नि का ल प त्र
श्री.डी.डी.मडके, अध्यक्षः तक्रारदार यांनी विरुध्द पक्ष उर्मदा विविध सेवा सह.सोसायटीत जमा असलेली रक्कम परत मिळावी म्हणून मागणी केली असता सोसायटीने रक्कम परत न करुन सेवेत त्रुटी केली आहे म्हणून तक्रारदार यांनी सदर तक्रार अर्ज मंचात दाखल केला आहे.
२. तक्रारदार यांची थोडक्यात अशी तक्रार आहे की, श्री.कंद-या विरजी पावरा हे सोसायटीचे भागधारक आहेत. त्यांनी सोसायटीकडून कर्ज रु.१२,३५९/- घेतले होते. त्याची त्यांनी दि.२७/१२/०७ रोजी परतफेड केलेली आहे. त्यांचे खाते क्र.२७ हे निल आले होते. त्यांनी दि.२९/१२/०७ रोजी रु.१२,०१५/- सोसायटीत जमा केले व त्यावर रु.३४४/- व्याज झालेले आहे. शिवाय शेअरर्सची रक्कम रु.४०००/- सोसायटीत जमा आहेत. सर्व मिळून सोसायटीकडे रु.१६,३५९/- जमा आहेत.
तक्रार क्र.१७२/१०
३. तक्रारदार यांचे पुढे असे म्हणणे आहे की, त्यांनी वेळोवेळी सोसायटीकडे जमा रक्कम मिळावी अशी मागणी केली होती. परंतू सोसायटीने रक्कम त्यांना देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांनी नोटीस देऊन दि.०७/१०/०९ रोजी रकमेची मागणी केली. परंतू त्याचे उत्तर सोसायटीने दिले नाही व रक्कमही दिली खर्च.
४. तक्रारदार यांनी शेवटी सोसायटीकडे जमा असलेली रक्कम रु.१६,३५९/- व त्यावर १८ टक्के दराने व्याज, नोटीसचा खर्च रु.१०००/-, मानसिक त्रासापोटी रु.८०,०००/- व तक्रार अर्जाच्या खर्चापोटी रु.२६४०/- मिळावेत अशी विनंती केली आहे.
५. तक्रारदार यांनी आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.३ वर शपथपत्र तसेच नि.५ वरील कागदपत्रांच्या यादीनुसार ४ कागदपत्रे दाखल केली आहेत. त्यात नि.५/१ वर पासबुकची प्रत, नि.५/२ वर पावती, नि.५/३ वर नोटीसची प्रत, नि.५/४ वर नोटीस पाठवल्याची नोंद दाखल केली आहे.
६. विरुध्द पक्ष क्र.१ सोसायटीने आपले लेखी म्हणणे नि.९ व नि.१० वर दाखल करुन तक्रारदार यांनी सोसायटीकडून दि.३०/०६/०७ रोजी पिक कर्ज रु.१२,०००/- व विमा रु.१५/- असे रु.१२,०१५/- घेतले होते. त्यापोटी दि.२७/१२/०७ रोजी रक्कम रु.१२,०१५/- व व्याज रु.३४४/- असे रु.१२,३५९/- जमा केले आहेत. सदर रक्कम परत मागण्याचा काहीही संबंध नाही. तसेच शेअर्सची रक्कम रु.४०००/- बाबत सहायक निबंधक सहकारी संस्था यांच्या परवानगी शिवाय देता येत नाही. तक्रारदार यांनी सोसायटीकडे तसा अर्ज दिलेला नाही व प्रस्तुत खोटी तक्रार दाखल केली आहे.
७ विरुध्द पक्ष क्र.२ बॅंकेने आपले लेखी म्हणणे नि.१६ वर दाखल करुन तक्रारदार बॅंकेचे ग्राहक नाहीत. बॅंके विरुध्द अर्जात काहीही सेवा दिल्याबद्दल उल्लेख नाही. बॅंकेस विनाकारण पार्टी केले आहे. त्यामुळे तक्रार फेटाळण्यात यावी अशी विनंती केली आहे.
