निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 12/02/2013
तक्रार नोदणी दिनांकः-05/03/2013
तक्रार निकाल दिनांकः- 19/09/2013
कालावधी 06 महिने. 14दिवस.
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM,LLB.
---------------------------------------------------------------------------------------------------------
विश्र्वनाथ पिता बाबुराव कडासने. अर्जदार
वय 38 वर्षे. धंदा.व्यापार. अॅड.एस.एन.व्यवहारे.
रा.कौसडी ता.जिंतूर जि.परभणी.
विरुध्द
व्ही.डी.आष्टुरकर. गैरअर्जदार.
वय.54 वर्षे.धंदा. नौकरी. अॅड.आर.बी.वांगीकर
शाखा व्यवस्थापक,
युनायटेड इंडिया इंशुरन्स कंपनी.
स्टेशन रोड, परभणी ता.जि.परभणी.
______________________________________________________________________
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.पी.पी.निटुरकर.अध्यक्ष.)
गैरअर्जदाराने अर्जदाराच्या इंडिका गाडीची नुकसान भरपाई रु.1,10,000/- देण्याचे नाकारुन सेवेत त्रुटी दिल्याबद्दलची अर्जदाराची तक्रार आहे.
अर्जदाराची तक्रार थोडक्यात अशी आहे की, अर्जदाराच्या मालकीची इंडिका कार नंबर एम.एच.22 एच. 2487 चा विमा गैरअर्जदार विमा कंपनीकडे अर्जदाराने काढला होता, अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, दिनांक 19/04/2012 रोजी वसमत ते परभणी रोडवर खाडेगांव शिवारात अपघात झाला व सदर अपघातामध्ये अर्जदाराच्या गाडीचे रु. 1,10,000/- चे नुकसान झाले सदर अपघाता बद्दल अर्जदाराने पोलीस स्टेशन वसमत येथे तक्रार दिली. ज्याचा क्राईम नंबर 12/12 असा आहे. व संबंधीत पोलीसांनी घटनास्थळ पंचनामा केला, त्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीला सदर अपघाता बद्दल अर्जदाराने लेखी माहिती दिली व विमा कंपनीच्या प्रतिनीधीने गाडीची पाहणी केली व गाडी दुरुस्त करुन अंतिम बिल दाखल करण्यास सांगीतले. गैरअर्जदाराच्या सांगण्या प्रमाणे अर्जदाराने ओमसाई मोटर्स, परभणी यांच्याकडून गाडी दुरुस्त करुन घेतली व गाडीचे स्पेअर पार्ट सेवा अॅटोमोबॉईल परभणी यांच्याकडून खरेदी केले, अर्जदाराने सर्व्हेअर फिस म्हणून गैरअर्जदार विमा कंपनीकडे 6,500/- रुपये जमा केले, अर्जदाराने गैरअर्जदार विमा कंपनीकडे पोलीस पेपर्स, आर.बी.बुक, ड्रायव्हींग लायसेंस, विमा पॉलिसी, मुळ बिलाची प्रत, गाडीचे फोटो सादर केल्यानंतर गैरअर्जदाराने अर्जदारास फक्त गाडीचे नुकसानी म्हणून 67,386/- रुपयेचा नुकसान भरपाई धनादेश दिला व सदर धनादेश हा जालना कार्यालय गैरअर्जदार यांनी दिला.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, गाडीचे नुकसानी रक्कम रु. 1,10,000/- झालेले असून अर्जदाराने संपूर्ण बिलाच्या मुळ प्रती गैरअर्जदार विमा कंपनीकडे दिलेल्या आहेत, पण गैरअर्जदार विमा कंपनीने जाणीवपूर्वक अर्जदारास 67,386/- रुपयांचा धनादेश दिला. तरी ती नुकसान भरपाई अर्जदारास मान्य नाही, असे म्हणून त्यांनी ते धनादेश दिला. अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, अर्जदार यांची गाडी नविन असून गैरअर्जदार विमा कंपनी चुकीचे पध्दतीने मुल्यांकन करुन अर्जदारास संपूर्ण नुकसान भरपाई दिली नाही. म्हणून अर्जदारास सदरची तक्रार मंचासमोर दाखल करावी लागली व मंचास विनंती केली आहे की, सदरचा तक्रार अर्ज मंजूर करुन गैरअर्जदारांना असा आदेश द्यावा की, त्यांनी रु. 60,000/- प्रतिमहा 18 टक्के व्याज दराने व्याजासहीत व अर्जाचा खर्च रु.2,000/- अर्जदारास देण्याचा आदेश पारीत करावा.
