निकालपत्र
तक्रार दाखल दिनांकः- 17/08/2011
तक्रार नोदणी दिनांकः- 18/08/2011
तक्रार निकाल दिनांकः- 06/05/2013
कालावधी 01 वर्ष 08 महिने 18 दिवस
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच, परभणी
अध्यक्ष श्री.पी.पी.निटूरकर.B.Com.LL.B.
सदस्य
श्री.आर.एच.बिलोलीकर.B.Tech, MBA, DCM, LLB.
------------------------------------------------------------------------------------------------------------
महेश पिता माणिकराव रामपूरकर. अर्जदार
वय 20 वर्षे. व्यवसाय.शिक्षण. अड.एस.जी.बुरसे.
रा.विजय फोटो फ्रेम मेकर,बाबासाहेब मंदिर रोड,
सेलू ता.सेलू जि.परभणी.
विरुध्द
1 मा.कुलगुरु. गैरअर्जदार
स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ, सौ.एस.एम.चावरे.
नांदेड,ता.व जि.नांदेड.
2 मा.परिक्षा नियंत्रक,
स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ,
नांदेड,ता.व जि.नांदेड.
3 मा.प्राचार्य, अड.एस.एन.वेलणकर.
नूतन महाविद्यालय,सेलू ता.सेलू जि.परभणी.
------------------------------------------------------------------------------------
कोरम - 1) श्री.पी.पी.निटूरकर. अध्यक्ष.
2) श्री.आर.एच.बिलोलीकर सदस्य.
(निकालपत्र पारित व्दारा.श्री.आर.एच.बिलोलीकर.सदस्य.)
अर्जदार यांची तक्रार गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 विरुध्द त्यांनी दिलेल्या त्रुटीची व निष्काळजीपणाने सेवा दिली त्यामुळे अर्जदाराचे शैक्षणिक नुकसान झाले त्याची भरपाई मिळावी म्हणून दाखल केली आहे.
अर्जदाराचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, अर्जदार गैरअर्जदार क्रमांक 3 च्या महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष 2008-2009 या कालावधीत शिक्षण घेत होता.सदरील महाविद्यालय हे गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या विद्यापीठाशी संलग्न आहे.व गैरअर्जदार क्रमांक 2 हे स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मध्ये परीक्षा नियंत्रक आहेत.व ते गैरअर्जदार क्रमांक 1 यांच्या आदेशा नुसार व विद्यापीठ कायद्या अंतर्गत संलग्नीत परीक्षा घेतात.
अर्जदाराचे असे म्हणणे आहे की, शैक्षणिक वर्ष 2008-2009 मध्ये अर्जदाराने बी.सी.ए.प्रथम वर्षाच्या दुस-या सत्राची परीक्षा फी भरुन सदर अर्जदारास परीक्षाच्या वेळे पर्यंत परीक्षाचे प्रवेशपत्र मिळाले नाही. याबाबत अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अर्जदारास गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडून ते प्राप्त न झाल्याचे सांगीतले याला फक्त गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 याचा गैर कारभार व ते त्यांच्या चुकीमुळे अर्जदारास मिळाले नाही, व त्याला प्रवेश पत्र मिळण्यासाठी मानसिकत्रास सहन करावा लागला त्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 यांना परीक्षा केंद्रा मध्ये परीक्षेला बसू देण्याबाबत अर्जदाराने विनंती केली असता, गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदारास पी.एन.आर. नं. 