८. बॅंकेने पुढे असे म्हटले आहे की, तक्रारदार क्र.२ हा सोसायटीचा सभासद आहे. त्याने सोसायटीकडून घेतलेले कर्ज व व्याजाची परतफेडही केलेली आहे व त्यांचे खाते निल झालेले आहे. तक्रारदार यांनी शेअर्सच्या रकमेची मागणी केली आहे परंतू महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व त्याखालील नियमानुसार सहायक निबंधक सहकारी संस्था, शिरपूर यांच्या परवानगी शिवाय देता येत नाही. त्यासाठी तक्रारदार यांनी सोसायटीकडे अर्ज करणे आवश्यक आहे. परंतू तसा अर्ज तक्रारदार यांनी दिलेला नाही.
तक्रार क्र.१७२/१०
९ बॅंकेने शेवटी तक्रार रद्द करावी व विनाकारण पार्टी केल्यामुळे तक्रारदाराकडून नुकसान भरपाई रु.१०,०००/- मिळावी अशी विनंती केली आहे.
१०. बॅंकेने आपल्या म्हणण्याच्या पृष्ठयार्थ नि.१७ वर ठाणसिंग फुला पावरा मॅनेजर यांचे शपथपत्र दाखल केले आहे.
११. तक्रारदार यांनी लेखी युक्तीवाद नि.२१ वर दाखल केला आहे. विरुध्द पक्ष तर्फे अॅड.पाटील यांनी युक्तीवाद केला.
१२. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी दाखल केलेल्या कागदपत्रावरुन आमच्या समोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात व त्याची उत्तरे आम्ही सकारण खालील प्रमाणे देत आहोत.
मुद्दे उत्तर
१. विरुध्द पक्ष यांनी सेवेत त्रुटी केली आहे काय? नाही.
२. आदेश काय? अंतीम आदेशानुसार.
विवेचन
१३. मुद्दा क्र.१ – तक्रारदार यांची तक्रार आहे की, त्यांनी सोसायटीकडून कर्जघेतले होते त्याची परतफेड त्यांनी दि.२७/१२/०७ रोजी केलेली आहे व त्यांचे खाते निल झाले होते. त्यानंतर त्यांनी दि.२९/१२/०७ रोजी सोसायटीकडे रु.१२,०१५/- जमा केले त्याचे व्याज रु.३४४/- झाले आणि सोसायटीकडे जमा असलेली शेअर्सची रक्कम रु.४०००/- असे रु.१६,३५९/- येणे नाहीत. सदर रकमेची मागणी करुनही विरुध्द पक्ष यांनी रक्कम दिली नाही व सेवेत त्रुटी केली आहे.
१४. या संदर्भात सोसायटी व बॅंकेत तक्रारदार यांनी दि.३०/०६/०७ रोजी घेतलेले कर्ज रु.१२,०१५/- व व्याज रु.३४५/- दि.२७/१२/०७ रोजी सोसायटीत भरले व त्यांचे कर्ज खाते निल झालेले आहे. तक्रारदार यांचे सोसायटीचे खात्यामध्ये इतर रक्कम जमा नाही. तसेच मागणी केल्यानंतर सहायक निबंधकांच्या परवानगीने सदर रक्कम देता येते.
१५. तक्रारदार तर्फे अॅड.परदेशी यांनी दि.२९/१२/०७ रोजी सोसायटीत रु.१२,०१५/- इतकी रक्कम जमा केली आहे असे म्हटले आहे. आम्ही तक्रारदार यांचे पासबुक नि.५/१ चे अवलोकन केले आहे.
तक्रार क्र.१७२/१०
त्यावर दि.२७/१२/०७ रोजी रक्कम रु.१२,०१५/- व व्याज रु.३४४/- भरल्याचा उल्लेख आहे. त्यानंतर कुठलीही नोंद नाही. त्यामुळे दि.२९/१२/०७ रोजी तक्रारदाराने रक्कम कोणत्या खात्यात भरले त्याची पावती दाखल केलेली नाही. त्यामुळे तक्रारदार यांची सोसायटीत दि.२९/१२/०७ रोजी रक्कम भरली होती हे सिध्द होऊ शकत नाही.
