अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच नागपूर
--------------------------------------------------------------------------------------------------------------
तक्रार क्रमांक: 113/2011 तक्रारदाखलदिनांक: 11/10/2011
आदेश पारित दिनांकः 16/03/2012
तक्रारकर्ता :- श्री दामोदर गोविंदा डोणारकर
वय–48, व्यवसाय – नोकरी,
रा. पारशिवनी, जिल्हा- नागपूर 441105
-// वि रु ध्द //-
गैरअर्जदार :- 1. उत्पादक महिन्द्रा टु व्हिलर्स कस्टमर केअर लिमीटेड
डी अॅन्ड 1 ब्लॉक प्लॉट नं.8212 (पार्ट) एमआयडीसी
चिंचवड पूणे – 411019
2. बेरार फायनान्स लिमीटेड (वगळले)
अविनिशा टॉवर मेहाडीया चौक, धंतोली नागपूर
3. एजन्ट व डीलर दिनेश दौलतजी डोनारकर
वय- 25 वर्षे , धंदा – ऑटोमोबाईल, मु.पारशिवनी,जि.नागपूर
गणपूर्ती :- 1. श्री. विजयसिंह ना. राणे - अध्यक्ष
2. श्रीमती जयश्री येंडे - सदस्या
उपस्थिती :– तक्रारदारातर्फे वकील श्री डी आर भेदरे व
श्री एस एन चिचबनकर
गैरअर्जदारा क्रं.1 तर्फे वकील श्रीमती विभा देशमुख
गैरअर्जदार क्रं.2 वगळण्यात आले
गैरअर्जदार क्रं.3 तर्फे वकील एम डी चिखले
( आदेश पारित द्वारा : श्री. विजयसिंह ना. राणे, अध्यक्ष )
आदेश
( पारित दिनांक : 16 मार्च, 2012 )
तक्रारदार ह्यांनी प्रस्तूत तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अन्वये मंचासमक्ष दाखल केली आहे.
यातील तक्रारकर्त्याची थोडक्यात तक्रार अशी आहे की, गैरअर्जदार क्रं.1 हे दुचाकी वाहनाचे उत्पादक असुन गैरअर्जदार क्रं.3 हे त्यांचे विक्रेते आहेत. गैरअर्जदार क्रं.3 तक्रारदारास महिन्द्रा फलायटी मोटर सायकल घेण्यास भाग पाडले. तक्रारदारास सदर वाहनाचे अॅव्हरेज प्रती लिटर 40 ते 50 कि.मी असल्याचे सांगण्यात आले त्यावर विश्वास ठेवुन तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.2 वित्तीय संस्थेकडुन कर्ज उपलब्ध करुन दुचाकी घेण्यास भाग पाडल्याने तक्रारदाराने गैरअर्जदार क्रं.3 कडे Mahindra Flyte हे दुचाकी वाहन घेण्याकरिता दिनांक 4/11/2010 रोजी 24,000/- जमा केले. व पुढे वेळावेळी कर्जाची किस्त म्हणुन रुपये 1440/- अशा 3 कीस्ती गैरअर्जदार क्रं.2 कडे जमा केले. सदर दुचाकी वाहन घेतल्यापासुन त्याचा अॅव्हरेज कमी येत असल्यामुळे तक्रारदाराने सदर बाब गैरअर्जदार क्रं.3 चे लक्षात आणुन दिली व त्यांनी ती स्वतः तपासली असता वाहन केवळ 15 कि.मी. अॅवरेज देत असल्याचे स्टॅम्पपेपरवर लिहुन दिले आहे.
सदर वाहन अॅवरेजचे दुरुस्तीकरिता गैरअर्जदार क्रं.3 ने दिनांक 28/6/2011 रोजी लिंम्बाना मोटोस्कुटर, माऊंटरोड, सदर, नागपूर येथे दिले तेथुन आजपर्यत वाहन परत मिळाले नाही. गैरअर्जदार क्रं.1 ने उत्पादीत केलेल्या दुचाकी वाहन आश्वासान दिल्याप्रमाणे 40 ते 50 कि.मी.अॅवरेज न देता केवळ 15 कि.मी. एवढे अॅवरेंज देते ही गैरअर्जदाराची दोषपुर्ण सेवा आहे म्हणुन तक्रारदाराने ही तक्रार दाखल करुन तक्रारदाराचे वाहन गैरअर्जदारांनी अॅवरेज 40 ते 50 कि.मी असल्याचे प्रमाणपत्रासह परत करावे किंवा तक्रारदाराने गैरअर्जदाराकडे भरलेली वाहनाची किंमत 18टक्के व्याजासह परत करावी. वाहन दोषपुर्ण असल्यामुळे 50,000/- रु.जास्त पेट्रोल भरावे लागल्यामुळे झालेल्या मनस्तापापोटी ही रक्कम मिळावी अशी मागणी केली आहे.
सदर तक्रार दाखल करतांना सुनावणीचेवेळी तक्रारदारांचे वकीलांनी गैरअर्जदार क्रं.2 यांना प्रकरणातुन वगळण्याचा अर्ज केला. अर्ज मंजूर करण्यात आला व गैरअर्जदार क्रं.2 यांना सदर प्रकरणातु वगळयात आले.
तक्रारकर्त्याने आपली तक्रार प्रतिज्ञालेखावर दाखल केली असून, दस्तऐवजयादीनुसार एकुण 13 कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात बेरार फायनान्सचे पत्र, रोख भरणाचे पत्रक, ग्रेस मोटर्सची पावती, पोहचपावती, गैरअर्जदार क्रं.3 ने लिहुन दिलेले स्टॅप पेपर, वकीलाची नोटीस, इत्यादी कागदपत्रे दाखल केलीत.
यात गैरअर्जदार क्रं. 1 ते 3 यांना नोंदणीकृत पोस्टाद्वारे नोटीस पाठविण्यात आली. नोटीस प्राप्त होऊन गैरअर्जदार हजर झाले व आपला लेखी जवाब दाखल केला.
गैरअर्जदार क्र.1 ने आपले जवाबात तक्रारदाराने लिंबाना मोटोस्कुटर्स याना पक्षकार न केल्यामुळे तक्रार खारीज होण्यास पात्र आहे असा प्राथमिक आक्षेप घेतला आहे.
गैरअर्जदार क्रं.1 पुढे असे नमुद करतात की, गैरअर्जदार क्रं.3 चे त्यांचे अधिकृत एजंट/विक्रेते नाही त्यामुळे तक्रारदाराने अधिकृत विक्रेत्याकडुन वाहन खरेदी केलेले नाही. तक्रारदाराने त्यांचे पुतण्याकडुन वाहन खरेदी केल्याचे दिसुन येते. तसेच वाहन अधिकृत विक्रेत्याकडुन खरेदी केल्याची पावती वाहन क्रमांक, नोंदणी क्रमांक, माहितीपुस्तिका इत्यादी बाबींचा तक्रारीत स्पष्ट खुलासा केलेला नाही त्यामुळे वाहन दोषपुर्ण असल्याचे ठरविता येणार नाही. वाहनाचे अॅवरेज कमी असल्याचे पृष्ठर्य्थ तक्रारदाराने कोणत्याही तज्ञांचा अहवाल दाखल केलेला नाही त्यामुळे वाहन दोषपुर्ण होते असे म्हणता येणार नाही. गैरअर्जदार क्रं.3 यांनी वारंवार ग्रेस मोटर्स येथे वाहनाची दुरुस्ती केली आहे व सदर बाब मंचापासुन लपवुन ठेवली आहे. त्यामुळे तक्रारदाराची तक्रार खारीज करण्यात यावी अशी विनंती केली.
गैरअर्जदार क्रं.3 आपले जवाबात असे नमुद करतात की ते गैरअर्जदार क्रं.1 चे कायदेशीर डिलर नाहीत. त्यांचेमधे असा कोणताही करार झालेला नाही. गैरअर्जदार क्रं.3 चे म्हणण्याप्रमाणे गैरअर्जदार क्रं.1 चे लिंबांना मोटर्स स्कुटर्स सदर नागपूर हे अधिकृत डिलर व एजंट आहेत त्यांना या प्रकरणात पक्षकार करणे आवश्यक होते. तसे तक्रारदाराने केले नाही. त्यामुळे गैरअर्जदार क्रं.3 चा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. म्हणुन त्यांचे विरुध्दची तक्रार खारीज करण्यात यावी.
