(मंचाचा निर्णय: श्री. मिलींद केदार - सदस्य यांचे आदेशांन्वये) -// आ दे श //- (पारित दिनांक : 14/02/2011) 1. प्रस्तुत तक्रार ही तक्रारकर्त्यानी ग्राहक संरक्षण कायदा 1986 च्या कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारां विरुध्द मंचात दिनांक 20.02.2010 रोजी दाखल केली असुन प्रस्तुत तक्रारीचे थोडक्यात स्वरुप खालिल प्रमाणे :- 2. तक्रारकर्त्याने नमुद केले आहे की, गैरअर्जदार हे अक्वागार्ड सिस्टिमचे उत्पादक व विक्रेते असुन पाणी शुध्दीकरणाचे उपकरण विकतात. तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांकडून दि.18.05.2009 रोजी अक्वागार्ड टोटल रिवायवा डब्ल्युपी सिस्टम उपकरण क्र.1223604096038036 हे रु.9,990/- ला खरेदी केले. तक्रारकर्त्याने पुढे नमुद केले आहे की, सदर उपकरण स्थापीत झाल्यानंतर 2 महिने व्यवस्थीत कार्य करीत होते व त्यानंतर अचानकपणे सदर उपकरणात बिघाड निर्माण झाला. त्याबाबतची तक्रार गैरअर्जदार कंपनीकडे नोंदविण्यांत आली, तक्रार नोंदविण्यांत आल्याचे 15 दिवसांनंतर गैरअर्जदाराने कारागीर पाठवुन उपकरणाची पाहणी केली, तेव्हा त्यावेळी फिल्टर खराब झाल्याचे निदर्शनास आले. गैरअर्जदाराने ते बदलवुन दिले व फिल्टर खराब होणार नाही याची हमी दिली. त्यानंतर सुध्दा वारंवार सदर उपकरणामध्ये दोष निर्माण झाले त्याची सुचना तक्रारकर्त्याने गैरअर्जदारांना केली तेव्हा गैरअर्जदारांनी रु.2,500/- ची मागणी केल्याचे तक्रारीत नमुद केले आहे. तक्रारकर्त्याने पुढे असे नमुद केले आहे की, गैरअर्जदाराने पुरवलेले उपकरण हे दोषयुक्त असुन ते वारंवार बिघडत आहे. याकरीता तक्रारकर्त्याने सदर तक्रारीव्दारा गैरअर्जदाराने उपकरणाची स्विकारलेली रक्कम रु.11,080/- 18% व्याजासह परत करावी व शारीरिक, मानसिक त्रासापोटी रु.5,000/- तसेच तक्रारीच्या खर्चापोटी रु.5,000/- ची मागणी केलेली आहे. 3. सदर तक्रारीची नोटीस गैरअर्जदाराला बजावण्यात आली असता गैरअर्जदाराने सदर तक्रारीला खालिल प्रमाणे उत्तर दाखल केलेले आहे... गैरअर्जदाराने आपल्या उत्तरात नमुद केले आहे की, तक्रारकर्त्याची तक्रार ही खोटी आहे, उपकरण वारंटी कालावधीत दोषपूर्ण होते व तक्रारकर्त्याला स्वच्छ, सुंदर पाणी देत आहे. तसेच सदर यंत्र हे उच्चकोटीचे असुन त्यामधे कोणताही दोष नसल्याचे नमुद केले आहे. 4. सदर तक्रार ही मंचासमक्ष मौखिक युक्तिवादाकरीता दि.03.02.2011 रोजी आली असता मंचाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद त्यांचे वकीला मार्फत ऐकला. तसेच तक्रारीत दाखल दस्तावेज व उभय पक्षांचे कथन यांचे अवलोकन केले असता मंच खालिल प्रमाणे निष्कर्षांप्रत पोहचले. -// नि ष्क र्ष //- 6. तक्रारकर्त्याने गैरअर्जदाराकडून अक्वागार्ड टोटल रिवायवा डब्ल्युपी सिस्टम उपकरण क्र.1223604096038036 हे रु.9,990/- ला खरेदी केले होते, ही बाब उभय पक्षांना मान्य आहे. तसेच तक्रारकर्त्याने दाखल केलेल्या दस्तावेज क्र.1 वरुन सुध्दा स्पष्ट होते, त्यामुळे तक्रारकर्ता हा गैरअर्जदारांचा ‘ग्राहक’ ठरतो असे मंचाचे मत आहे. 