जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंच बीड यांचे
तक्रार क्रमांक – 45/2011 तक्रार दाखल तारीख –01/03/2011
गोविंद पि. विठठलराव मुंडे
वय 37 वर्षे धंदा शेती .तक्रारदार
रा.पांगरी ता.परळी (वै.) जि.बीड
विरुध्द
1. उत्तम अँग्रो एजन्सीज,
नवा मोंढा रोड, बीड ता.जि.बीड सामनेवाला
2. अंकूर सिडस प्रा.लि.
27, न्यु कॉटन मार्केट ले-आऊट नागपुर-440 018
को र म - पी.बी.भट, अध्यक्ष
अजय भोसरेकर, सदस्य.
तक्रारदारातर्फे :- अँड.जे.डी.पांडव
सामनेवाला क्र.1 तर्फे ः-अँड.ए.पी.पळसोकर.
सामनेवाला क्र.2 तर्फे ः- अँड.ए.जी.धुत
निकालपत्र
तक्रारदार यांनी प्रस्तुतची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 कलम 12 प्रमाणे सामनेवाले विरुध्द दाखल केली आहे.
तक्रारदार पांगरी ता.परळी वैजनाथ येथील रहिवासी आहे. तेथेच ते शेती व्यवसाय करतात. तक्रारदार जी शेती करतो ती त्यांचे वडिलांचे नांवावर असून तिचा गट नंबर 2 व 146 असून त्यांचे एकूण क्षेत्रफळ 1 हेक्टर 76 आर आहे.
तक्रारदार यांनी दि.12.6.2010 रोजी सामनेवाला क्र.1 यांचेकडे एआरसीएच-930 हे मिरचीचे बियाणे ज्यांचे उत्पादक सामनेवाला क्र.2 आहेत, त्याची 11 पाकीटे खरेदी केले. त्यांचा पावती क्र.7765 असून त्याबददल रु.2475/- सामनेवाला क्र.1 यांना दिले.
तक्रारदाराने मिरची लागवड वरील जमिनीतील 50 आर क्षेत्रावर केली. लागवडीच्या वेळी 10-26-26 हे खत दिले. लागवड 3 1.5 फुट अंतरावर केली. वेळोवेळी आवश्यक ती रासायनी खताच्या मात्रा दिल्या. यामध्ये डिएपी (200 किलोग्रँम), सल्फर (सुक्ष्म मुलद्रव्य) तसेच पिक संरक्षणासाठी सुरुवातीस कॉन्फीडॉर, त्यानंतर वेळोवेळी पॅगॉसस, कॉन्टॉफ, इजिडाकलोप्रीड तसेच सुक्ष्म मुलद्रव्ये देखील फवारणीद्वारे दिले.परंतु झाडाची वाढ समाधानकारक झाली नाही. काळजी घेऊन देखील पिकावर किडीचा प्रादुर्भाव झाला. उपाय करुन देखील ती नियंत्रणात आली नाही. झाडांची वाढ न होणे हे पिक रोगास (किडीस) बळी पडणे यावरुन तक्रारदाराचे लक्षात आले की, सदरचे बियाणे सदोष असून त्यांस रोग प्रतिकारक क्षमता नाही.
एक एकर जमिनीवर किमान 75 क्विंटल हिरवी मिरची उत्पादन अपेक्षित होते. ते एकदम निरंक झाले. जवळपास अडीच लाखाचे उत्पादन बुडाले. त्यांस मानसिक, शारीरीक, आर्थिक त्रास सहन करावा लागला.