गैरअर्जदार क्रं.3 यांचे पारशिवनी येथे स्वतःचे ग्रेस मोटर्स नावाचे गॅरेज आहे व त्यांना दुचाकी वाहनांबद्दल बरीचशी माहिती असल्याने व तक्रारदार त्यांचे काका असुन ते अपंग असल्याने काकांसोबत लिंबाना मोटर्स येथे दुचाकी वाहन विकत घेण्याकरिता गेले होते. गैरअर्जदार क्रं.3 चे पुढे असे नमुद करतात की केवळ काका अपंग असल्यामुळे त्यांचे सोबत लींबाना मोटर्स नागपुर येथे रुपये 24,000/- डाऊन पेमेट करुन दुचाकी वाहन खरेदी करण्याकरिता गेले होते. पुढे तक्रारदार काकांच्या सांगण्यावरुन वाहनाचे अॅवरेज 15 की. मी. प्रती लिटर देते असे लिहुन दिले. तक्रारदाराचे सांगण्यावरुन गैरअर्जदार क्रं.3 ने सदर वाहन दुरुस्तीकरिता लिंबाना मोटर्स नागपूर येथे दिले. त्यानंतर तक्रारदाराने या विषयावर कधीही चर्चा केली नाही. तक्रारीतील तक्रारदाराच्या मागण्या खोटया असल्यामुळे सदर तक्रार खर्चासह खारीज करावी अशी विनंती केली.
तक्रारकर्त्यातर्फे वकील श्री एस एन चिंचबनकर, गैरअर्जदार क्रं.1 तर्फे त्यांचे प्रतिनीधी हजर, गैरअर्जदार क्रं.3 चे वकील हजर त्यांचा युक्तिवाद एैकला.
-: का र ण मि मां सा :-
यातील वस्तुस्थीतीप्रमाणे तक्रारदाराने योग्य बाब मंचासमोर आणली नाही. कारण तक्रारीत असे दिसते की, तक्रारदाराने बेरार फायनान्सकडुन 32,000/- रुपये कर्ज घेतले आणि रुपये 1440/- प्रमाणे 3 किस्ती बेरार फायनान्सकडे जमा केल्या जेव्हा की तक्रारादाराचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी 24,000/- डिलरकडे दिले. गैरअर्जदार क्रं. 3 आणि गैरअर्जदार क्रं.1 यांचे जवाबाप्रमाणे गैरअर्जदार क्रं.3 हे गैरअर्जदार क्रं.1 चे डिलर नाहीत. गैरअर्जदार क्रं.3 हे डिलर असल्याबाबत तक्रारदाराने योग्य असे दस्तऐवज दाखल केले नाही. वाहनाचे अॅव्हरेज संबंधी तक्रारदाराने वाहनाचे खरेदीचे वेळी मिळणारी पुस्तिका दाखल केली नाही. गैरअर्जदार क्रं.3 चा घेतलेला बचाव पाहता सदर प्रकरणातील वस्तुस्थीती वेगळी आहे. ती नमुद करता तक्रारदाराने ज्यांचेकडे वाहन दुरुस्तीकरिता ठेवण्यात आले त्यांना या प्रकरणात प्रतीपक्ष केलेले नाही आणि वाहनाचे अॅव्हरेज संबंधी तज्ञांचा कोणताही अहवाल दिला नाही. गैरअर्जदार क्रं.3 ने स्टॅम्प पेपर म्हणुन एक दस्तऐवज दाखल केलेला आहे. तो वाहनाचे अॅव्हरेजसंबंधी योग्य पुरावा ठरु शकता नाही. यातील गैरअर्जदार क्रं.1 चा व तक्रारदाराचा प्रत्यक्ष कोणताही संबध आल्याचे दिसुन येत नाही. यासंबंधी योग्य पुरावा तक्रारदाराने दिलेला नाही. तक्रारदाराचे म्हणण्याप्रमाणे त्यांनी सदर वाहनाकरिता दिनांक 4/11/2011 रोजी पैसे दिले मात्र वाहन केव्हा विकत घेतले व ते तक्रारदाराचे नावे केव्हा झाले यासंबंधी दस्तऐवज दाखल केला नाही. असे असले तरी तक्रारदाराने या तक्रारीत नमुद केल्याप्रमाणे त्यांचे वाहनाचा अॅव्हरेज कमी असल्यामुळे वाहनात प्रत्यक्ष गरजेपेक्षा 50,000/- रुपयाचे जास्तीचे पेट्रोल टाकावे लागले असे म्हटले आहे ते अविश्वासनीय दिसते. या सर्व बाबी लक्षात घेता तक्रारदाराने आपली तक्रार योग्य रितीने मांडली नाही. यास्तव ती निकाली काढण्यात येते. सबब आदेश.
-// अं ति म आ दे श //-
1. तक्रारकर्त्याची तक्रार निकाली काढण्यात येते.
2. खर्च ज्याचा त्याने सोसावा.
2.
( जयश्री येंडे ) (विजयसिंह ना. राणे )
सदस्या अध्यक्ष
अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, नागपूर