2008016800170756 या क्रमांका वर अर्जदारास परीक्षा देण्याची परवानगी दिली, त्यानंतर सदरील परीक्षा ही दिनांक 29/04/2009 रोजी सुरु होवुन 10/05/2009 रोजी संपली व त्यानंतर परीक्षेचा निकाल ठराविक मुदती नंतर म्हणजे 20 जुलै 2009 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यानी जाहिर केला, तेव्हा अर्जदार हा आपला निकाल पाहण्यासाठी गेला असता त्याला असे समजले की, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदाराचा निकाल जाहिर केला नाही याबाबत अर्जदाराने गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे निकाल का लागला नाही याबाबत विचारणा केली असता प्रत्येक वेळेस उत्तर देण्याचे टाळले, परंतु गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी कळविले आहे की, आम्ही गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याशी पत्रव्यवहार केला, प्रतिनिधी सुध्दा पाठविल्या बाबत कळविले व अर्जदाराचा निकाल लवकरच घोषीत करुन त्याची गुणपत्रिका देण्यात येईल असे सांगीतले, परंतु तसे काही घडलेले नाही अर्जदाराचे हे म्हणणे आहे की, निकाल वेळेवर न लागल्यामुळे त्यास पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश घेता आले नाही किंवा अर्जदारास नापास म्हणून घोषीत केले असते तर परत अर्जदारास नापास झालेल्या वर्षाचे परीक्षा फॉर्म सादर करता आले असते, परंतु गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदाराचा निकाल लवकर घोषीत केलेला नाही, अर्जदाराचे हे म्हणणे आहे की,डिसेंबर 2009 पर्यंत अर्जदाराचा निकाल घोषीत न झाल्यामुळे शेवटी अर्जदाराच्या वडीलाने 22/12/2009 रोजी आर.टी.आय. 2005 नुसार अर्जदाराचा निकाल इतर विद्यार्थ्यांच्या निकाला सोबत का घोषीत करण्यात आला नाही व अर्जदाराचा निकाल घोषीत करुन त्याच्या गुणपत्रिकाची मागणी केली असता हे प्रकरण आपल्या अंगलट येत आहे असे गैरअर्जदाराच्या लक्षात येताच त्यांनी अर्जदाराचा चुकीचा व बनावट निकाल तयार करुन गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या मार्फत दिनांक 20/01/2010 रोजी अर्जदारास पत्राव्दारे कळविले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदाराचा निकाल 20/01/2010 रोजी घोषीत केला आहे व सोबत नापास झाल्याचे गुणपत्रिका अर्जदाराच्या वडीलांना दिली.
या संपूर्ण घटने बाबत अर्जदाराने त्याच्या वकिलां मार्फत गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांना निकाल विलंबाने घोषीत केल्यामुळे अर्जदाराचे झालेल्या शैक्षणिक नुकसानी बद्दल विचारणा करुन नुकसान भरपाई मागणीसाठी अर्जदाराने 10 फेब्रुवारी 2011 रोजी गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांस नोटीस पाठविली त्या नोटीसीस गैरअर्जदार क्रमांक 2 यांनी दिनांक 17 मार्च 2011 रोजी प्रती उत्तर दिले व त्यांनी अप्रत्यक्ष चुक मान्य करुन स्वतःचे अंग झटकून सर्व जबाबदारी महाराष्ट्र नॉलेज कार्पोरेशन लि.यांच्यावर टाकून विद्यापीठ परीक्षेचे संगणकीकरण करण्याचे काम त्यांना सोपविलेले होते असे स्पष्ट केले.
गैरअर्जदार क्रमांक 3 व गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्यातील समन्वयाचा विचार केला असता अर्जदाराने झालेल्या त्याच्या शैक्षणिक नुकसानीस गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 हेच जबाबदार आहेत त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांच्या विरुध्द सदरची तक्रार दाखल केली आहे,व गैरअर्जदार क्रमांक 1 ते 3 यांच्याकडून रु.5,00,000/- नुकसान भरपाई मिळावी व तसेच मानिकत्रासापोटी रु.20,000/- व अर्जाचा खर्च म्हणून रु. 10,000/- मिळावे, अशी मंचास विनंती केली आहे.
अर्जदाराने त्याच्या अर्जाच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 2 वर त्याचे शपथपत्र दाखल केले आहे.तसेच नि.क्रमांक 5 वर कागदपत्रांच्या यादीसह कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती दाखल केलेल्या आहेत.
