::: आ दे श :::
( पारीत दिनांक : 23/06/2016 )
आदरणीय सदस्य श्री कैलास वानखडे, यांचे अनुसार
1. ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे, कलम : 12 अन्वये, सादर करण्यात आलेल्या, सदर तक्रारीचा सारांश येणेप्रमाणे, . .
तक्रारकर्त्याने पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विरुध्दपक्षाकडून ऑनलाईन सेवेव्दारे दि. 29/4/2015 ला डॉ. एक्वागार्ड मॅग्ना एच.डी. आर.ओ + यु.व्ही. क्र. 1227004058002246 हे वाटर प्युरीफायर रु. 17,490/- ला विरुध्दपक्षाकडून विकत घेतले. सदर प्युरीफायर विरुध्दपक्षाच्या प्रतिनिधीने म्हणजे विरुध्दपक्ष क्र. 2 ने तक्रारकर्त्याच्या घरी लावून दिले. परंतु फक्त दोन दिवसातच म्हणजे दि. 1/5/2015 रोजी सदरहू वाटर प्युरीफायर पुर्णत: बंद पडले. तक्रारकर्त्याने अनेकवेळा, भ्रमणध्वनीद्वारे व ऑनलाईनद्वारे, विरुध्दपक्षाकडे सदर वॉटर प्युरीफायर दुरुस्त करुन देण्याबाबत विनंती केली, परंतु विरुध्दपक्षाने त्याची दखल घेतली नाही. तक्रारकर्त्याने दि. 30/5/2015 ते 21/8/2015 या कालावधीत एकुण 10 तक्रारी ऑनलाईन केल्या, त्याचा तपशिल तक्रारीमध्ये नमुद आहे. विरुध्दपक्षाने अत्यंत निकृष्ठ दर्जाचे प्युरीफायर तक्रारकर्त्याला दिले व वारंवार विनंत्या व तक्रारी करुन सुध्दा विरुध्दपक्षाने सेवा देण्यास हलगर्जीपणा व निष्काळजीपणा दर्शविला. तक्रारकर्त्याने दि. 24/8/2015 रोजी विरुध्दपक्षास वकीलामार्फत नोटीस पाठविली व नुकसान भरपाईची मागणी केली, परंतु विरुध्दपक्षाने कुठलीही सेवा तक्रारकर्त्याला पुरविली नाही. अशा प्रकारे विरुध्दपक्षाने सेवा देण्यास न्युनता दर्शविली व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब केलेला आहे. तक्रारकर्त्याने सदर तक्रार मंचासमक्ष दाखल करुन विनंती केली आहे की, विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला विकलेल्या वरील वॉटर प्युरीफायरची रक्कम रु. 17,490/- ही 18 टक्के व्याजासह तक्रारकर्त्याला परत करण्याचे आदेश विरुध्दपक्षाला देण्यात यावे. विरुध्दपक्ष यांनी तक्रारकर्त्याला मानसिक, शारीरिक व आर्थिक नुकसान भरपाईपोटी रु. 50,000/- द्यावे. तसेच न्यायिक खर्चापोटी रु. 10,000/- द्यावे.
सदर तक्रार शपथेवर दाखल असून त्यासोबत एकंदर 06 दस्तऐवज पुरावे म्हणून जोडण्यात आले आहेत.
विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांचा लेखीजवाब :-
2. विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी त्यांचा संयुक्त लेखी जबाब दाखल केला आहे. त्यानुसार त्यांनी तक्रारीतील आरोप नाकबुल करुन असे नमुद केले की, तक्रारकर्त्याची तक्रार आल्यानंतर विरुध्दपक्षाच्या सर्व्हीस सेंटर मधून टेक्नीशियन तक्रारकर्त्याच्या घरी गेले व सदर वॉटर प्युरीफायर चेक केल्यानंतर त्यामधील मेमब्रेन पार्ट खराब झाल्यामुळे वॉटर प्युरीफायर बंद झाल्याचे तक्रारकर्त्यास सांगितले. वारंटी मधील सर्व्हीस नियमाप्रमाणे सदर पार्ट हे वॉरंटी नियमात नसल्याने त्यासंबंधी नियमाप्रमाणे रक्कम देवून सदर पार्ट बसवावा लागेल, असे तक्रारकर्त्यास सांगण्यात आले असता, त्यास त्यांनी असमर्थता दर्शविली व टेक्निशियनला परत पाठविले. टेक्नीशियन यांनी तक्रारकर्त्यास सदरचे व्हीजीट बाबत सही मागीतली, परंतु तक्रारकर्त्याने कोणतीही सही दिली नाही. सदर वॉटर प्युरीफायरचे वर ओवरेट टँक बसविणे गरजेचे असते, जे तकारकर्त्याने बसविले नाही व त्याजागी प्रेशर येण्यासाठी कुलरपंप लावला, त्यामुळे प्रेशर कमी जास्त झाल्याने सदर पार्ट हा खराब झाला, ज्यापार्टची वॉरंटी विरुध्दपक्ष देत नाही. विरुध्दपक्षाने कोणत्याही प्रकारची अनुचित सेवा दिलेली नाही, त्यामुळे तक्रारकर्त्याची तक्रार खर्चासह खारीज करण्यात यावी.