तक्रार अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर अर्जदाराने आपले शपथपत्र दाखल केलेले आहे. व नि.क्रमांक 5 वर 8 कागदपत्रांच्या यादीसह 8 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. ज्यामध्येवाहन चालवण्याचा परवाना, आर.सी.बुक, घटनास्थळ पंचनामा, ओमसाई मोटर्सचे बील, सेवा ऑटोमोबॉईल्स चे बील, सेवा ऑटोमोबॉईल्सचे बील, विमा पॉलिसी, धनादेशाची प्रत. इत्यादी कागदपत्रे दाखल केलेली आहेत.
गैरअर्जदारांना लेखी जबाब सादर करण्यासाठी नोटीसा काढण्यात आल्या, गैरअर्जदार वकिला मार्फत मंचासमोर हजर व नि.क्रमांक 9 वर आपला लेखी जबाब सादर केला. त्यात त्यांचे असे म्हणणे आहे की, सदरची तक्रार ही खोटी व बनावट आहे. तसेच त्यांनी मान्य केले आहे की, अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे व दिनाक 19/04/2012 रोजी अर्जदाराच्या इंडिका गाडीचा अपघात झाला होता, परंतु त्यांनी हे अमान्य केले आहे की, अर्जदारास सदरच्या अपघातामध्ये त्याच्या गाडीचे नुकसानरु.1,10,000/- झाले होते. तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, अर्जदाराने त्याच्या गाडीच्या अपघाता बद्दल माहिती दिल्यानंतर गैरअर्जदार विमा कंपनीने शासन मान्य सर्व्हेअरची नियुक्ती करुन सदरच्या अपघाता बद्दलची नुकसानी बद्दल सर्व्हे करण्यात आला व तो गैरअर्जदार विमा कंपनीकडे अहवाल सादर करण्यात आला. सर्व्हेअर रिपोर्ट प्रमाणे अर्जदाराच्या गाडीचे रु. 67,386/- चे नुकसान झाले होते, त्याप्रमाणे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास रु. 67,386/- चा धनादेश दिला व तो देखील धनादेश अर्जदाराने स्वीकारला व तसेच त्यांचे असे म्हणणे आहे की, वाहनाच्या नुकसान भरपाईच्या संदर्भात वाहन मालकाने नुकसान भरपाईची रक्कम कंपनीकडून एकदा स्वीकारली की, त्याला नंतर जास्तीची रक्कम कंपनी विरुध्द मागण्याचा अधिकार नाही व अर्जदाराने 67,386/- रुपये उचललेले आहे. कंपनी विरुध्द त्रुटीची सेवा दिल्याबद्दलचा तक्रारदार याचा आक्षेप नाही. तसेच तक्रार दाखल करण्यासाठी न्यायीक कारण नाही. म्हणून सदरची तक्रार खर्चासह खारीज करण्याची गैरअर्जदाराने मंचास विनंती केली आहे. व तक्रारदाराकडून 6,000/- रुपये अयोग्य तक्रार दाखल केली म्हणून मंजूर करावे. अशी विनंती केली आहे.
गैरअर्जदाराने लेखी जबाबाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 11 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे. व तसेच नि.क्रमांक 14 वर 2 कागदपत्रांच्या यादीसह 2 कागदपत्रे दाखल केलेली आहेत. त्यामध्ये 25/07/2012 चा अंतिम सर्व्हे रिपोर्ट व ओमसाई मोटर्स बिल इस्टीमेट बिलाच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत.
दोन्ही बाजुंच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे.