गैरअर्जदारास मंचातर्फे नोटीस पाठवल्या नंतर नि.क्रमांक 20 वर गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी त्यांचा लेखी जबाब दाखल केला आहे. त्यांचे थोडक्यात असे म्हणणे आहे की, सदरचे अर्जदारास गैरअर्जदार क्रमांक 1 ते 2 विरुध्द तक्रार दाखल करण्याचा काही एक अधिकार नाही व तसेच अर्जदार विद्यार्थी आणि प्रतिवादी विद्यापीठ यांच्या मध्ये उपभोक्ता आणि सेवाप्रदाता या नात्या अभावी प्रस्तुत फिर्याद असमर्थनीय आहे. व या व्यतिरिक्त गैरअर्जदाराचे असे म्हणणे आहे की, फिर्यादी विद्यार्थीचा निकाल दिनांक 20/01/2010 रोजी घोषीत केल्यानंतर व त्याने कोठलाही आक्षेप न नोंदवता तो स्वीकारल्या नंतर तब्बल एक वर्षानंतर फिर्याद दाखल केली आहे. यामुळे सदरची तक्रार चालवण्यास योग्य नाही व खारीज करण्यात यावी, विद्यापीठाचे पुढे असे म्हणणे आहे की, फिर्यादी विद्यार्थीस तथाकथीत प्रवेशपत्र अप्राप्त झाल्यावर त्याने प्रतिवादी विद्यापीठाशी संदर्भीत कालावधीत कधीही संपर्क साधलेला नाही,गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदारास कायम नोंदणी क्रमांक पी.आर.एन.क्रमांकावर परीक्षेस बसू दिले हे विधान मान्य आहे तसेच संबंधीत परीक्षे करीता ज्या विद्यार्थ्यांना एम.के.सी.एल यांनी आसन क्रमांक दिले होते त्याच विद्यार्थ्यांचा निकाल विहित मुदतीत घोषीत केला गेला. अर्जदार विद्यार्थ्यांने अथवा गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी जुलै 2009 मध्ये निकाल घोषीत झाल्यानंतरही माहे नोव्हेंबर 2009 पर्यंत प्रतिवादी विद्यापीठास कधीही संपर्क साधला नाही, अथवा विचारणा केली नाही.गैरअर्जदार क्रमांक 3 महाविद्यालयाचे पत्र दिनांक 16/11/2009 रोजीचे सोबत जोडले आहे.गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचे पूढे असे ही म्हणणे आहे की, सन 2008-2009 या वर्षात जवळपास 20 हजार विद्यार्थी बी.सी.एस. परीक्षेस बसले होते याच वेळी महाराष्ट्र शासनाने दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यामध्ये विद्यार्थी प्रवेश तथा परीक्षा पध्दती संगणकीकृत करण्याची सुरवात झाली राज्याच्या जवळपास सर्वच विद्यापीठांनी एम.के.सी.एल. या संस्थेकडे परीक्षेच्या संगणकीकरणाची जबाबदारी सोपवली होती, या संपूर्ण प्रक्रियेत विद्यार्थ्यांचा विद्यापीठाशी कधीही थेट संबंध येत नव्हता एम.के.सी.एल. यांनी स्थानिक प्रतिनिधींची नेमणुक करुन विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालया मध्ये प्रत्यक्ष जावुन माहाविद्यालयाने सांगीतल्यानुसार परीक्षा आवेदनपत्राचे ऑनलाईन संकलन करणे हे त्यांना ठरवुन दिलेली जबाबदारी होती.विद्यांर्थ्यांच्या परीक्षा आवेदनपत्रांची माहिती ऑनलाईन संकलित केल्यानंतर, आसन क्रमांक देवुन विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र महाविद्यालयांना ऑनलाईन एम.के.सी.एल.ने देणे अभिप्रेत होते.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांचे पुढे असे म्हणणे आहे की, विद्यापीठाने 20 जुलै 2009 रोजी निकाल घोषीत केल्यानंतर फिर्यादी विद्यार्थ्याने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 कडे कधीही चौकशी केली नाही जवळपास 4 महिन्या नंतर गैरअर्जदार क्रमांक 3 महाविद्यालयाने फिर्यादी विद्यार्थ्याच्या माहिती बाबत चौकशी करण्याचे पत्र दिले, जे गैरअर्जदार विद्यापीठाच्या परीक्षा विभागास दिनांक 29/12/2009 रोजी प्राप्त झाले जवळपास 20 हजार विद्यार्थ्यांच्या उत्तर पत्रिकेचा तपास करण्याचे डोंगरा एवढे काम
अपु-या मनुष्यबळासहीत केल्यानंतर प्रतिवादी विद्यापीठाने पत्र प्राप्तीनंतर अक्षरशः 20 दिवसांत दिनांक 20 जानेवारी 2010 रोजी फिर्यादी विद्यार्थ्यांचा निकाल घोषीत केला.गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदाराचे इतर मुद्ये नाकारले आहे. व मंचास विनंती केली आहे की, अर्जदाराची तक्रार फेटाळण्यात यावी.
गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी आपल्या म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 22 वर दिलेल्या यादी प्रमाणे कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती जोडलेल्या आहेत.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी आपले म्हणणे नि.क्रमांक 23 वर दाखल केलेले आहे. त्यांचे थोडक्यात म्हणणे असे आहे की, अर्जदार व गैरअर्जदारा मध्ये ग्राहक सेवा उपभोक्ता व सेवा प्रदान करणारा विक्रेता हे नातेच निर्माण होत नाही व त्यामुळे अर्जदारास ग्राहक म्हणून या मंचासमोर दाद मागण्याचा व तसेच या विद्यमान मंचास हा वाद चालवण्याचा अधिकार पोहचत नाही, व म्हणून या मुळ कायद्याच्या आक्षेपावर ही तक्रार पूर्णपणे फेटाळण्या योग्य आहे.
गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी हे मान्य केले आहे की, अर्जदाराने 2008-2009 या शैक्षणिक वर्षात बी.सी.ए. प्रथम वर्षी या वर्गात शिक्षण घेतले हे मान्य केले आहे.व तसेच गैरअर्जदाराने हे देखील मान्य केले आहे की, अर्जदाराने व्दितीय सत्राची परीक्षा फीस भरली होती व गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी मुदतीत सदरील फिस गैरर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्यकाडे पाठवली होती तरी देखील अर्जदारास वेळेवर परीक्षेचे प्रवेशपत्र मिळाले नाही तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 यांचे हे म्हणणे आहे की, महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शना प्रमाणे गैरर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी परीक्षा फॉर्म ऑनलाईन भरुन घेने व त्या नंतर प्रवेशपत्र त्या त्या महाविद्यालयांना देणे हे काम एम.के.सी.एल. या संस्थेस दिले होते व त्या संस्थेने तसे सॉफ्टवेअर डेव्हलप करुन गैरअर्जदाराच्या अधिपत्या खालील सर्व महाविद्यालयांना त्या प्रमाणे जोडण्यात आले होते. ती सर्व संलग्न महाविद्यालये ऑनलाईन फार्मस हे एम.के.सी.ल. कडे पाठवत होते व नंतर ते त्यांच्याव्दारे विद्यापीठात पाठवत होते अर्जदारास त्याचे प्रवशेपत्र न मिळाल्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी तात्काळ गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांना दुरध्वनी वरुन कल्पना देवुन एम.के.सी.एल.कडून पी.आर.एन. क्रमांक 2008016800170756 या नंबरवर अर्जदारास परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली त्यामुळे गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी कोणतीही त्रुटी किंवा निष्काळजीपणेची सेवा दिलेली नाही व तसेच गैरअर्जदार क्रमांक 3 यांचे असे ही म्हणणे आहे की, सदर परीक्षेचा निकाल लागल्यानंतर गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी गैरअर्जदार कमांक 1 व 2 यांच्याकडे वारंवार अर्जदाराच्या निकालपत्र पाठवुन देणे बाबत पाठपुरावा केला,परंतु अर्जदाराची गुणपत्रिका मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी कोणत्याही प्रकारची सेवेत त्रुटी केली नाही, म्हणून सदरची तक्रार त्यांच्या विरुध्द फेटाळण्यात यावी. अशी मंचास विनंती केली आहे.गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी आपल्या लेखी म्हणण्याच्या पुष्टयर्थ नि.क्रमांक 24 वर आपले शपथपत्र दाखल केले आहे.
दोन्ही पक्षाच्या कैफियतीवरुन निर्णयासाठी उपस्थित होणारे मुद्दे खालील प्रमाणे.
मुद्दे उत्तर
1 गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदारास निष्काळजीपणा दाखवुन
सेवेत त्रुटी दिली आहे काय ? होय.
2 आदेश काय ? अंतिम आदेशा प्रमाणे.