१६. तक्रारदार यांची अशीही तक्रार आहे की, त्यांनी शेअर्सची रक्कम रु.४०००/- मिळावेत अशी मागणी केली होती. सोसायटीने त्याबाबत तक्रारदार यांनी सोसायटीकडे प्रथम अर्ज करणे आवश्यक आहे असे म्हटले आहे तसेच सदर अर्ज मिळाल्यानंतर त्याबाबत सोसायटीचे संचालक मंडळाच्या सभेत मंजूरी घेऊन महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम व त्याखालील तरतुदीनुसार सहायक निबंधक, शिरपूर यांच्या मान्यतेनंतर सदर रक्कम देण्याची तरतुद आहे असे म्हटले आहे.
१७. तक्रारदार तर्फे अॅड.परदेशी यांनी आपल्या युक्तीवादामध्ये तक्रारदार यांनी दि.०७/१०/०९ रोजी पाठवलेल्या नोटीसमध्ये खाते बंद करणेबाबत कळवले होते. तसेच नोटीस सोबत खातेबंदचा अर्ज पाठवला होता असे म्हटले आहे. तसेच नि.२० वर अर्ज दाखल केला आहे असे म्हटले आहे.
१८. आम्ही तक्रारदार यांनी पाठवलेल्या नि.५/३ वरिल नोटीसचे बारकाईने अवलोकन केले आहे. सदर नोटीसमध्ये खाते बंद करायचे आहे असा उल्लेख आहे. परंतू त्यावर सोबत वेगळा अर्ज जोडला आहे असा उल्लेख दिसून येत नाही. तसेच सदर नोटीसवर सोसायटीचे सभासद तक्रारदार क्र.२ ची सही नाही. सही फक्त सभासद नसलेल्या तक्रारदार क्र.१ ची आहे. तसेच तक्रारदार यांनी नि.२० वर दाखल सभासद कमी करुन शेअर्सची रक्कम परत मिळणेबाबत दाखल केलेल्या अर्जावर अर्जदार म्हणून इगन्या कंद-या पावरा याचा उल्लेख आहे व त्यावर त्याचा अंगठा आहे. वास्तविक इगन्या पावरा यांच्या नावावर शेअर्सची रक्कम जमा नाही. त्यामुळे शेअर्सची रक्कम परत मिळावी असा अर्ज केल्याबाबत कुठलाही पुरावा तक्रारदार यांनी दाखल केलेला नाही.
१९. यावरुन तक्रारदार यांनी सोसायटीकडे दि.२९/१२/०७ रोजी रक्कम भरलेबाबत किंवा तक्रारदार यांनी सोसायटीकडे सभासदत्व रद्द करुन शेअर्सची रक्कम मागणी केलेबाबत अर्ज केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे विरुध्द पक्ष यांनी तक्रारदार यांना दयावयाच्या सेवेत त्रुटी केली असे म्हणता येणार नाही. त्यामुळे आम्ही मुद्दा क्र.१ चे उत्तर नकारार्थी देत आहोत.
२०. मुद्दा क्र.२ – तक्रारदार यांनी शेअर्सच्या रकमेसंदर्भात सोसायटीकडे अर्ज केल्यानंतर सोसायटी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियमानुसार सहायक निबंधक सहकारी संस्था, शिरपूर यांची मान्यता
तक्रार क्र.१७२/१०
घेऊन रक्कम देण्यास तयार आहे असे विरुध्द पक्ष यांनी म्हटलेले आहे. त्यामुळे तक्रारदार यांनी सोसायटीकडे रितसर अर्ज करावा व सोसायटीने नियमानुसार त्यावर प्राधान्याने निर्णय घ्यावा.
२१. मुद्दा क्र.३ - वरील विवेचनावरुन आम्ही खालील प्रमाणे आदेश देत आहोत.
आ दे श
१. तक्रारदार यांचा तक्रार अर्ज रद्द करण्यात येतो.
२. तक्रारदार व विरुध्द पक्ष यांनी आपआपला खर्च सोसावा.
(सी.एम.येशीराव) (डी.डी.मडके)
सदस्य अध्यक्ष
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंच, धुळे