(आदेश पारीत व्दारा - श्रीमती चंद्रिका कि. बैस, मा.सदस्या)
(पारीत दिनांक : 31 जानेवारी 2017)
1. तक्रारकर्त्याने सदरची तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत दाखल केली असून तक्रारकर्त्याच्या तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालील प्रमाणे आहे.
2. विरुध्दपक्ष क्र.1 हे सिमेंटची मिनी सेप्टीक टँक याचे उत्पादक आहे, तसेच विरुध्दपक्ष क्र.2 हा गैरअर्जदार क्र.1 चा मुलगा असून तो एजंट आहे. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी सिमेंटची मिनी सेप्टीक टँक व सेंद्रीय खत यासंबंधाने गावोगावी परिपञक वाटले ते तक्रारकर्त्याला दिनांक 5.1.2015 रोजी पारशिवनी बाजारात मिळाले. सदरच्या परिपञकानुसार तक्रारकर्त्याने दिनांक 28.5.2015 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडे रुपये 1,500/- नगदी अॅडव्हान्स दिले, यानुसार तक्रारकर्ता हे विरुध्दपक्षाचे ग्राहक आहेत. विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्याला सांगितल्यानुसार त्यांनी विरुध्दपक्ष क्र.2 यांचे खाते क्रमांक 33810201930 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, पारशिवनी मधून दिनांक 9.4.2015 रोजी रुपये 6,500/- ट्रान्सफर केले. विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्याने दिलेली एकूण रक्कम खालील प्रमाणे आहे.
अ.क्र. | विवरण | रुपये | दिनांक |
i) | अॅडव्हान्स | 1,500/- | 15.01.2015 |
ii) | स्टेट बँक ऑफ इंडीया मधून ट्रान्सफर केलेले रुपये | 6,500/- | 09.04.2015 |
iii) | गॅरेजचा चार्ज – भक्ती गॅरेज | 800/- | 20.05.2015 |
iv) | गॅरेजचा चार्ज – अनिस रोडलाईन्स | 1,210/- 5/- | 19.05.2015 |
तक्रारकर्त्याने एकूण रुपये 10,015/- दिले त्यात गॅरेजचे एकूण भाडे रुपये 2,015/- भक्ती गॅरेजला दिले.
3. तक्रारकर्त्याने विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना दिलेल्या रकमेच्या मोबदल्यात त्याला निकृष्ठ दर्जाची उत्पादन केलेली टँक पाठविली. सिमेंटची मिनी सेप्टीक टँक तालुका – दर्यापूर येथून अनिस रोडलाईन्स यांचे ट्रान्सपोर्टने नागपूर येथे आले व नागपूर येथून भक्ती ट्रान्सपोर्टने ती पारशिवनीला आला. सदरची टँक भक्ती ट्रान्सपोर्ट यांनी तक्रारकर्त्या समक्ष खाली उतरविली त्या दोन्हीं टँकचे गाडीतून खाली उतरवितांना तक्रारकत्याच्या समक्ष आपोआप तुकडे पडले. सदर टँकचा तक्रारकर्त्याने पाच लोकांसमोर पंचनामा सुध्दा केला आहे. त्यामुळे ही बाब ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 2(1)(R) नुसार अनुचित व्यापारी पध्दती आहे. त्यामुळे तक्रारकर्त्यास प्रचंड मानसिक, शारिरीक ञास सहन करावा लागला. यासंबंधी तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षास दिनांक 13.6.2015 रोजी वकीला मार्फत रजिस्टर्ड पोष्टाने कायदेशिर नोटीस दिला.
4. तक्रारकर्त्याच्या प्रार्थनेनुसार विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांचेकडून विकत घेतलेली दोन सिमेंटची मिनी सेप्टीक टँक करीता आलेला खर्च रुपये 10,015/- भरपाई म्हणून तक्रारकर्त्याला देण्यात यावे. त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष हलगर्जीपणामुळे त्याचेवर ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 14 (ड) नुसार जबर दंडात्मक नुकसान भरपाई रुपये 40,000/- तक्रारकर्त्यास देण्यात यावे. त्याचप्रमाणे आर्थिक, मानसिक व शारिरीक ञासापोटी रुपये 90,000/- देण्यात यावे व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 10,000/- द्यावे, त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी निकृष्ठ दर्जाचा उत्पादीत केलेली सिमेंटची मिनी सेप्टीक टँकची विक्री व जारीरात करु नये, याकरीता न्यायालयाने आदेश पारीत करावे.