कारणे
अर्जदाराने हे सिध्द केले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्या कॉलेज मध्ये 2008-2009 या शैक्षणिक वर्षात बी.सी.ए. च्या प्रथम वर्षासाठी प्रवेश घेतले होते. व तसेच अर्जदाराने हे देखील सिध्द केले आहे की, 2009 मध्ये वार्षिक परीक्षेसाठी त्याने गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे फिस भरली होती व तसेच अर्जदाराने हे पण सिध्द केले आहे की अर्जदारास सदरील परीक्षेसाठी गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडून वेळेत प्रवेशपत्र मिळाले नव्हते व तसेच अर्जदाराने हे देखील सिध्द केले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 3 यांच्याकडे एम.के.सी.एल.व्दारे पी.आर.एन. नंबर वर 2008016800170756 या क्रमांका वरती परीक्षा देण्याची परवानगी देण्यात आली याबाबतचा कागदोपत्री पुरावा अर्जदाराने नि.क्रमांक 5 वरील कागदपत्राच्या यादीसह दाखल कलेल्या झेरॉक्स प्रतीवरुन सिध्द केलेला आहे.अर्जदाराने हे देखील सिध्द केले आहे की, त्याने दिलेल्या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षेचा निकाल जानेवारी 2010 मध्ये लागला ही अडमिटेड फॅक्ट आहे. गैरअजदार क्रमांक 1 व3 यांनी अर्जदाराचा निकाल उशिरा लागला हे देखील मान्य केलेले आहे. गैरअर्जदार क्रमांक 1 यांचे असे म्हणणे आहे की, गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी सदर परीक्षेचा निकाल विद्यापीठाने 20 जुलै 2009 रोजी घोषीत केल्यावर गैरअर्जदार क्रमांक 3 महाविद्यालयाने जवळपास 4 महिन्या नंतर फिर्यादी विद्यार्थ्याच्या निकाला बाबत चौकशी करणारे पत्र दिले जे प्रतिवादी विद्यापीठाच्या परीक्षा विभागास 29/12/2009 रोजी प्राप्त झाले. सदर पत्राची झेरॉक्स प्रत नि.क्रमांक 22 वर दाखल कलेली आहे.आणि तरीपण विद्यापीठाने अक्षरशः 20 दिवसांत म्हणजे दिनांक 20 जानेवारी 2010 रोजी फिर्यादी विद्यार्थ्यांचा निकाल घोषीत केला यावरुन असे दिसते की, गैरअर्जदार क्रमांक 3 महाविद्यालयाने विद्यापीठाशी 20 जुलै 2009 नंतर लगेचच विद्यापीठाशी पत्रव्यवहार केला असता अथवा चौकशी केली असती तर अर्जदार विद्यार्थ्याचा निकाल ऑगस्ट 2009 मध्ये लागला असता यावरुन मंचास असे वाटते की, महाविद्यालयाने विद्यापीठाशी लवकर संपर्क न साधता / चौकशी न केल्यामुळे विद्यार्थ्याचे नुकसान झालेले आहे व महाविद्यालयाचा निष्काळजीपणा दिसून आलेला आहे.
मा.सर्वोच्च न्यायालयाने दिलेले निकाल 2009 (4) सी पी.आर.421 (एस.सी.) पेज नंबर 27 सिव्हील अपील नंबर 3911/2003 बिहार स्कुल एक्झामिनेशन बोर्ड विरुध्द सुरेश प्रसाद सिन्हा या प्रमाणे विद्यापीठाचे परीक्षा घेण्याचे कार्य हे संवैधानीक कार्य असून ते सी.पी.अक्ट 1986 च्या अन्वये सेवा या सदरा खाली येत नाही,म्हणून सदरील निकालाचा आधार घेवुन मंचाचे हे मत झाले आहे की, गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांनी अर्जदारास कसल्याही प्रकारची निष्काळजीपणेची सेवेत त्रुटी दिलेली नाही म्हणून गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांस जबाबदार धरता येत नाही, याला गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदाराचा निकाल वेळेत न आल्यामुळे तात्काळ त्याने गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडे संपर्क करणे आवश्यक होते व तसे संपर्क केल्याचा पुरावा गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी मंचासमोर आणलेला नाही. गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी जुलै 2009 मध्ये निकाल लागल्यानंतर नोव्हेंबर 2009 मध्ये गैरअर्जदार क्रमांक 1 व 2 यांच्याकडे अर्जदाराच्या निकाला बद्दल चौकशी केली यावरुन हे स्पष्ट होते की, गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अत्यंत चुकीच्या व निष्काळजीपणाने अर्जदाराचे प्रकरण हाताळून अर्जदारास झालेल्या नुकसानीस गैरअर्जदार क्रमांक 3 हेच जबाबदार आहे.
म्हणून मुद्दा क्रमांक 1 चे उत्तर होकारार्थी देवुन हे मंच पुढील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1 अर्जदाराचा तक्रार अर्ज अंशतः मंजूर करण्यांत येत आहे.
2 गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी निकाल कळाल्यापासून 30 दिवसांच्या आत अर्जदारास त्याला झालेल्या नुकसानी बद्दल रक्कम रु.20,000/- फक्त (अक्षरी रु.विसहजार फक्त) द्यावे.
3 गैरअर्जदार क्रमांक 3 यांनी अर्जदारास तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- फक्त
( अक्षरी रु.एकहजार फक्त ) आदेश मुदतीत द्यावे.
4 पक्षकारांना आदेशाच्या प्रती मोफत पुरवाव्यात.
श्री.आर.एच.बिलोलीकर. श्री. पी.पी.निटूरकर
मा.सदस्य मा.अध्यक्ष