निकालपत्र :- (दि.26.07.2010) (द्वारा - श्री.एम्.डी.देशमुख, अध्यक्ष) (1) प्रस्तुतची तक्रार स्विकृत करुन सामनेवाला यांना नोटीसीचा आदेश झाला. सामनेवाला यांनी म्हणणे दाखल केले. सुनावणीचेवेळेस, तक्रारदारांनी स्वत: व सामनेवाला यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला. (2) तक्रारदाराची थोडक्यात तक्रार अशी, तक्रारदार हे सामनेवाला बँकेचे क्रेडिट कार्डधारक जुलै 2007 पासून आहेत. त्यांचा क्रेडिट कार्ड नं.4711630001305043 असा आहे. सामनेवाला बँकेचे क्रेडिट कार्ड स्टेटमेंट वेळोवेळी मिळत नसल्याने सदर क्रेडिट कार्ड बंद करुन फुल अण्ड फायनल स्टेटमेंट करणेस सामनेवाला यांना सांगितले असता त्यांना त्यासंबंधी माहिती बँकेने दिलेली नाही. मार्च 2009 मध्ये तक्रारदारांनी एच्.डी.एफ्.सी.बँकेमध्ये कर्ज मागणी अर्ज केला होता. सदर बँकेने तक्रारदारांना कर्ज नाकारले होते, याबाबत तक्रारदारांनी चौकशी केली असता सामनेवाला बँकेचे क्रेडिट कार्ड पेमेंट रुपये 15,848.32 पैसे थकित असलेचे सीबीलमध्ये दिसत आहे. तक्रारदार पुढे सांगतात, त्यांनी सदर कार्डवरती फक्त रुपये 10,000/- खर्च केलेला आहे. त्यावेळेस सामनेवाला बँकेच्या क्रेडिट कार्ड डिव्हीजनला संपर्क साधून विचारणा केली असता त्यावेळेस जेवढा वापर केला, तेवढेच फायनल सेटलमेंट दिले व सीबिलमधून नांव व थकबाकीची नोंद काढणेत येईल असे सांगितले. (3) तक्रारदार त्यांच्या तक्रारीत पुढे सांगतात, तक्रारदारांनी एप्रिल 2009 मध्ये सिटी फायनान्समध्ये कर्जासाठी अर्ज केल्यानंतर त्यांना सदरचे कर्ज नाकारणेत आले. त्यावेळेस सीबिलमध्ये युटीआय बँकेचे क्रेडिट कार्ड थकबाकीत असलेचे कारणावरुन कर्ज नाकारणेत आले. त्यावेळेसही सामनेवाला बँकेच्या क्रेडिट कार्ड डिव्हीजनशी संपर्क साधला असता info@cibil.comया सीबीलच्या ई-मेलवर फुल अण्ड फायनल सेटलमेंट पाठविले. परंतु, सदरची माहिती सामनेवाला बँकेच्या डिव्हीजनकडून माहिती पाठवावी लागते असे तक्रारदारांना सीबीलच्या वेबसाईटवरुन मिळाली. त्यानंतर सामनेवाला यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी प्रत्येक तिमाहीमध्ये सीबीलमध्ये पाठविली जाते व त्यानंतर सीबीलच्या माहितीमध्ये बदल होईल असे त्यांना सांगणेत आले. (4) तक्रारदार पुढे सांगतात, त्यांनी सप्टेंबर 2009 मध्ये टाटा फायनान्समध्ये कर्ज मागणी केली. त्यावेळेसही युटीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमध्ये थकबाकी आहे या कारणावरुन कर्ज प्रकरण नाकारणेत आले. याबाबतची माहिती सामनेवाला बँकेच्या क्रेडिट कार्ड डिव्हीजनशी संपर्क साधला असता त्यांनी माहिती दिली नाही. तक्रारदारांना पैशाची गरज होती. त्यामुळे जादा दराने बाहेरुन कर्ज घ्यावे लागले. सामनेवाला बँकेने सीबीलमध्ये थकबाकीची माहिती न पाठविलेने त्यांना जादा व्याज द्यावे लागले. तसेच, नविन कर्ज घेणेसाठी ते निगेटिव्ह कस्टमर झालेले आहे. सबब, रक्कम रुपये 1,00,000/- देणेचा आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (5) तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीसोबत क्रेडिट कार्ड, सेटलमेंट स्टेटमेंट, एचडीएफसी कर्ज पत्र, सिटी फायनान्सियल पत्र, सीबीलला पाठविलेला ईमेल, सीबीलकडून आलेला ईमेल इत्यादीच्या प्रती व शपथपत्र दाखल केले आहे. (6) सामनेवाला बँकेने त्यांच्या म्हणण्यान्वये