सदरची बाब तक्रारदारानी सामनेवाला यांना तोंडी कळविली परंतु त्यांनी दखल घेतली नाही. शेवटी तक्रारदाराने जिल्हाधिकारी यांना संबंधीत शेतक-यास सामनेवाला यांनी फसवल्या बददल दि.5.10.2010 रोजी पत्र दिले. त्यांचे प्रती कृषी अधिकारी, तहसीलदार इत्यादीना दिल्या. त्यानंतर जिल्हास्तरीय बियाणे तक्रार निवारण समिती यांनी क्षेत्रीय भेट दि.21.10.2010 रोजी दिली. पाहणी करुन अहवाल दिला. त्यात तक्रारदारास फसवले असल्याचे स्पष्टपणे नमूद केलेले आहे.सामनेवाला क्र.1 व 2 यांना वरीलप्रमाणे सेवेत कसूर केला आहे. त्यामुळे त्यांचेकडून एकत्रितरित्या किंवा संयूक्तीकरित्या नूकसान भरपाई मिळण्यास तक्रारदार पात्र आहे. नुकसान भरपाई खालील प्रमाणे,
1. मशागत, बियाणे, खत, औषधी इत्यादी रु.25,000/-
साठी झालेला खर्चाबददल.
2. सदोष बियाणे दिल्यामुळे बुडालेले उत्पन्नाबददल रु.2,00,000/-
3. मानसिक त्रासाबददल रु.10,000/-
4. तक्रार खर्च रु.5,000/-
एकूण रक्कम रु.2,45,000/-
वरील रक्कमेवर 12 टक्के द.सा.द.शे.व्याज मिळण्यास हक्कदार आहे.
विनंती की, तक्रारदारांना तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे नूकसान भरपाई रु.2,45,000/- 12 टक्के व्याजासह सामनेवाला यांनी देण्याबाबत आदेश व्हावेत.
सामनेवाला क्र.1 यांनी त्यांचा खुलासा दि.7.7.2011 रोजी दाखल केला. खुलाशात तक्रारीत सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. बियाणे घेतल्याची बाब मान्य आहे. परंतु सदरचे बियाणे हे व्यापारी हेतूने तक्रारदाराने घेतलेले असल्याने तक्रारदार ग्राहक नाही. सदरचा विवार हा ग्राहक विवाद नाही. त्यामुळे सदरची तक्रार या न्यायमंचात चालविण्याचा अधिकार नाही. बियाणे दोषयूक्त असल्याची बाब शाबीत करण्याची पूर्ण जबाबदारी तक्रारदाराची आहे. सदरची बाब ही ग्राहक संरक्षण कायदयातील कलम 13 (1)(सी) प्रमाणे कारवाई केल्यावर शाबीत होऊ शकते. सामनेवाला क्र.1 हे विक्रेते आहे, उत्पादक नाही. उत्पादक कंपनी कडून आलेले बियाण्याची पाकीटे तक्रारदारांना विकलेले आहेत. त्यामुळे त्या संदर्भात नूकसान भरपाई सामनेवाला क्र.1 हे देण्याचा प्रश्न येत नाही. तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
सामनेवाला क्र.2 ने दि.15.4.2011 रोजी त्यांचा खुलासा दाखल केला. तक्रारीतील सर्व आक्षेप त्यांनी नाकारलेले आहेत. तक्रारदारांनी मिरचीचे बियाण्याची लागवड केली, उगवण चांगली आली. उगवणी बाबत तक्रार नाही. परंतु रोपावर किड पडल्याने तक्रारदारांना उत्पन्न मिळाले नाही.सामनेवाला यांनी उत्पादित केलेले मिरचीचे बियाणे योग्य नसून त्यात दोष आहे हे सिध्द करण्याचा भार तक्रारदारावर आहे. सदरचे बियाणे हे दोषमुक्त आहे हे दर्शविण्यासाठी इतर 2-3 शेतक-याचे शपथपत्र दाखल करीत आहे. जर इतर शेतक-यांना त्यांचे बियाण्यापासून उत्तम उत्पन्न मिळाले असेल तर तक्रारदारांना ते मिळाले नाही म्हणून बियाण्यात दोष आहे असे म्हणता येणार नाही. तसेच बियाणे समितीच्या अहवालात बियाणे सदोष असल्याबददल उल्लेख नाही. पिकावरील रोगामूळे उत्पन्न मिळाले नाही असे त्यात नमूद आहे. तक्रार खोटी असून खर्चासह खारीज करण्यात यावी.
तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्र, तक्रारदाराचे शपथपत्र, तक्रारदाराचे साक्षीदार वैजिनाथ नागोराव गिते, शेतकरी, शरद नागोराव गिते, शेतकरी, तक्रारदाराचा लेखी युक्तीवाद, सामनेवाला क्र.1 चा खुलासा, शपथपत्र, सामनेवाला क्र.2 चा खुलासा, शपथपत्र, साक्षीदार नाथ गुलाबराव किनोळकर रा. मोठेवाडी, लक्ष्मण हरिभाऊ आढाव रा.खरात आडगांव, विठठल सोपानराव डांगे रा.मोठेवाडी ,नंदकुमार जालिंदर कुरे रा.जदीदजवळा यांचे शपथपत्र, दाखल कागदपत्र, यांचे सखोल वाचन केले.
सामनेवाले क्र.1 चे विद्वान वकील श्री.पळसोकर, सामनेवाले क्र.2 चे विद्वान वकील श्री.धुत यांचा यूक्तीवाद ऐकला.
तक्रारीतील कागदपत्र पाहता तक्रारदार वडिलांचे नांवाने असलेल्या शेत जमिन कसतात. त्यांनी मिरचीची लागवड करण्यासाठी सामनेवाला क्र.1 यांचेकडून सामनेवाला क्र.2 यांनी उत्पादित केलेले मिरचीचे बियाणे विकत घेतले आहे. त्या बाबतचे सामनेवाला क्र.1 ची पावती नंबर 7766 दि.12.6.2010 ची दाखल केली आहे.
सदरचे बियाण्याची लागवड तक्रारदारांनी त्यांचे तक्रारीत नमूद केलेल्या शेत जमिनीतील 50 आर क्षेत्रावर केलेली आहे. तक्रारदाराची बियाण्याचे उगवणी संदर्भात तक्रार नाही. परंतु रोपाची वाढ झाली नाही. झाड किडीला बळी पडले. त्यामुळे तक्रारदारांना लक्षात आले की, बियाणे सदोष आहे. या संदर्भात तक्रारदारांनी सामनेवालाकडे तक्रार केली परंतु त्यांनी दखल घेतली नाही म्हणून जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार केल्यानुसार त्यांनी सदरची तक्रार बियाणे समितीकडे पाठविली व बियाणे समितीने तक्रारदाराचे पिक क्षेत्राची पाहणी केलेली आहे. सदरचा पाहणी अहवाल पाहता त्यात शेतक-याने त्यांचे जवाबात सांगितल्याप्रमाणे खत व पिक संरक्षण व्यवस्थापन केले आहे असे त्यांचे म्हणणे आहे “ परंतु प्रत्यक्षात पिकावर किड व रोगाचा मोठयाप्रमाणावर प्रार्दुभाव असून झाडांना अल्प प्रमाणात फळधारणा झालेली आहे. ती देखील सर्व किड रोगग्रस्त असल्याचे दिसून आले. किड रोगाचे प्रमाण जास्त असल्यामुळे शेतक-याला निरंक उत्पादन आले आहे ही वस्तूस्थिती आहे. निष्कर्ष ः- शेतक-याच्या तक्रारीमध्ये तथ्य आढळून येते. ”
संपूर्ण पंचनाम्यात बियाणे दोषयुक्त असल्याबददलचा उल्लेख नाही. केवळ सदर पंचनाम्याचे खाली श्री.पी.बी.तिडके तालुका कृषी अधिकारी परळी यांना सदरील शेत परिस्थितीप्रमाणे बियाणे सदोष आहे व प्रतिकारक क्षमता नाही त्यामुळे रोगास बळी पडणारी जात आहे असा शेरा लिहीलेला आहे परंतु निष्कर्षात बियाणे दोषयुक्त असल्याचा निष्कर्ष नाही.