3. त्यानंतर तक्रारकर्त्याने प्रतिउत्तर दाखल केले व विरुध्दपक्ष यांनी लेखी युक्तीवाद दाखल केला, तसेच तक्रारकर्त्यातर्फे तोंडी युक्तीवाद करण्यात आला.
::: का र णे व नि ष्क र्ष :::
4. सदर प्रकरणात तक्रारकर्त्याची तक्रार, सोबत दाखल केलले सर्व दस्तएवेज, विरुध्दपक्ष क्र. 1व 2 यांचा लेखी जबाब, तक्रारकर्त्याचे प्रतिउत्तर, तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचा लेखी व तोंडी युक्तीवाद यांचे काळजीपुर्वक अवलेाकन करुन खालील निष्कर्ष कारणे देवून नमुद केला तो येणे प्रमाणे.
तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाकडून ऑनलाईन पध्दतीने वॉटर प्युरीफायर दि. 22/4/2015 रोजी विकत घेतले. विरुध्दपक्षाने तक्रारकर्त्याला सदरहू वॉटर प्युरीफायर त्याच्या वितरण कार्यालय, अकोला येथून दिले, त्याचे टॅक्स इन्व्हाईस सोबत दाखल केले आहे, त्यामुळे तक्रारकर्ता हा विरुध्दपक्षाचा ग्राहक आहे, हे सिध्द होते.
तक्रारकर्त्याचे म्हणणे असे की, सदर प्रकरणात तक्रारकर्त्याने सदर ऑर्डर ऑन लाईन पध्दतीने दि. 22/4/2015 रोजी दिली, तिचा क्र. 164021172 आहे व इनवाईस नं. 1645100310 दि. 29/4/2015 आहे. सदर वॉटर प्युरीफायरची एकूण रक्कम रु. 17490/- आहे. विरुध्दपक्ष क्र. 2 यांनी वरील पत्यावर वाटर प्युरीफायर लावून दिल्यानंतर दोन दिवसांनी दि. 1/5/2015 रोजी ते पुर्णपणे बंद पडले. विरुध्दपक्षला अनेक वेळा विनंती केली. परंतु विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी कुठलाही प्रशिक्षित कारागीर पाठविला नाही. त्यामुळे विरुध्दपक्ष यांनी अनुचित व्यापार प्रथेचा लवलंब केलेला आहे. त्यामुळे वकीलामार्फत दि. 24/8/2015 रोजी कायदेशिर नोटीस विरुध्पक्षाला पाठवावी लागली व नोटीस मिळून सुध्दा कुठलीही सेवा व नोटीसची पुर्तता केलेली नाही. विरुध्दपक्षाने सेवा देण्यामध्ये जो हलगर्जीपणा केलेला आहे, त्यामुळे सदर तक्रार ग्राहक मंचामध्ये दाखल करावी लागली.
