नि.37
मे. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, सांगली यांचेसमोर
मा.अध्यक्ष – श्री ए.व्ही.देशपांडे
मा.सदस्या - श्रीमती वर्षा शिंदे
ग्राहक तक्रार अर्ज क्र. 573/2010
तक्रार नोंद तारीख : 23/11/2010
तक्रार दाखल तारीख : 25/11/2010
निकाल तारीख : 23/07/2013
----------------------------------------------
1. श्रीमती मंगल विष्णू नेर्लेकर
2. श्री हेमचंद्र विष्णू नेर्लेकर
रा. साई सर्जीकल अॅण्ड मॅटर्निटी हॉस्पीटल
चर्चजवळ, यल्लम्मा देवी चौक, इस्लामपूर
ता.वाळवा जि.सांगली ....... तक्रारदार
विरुध्द
1. उत्तरेश्वर नागरी सहकारी पतसंस्था लि.शिरगांव
मुख्य कार्यालय शिरगांव, पलूस जि.सांगली
2. श्री विठ्ठल रामचंद्र माने (चेअरमन)
रा.मु.शिरगांव पो.देवराष्ट्रे, ता.कडेगांव जि.सांगली
3. श्री श्रीपाद सिताराम कुलकर्णी, (व्हा.चेअरमन)
रा.मु.पो.भाळवणी, ता.खानापूर जि.सांगली
4. श्री बाळासो पांडुरंग जाधव, (संचालक)
रा.मु.पो.भाळवणी, ता.खानापूर जि.सांगली
5. श्री बजरंग नामदेव घोरपडे, (संचालक)
रा.मु.पो.भाळवणी, ता.खानापूर जि.सांगली
6. श्री आनंदा नागू जगदाळे (संचालक)
रा.मु.पो.भाळवणी, ता.खानापूर जि.सांगली
7. श्री भाऊसो ज्ञानू पाटील (संचालक)
रा.मु.पो.बोरगांव, ता.वाळवा जि.सांगली
8. श्री विलास जयसिंग शिंदे (संचालक)
रा.मु.पो.बोरगांव, ता.वाळवा जि.सांगली
9. श्री तानाजी विष्णू वाटेगांवकर (संचालक)
रा.मु.पो.बोरगांव, ता.वाळवा जि.सांगली
10. श्री हणमंत रामचंद्र माने (संचालक)
रा.मु.शिरगांव पो.देवराष्ट्रे, ता.वाळवा जि.सांगली
11. श्री उत्तम परशुराम पवार (संचालक)
रा.मु.पो.भाळवणी, ता.खानापूर जि.सांगली
12. श्री संतोष भिमराव सपाटे (संचालक)
रा.मु.पो.ताकारी, ता.वाळवा जि.सांगली
13. सौ शितल श्रीकांत जाधव (स्वीकृत संचालक)
रा.मु.पो.कुंडल, ता.पलूस जि.सांगली ..... जाबदार
तक्रारदार तर्फे : अॅड श्री एस.एस.हंगड
जाबदारक्र.5 : अॅड बी.व्ही.मोहिते
जाबदारक्र.1 ते 4, 6 ते 13 : एकतर्फा
- नि का ल प त्र -
द्वारा: मा. सदस्या : श्रीमती वर्षा शिंदे
1. प्रस्तुतची तक्रार सामनेवाला यांनी मागणी करुनही ठेव रक्कम अदा न केलेने दाखल केली आहे. तक्रार स्वीकृत करुन सामनेवालांना नोटीस आदेश झाला. सामनेवाला क्र.5 हे वकीलांमार्फत हजर होवून त्यांनी त्यांचे लेखी म्हणणे नि.26 ला दाखल केले आहे. सामनेवाला क्र.2 ते 6, 9 व 11 ते 13 यांना नोटीस लागू होऊनही मे.मंचासमोर ते उपस्थित नाहीत, सबब त्यांचेविरुध्द हे मंच एकतर्फा आदेश पारीत करीत आहे. नि.1 वर, सामनेवाला क्र.1 यांचे ऑफिस बंद आहे, सामनेवाला क्र.7 या नावाचे कोणी नाही, सामनेवाला क्र.8 यांचा एन.सी.शेरा व सामनेवाला क्र.10 नोटीस स्वीकारत नाहीत अशा नोंदी नमूद आहेत. सबब त्यांचेविरुध्द एकतर्फा आदेश पारीत करण्यात येत आहे.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी –
सामनेवाला क्र.1 ही सहकारी पतसंस्था असून सामनेवाला क्र.2 व 3 हे अनुक्रमे सामेनवाला क्र.1 चे चेअरमन व व्हा.चेअरमन असून सामनेवाला क्र.4 ते 13 हे संचालक आहेत. तक्रारदाराने सामनेवालांच्या इस्लामपूर शाखेत दि.5/12/2001 रोजी रु.40,000/- इतकी मुदत ठेव ठेवली होती. सदर ठेवपावतीची मुदतीनंतर झालेली ठेवरक्कम व्याजासहीत तक्रारदाराचे सेव्हिंग्ज खाते क्र.12 मध्ये दि.16/8/08 रोजी वर्ग केलेली होती. त्याप्रमाणे तक्रारदाराने सेव्हिंग्ज खातेवरुन वेळोवेळी रकमांची उचल केलेली आहे. मात्र सदर खातेवर अद्यापही रु.21,589/- इतकी रक्कम दि.21/11/08 पासून शिल्लक आहे. सदर दिवसापासून सदर शाखा बंद पडल्याने सदर रक्कम मिळाली नाही. त्याबाबत तक्रारदाराने तोंडी विनंती करुनही दाद न मिळाल्याने दि.30/3/10 रोजी रजि. नोटीस पाठविली. तरीही रक्कम न मिळाल्याने प्रस्तुतची तक्रार दाखल केलेली आहे. सबब सामनेवाला क्र.1 ते 13 यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरुन रु.50,000/- नुकसानीपोटी तसेच सेव्हिंग्ज खातेवरील रक्कम रु.21,589/-, दि.21/11/08 पासून संपूर्ण रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे. 14 टक्के व्याजासह मिळावी अशी विनंती केली आहे.
