जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच,नांदेड. प्रकरण क्रमांक :- 228/2008. प्रकरण दाखल तारीख - 25/06/2008 प्रकरण निकाल तारीख - 12/12/2008 समक्ष – मा.श्री. बी.टी.नरवाडे पाटील, - अध्यक्ष मा.श्रीमती सुजाता पाटणकर - सदस्या श्रावण पि. लक्ष्मण चव्हाण वय, 55 वर्षे, धंदा, शेती. रा.किन्होळा ता. वसमत जि. हिंगोली. अर्जदार विरुध्द. 1. उत्तम कृषि सेवा केंद्र, नवा मोंढा, नांदेड 2. यशोदा हैब्रीड सिडस प्रा.लि. गैरअर्जदार नोंदणीकृत कार्यालय, 248, लक्ष्मी टॉकीज जवळ, हिंगणघाट-442 301 जि.वर्धा. अर्जदारा तर्फे वकील - अड.महेश भूसे गैरअर्जदार क्र.1 व 2 तर्फे - अड.पी.एस.भक्कड निकालपञ (द्वारा - मा.श्रीमती सुजाता पाटणकर, सदस्या ) गैरअर्जदार यांनी अर्जदारास ञूटीची सेवा दिली म्हणून अर्जदाराने ही तक्रार दाखल केली आहे. अर्जदार हे मौजे किन्होळा ता. वसमत जि. हिंगोली येथील रहीवासी असून त्यांला गट नंबर 45/ए मध्ये 1 हेक्टर जमीन आहे व त्यावर ते आपल्या कूटूंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी गैरअर्जदार क्र. 2 या गंगाकावेरी कंपनीने उत्पादीत केलेले सूर्यफूल बियाण्याची एक बँग व यशोदा कंपनीच्या सुर्यफूलाच्या दोन बँग ज्यांचा लॉट नंबर 701 किंमत रु.1000/- गैरअर्जदार क्र. 1 कडून पावती नंबर 000011 घेऊन विकत घेतली. दि.16.1.2008 रोजी बियाणे पेरले होते. गंगाकावेरी सूर्यफूलाचे बियाणे चांगले उगवले. परंतु यशोदा कंपनीचे सूर्यफूलाचे बियाणे उगवले नाही. गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांना त्याबाबत तक्रार केली परंतु त्यांचे कोणतेही प्रतिनीधी किंवा अधिकारी आले नाही त्यांनी पाहणी केली नाही. अर्जदाराने दि.31.1.2008 रोजी कृषी अधिकारी, पंचायत समिती वसमतनगर यांच्याकडे तक्रार केली तसेच दि.1.2.2008 रोजी कृषी अधिकारी, जिल्हा परीषद नांदेड यांचेकडे अर्ज दिला. त्याप्रमाणे कृषी विकास अधिकारी जि. प. हिंगोली, वनस्पती शास्ञज्ञ, महाराष्ट्र कृषी विद्यापीठ, परभणी, सहायक क्षेञ अधिकारी महाबिज, वसमत, विस्तार अधिकारी कृषी पंचायत समिती वसमत यांनी अर्जदार यांचे शेत गट नंबर 45/1 मध्ये स्वतः येऊन प्रत्यक्ष शेताची पाहणी केली व पंचनाम्यात त्यांनी यशोदा कंपनीच्या बॅग लेबल नंबर 701338 लॉट नंबर के-07-23008 चे बियाणे हे 45 टक्के उगवण झाल्याचे नमूद केले. त्या पंचनाम्यावर साक्षीदारांनी सहया केल्या व पंचानी सहया केल्या आहेत. तसेच मंडळ अधिकारी वीभाग गिरगांव ता. वसमत तसेच तलाळी किन्होळा यांनी दि.3.4.2008 रोजी अर्जदाराच्या शेतात पाहणी करुन पंचनामा केला व त्यात बियाणे 25 टक्के उगवले असे आढळून आले. निकृष्ट बियाण्यामूळे अर्जदार यांचे अतोनात नूकसान झाले. अर्जदार यांचे नांगरणी व वखारणीचा खर्च, यशोदा कंपनीच्या बॅग, भिजवणीचा खर्च, पाणी पटटी, पेरणीचा खर्च, खत, पिक उत्पन्नाचा खर्च, तसेच मानसिक व शारीरिक ञास मिळून एकूण रु.95,240/- एवढे नूकसान झाले ते गैरअर्जदारांकडून मिळावे अशी मागणी केली आहे. गैरअर्जदार क्र. 1 व 2 हे वकिलामार्फत हजर झाले त्यांनी आपले लेखी म्हणणे दाखल केले आहे. गैरअर्जदार क्र. 1 हे व्यापारी आहेत, उत्पादक नाहीत. त्यांनी फक्त बियाणे विक्री केलेले आहे. त्यामूळे बियाण्यातील दोषाबददल त्यांना जबाबदार धरता येणार नाही. म्हणून त्यांचे विरुध्दची तक्रार फेटाळावी असे म्हटले आहे. अर्जदार हा 41/1 चा मालक आहे हे त्यांना अमान्य आहे. गैरअर्जदार यांना हे मान्य नाही की, यशोदा कंपनीचे बियाणे उगवले नाही. अर्जदार यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडे कधीही बियाण्याबददल तक्रार केलेली नाही.