निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 16/09/2013
तक्रार नोदणी दिनांकः- 23/09/2013 तक्रार निकाल दिनांकः- 03/04/2014
कालावधी 06 महिने. 11 दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्या
सौ.अनिता ओस्तवाल.M.Sc. L.L.B.
---------------------------------------------------------------------------------------------------------
शोभाबाई भ्र.ज्ञानोबा गरुड, अर्जदार
वय 48 वर्षे. धंदा.घरकाम. अॅड.एस.एन.व्यवहारे.
रा.साखला प्लॉट, परभणी ता. जि.परभणी.
विरुध्द
व्ही.डी.आष्टुरकर, वय 50 वर्षे.धंदा नौकरी. गैरअर्जदार.
शाखा व्यवस्थापक, अॅड.आर.बी.वांगीकर.
युनायटेड इंडिया इ. कंपनी.
दयावान कॉम्पलेक्स,परभणी ता.जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) सौ.अनिता ओस्तवाल. सदस्या.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटूरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराचा विमादावा नाकारुन अर्जदारास सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची तक्रार आहे.
अर्जदाराची थोडक्यात तक्रार अशी आहे की, अर्जदार ही मयत ज्ञानोबा रामराव गरुड यांची पत्नी आहे. अर्जदाराचे पती हयात असतांना शेती व्यवसाय करत होते व आपल्या कुटूंबाचे पालन पोषण करत होते.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदार ही अज्ञान असून तिला कायदेविषयक माहिती नाही. तसेच कुटूंबाचा संपूर्ण व्यवहार तिचे मयत पतीच स्वतः हयात असतांना सांभाळत असे. अर्जदाराला पतीच्या व्यवहारा विषयी वैयक्तिक माहिती नव्हती.
अर्जदाराचे म्हणणे की, दिनांक 10/04/2006 रोजी संध्याकाळी तिचे पती मोटार सायकलवरुन परभणीहून सहजपूरकडे जात असतांना रस्त्यावर अचानक रानडुकर आल्याने अपघात झाला व सदर अपघातात अर्जदाराच्या पतीच्या डोक्याला व छातीला मार लागला. त्यामुळे त्यांना उपचारासाठी यशोदा हॉस्पीटल नांदेड येथे शरीक करण्यात आले व सदर उपचारा दरम्यान अर्जदाराच्या पतीचा दिनांक 16/04/2006 रोजी मृत्यू झाला. त्यानंतर अर्जदाराच्या पतीचे शासकीय रुग्णालय नांदेड येथे शवविच्छेदन करण्यात आले. सदर अपघाताच्या घटनेबाबत दैठणा पोलीसानी नोंद केलेली असून व घटनास्थळ पंचनामा केला. अर्जदाराच्या पतीचे मृत्यू समयी 50 वर्षे वय होते.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराच्या मयत पतीनी गैरअर्जदार विमा कंपनीकडे त्यांच्या अपघाती मृत्यूची विमा पॉलिसी काढलेली होती व सदर विम्याचा कालावधी 25/08/1998 ते 24/08/2008 हा वैध होता सदरची पॉलिसी ही “ जनता वैयक्तिक अपघात विमा योजना ” या नावाने आहे. सदर पॉलिसीच्या हप्त्यापोटी अर्जदाराच्या पतीने 1250/- रु. गैरअर्जदार विमा कंपनीकडे भरणा केलेली आहे. व त्यांच्या अपघाती मृत्यूची 5 लाख रु. ची जोखीम गैरअर्जदार विमा कंपनीकडे सदर पॉलिसी व्दारे उतरविलेली आहे.
अर्जदाराचे म्हणणे की, तिच्या पतीच्या अपघाती मृत्यू दिवशी सदर विमा पॉलिसी ही वैध होती. अर्जदाराचे पती अपघाती मरण पावल्यामुळे अर्जदाराचे माणसिक संतुलन बिघडले होते तसेच सदर विम्या पॉलिसी विषयी कागदपत्रे हे मयत पतीने कोठे ठेवले आहेत, या बद्दल माहिती नव्हती, त्यामुळे मुदतीत क्लेम दाखल करु शकली नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे मुदतीत तोंडी माहिती दिली होती व पॉलिसीचा नंबर व कागदपत्रे देण्याची गैरअर्जदारास विनंती केली होती पण विमा कंपनीने तिला कोणतेही माहिती दिली नाही. व नुकसान भरपाईची रक्कम दिली नाही.