या संदर्भात सामनेवाला क्र.2 यांनी त्यांचे सदर वाणांचे संदर्भातील माहीती पत्रके दाखल केलेले आहेत. त्यातील दि.7.5.2012 रोजी दाखल केलेल्या यादीतील माहीती पत्रक क्र.1 मधील मराठी अनुवाद पिक संरक्षण यात “ किड व रोगामुळे मिरची पिकाची उत्पादन क्षमता आणि गुणवत्ता यावर विपरित परिणाम होतो त्यामूळे वेळवर पिक संरक्षणाचे उपाय केल्यास पिकाची उत्पादन क्षमता व फळाची प्रत टिकून राहण्यास मदत होते.”
उत्पादक कंपनीने सदर बियाण्याचे संदर्भात त्यावर किडीचा प्रार्दुभाव होणार नाही असे कूठलेही आश्वासन दिले नाही किंवा सदरचे बियाणे हे किड किंवा रोग यांस प्रतिकारक्षम आहे असे कूठेही हमी दिलेली नाही. याउलट वरील विधानावरुन उत्पादक कंपनीने बियाण्याचे संदर्भात त्यावर किड व रोगाची लागण होऊ शकते यांची सुचना दिली आहे.
बियाणे सदोष असल्यामुळे किड लागली असे तक्रारदाराचे म्हणणे नाही. बियाणे सदोष असल्याबाबत तक्रारदाराचा पुरावा नाही. वरील निष्कर्ष अहवालात प्रतिनिधीने त्यांचा शेरा वर नमूद केल्याप्रमाणे दिलेला आहे. परंतु मुळात कंपनीने ती बाब स्पष्ट केलेली असल्याने त्या शे-याला तितकेसे महत्व राहत नाही. तसेच निष्कर्ष अहवाल हा समितीतील सर्व सदस्याच्या एकमताने बियाणे दोषयुक्त असल्याबाबतचा निर्विवाद अहवाल नाही. त्यामुळे जो रेकॉर्डवर अहवाल आहे त्यात बियाणे दोषयुक्त असल्याचा निष्कर्ष नाही. त्यामुळे बियाणे ुदोषयुक्त असल्याने उत्पादन आलेले नाही ही बाब शाबीतीची पूर्ण जबाबदारी तक्रारदारावर आहे. या संदर्भात तक्रारदारांनी आजुबाजूच्या शेतक-याचे शपथपत्र दाखल केलेले आहे परंतु ते शपथपत्र पाहता त्यात तक्रारदाराचे मिरचीच्या बियाण्याची उगवण झाली नाही या संदर्भातील आहे. वास्तव व शपथपत्रातील विधाने यात विसंगती आहे. त्यामुळे सदरचे शपथपत्र याठिकाणी ग्राहय धरणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे. याउलट सामनेवाला यांनी त्यांचे खुलाशासोबत वर नमूद केलेल्या शेतक-यांचे शपथपत्र दिलेले आहेत. सदरचे शेतक-यांनी योग्य नियोजन केल्याने त्यांना उत्पादन मिळाले आहे. या सर्व परिस्थितीचा विचार करता बियाणे दोषयुक्त असल्याची बाब स्पष्ट न झाल्याने तक्रारीत मागणी केल्याप्रमाणे तक्रारदारांना नुकसान भरपाई देणे उचित होणार नाही असे न्यायमंचाचे मत आहे.
सबब, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रार रदद करण्यात येते.
2. खर्चाबददल आदेश नाही.
3. ग्राहक संरक्षण कायदा- 1986, अधिनियम 2005 मधील कलम-20
(3) प्रमाणे तक्रारीतील सदस्यांचे संच तक्रारदाराला परत करावेत.
(अजय भोसरेकर) (पी.बी.भट)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, बीड