5. तक्रारकर्त्याचे तक्रारीनुसार विरुध्दपक्षाला नोटीस बजावण्यात आली. विरुध्दपक्ष मंचात वकीला मार्फत हजर झाले, परंतु त्यांना मंचाने लेखीउत्तर दाखल करण्याची सतत संधी देवूनही विरुध्दपक्ष यांनी लेखी उत्तर दाखल केले नाही. त्यामुळे, मंचाने निशाणी क्र.1 वर विरुध्दपक्षाचे उत्तराशिवाय प्रकरण पुढे चालविण्याचा आदेश दिनांक 4.11.2015 ला पारीत झाला.
6. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने लेखी युक्तीवादाकरीता पुरसीस दाखल केली. विरुध्दपक्षास संधी मिळूनही लेखी युक्तीवाद दाखल केला नाही व मौखीक युक्तीवाद केला नाही. तक्रारकर्ताचे वकीलांचा मौखीक युक्तीवाद मंचासमक्ष ऐकण्यात आला. तक्रारकर्त्याने अभिलेखावर दाखल केलेल्या दस्ताऐवजाचे अवलोकन करण्यात आले, त्याप्रमाणे खालील प्रमाणे मुद्दे व निष्कर्ष देण्यात येते.
मुद्दे : निष्कर्ष
1) तक्रारकर्त्याची तक्रार मंजूर होण्यास पाञ आहे काय ? : होय.
2) अंतिम आदेश काय ? : खालील प्रमाणे
// निष्कर्ष //
7. तक्रारकर्ता यांनी विरुध्दपक्ष यांचेकडून दोन सिमेंटची मिनी सेप्टीक टँक व शेंद्रीय खत यासंबंधी दिनांक 28.5.2015 रोजी विरुध्दपक्ष क्र.1 यांचेकडे रुपये 1500/- रोख रक्कम खरेदीकरीता अॅडव्हान्स दिले. त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष क्र.1 यांनी तक्रारकर्त्याला सांगितल्यानुसार विरुध्दपक्ष क्र.2 यांचे खाते क्रमांक 33810201930 मध्ये रुपये 6500/- दिनांक 9.4.2015 रोजी स्टेट बँक ऑफ इंडिया, शाखा पारशिवनी मधून विरुध्दपक्ष क्र.2 च्या खात्यात ट्रान्सफर केले, असे एकूण रुपये 8,000/- विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना दिले, त्याची पावती निशाणी क्रमांक 3 वरील दस्त क्र.12 वर दाखल आहे. त्याचप्रमाणे विरुध्दपक्ष क्र.1 यांनी गावो-गांवी जावून जे परिपञक वाटले ते दस्त क्र.11 वर जोडलेले आहे. सदर दोन सिमेंटची मिनी सेप्टीक टँक तक्रारकर्त्याने आपल्या राहत्या घरी तालुका पारशिवनी, जिल्हा – नागपूर येथे आणण्याकरीता भक्ती ट्रान्सपोर्ट यांना रुपये 2,015/- दिल्याचे निशाणी क्र.3 वरील दस्ताऐवज दस्त क्र.13 वर दाखल आहे, त्याचप्रमाणे अनिस रोडलाईनची पावती देखील जोडली आहे. निशाणी क्र.3 वरील दस्त क्र.14 वर संजय इंडस्ट्रीजचे भक्ती गॅरेजचे नावाने पञ जोडले आहे, त्यात त्यांनी स्पष्टपणे लिहिले आहे की, ‘’महोदय वाडी पे उतार देना वहासे पारशिवनी भक्ती गॅरेज की गाडी जाती है | ’’ त्याचप्रमाणे रुपये 6,500/- विरुध्दपक्ष क्र.2 च्या खात्यात वळती केल्याची रसीद लावलेली आहे, तसेच दिनांक 21.5.2015 रोजी दाने सिमेंटची मिनी सेप्टीक टँक सकाळी 11-00 वाजता तक्रारकर्ता व त्याचे पाच साक्षदार यांचेसमक्ष उतरवीत असतांना सदर दोन्ही सिमेंटची मिनी सेप्टीक टँकचे आपोआप तुकडे पडले असल्याचा पंचनामा निशाणी क्र.3 वरील दस्त क्र.14-ए वर जोडला आहे. त्यानंतर दस्त क्र.15 वर दिनांक 13.6.2015 ला तक्रारकर्त्याचे वकील दादाराव भेदरे यांची नोटीस जोडली आहे.