अर्जदाराचे म्हणणे की, तिला सदर विमा पॉलिसीचे कागदपत्रे सापडल्यानंतर त्यांनी संपूर्ण कागदपत्रासह क्लेमफॉर्म भरुन तिच्या पतीच्या मृत्यूची नुकसान भरपाई रक्कमेची मागणी केली, परंतु दिनांक 29/04/2013 रोजी विमा कंपनीने अर्जदारास लेखी पत्राव्दारे कळविले की, सदरचा क्लेम मुदतीत दाखल न केल्यामुळे विमादावा नामंजूर करण्यात येत आहे. या अगोदर दाखल केलेला क्लेम विमा कंपनीने अर्जदारास विश्वासात न घेता नामंजूर केला होता.
अर्जदाराचे म्हणणे की, ती विधवा व अशिक्षीत महिला असून तिला कायद्याचे ज्ञान नसल्यामुळे तिने आपला क्लेम लेखी स्वरुपात मुदतीत दाखल केला नव्हता, परंतु तिने तोंडी संपूर्ण माहिती गैरअर्जदारांना दिली होती. विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा नाकारुन सेवेत त्रुटी दिली, म्हणून सदरची तक्रार दाखल करणे भाग पडले व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारास आदेश करावा की,त्याने अर्जदाराच्या मयत पतीच्या विमा पॉलिसीची रक्कम पाचलाख रु. 18 टक्के व्याजाने अर्जदारास द्यावेत. तसेच मानसिक त्रासापोटी 25,000/- व तक्रार अर्ज खर्चापोटी 5000/- रु. गैरअर्जदाराने अर्जदारास देण्याचा आदेश व्हावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयार्थ अर्जदाराने नि.क्रमांक 2 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
अर्जदाराने पुराव्याबाबत नि.क्रमांक 5 वर 11 कागदपत्राच्या यादीसह 11 कागदपत्राच्या झेरॉक्स प्रती दाखल केल्या आहेत.ज्यामध्ये Repudiation Letter, फिर्याद प्रत, मरणोत्तर पंचनामा, घटनास्थळ पंचनामा, Provisional Post Mortem Report, पी.एम.रिपोर्ट, विमा कंपनीकडे दिलेला अर्ज, विमा पॉलिसी, विमा पॉलिसी, पैसे भरलेली पावती, इ. कागदपत्रे दाखल केली आहेत.
तक्रार अर्जास लेखी निवेदन सादर करण्यासाठी मंचातर्फे गैरअर्जदारास नोटीस काढण्यात आली.
गैरअर्जदार विमा कंपनी वकिला मार्फत मंचासमोर हजर, व नि.क्रमांक 11 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराच्या पतीने त्यांचेकडे जनता अपघात विमा योजने अंतर्गत 5 लाख रु. जोखीमेची पॉलिसी त्यांच्याकडे काढली होती व सदर पॉलिसीचा कालावधी 25/08/1998 ते 24/08/2008 पर्यंत वैध होती. सदर पॉलिसीचा 1250/- रु. हप्ता अर्जदाराच्या पतीने त्यांच्याकडे भरला होता. अर्जदारानी विमा कंपनीस सदर घटनेबाबत मुदतीत तोंडी माहिती कधीही दिली नव्हती.
विमा कंपनीचे म्हणणे की, अर्जदाराने तिच्या पतीच्या मृत्यू दाव्याचा अर्ज तिन वर्षानंतर दाखल केला व तो मुदतीनंतर दाखल केला असल्यामुळे विमा कंपनी नुकसान भरपाई भरण्यास पात्र नाही. तिचे कुठलेही दाईत्व येत नाही. विमा कंपनीने अर्जदारास कसल्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही. अर्जदाराची प्रस्तुतची तक्रार खोटी आहे. त्यासाठी Cause of Action येत नाही व दावा मुदतबाहय आहे.