मुद्दे. उत्तर.
1 गैरअर्जदाराने अर्जदाराचे इंडिका कार एम.एच.22 एच.2487
अपघातात झालेली नुकसान भरपाई रक्कम रु.1,10,000/-
देण्याचे नाकारुन व केवळ रु.67,386/- अर्जदारास देवुन
गैरअर्जदाराने सेवेत त्रुटी दिली आहे काय ? नाही.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे.
मुद्दा क्रमांक 1.
अर्जदार हा इंडिका कार ज्याचा क्रमांक एम.एच.22 एच. 2487 चा मालक आहे. ही बाब नि.क्रमांक 5/2 वरील दाखल केलेल्या आर.सी.बुक प्रत वरुन सिध्द होते,तसेच अर्जदाराने गैरअर्जदाराकडे सदरच्या गाडीचा विमा काढला होता व सदरचा विमा कालावधी दिनांक 11/10/2011 ते 10/10/2012 पर्यंत वैध होता ही बाब अर्जदाराने दाखल केलेल्या नि.क्रमांक 5/7 वरील पॉलिसी प्रत वरुन सिध्द होते तसेच अर्जदाराची गाडी एम.एच.22 एच.2487 चा दिनांक 19/04/2012 रोजी अपघात झाला होता ही, बाब नि.क्रमांक 5/3 वरील दाखल केलेल्या एफ.आय.आर. प्रत वरुन सिध्द होते. सदरच्या अपघता मध्ये अर्जदाराच्या गाडीचे जवळपास 60,560/- रुपयांचे नुकसान झाले ही बाब नि.क्रिमांक 14/1 वरील फायनल सर्व्हे रिपोर्टच्या प्रत वरुन सिध्द होते, व तसेच सदरच्या अपघातापोटी गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदारास 67,386/- रुपयेचा चेक देवुन नुकसान भरपाई दिली ही बाब नि.क्रमांक 5/8 वरील धनादेश प्रत वरुन सिध्द होते. अर्जदाराचे म्हणणे सदरच्या अपघतामध्ये त्याच्या गाडीचे रु.1,10,000/- नुकसान झाले होते, हे म्हणणे मंचास योग्य वाटत नाही. व तसेच गैरअर्जदार विमा कंपनीने 67,386/- रुपयांचा चेक दिला व सदरचा चेक नुकसान भरपाई म्हणून अर्जदाराने स्वीकारला ही बाब त्याने स्वतः त्याच्या तक्रार अर्जामध्ये मान्य केलेली आहे. त्यामुळे अर्जदारास परत गैरअर्जदारा विरुध्द 60,000/- रुपये उर्वरित नुकसान भरपाई द्यावी असे म्हणण्याचे कायद्याने अर्जदारास काही एक अधिकार नाही, या बद्दल मा.राज्य आयोग मुंबई यांनी 2013 (2) सी.पी.आर. (1) महाराष्ट्र पान क्रमांक 1 मध्ये न्यु इंडिया इन्शुरंस कंपनी लि.विरुध्द मोहन दाजी सातव ज्याचा अपील क्रमांक एफ.ए. नंबर ए / 4 / 588 निर्णय तारीख 24/09/2012 मध्ये आयोगाने असे म्हंटले आहे की,
Discharge voucher without any protest and receiving amount offered by Respondent / Complainant acquiesced his claim. व सदरचे निर्णय या तक्रारीस लागु पडते.त्यामुळे गैरअर्जदार विमा कंपनीने अर्जदाराच्या गाडीची नुकसान भरपाई म्हणून रु. 67,386/- देवुन अर्जदारास कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी दिली नाही व चुक केली नाही.अर्जदार त्याची तक्रार सिध्द करण्यास पूर्णपणे असमर्थ ठरला आहे.म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर नकारार्थी देवुन मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज नामंजूर करण्यात येत आहे.
2 तक्रारीचा खर्च ज्याचा त्यांनी सोसावा.
3 आदेशाच्या प्रती पक्षकारांना मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य. मा.अध्यक्ष.