिळाल्याचे नमुद करुन राहीलेले एक मशिन त्वरीत तक्रारदारास जळगांव येथे देण्याबाबत कळविलेले असल्याचे नि.क्र.3/6 लगत दाखल पत्राचे सत्यप्रतीवरुन स्पष्ट होते. विरुध्द पक्षास अनेक वेळा संपर्क करुनही त्यांनी तक्रारदारास तीन मशिनपैकी उर्वरीत एक मशिन न दिल्याने तक्रारदाराने सरतेशेवटी वकीलामार्फत दि.24/08/2011 रोजी नोटीसीने विरुध्द पक्षास नुकसान भरपाईची मागणी केल्याचे नि.क्र.3/9 लगत दाखल नोटीसीचे सत्यप्रतीवरुन स्पष्ट होते. वरील एकुण विवेचनावरुन तक्रारदारास विरुध्द पक्षाकडुन तीन मशिनपैकी एकुण फक्त दोनच मशिन जळगांव येथे प्राप्त झाल्याचे तक्रारदाराने कागदोपत्री पुराव्यावरुन शाबीत केलेले आहे. याउलट विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 हे प्रस्तुत तक्रारीकामी वकीलामार्फत हजर झाले तथापी त्यांनी तक्रारदाराचे तक्रारीतील कथन नाकारले नाही. तसेच लेखी म्हणणेही दाखल केलेले नाही. यावरुन विरुध्द पक्ष यांना तक्रारदाराची तक्रार एकप्रकारे मान्यच असल्याचा निष्कर्ष निघतो. विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांनी तक्रारदारास मशिन वाहतुक करतांना तीन मशिनपैकी एक मशिन जळगांव येथे न देऊन सेवेत त्रृटी केल्याचे निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सबब मुद्या क्र. 1 चे उत्तर आम्ही होकारार्थी देत आहोत.
6. मुद्या क्र. 2- विरुध्द पक्ष कंपनीचे बेजबाबदारपणामुळे तक्रारदारास झालेल्या नुकसानी दाखल एका मशिनची किंमत रु.7,000/- + तक्रारदारास दिल्ली येथे जाणे – येणे यासाठी आलेला खर्च रु.13,000/- अशी एकुण नुकसान रक्कम रु.20,000/- द.सा.द.शे.16 टक्के व्याजासह मिळावा, नोटीस खर्च रु.2,500/- व मानसिक शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- , तक्रार खर्च रु.5,000/- विरुध्द पक्षाकडुन मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केलेली आहे. तक्रारदाराने दिल्ली येथे जाणे- येणे करिता एकुण रक्कम रु.13,000/- खर्च आल्याचे तक्रारीत कथन केलेले आहे तथापी दिल्ली येथे गेल्याबाबतचे रेल्वे अगर बसचे तिकीटाची छायाप्रत याकामी दाखल केलेली नाही त्यामुळे तक्रारदार हे पुराव्याअभावी सदरची रक्कम मिळण्यास पात्र नाहीत. मात्र आमचे मते तक्रारदार हे एका मशिनची किंमत रक्कम रु.7,000/- + वॅटचा खर्च रु.350/- अशी एकुण रक्कम रु.7,350/- तक्रार दाखल तारीख 17/10/2011 पासुन द.सा.द.शे.8 टक्के व्याजासह, मानसिक व शारिरिक त्रासापोटी रु.10,000/- व तक्रार अर्जाचा खर्च रु.5,000/- विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 कडुन वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या मिळण्यास पात्र आहेत या निष्कर्षाप्रत आम्ही येत आहोत. सबब आम्ही खालीलप्रमाणे आदेश पारीत करीत आहोत.
आ दे श
( अ ) तक्रारदार यांचा तक्रारी अर्ज अंशतः मंजूर करण्यात येतो.
( ब ) विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असे निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास नुकसानी दाखल एकुण रक्कम रु.7,350/- (अक्षरी रक्कम रु.सात हजार तीनशे पन्नास मात्र) तक्रार दाखल दि.17/10/2011 पासुन द.सा.द.शे.8 टक्के व्याजासह या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
( क ) विरुध्द पक्ष क्र. 1 व 2 यांना वैयक्तीक अथवा संयुक्तीकरित्या असे निर्देशीत करण्यात येते की, त्यांनी तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासापोटी रक्कम रुपये 10,000/- (अक्षरी रक्कम रु.दहा हजार मात्र ) व तक्रार अर्जाचे खर्चापोटी रु.5,000/-(अक्षरी रक्कम रु.पाच हजार मात्र ) या आदेशाच्या प्राप्तीपासुन 30 दिवसाचे आंत द्यावेत.
ज ळ गा व
दिनांकः- 07/09/2013.
( श्रीमती पुनम नि.मलीक ) ( श्री.चंद्रकांत मो.येशीराव ) (श्री.विश्वास दौ.ढवळे )
सदस्या सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,जळगांव.