3. तक्रारीच्या पुष्ठयर्थ नि. 3 ला शपथपत्र व नि.5 चे फेरिस्तप्रमाणे एकूण 7 कागदपत्रे दाखल केली आहे.
4. सामनेवाला क्र.5 याने दाखल केलेले लेखी म्हणण्यानुसार तक्रारदारची तक्रार नाकारली आहे. त्यांनी दि.13/3/2008 रोजीच सामनेवाला संस्थेचा राजीनामा दिला असून दि.10/6/2008 रोजी सदर राजीनामा स्वीकारणेसंदर्भात जिल्हा सहकारी उपनिबंधक यांचेकडे पाठविला आहे. तदनंतर संचालक या नात्याने मिटींगची नोटीस वगैरे आली नाही, त्यामुळे त्यांना जबाबदार धरता येणार नाही. तक्रारदारचा तक्रारअर्ज नामंजूर करावा अशी विनंती केली आहे. सामनेवाला क्र.5 यांनी आपले म्हणणेचे पुष्ठयर्थ नि.27 वर शपथपत्र व नि.28 वरील फेरिस्तप्रमाणे कागद दाखल केले आहेत. तसेच नमूद सामनेवाला क्र.1 संस्थेचे व्हार्इस चेअरमन यांनी नि.21 व 36 वर तक्रारदारास रक्कम अदा केल्याबाबतचे अर्ज दाखल केले आहेत.
5. तक्रारदाराची तक्रार, सामनेवाले क्र.5 चे म्हणणे व पुराव्यादाखल कागदपत्रे यांचा विचार करता सदर प्रकरणी खालील मुद्दे आमच्या निष्कर्षाकरिता उपस्थित होतात.
मुद्दे उत्तरे
1. प्रस्तुतची तक्रार मंजूर करणेस पात्र आहे काय ? नाही.
2. अंतिम आदेश खालीलप्रमाणे
कारणे
मुद्दा क्र.1 व 2
6. तक्रारदारांनी दाखल केलेल्या नि.5/1 वरील सेव्हिंग्ज खाते क्र.12 चे मूळ सेव्हिंग्ज पासबुकाचे अवलोकन केले असता दि.20/11/2008 रोजी रक्कम रु.21,589/- शिल्लक दिसून येते. सदर खाते तक्रारदार क्र.1 व 2 यांचे नावे असून त्यांचे नाते आई व मुलगा असल्याचे निदर्शनास येते. सदर रकमांची मागणी नोटीसा पाठवून केलेचे नि.5/2 वरील दाखल नोटीसवरुन दिसून येते. नमूद सामनेवाला क्र.1 संस्थेचे व्हाईस चेअरमन श्रीपाद सिताराम कुलकर्णी यांनी नि.21 वर अर्ज दाखल करुन तक्रारदाराचे सदर सेव्हिंग्ज खातेवरील रक्कम रु.11,589/- दि.31/12/2010 चे आत अदा करणेची होती व राहिलेली रक्कम रु.10,000/- शासनाचे मंजूर पॅकेजमधून त्यांना मिळणार होते. त्याप्रमाणे सामनेवाला संस्थेने रु.11,589/- इतकी रक्कम तक्रारदारास अदा केली आहे व शासनाचे पॅकेज न मिळाल्यास सदर रु.10,000/- रक्कम देण्यासही ते तयार असल्याचे नमूद केले आहे. नि.36 नुसार संस्थेचे व्हाईस चेअरमन यांनी रु.11,589/- डिसेंबर 2011 मध्ये दिलेले आहेत व राहिलेली रक्कम रु.10,000/- दि.25/6/12 रोजी रोख दिल्याचे अर्जावर नमूद केले आहे. नि.36 वर सदर अर्जासोबतच सामनेवाला यांनी तक्रारदारास रु.10,000/- पूर्ण मिळाली असल्यामुळे संस्थेकडे येणे-देणे काही नाही असे तक्रारदाराने लिहून दिलेबाबत कागद दाखल केला आहे. तसेच सदर अर्जावर तत्कालीन मंचाने तक्रारदाराने म्हणणे द्यावे म्हणून आदेश पारीत केला आहे. सदर अर्जावर तक्रारदारांनी म्हणणे दिलेले नाही. तदनंतर ते सातत्याने आजअखेर नेमलेल्या तारखांना गैरहजर राहिलेचे दिसते. यावरुन प्रस्तुत रक्कम त्यांना मिळालेली आहे असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरणार नाही. सबब वरील पुराव्याचा विचार करता गुणदोषावर हे मंच प्रस्तुत तक्रार नामंजूर करण्याच्या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे व खालील आदेश पारीत करण्यात येत आहे.
आदेश
1. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज नामंजूर करणेत येत आहे.
2. खर्चाबाबत कोणतेही आदेश नाहीत.
सांगली
दि. 23/07/2013
( वर्षा शिंदे ) ( ए.व्ही.देशपांडे )
सदस्या अध्यक्ष