8. सदर सर्व कागदपञावरुन असे दिसून येते की, विरुध्दपक्षाने आपल्या सिमेंटची मिनी सेप्टीक टँक करीता परिपञक काढले होते व त्याची माहीत पटवून देण्यासाठी परिपञकात सविस्तर विवरण केले होते. त्याच्या प्रलोभनाला बळीपडून तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडे दोन सिमेंटची मिनी सेप्टीक टँक विरुध्दपक्ष क्र.1 कडून रुपये 8,000/- ला खरेदी केले व विरुध्दपक्ष क्र.1 च्या संजय इंडस्ट्रीज, तालुका – दुर्यापूर, जिल्हा – अमरावती येथून तक्रारकर्त्याच्या घरी तालुका – पारशिवनी, जिल्हा नागपूर येथे आणण्याकरीता तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या म्हणण्यानुसार भक्ती ट्रान्सपोर्ट यांना रुपये 2,015/- दोन सिमेंटची मिनी सेप्टीक टँक रकमेच्या व्यतिरिक्त दिले. त्यामुळे सदर दोन्ही सिमेंटची मिनी सेप्टीक टँक तक्रारकर्त्याच्या घरी व्यवस्थितरित्या पोहचविण्याची विरुध्दपक्ष क्र.1 ची जबाबदारी होती. परंतु, सदर दोन्ही सिमेंटची मिनी सेप्टीक टँक संजय इंडस्ट्रीज, तालुका – दर्यापूर, जिल्हा – अमरावती येथून वाडी नागपूर पर्यंत व्यवस्थित पोहचल्या. त्यानंतर नागपूरवरुन पारशिवनी येथे भक्ती ट्रान्सपोर्टच्या गाडीतून दोन्ही टँक आणले, परंतु भक्ती ट्रान्सपोर्टच्या गाडीतून दोन्ही टँक काढतांना दोन्ही सिमेंटची मिनी सेप्टीक टँकचे तुकडे पडले. त्यामुळे, सदर दोन्ही सिमेंटची मिनी सेप्टीक टँक तक्रारकर्त्याचे घरी पोहचू शकल्या नाही. करीता, मंच खालील प्रमाणे आदेश पारीत करीत आहे.
// अंतिम आदेश //
(1) तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजुर करण्यात येते.
(2) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांना आदेशीत करण्यात येते की, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी संयुक्तीकरित्या किंवा वैयक्तीकरित्या तक्रारकर्त्याचे रुपये 10,015/- दोन निकृष्ठ सिमेंटची मिनी सेप्टीक टँकचे नुकसान भरपाई म्हणून तक्रारकर्त्यास द्यावे.
(3) तसेच, विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी तक्रारकर्त्यास झालेल्या आर्थिक, शारिरीक व मानसिक ञासापोटी रुपये 3,000/- द्यावे व तक्रारीचा खर्च म्हणून रुपये 2,000/- तक्रारकर्त्यास द्यावे.
(4) विरुध्दपक्ष क्र.1 व 2 यांनी आदेशाचे पालन आदेशाची प्रत प्राप्त झाल्यापासून 30 दिवसाचे आत करावे.
(5) उभय पक्षकारांना आदेशाची प्रत निःशुल्क पाठविण्यात यावी.
नागपूर.
दिनांक :- 31/01/2017