तक्रारदारांची तक्रार नाकारली आहे. ते त्यांच्या म्हणण्यात पुढे सांगतात, प्रस्तुतचा वाद हा ग्राहक वाद होत नाही. तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदार हे सामनेवाला बँकेचे क्रेडिट कार्डधारक आहेत. तक्रारदारांनी क्रेडिट कार्डच्या सुविधेचा वापर केलेला आहे, पंरतु त्या अनुषंगाने असणारी थकबाकी त्यांनी वेळेत भरलेली नाही. ऑक्टोबर 2007 पर्यन्तची थकबाकी तक्रारदारांनी भरणा केलेली नव्हती. याबाबत सामनेवाला बँकेने तक्रारदारांशी संपर्क साधला असता तक्रारदारांनी दि.25.03.2009 रोजी एकूण थकबाकी रुपये 15,848.32 पैसे पैकी रक्कम रुपये 10,000/- चा भरणा केला व विशेष बाब म्हणून अंतिम परिपुर्ती म्हणून सामनेवाला बँकेने सदर व्यवहारास मान्यता दिली. (7) सामनेवाला बँक पुढे सांगतात, तक्रारदारांनी त्यांच्या तक्रारीमध्ये त्यांना कर्ज नाकारणेच्या कारणांबाबत केलेला उल्लेख हा दिशाभूल करणार आहे. तसेच, सीबील हे स्वतंत्र ऑर्गनायझेशन आहे. त्यावरती सामनेवाला बँकेचे कोणतेही नियंत्रण नसते. तसेच, सामनेवाला बँकेने पिरीऑडिकल डाटा सीबीलकडे पाठविला आहे. सबब, तक्रारदारांची तक्रार खर्चासह फेटाळणेत यावी व कॉम्पेनसेटरी कॉस्ट रुपये 10,000/- देणेबाबत आदेश व्हावा अशी विनंती केली आहे. (8) सामनेवाला बँकने त्यांच्या म्हणण्यासोबत ऑक्टोबर 07 ते एप्रिल 09 पर्यन्तचा खातेउतारा दाखल केलेला आहे. (9) या मंचाने उपलब्ध कागदपत्रांचे अवलोकन केले आहे. तक्रारीत उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदार हे सामनेवाला बँकेचे क्रेडिट कार्ड धारक आहेत. ही वस्तुस्थिती निर्विवाद आहे. क्रेडिट कार्डच्या अनुषंगाने मिळणा-या सेवा या ग्राहक संरक्षण कायदा, 1986 कलम 2(1)(ओ) यातील तरतुद विचारात घेतली असता सदरची सेवा ही ग्राहक वाद होत आहे या निष्कर्षाप्रत हे मंच येते. (10) प्रस्तुत प्रकरणी सामनेवाला बँकेने तक्रारदारांचे ऑक्टोबर 2007 ते एप्रिल 2009 या कालावधीतील तक्रारदारांच्या क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट दाखल केले आहे. सदर स्टेटमेंटचे अवलोकन केले असता सामनेवाला बँकेने त्यांच्या म्हणण्यात उल्लेख केलेप्रमाणे तक्रारदार हे 2007 मध्येच थकित राहिलेले आहेत, ही वस्तुस्थिती दिसून येते. एकूण थकबाकी रक्कम रुपये 15,848/- दर्शविली आहे व सदरची थकबाकी ही सन 2007 पासूनची आहे. सामनेवाला बँकेने तक्रारदारांना वेळोवेळी अकौंट स्टेटमेंट दिलेचे दिसून येते. मुलत: तक्रारदार हे प्रथम डिफॉल्टर झालेले आहे व त्यांनी डिफॉल्टची संपूर्ण रक्कम भरलेली नाही. सामनेवाला बँकेने एकूण थकबाकीपैकी संपूर्ण परिपुर्तीची रक्कम म्हणून रुपये 10,000/- चा भरणा करुन घेतलेला आहे. तसेच, वित्तीय कंपन्यांनी तक्रारदारांचे कर्ज नाकारलेबाबत तक्रारदार हे थकीत आहेत याबाबत स्पष्टपणे कारण दिसून येत नाही. सामनेवाला बँकेने अंतिम परिपुर्ती म्हणून रक्कम स्विकारुन तक्रारदारांना तसे अकौंट स्टेटमेंट दिलेले आहे. त्यामुळे तक्रारदारांनी तक्रारीत मागितलेली नुकसान मिळणेत तक्रारदार हे पात्र नाहीत या निष्कर्षाप्रत हे मंच येत आहे. सबब आदेश. आदेश 1. तक्रारदारांची तक्रार फेटाळणेत येते. 2. खर्चाबाबत आदेश नाहीत.
| [HONABLE MRS. Mrs.P.J.Karmarkar] MEMBER[HONABLE MR. Mr.M.D.Deshmukh] PRESIDENT[HONABLE MRS. Mrs.V.N.Shinde] MEMBER | |