विमा कंपनीने पॉलिसीच्या नियमा प्रमाणेच अर्जदाराचा विमादावा नामंजूर केला आहे. अर्जदाराने तिच्या मयत पतीच्या अपघाता बद्दलची माहिती विमा कंपनीस तात्काळ देणे आवश्यक होते व ते न दिल्याने विमादावा नामंजूर केला आहे. म्हणून मंचास विनंती केली आहे की, प्रस्तुतची तक्रार 6000/- अर्जदारावर खर्च आकारुन प्रकरण खारीज करण्यात यावे.
विमा कंपनीने लेखी जबाबाच्या पुष्टयार्थ नि.क्रमांक 15 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
विमा कंपनीने पुराव्याबाबत नि.क्रमांक 14 वर दोन कागदपत्रे दाखल केली आहेत. ज्यामध्ये विमा कंपनीचे पत्र, पॉलिसी कॉपी दाखल केली आहे.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयास उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे आहेत.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराचा जनता वैयक्तिक अपघात
विमा योजने अंतर्गत मयत पतीचा विमादावा नामंजूर करुन
अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदाराचे पती नामे ज्ञानोबा रामराव गरुड याचा दिनांक 10/04/2006 रोजी मोटार सायकल क्रमांक MH-22-G-5362 ने परभणी येथून सहजपूर जवळाकडे जात असतांना अंबडपुर लोहगाव रोड, पावर हाऊस जवळ सदर मोटार सायकल समोर अचानक रानडुक्कर आले व अपघात झाला. व सदर अपघातात अर्जदाराच्या पतीस डोक्याला व छातीला मार लागला होता, ही बाब नि.क्रमांक 5/3 वर दाखल केलेल्या पोलीस स्टेशन दैठणाच्या कागदपत्रावरुन सिध्द होते.
सदर अपघातात अर्जदाराचे पती गंभीर जखमी झाले होते व वैद्यकीय उपचारासाठी नांदेड येथील यशोदा हॉस्पीटलमध्ये शरीक केले होते व अर्जदाराच्या पतीचा डॉ. यशोदा हॉस्पीटल नांदेड येथे उपचारा दरम्यान दिनांक 16/04/2006 रोजी मृत्यू झाला होता. ही बाब नि.क्रमांक 5/4 वर दाखल केलेल्या मरणोत्तर पंचनामाच्या प्रतीवरुन व तसेच नि.क्रमांक 5/7 वर दाखल केलेल्या पी.एम. रिपोर्टवरुन सिध्द होते.
अर्जदाराचे पती नामे ज्ञानोबा गरुड यांनी हयात असतांना जनता वैयक्तीक अपघात विमा योजना अंतर्गत गैरअर्जदार विमा कंपनीकडे पॉलिसी काढली होती व सदर पॉलिसीचा कालावधी 25/08/1998 ते 24/08/2008 पर्यंत वैध होता व तसेच सदर पॉलिसी मध्ये नॉमिनी म्हणून अर्जदाराचे नाव होते. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 5/10 वरील सदर पॉलिसीच्या प्रतीवरुन सिध्द होते.
सदर पॉलिसीची जोखीम 5 लाख रु. पर्यंत होती. ही बाब देखील नि.क्रमांक 5/10 वर दाखल केलेल्या पॉलिसीच्या प्रतीवरुन सिध्द होते.
अर्जदाराच्या पतीने सदर पॉलिसी घेतांना दिनांक 25/08/1998 रोजी विमा हप्त्यापोटी रु. 1250/- गैरअर्जदाराकडे भरले होते. ही बाब नि.क्रमांक 5/11 वर दाखल केलेल्या विमा कंपनीने दिलेल्या पावती वरुन सिध्द होते.
अर्जदाराच्या पतीचा दिनांक 16/04/2006 रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला म्हणजे सदर पॉलिसीच्या वैध कालावधी मध्येच झाला होता, ही बाब देखील सदर पॉलिसीच्या प्रतीवरुन व पोलीसाच्या कागदपत्रावरुन दिसून येते.
अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिनांक 05/05/2010 रोजी सदर विम्याचा लाभ मिळावा म्हणून तिच्या मयत पतीच्या विम्यादाव्याची रक्कमेची मागणी केली होती, ही बाब नि.क्रमांक 5/8 वर दाखल केलेल्या अर्जाच्या प्रतीवरुन दिसून येते.
विमा कंपनीने अर्जदाराचा विमादावा 29/04/2013 च्या पत्राव्दारे नामंजूर केला होता व नामंजूर करण्याचे कारण विमादावा मुदतबाहय असले कारणाने व पॉलिसीच्या नियमा प्रमाणे लवकर माहिती दिली नाही, म्हणून असे दर्शवुन अर्जदाराचा विमादावा फेटाळला होता. ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 5/1 वरील Repudiation Letter वरुन सिध्द होते. गैरअर्जदार विमा कंपनीचे सदरचे कारण मंचास योग्य वाटत नाही. कारण अर्जदाराने आपल्या तक्रारीमध्ये स्पष्टपणे म्हंटले आहे की, ती अशिक्षीत आहे व तिच्या पतीने काढलेल्या पॉलिसीची तिला कांहीच माहिती नव्हती. व ज्यावेळेस सदर पॉलिसीची माहिती मिळताच तिने ताबडतोब विमा कंपनीला विमा रक्कमेची मागणी केली. याबाबत गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदार ही सुशिक्षीत आहे व तिला पॉलिसीची माहिती होती याबद्दल कोणताही कागदोपत्री ठोस पुरावा मंचासमोर आणला नाही.
विमा कंपनीने पॉलिसीच्या नियमा प्रमाणे अर्जदाराने मुदतीत विमादावा दाखल केला नाही, म्हणून नामंजूर करणे हे नैसर्गिक न्यायतत्वाच्या विरोधात आहे. असे मंचास वाटते.
याबाबत मा. राज्य आयोग आयोग झारखंड राज्य रांची यांनी 2009 (2) CPR 202 F A No. 75 of 2008 गोल्डन ट्रस्ट विरुध्द मलवादेवी या प्रकरणात स्पष्टपणे म्हंटले आहे की, Where Claimant was illiterate and was not even aware of group Janta Personal Accident Policy, condition in policy that intimation of accident was not given within a month of accident would not defeat claim under policy सदरचा निकाल प्रस्तुत प्रकरणास लागु पडतो.
अर्जदाराचे उशीरा क्लेम दाखल केल्याच्या कारणास्तव विमा दाव्याची रक्कम मिळण्यापासून अर्जदाराला वंचीत ठेवणे हे अन्यायकारक आहे. अशा परिस्थिती मध्ये Non Standard Basis वर विमा कंपनीने अर्जदाराचा क्लेम मंजूर करावयास हवा होता. असे मंचाचे मत आहे. याबाबत रिपोर्टेड केस Amalandu Sahoo V/s Oriental Insurance Co. Ltd (Supra) मध्ये मा. सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांनी असे मत व्यक्त केले आहे की, Violuation of terms of policy, the claim has to be settled on non standard basis.
सदर प्रकरणात मा. सर्वेाच्च न्यायालयानी व्यक्त केलेले मत प्रस्तुत प्रकरणास लागु पडतो. म्हणून अर्जदार ही Non Standard basis वर विमा दाव्याची रक्कम विमा कंपनीकडून मिळवणेस पात्र आहे. असे मंचाचे ठाम मत आहे. व गैरअर्जदार विमा कंपनीने विमा दाव्याची रक्कम अर्जदारास न देवून नक्कीच अर्जदारास सेवेत त्रुटी दिली आहे. हे सिध्द होते, म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे होकारार्थी उत्तर देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यात येत आहे.
2 गैरअर्जदार विमा कंपनीने आदेश तारखे पासून 30 दिवसाच्या आत
“ जनता वैयक्तीक अपघात विमा योजने ” अंतर्गत अर्जदाराच्या मयत पतीच्या
विमादाव्यापोटी नुकसान भरपाई म्हणून रु. 3,75,000/- फक्त (अक्षरी रु.
तीनलाख पंच्याहत्तरहजार फक्त ) अर्जदारास द्यावेत.
3 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
4 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
सौ.अनिता ओस्तवाल. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्या. मा.अध्यक्ष.