विरुध्दपक्षाचे म्हणणे असे की, विरुध्दपक्ष क्र. 1 ही एक नामांकित कंपनी असून उच्च दर्जाचे आणि गुणवत्तापुर्ण वॉटर प्युरीफायरची विक्री करते. तक्रारकर्त्याने दि. 30/5/2015 रोजी पहीली तक्रार केलेली आहे, म्हणजे वॉटर प्युरीफायर बंद पडल्यानंतर एक महिन्यानंतर तक्रार दिल्याचे दिसते. प्रत्येक जिल्हयामध्ये एक अधिकृत सर्व्हीस सेंटर असून ग्राहकाची तक्रार येताच अधिकृत सर्व्हीस सेंटर मधून टेक्नीशियन पाठविण्यात येतो. तक्रारकर्त्याची तक्रार आल्यानंतर टेक्नीशियन तक्रारकर्त्याच्या घरी गेले. सदर वॉटर प्युरीफायर चेक केल्यानंतर त्यामधील मेमब्रेन पार्ट ( एच डी आर ओ मेमब्रेन ) खराब झाल्यामुळे वॉटर प्युरीफायर बंद पडले, हे तक्रारकर्त्याला सांगितले व सदर पार्ट हा वॉरंटी नियमात येत नसल्याने नियमाप्रमाणे सदर पार्टची रक्कम देवून पार्ट बसवावा लागेल. परंतु तक्रारकर्त्याने असमर्थता दर्शविली व परत पाठविले. तक्रारकर्ता हा ग्रामिण भागात राहत असल्याने इलेक्ट्रीक लाईन व्होल्टेज हे नेहमी कमी जास्त होत असते. तसेच वॉटर प्युरीफायरचे वर ओवरेट टँक बसविणे गरजेचे असते, ते तक्रारकर्त्याने बसविले नसल्याने व त्याजागी प्रेशर येण्यासाठी कुलर पंपाचा वापर केला आहे. त्यामुळे सदर पार्ट हा खराब झालेला आहे.
अशा प्रकारे उभय पक्षांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर मंचाचे असे मत आहे की, विरुध्दपक्ष याने तोंडी युक्तीवाद करतांना असे सांगितले की, तक्रारकर्त्याने ओव्हरहेड टँकची उंची वाढवावी व वॉटर प्युरीफायर मधील मेमब्रेन ( एच डी आर ओ मेमब्रेन ) पार्ट खराब झाला आहे तो निशुल्क बदलून देण्यास तयार आहे. तक्रारकर्त्याने जर वॉटर प्युरीफायरची उंची वाढवली नाही तर नविन मेमब्रेन पार्ट परत खराब होईल. यावर तक्रारकर्त्याचे म्हणणे असे आहे की, तक्रारकर्त्याने ऑव्हरहेड टँकची उंची वाढवलेली आहे. यावर विरुध्दपक्ष यांचे म्हणणे की, तक्रारकर्ता यांनी ओव्हरहेड टॅन्क बसविलेला नाही. त्यामुळे योग्य प्रेशर येत नव्हते, तसेच तक्रारकर्त्याने प्रेशर येण्यासाठी कुलर पंप लावला आहे. त्यामुळे सदर पार्ट खराब झाला.
तक्रारकर्ता व विरुध्दपक्ष यांचा युक्तीवाद व दाखल पुरावा यांचे अवलोकन करुन मंचाने असा निष्कर्ष काढला आहे की, तक्रारकर्त्याने नियमानुसार ओव्हरहेड टँकची उंची वाढवावी व विरुध्दपक्षाने मेमब्रेन हा नविन पार्ट कोणतेही शुल्क न आकारता वॉटर प्युरीफायर मध्ये बसवून सदर मशिन सुरळीत चालु करुन द्यावी, या निष्कर्षाप्रत सदर मंच आले आहे. सबब अंतीम आदेश पारीत केला तो येणे प्रमाणे.
::: अं ति म आ दे श :::
- तक्रारकर्ते यांची तक्रार अंशत: मंजुर करण्यात येते.
- तक्रारकर्त्याने विरुध्दपक्षाच्या कंपनीचे वॉटर प्युरीफायर सुरळीत चालण्यासाठी विरुध्दपक्षाच्या नियमानुसार पाण्याची टाकी योग्य त्या उंचीवर बसवावी व त्यानंतर विरुध्दपक्षांनी तक्रारकर्त्याला नविन मेमब्रेन पार्ट निशुल्क बसवून देऊन त्याचा वॉटर प्युरीफायर दुरुस्त करुन द्यावा.
- विरुध्दपक्ष क्र. 1 व 2 यांनी वैयक्तीक व संयुक्तरित्या तक्रारकर्त्यास शारीरिक आर्थिक व मानसिक नुकसान भरपाईपोटी रु. 3000/- ( रुपये तिन हजार ) व प्रकरणाच्या खर्चापोटी रु. 2000/- ( रुपये दोन हजार ) द्यावे.
- सदर आदेशाचे पालन, निकालाची प्रत मिळाल्यापासून 45 दिवसांच्या आंत करावे.
5. सदर आदेशाच्या प्रती उभयपक्षांना निशुल्क देण्यात याव्या.