7. सदर प्रकरणी तक्रारीत नमुद उपकरण मंचासमक्ष आणण्यात आले व त्याचे प्रात्यक्षीक देण्यांत आले, परंतु सदर अहवालात असे नमुद केले आहे की, जरी पाणी येत होते तरी ते निजंतुक होते किंवा नाही याबाबत स्पष्ट पुरावा नाही, तसेच गैरअर्जदाराने ते सिध्द केलेले नाही. याउलट गैरअर्जदाराच्या प्रतिनिधीने प्रात्यक्षिकाचे दरम्यान ही बाब सांगितली की, 6000 लिटर पाणी किंवा 12 महिने पर्यंत सदर उपकरणातील फिल्टर काम करते, त्यानंतर ते निकामी होते. तक्रारीतील तथ्यावरुन हे सिध्द होते की, सदर उपकरणातील फिल्टर हे दोन महिन्यातच निकामी झाले होते व ते गैरअर्जदारांनी बदलवुन सुध्दा दिलेले नाही. म्हणजेच वारंटी कालावधीतच उपकरणामध्ये दोष निर्माण झाला होता व गैरअर्जदाराने जी आश्वासने दिली किंवा त्यांचे प्रतिनिधींनी जे सांगितले त्यानुसार उपकरण काम करीत नव्हते, म्हणून असा सरळ निष्कर्ष निघतो की, सदर उपकरणात उत्पादीत दोष आहे. त्यामुळे मंचाचे असे मत आहे की, गैरअर्जदारांनी तक्रारकर्त्यास तक्रारीत नमुद पाणी शुध्दीकरणाचे उपकरण बदलवुन द्यावे. जर ते शक्य नसल्यास उपकरणाची किंमत रु.9,990/- परत करावी. 8. तक्रारकर्त्याने शारीरिक व मानसिक त्रासाकरीता रु.5,000/- व तक्रारीच्या खर्चाकरीता रु.5,000/- मागणी केलेली आहे. सदर दोन्ही मागण्या अवास्तव वाटत असल्यामुळे न्यायोचितदृष्टया तक्रारकर्ता हा शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- मिळण्यांस पात्र ठरतो असे मंचाचे मत आहे. प्रस्तुत प्रकरणात दाखल दस्तावेजांचे तसेच युक्तिवादाचे अवलोकन केले असता आम्ही खालिल प्रमाणे आदेश पारित करीत आहे. -// अं ति म आ दे श //- 1. तक्रारकर्त्याची तक्रार अंशतः मंजूर करण्यांत येते. 2. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की त्यांनी तक्रारकर्त्यास तक्रारीत नमुद पाणी शुध्दीकरणाचे उपकरण बदलवुन द्यावे जर ते शक्य नसल्यास उपकरणाची किंमत रु.9,990/- परत करावी. 3. गैरअर्जदाराला आदेश देण्यांत येतो की, त्यांनी तक्रारकर्त्यास शारीरिक व मानसिक त्रासापोटी रु.2,000/- व तक्रारीच्या खर्चापोटी रु.1,000/- अदा करावे. 4. गैरअर्जदाराने वरील आदेशाची अंमलबजावणी आदेशाची प्रत प्राप्त झाल्याचे दिनांकापासुन 30 दिवसांचे आंत करावी. अन्यथा पुढील कालावधीसाठी आदेश क्र.2 मधील नमुद रकमेवर द.सा.द.शे.9% दराने रक्कम अदा होईपर्यंत व्याज देय राहील.
| [HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT | |