न्या य नि र्ण य
द्वारा – मा. सौ मनिषा सं. कुलकर्णी, सदस्या
1. तक्रारदाराने प्रस्तुत तक्रारअर्ज ग्राहक संरक्षण कायदा, 1986 चे कलम 11 व 12 प्रमाणे दाखल केला आहे. तक्रारदार यांनी वि.प. यांचे वीज वितरण कंपनीकडून घरगुती वापराकरिता वीज कनेक्शन घेतलेले असून ते वि.प. कंपनीचे नियमित ग्राहक आहेत. दि. 20/5/2012 पासून सदरचे वि.प. कंपनीचे मीटर फॉल्टी दाखवत आहे. तक्रारदार यांनी सन 2012 पासून वि.प. यांना वेळोवेळी तोंडी सुचना देवून सुध्दा वि.प. कंपनीने त्याची दखलही घेतलेली नाही किंवा कोणतीही कार्यवाही केलेली नाही. उलट अंदाजे 100 युनिट वीज वापराचे बिल तक्रारदार यांना देवून त्यांच्यासाठी रक्कम रु.459.36 इतकी रक्कम तक्रारदार यांचेकडून वीज वापराचा मोबदला म्हणून वीज बिल भरुन घेतले आहे व तक्रारदार यांनी ते वीज बिल वेळेत भरुन वि.प. विज वितरण कंपनीस सहकार्य केलेले आहे. मात्र एखाद्या महिन्यामध्ये बिल वाढले किंवा कमी आले तर त्यासंदर्भातील कोणतीही माहिती वि.प. वीज वितरण कंपनीने दिलेली नाही. तक्रारदार यांना तक्रारीस अनुसरुन दि. 10/2/2015 रोजी वि.प. वीज वितरण कंपनीकडे नवीन मीटर देण्यात आले व जुने मीटर टेस्टींग लॅबकडे पाठविण्यात आले. मीटर फॉल्टी नसलेबाबतचा रिपोर्टही वि.प. कंपनीने पाठविलेला आहे. मात्र वस्तुस्थिती पाहता मे 2012 ते मार्च 2015 ची वीज वितरण कंपनीने पाठविलेली सर्व बिले फॉल्टी स्वरुपात आली आहेत. तरीदेखील तक्रारदार यांनी ती बिले भरलेली आहेत. मात्र सन 2015 रोजी वि.प. कंपनीने तक्रारदार यांचे वीज कनेक्शन तात्पुरते बंद केले. याबाबतची कोणतीही पूर्वसूचना तक्रारदार यांना दिलेली नाही व तदंनतर दि 27/08/15 रोजी मीटर कायमस्वरुपी बंद केले व ते काढून नेले. असे असूनही कंपनीद्वारे तदनंतर थकीत बिल भरणेची नोटीस तक्रारदार यांना आलेली आहे. मात्र पत्रव्यवहार करुनसुध्दा त्याची दखल घेतलेली नाही व मीटरचे कोणतेही रिपोर्ट न तपासता वि.प. यांच्या कार्यालयातर्फे बिल बाबतचा वाद लोक न्यायालयात नेवून तक्रारदार यांनी बिल भरण्याच्या सूचना एकतर्फा केलेल्या आहेत. वि.प. कंपनीने सदरचे मीटर वेळेत बदलेलेले नाही व वि.प. यांचेकडून दिवाणी न्यायालय, वडगाव येथे लोकअदालत ता.12/11/2016 रोजी रक्कम रु. 60096.92 इतके बिल भरा असे चुकीचे सांगितले. ते तक्रारदार यांनी अमान्य केले आहे. सबब, तक्रारदार यांना सदरचा तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले.
2. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात पुढीलप्रमाणे—
तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडून घरगुती वापराकरिता वीज कनेक्शन घेतलेले असून ते वि.प. कंपनीचे नियमित ग्राहक आहेत. त्यासाठी त्यांना ग्राहक क्र. 250342105781 देण्यात आला आहे व मीटर नं. 9006484704 हा असून दि. 20/5/2012 पासून सदरचे मीटर फॉल्टी दाखवत आहे. तक्रारदार यांनी सन 2012 पासून वि.प. यांना वेळोवेळी तोंडी सूचना देवूनसुध्दा वि.प. यांनी त्याची दखल घेतलेली नाही किंवा कोणतीही कार्यवाही केलेली नाही. उलटपक्षी अंदाजे 100 युनिट वीज वापराचे बिल तक्रारदार यांना देवून त्याच्यासाठी रक्कम रु.459.36 इतके बिल तक्रारदार यांचेकडून वीज वापरचा मोबदला म्हणून वीज बील भरुन घेतलेले आहे व सदरची सर्व बिले तक्रारदार यांनी वेळेत भरलेली आहेत व वीज वितरण कंपनीस सहकार्य केलेले आहे. मात्र तक्रारदार यांनी दर वेळी 100 युनिटचे बील भरावे लागेल असे वि.प. कंपनीने सांगितले असता एखाद्या महिन्यामध्ये बिल वाढले किंवा कमी झाले तर त्याचे संबंधी कोणतीही माहिती कंपनीने दिलेली नाही व तदनंतर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात लेखी तक्रार दिलेनंतर तक्रारीस अनुसरुन दि 10/2/2015 रोजी वि.प. यांच्या वीज वितरण कंपनीतर्फे तक्रारदार यांना नवीन मिटर देण्यात आले. त्याचा क्र. 5804153618 आहे व जुने मीटर टेस्टींग साठी वि.प. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या. शाखा भादोले द्वारे मीटर टेस्टींग लॅबकडे पाठविण्यात आले. परंतु वि.प. उपविभागीय कार्यालय, वडगाव यांनी आपल्या लेखी पत्राद्वारे दि. 26/9/2016 रोजी तक्रारदार यांना मीटर फॉल्टी नसलेबाबतचा रिपोर्ट पाठविला. परंतु वस्तुस्थिती पाहता मे 2012 ते मार्च 2015 ची वीज वितरण कंपनीने पाठविलेली सर्व बिले फॉल्टी स्वरुपात आलेली आहेत व ही बिले तक्रारदार यांनी वेळेत भरलेली आहेत. दि. 10/8/2015 रोजी वि.प. यांनी तक्रारदार यांचे वीज कनेक्शन तात्पुरते बंद केले व कोणतीही पूर्वकल्पना न देता दि.27/8/2015 रोजी तक्रारदार यांचे वीज कनेक्शन कायमस्वरुपी बंद केले व मीटरही काढून नेले. मात्र असे असूनही तक्रारदार यांना वि.प. कंपनीद्वारे थकीत बिल भरणेकरिता नोटीस दिली व याचा तक्रारदार यांना मोठा मानसिक धक्का बसला. वि.प. यांचेशी संपर्क साधला असता त्यांचेकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. तदनंतर तक्रारदार यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे लेखी तक्रारही केली व त्या कार्यालयाकडूनही कोणत्याही स्वरुपाची कार्यवाही झालेली नाही. तदनंतर दि. 9/7/2016 रोजी वि.प. यांच्या कार्यालयातर्फे थकीत बिलाबाबतचा वाद लोक न्यायालयात ठेवला गेला. तक्रारदार हजरही झाले. मात्र कोणत्याही कागदपत्रांची पाहणी न करता व मीटरचे रिपोर्ट न तपासता एकतर्फा अदेश देवून बिल भरणेबाबत सूचना केल्या. तदनंतर दि. 26/9/2016 रोजी वि.प. यांचे कार्यालयाकडून जुने मीटर फॉल्टी नसलेबाबतचा रिपोर्ट पाठविण्यात आला. मात्र मीटर बदलले नाही. फॉल्टी बिले देतेवेळी 100 युनिटचा आकार धरुन बिले काढली व ती तक्रारदार यांना दिली. मात्र 10 युनिटपेक्षा कमी किंवा जास्त वापर होणे हे पाहणे गरजेचे असूनही ग्राहक जर जादा वीज बिल भरत असेल तर त्याची पाहणी होवून योग्य ती थकीत रक्कम समोर येणे गरजेचे आहे. वरील सर्व वस्तुस्थिती पाहता वि.प. यांच्या वीज वितरण कार्यालयाची चूक दिसून येते व रक्कम रु. 60,096.92 इतके भरा असे चुकीचे सांगितले. तक्रारदार यांनी ते अमान्य केले व याकरिता तक्रारदार यास तक्रारअर्ज दाखल करणे भाग पडले. दि. 27/8/2015 रोजी कायमस्वरुपी बंद केलेले वीज कनेक्शन पूर्ववत सुरु करुन द्यावे व नवीन सुस्थितीत मीटर बसविणेचा आदेश वि.प. यांना करणेत यावा. तक्रारदार यांनी वेळोवेळी 100 युनिटचे बिल भरले असतानाही त्यांचा वीजपुरवठा खंडीत केला. त्यामुळे झालेल्या मानसिक व शारिरिक त्रासाकरिता रक्कम रु.1 लाख व रक्कम रु. 50,000/- नुकसान भरपाई म्हणून देणेत यावी व अर्जाचा खर्च रु.5,000/- मिळावा अशी विनंती तक्रारदार यांनी केली आहे.
3. तक्रारदाराने तक्रारीसोबत शपथपत्र व कागदयादीसोबत तक्रारदारास आलेली वीज बिले व ते भरल्याच्या पावत्या, तक्रारदार यांनी वि.प. यांना दिलेले अर्ज व त्यांची पोहोच, वि.प. यांचा मीटर बदलणेबाबतचा अहवाल, तक्रारदारास लोकन्यायालयातर्फे आलेली नोटीस, तक्रारदार यांनी वि.प. यांना पाठविलेली नोटीस व नोटीसची पोचपावती, वि.प. यांचे नोटीस उत्तर व वटमुखत्यारपत्र इ. कागदपत्रे दाखल केली आहेत. तसेच तक्रारदाराने पुराव्याचे शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
4. वि.प.क्र.1 ते 3 यांना आयोगाची नोटीस लागू झालेनंतर त्यांनी हजर होवून या आयोगासमोर आपले म्हणणे दाखल केले. त्यांचे कथनानुसार, तक्रारदाराचा तक्रारअर्ज खर्चासह रद्द होणेस पात्र आहे कारण त्यातील कथने वि.प. यांना मान्य नाहीत. वीज मीटर व्यवस्थित आहे. त्यामध्ये कोणताही दोष नाही. तक्रारदार मीटर फॉल्टी आहे असे म्हणतात, ते चुकीचे व मतलबीपणाचे आहे. सबब, अर्ज नामंजूर होणेस पात्र आहे. तक्रारदार यांचे वीज कनेक्शनला बसविलेले मीटर हे फॉल्टी नाही. तक्रारदार यांना पाठविलेली वीज बिले ही त्याचे मीटर रिडींग उपलब्ध होवू न शकलेने दरमहा 100 युनिटची बिले पाठविलेली आहेत. परंतु 100 युनिट हेच वापराचे युनिट आहे असा तक्रारदार यांनी गैरसमज करुन घेतलेला दिसतो. याकरिता हा वाद निर्माण झालेला आहे. त्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही व नुकसान भरपाई अगर तक्रारदार यांची कोणतीही मागणी वि.प. वितरण कंपनीवर बसविता येणार नाही. वि.प. यांनी तक्रारदार यांना पाठविलेली वीज बिलेही हजर केलेली आहेत. ती वीज बिले पाहिली असता त्यामध्ये मे 2014 चे बिल पाहता त्या बिलावर मीटर रिडींगचा फोटो उपलब्ध आहे व त्या फोटोमध्ये 16973 इतके रिडींग दिसते. तक्रारदार यांनी हजर केलेले बिलांवर खालीलप्रमाणे रिडींग उपलब्ध आहे.