कृषी अधिकारी नांदेउ व कृषी अधिकारी पंचायत समिती वसमत यांना तक्रारीची दखल घेण्याचा अधिकार नाही. पंचानी केलेला पंचनामा गैरअर्जदार यांनी अमान्य केला आहे. अधिका-यांनी पंचनामा करतेवेळी गैरअर्जदार यांना सूचना अथवा नोटीस दिलेली नाही. त्यांचे माघारी पंचनामा केला असल्यामूळे त्यांना तो मान्य नाही. सदरील बियाणे महाराष्ट्र शासनाच्या बियाणे प्रयोगशाळेत तपासलेले आहेत त्यांची उगवण शक्ती 82 टक्के आहे. ते बियाणे प्रयोगशाळेत तपासून त्यांला प्रमाणपञ दिलेले आहे. अर्जदाराला कोणत्याही प्रकारचे नूकसान झालेले नाही. त्यामूळे त्यांना कोणताही मानसिक ञास झालेला नाही.सदर प्रकरण या मंचास चालविण्याचा अधिकार नाही तसेच सदर प्रकरण मूदतीत नाही त्यामूळे फेटाळण्यात यावे अशी मागणी केली आहे. कृषी विकास अधिकारी जिल्हा परीषद नांदेड यांना बियाण्याच्या गूणवतेबददल तज्ञ शास्ञीय मत व्यक्त करण्याची त्यांची पाञता नाही व तसा त्यांना अधिकार नाही. हरीत क्रांती कृषी केंद्र नांदेड यांना आवश्यक पार्टी केलेले नाही त्यामूळे सदर तक्रार फेटाळावी असे म्हटले आहे. कृषी विकास अधिकारी यांनी गैरअर्जदार क्र. 2 यांचेकडून बियाण्याचा नमूना घेऊन त्यांची शास्ञोक्त पध्दतीने तपासणी करुन घेणे जरुरी होते व जर तसे कले असते तर वस्तुस्थिती समोर आली असती. त्यामूळे बियाणे निकृष्ट दर्जाचे होते असे म्हणता येणार नाही. त्यामूळे बियाणे निकृष्ट दर्जाचे होते हे सिध्द न झाल्यामूळे सदर तक्रार खारीज करण्यात यावी असे म्हटले आहे. बियाणे कमी उगवणे यास बरेच कारणे असू शकतात त्यामध्ये वेळेवर पाणी कमी असणे, हलकी जमीन असणे, उष्ण वातावरण असणे किंवा उशिरा पेरणी करणे, बियाणे किडयांनी किंवा पाखंरानी, खारीनी खाऊन घेणे इत्यादीचा समावेश आहे. त्यामूळे बियाणे निकृष्ट दर्जाचे होते असे म्हणता येणार नाही. या बियाण्याबददल इतर कोणत्याही शेतक-यांनी तक्रार केलेली नाही. म्हणून सदर तक्रार ही खर्चासह फेटाळण्यात यावी अशी मागणी गैरअर्जदारांनी केली आहे. अर्जदार यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ तसेच गैरअर्जदार क्र. 1 व 2 यांनी पूरावा म्हणून आपले शपथपञ दाखल केले आहे. दोन्ही पक्षकारानी दाखल केलेले दस्ताऐवज बारकाईने तपासून व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद ऐकून खालील मूददे उपस्थित होतात. मूददे उत्तर 1. अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत काय ? होय. 2. गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलीआहे काय ? होय. 3. अर्जदार गैरअर्जदार यांच्याकडून नूकसान भरपाईपोटी रक्कम मिळण्यास पाञ आहेत काय ? होय. 4. काय आदेश ? अंतिम आदेशाप्रमाणे कारणे मूददा क्र. 1 ः- अर्जदार यांनी प्रस्तूतच्या अर्जासोबत त्यांचे शेतामध्ये सूर्यफूल बियाणे पेरलेले होते असे म्हटले आहे. सदर अर्जासोबत अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून सूर्यफुल बियाणे घेतल्याची मूळ पावती दि.12.1.2008 रोजीची दाखल केली आहे.गैरअर्जदार यांनी सदरची बाबत त्यांचे लेखी म्हणणे मध्ये व शपथपञामध्ये नाकारलेली नाही. अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेली कागदपञे यांचा विचार करता अर्जदार हे गैरअर्जदार यांचे ग्राहक आहेत असे या मंचाचे मत आहे. म्हणून मूददा क्र. 1 चे उत्तर वरील प्रमाणे देण्यात आले. मूददा क्र.2 ः- अर्जदार यांनी त्यांचे शेतात 1 हेक्टर या क्षेञामध्ये सूर्यफुल बियाणे पेरलेले होते. सदरच्या बियाण्याची उगवण झाली नाही म्हणून अर्जदार यांनी कृषी अधिकारी यांचेकडे तक्रार केली होती. अर्जदार यांनी अर्जासोबत जिल्हा परीषद हिंगोली, मोहीम अधिकारी यांचे दि.20.2.2008 रोजीचा पंचनामा दाखल केलेला आहे. सदर पंचनाम्याचे अवलोकन केले असता अर्जदार यांचे शेतामध्ये बियाणे उगवण न झाल्यामूळे अर्जदार यांचे 55 टक्के नूकसान झालेले आहे असे नमूद केलेले दिसत आहे. सदर पंचनामा मोहीम अधिकारी, विस्तार अधीकारी, (कृषी) जिल्हा परीषद सदस्या यांचे सहया दिसून येत आहेत. गैरअर्जदार यांनी त्यांचे लेखी म्हणण्यामध्ये व शपथपञामध्ये अर्जदार यांचे शेतात पेरलेले सूर्यफूल बियाणे उगवले नाही ही बाब नाकारलेली आहे. गैरअर्जदार यांनी बियाणे संदर्भातील प्रयोगशाळेचा अहवाल दाखल केलेला आहे. अर्जदार यांचे बियाणे खरेदी पावतीवरील लॉट नंबर व प्रयोगशाळेतील अहवालाचे लॉट नंबर मध्हये तफावत दिसून येते आहे. त्यामूळे गैरअर्जदार यांनी दाखल केलेला प्रयोगशाळेचा परिक्षण अहवाल पूराव्याचेकामी वाचता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी सदरची तक्रार सूर्यफुल बियाण्याची उगवण झाली नाही या करिता केलेली आहे. सदर अर्जाचे साबत कृषी अधिकारी यांचे पंचनामा दाखल केलेला आहे. सदर पंचनाम्यानुसार अर्जदार यांचे शेतामध्ये 55 टक्के उगवण आढळून आली नाही म्हणजेच अर्जदार यांचहे एकूण उत्पन्नापैकी 55 टक्के नूकसान झाल्याचे स्पष्ट होत आहे. अर्जदार यांचे शेतातील सूर्यफुल बियाणे उगवले नसल्यामूळे अर्जदार यांचे नूकसान झालेले आहे. सदरची मागणी अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडे केलेली आहे परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार यांची सदरची मागणी फेटाळली आहे. अर्जदार यांचे शेतातील पिकाचे नूकसान हे गैरअर्जदार यांचेकडून घेतलेल्या बियाण्याची उगवण न झाल्याने झालेले आहे, परंतु गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सदर नूकसानीपोटी रक्कम दिलेली नाही. त्याअनुषंगाने गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना सेवा देण्यामध्ये कमतरता केलेली आहे असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत दाखल केलेल्या कागदपञाचे अवलोकन केले असता अर्जदार यांनी सूर्यफुल बियाणे 1 हेक्टर एवढया क्षेञामध्ये पेरलेले होते. सदर क्षेञामध्ये अंदाजे अर्जदार यांनी सहा क्विंटल इतके सूर्यफुलाचे उत्पन्न झाले असते असे गृहीत धरल्यास अर्जदार यांना दाखल केलेल्या डेली प्रभा पूष्प या दरपञकाप्रमाणे सूर्यफुलाचा एक क्विंटलला दर कमीत कमी रु.2900/- इतका दर्शविलेला आहे. अर्जदार यांचे शेतातील उत्पन्नाचे सहा क्विंटलचे रु.17,400/- इतक्या रक्कमेचे नूकसान झालेले आहे. आणि सदरचे नूकसान हे अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी सदरील अर्जामध्ये नांगरणी, वखारणीचा खर्च, भिजवणीचा खर्च, पाणीपटटी, पेरणीचा खर्च इत्यादी खर्चाची मागणी केलेली आहे परंतु सदर खर्चाचे पूष्ठयर्थ कोणतेही कागदोपञी पूरावा, पावती, शपथपञ याकामी दाखल केलेली नाही. त्यामूळे अर्जदार यांची प्रस्तूतची मागणी मान्य करता येणार नाही असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी अर्जासोबत सागन फर्टीलायझर येथून खत घेतल्या बाबतची रक्कम रु.760/- ची पावती आणि उत्तम कृषी सेवा केंद्र यांचेकडून सूर्यफूल (यशोदा) बियाणे घेतले बाबतची रु.1,000/- ची पावती या मंचामध्ये अर्जासोबत दाखल केलेली आहे. त्यामूळे अर्जदार हे यशोदा कंपनीच्या बियाण्याचा खर्च रु.1,000/- आणि खताचा खर्च रु.760/- असे एकूण रु.1760/- इतकी रक्कम गैरअर्जदार यांच्याकडून वसूल होऊन मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे. अर्जदार यांनी गैरअर्जदार यांचेकडून सूर्यफुल बियाणे स्वतःचे शेतामध्ये पेरण्यासाठी गैरअर्जदार यांचेकडून घेतलेले होते व सदर बियाण्याची शेतामध्ये पेरणी केलेली होती परंतु गैरअर्जदार यांचेकडून घेतलेल्या बियाण्याची उगवण न झाल्याने अर्जदार यांचे शेतातील उत्पन्नाचे नूकसान झालेले होते. सदर नूकसानची गैरअर्जदार यांचेकडे मागणी करुनही गैरअर्जदार यांनी अर्जदार यांना नूकसानीपोटी रक्कम दिलेली नाही. त्यामूळे अर्जदार यांनी सदरची नूकसान भरपाईपोटी रक्कम मिळण्यासाठी या मंचाकडे अर्ज करावा लागला व त्याअनुषंगाने खर्चही करावा लागलेला आहे. त्यामूळे अर्जदार हे गैरअर्जदार यांचेकडून मानसिक ञासापोटी व अर्जाचे खर्चापोटी रक्कम मिळण्यास पाञ आहेत असे या मंचाचे मत आहे.गैरअर्जदार क्र.1 हे बियाणे विक्रेता असल्यामूळे आणि सदरचे बियाणे हे गैरअर्जदार क्र.2 यांनी उत्पादित केलेले असल्याने गैरअर्जदार क्र.1 यांचे विरुध्द कोणतेही आदेश करण्यात येत नाहीत. अर्जदार यांनी दाखल केलेली तक्रार, शपथपञ, दाखल केलेली कागदपञे व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद व गैरअर्जदार यांनी दाखल केलेला जवाब, शपथपञ, दाखल केलेली कागदपञे व वकिलामार्फत केलेला यूक्तीवाद व वरिष्ठ कोर्टाची निकालपञ पाहून आम्ही खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहोत. आदेश 1. अर्जदाराची तक्रार अंशतः मंजूर करण्यात येते. आजपासून 30 दिवसांचे आंत अर्जदार यांना गैरअर्जदार क्र.2 यांनी खालील प्रमाणे रक्कम दयावी. 2. अर्जदाराचे शेतातील उत्पन्नाचे नूकसान भरपाईपोटी रक्कम रु.17,400/- दयावेत, व सदर रक्कमेवर अर्ज दाखल दिनांक 20.06.2008 रोजी पासून प्रत्यक्ष रक्कम पदरीपडे पर्यत 9 टक्के दराने व्याज दयावे. 3. बियाण्याचे खर्चापोटी व खतपोटी रु.1760/- दयावेत. 4. मानसिक ञासापोटी रु.3000/- व दावा खर्च म्हणून रु.1000/- मंजूर करण्यात येतात. 5. संबंधीताना आदेश कळविण्यात यावा. श्री.बी.टी.नरवाडे पाटील श्रीमती सुजाता पाटणकर अध्यक्ष सदस्या जे. यु. पारवेकर लघूलेखक. |