महिना चालू रिडींग (फॉल्टी) मागील रिडींग
मे 2014 16973 10437
जून 2014 18075 16973
जुलै 2014 18988 18075
ऑगस्ट 2014 19507 18988
सप्टेंबर 2014 20278 19507
ऑक्टोबर 2014 20872 20278
नोव्हेंबर 2014 21633 20872
डिसेंबर 2014 22201 21633
जानेवारी 2015 - 22201
फेब्रुवारी 2015 23316 23316
मार्च 2015 23517
23517 – 10437 = 13080
वरील प्रमाणे बिलांवरील फोटोमध्ये दिसणा-या रिडींगची बेरीज केली असता ती बेरीज 23517 इतकी दिसून येते व त्यामधून 2014 चे बिलावरील 10437 हे युनिट वजा केले असता 13080 युनिटप्रमाणे होणारे बिल हे रक्कम रु.1,68,080/- इतके आले. तथापि एप्रिल 2015 चे बिलामध्ये तक्रारदाराचे 13052 इतके युनिट मे 2012 ते मार्च 2015 या काळात विभागणी करुन त्यातून रक्कम रु.1,04,005/- इतकी रक्कम वजा करुन तक्रारदार यांना पुरवणी देयक रक्कम रु.60,080/- चे बिल दिलेले आहे व त्यांनी ते भरणे आवश्यक आहे. तथापि ते बिल न भरता तक्रारदाराने हा अर्ज केलेला आहे. सबब, या कारणास्तव तो नामंजूर होणेस पात्र आहे.
5. मीटर रिडींग घेणारे इसम मीटर घेण्यास चुकला किंवा त्याला योग्य रिडींग मिळाले नाही तर मीटरवर फॉल्टी असा शेरा येतो. याचा अर्थ त्या मीटरमध्ये काही दोष आहे असा होत नाही. तक्रारदार यांचा मीटरबाबत फॉल्टी शेरा आला असला तरी तक्रारदाराने वीज बिलावरील फोटोमध्य त्याची रिडींगची नोंद दिसते आहे हे पहाणे आवश्यक होते. परंतु हे न पाहता आपला मीटर फॉल्टी आहे व माझा दरमहिना 100 युनिटचा वापर आहे हे तक्रारदाराचे म्हणणे हास्यास्पद आहे. सबब, तक्रारदार यांचा अर्ज नामंजूर होणेस पात्र आहे. तक्रारदार यांनी मे 2014 पासून ते फेब्रुवारी 2015 अखेरची त्यांना पाठविलेली बिले हजर केली आहेत. परंतु त्यामध्ये त्यांना मार्च 2015 चे पाठविलेले बिल हजर केलेले नाही. कारण त्या बिलामध्ये त्यांचे युनिट किती झाले आहे व त्यातून किती कमी केले व वीज बिल भरावे लागतील या सर्वांचा उल्लेख त्या बिलामध्ये केलेला आहे व सदरचे बिल हजर केले असते तर तक्रारदाराची तक्रार त्याचक्षणी रद्द झाली असती म्हणून तक्रारदाराने सदरची माहिती कोर्टापासून लपवून ठेवलेली आहे.
6. दि.10/12/2016 रोजी सकाळी 11 वाजता कंपनीचे अधिका-यांनी तक्रारदाराचे वीज कनेक्शनचे ठिकाणी तपासणी केली असता त्यावेळी तक्रारदाराचे आर.सी.सी. तीन मजली इमारतीमध्ये चार वेगवेगळया नावांवर घरगुती वीज कनेक्शन असून ती सर्व ग्राऊंड फ्लोअरवर समोरचे खोलीमध्ये एका भिंतीवर चारीही कनेक्शनचे मीटर बसविलेले आहेत. यामध्ये कल्लाप्पा बापू देसाई, नाभिराज बापू देसाई, लालासाहेब बापू देसाई व लालासाहेब बापू देसाई अशी मीटर बसविलेली आहेत. त्यामध्ये तक्रारदार यांचा वीजवापर 2 टयूब्ज, 2 फॅन, 2 बल्ब, 1 टीव्ही, 1 गिझर व 1 शिलाई मशीन असा आहे व तो दरमहा कमीत कमी 370 युनिटचा आहे. असे असूनही 100 युनिटप्रमाणे बिल झाले पाहिजे व ते बिल बरोबर आहे असा आग्रह तक्रारदार यांचा दिसतो. तसेच या तिनही ग्राहक नंबरचे वीज कनेक्शन घरगुती असून त्याचा वापर पॉवर प्लगमधून दुधाची डेअरी, शीतगृह इ. साठी करीत असून पंचनामाही कपंनीने केला आहे. आपले घरगुती मीटरमधून व्यापारी कारणासाठी वीज वापर होतो हे उघडकीला येवू नये म्हणून तक्रारदाराने अशा प्रकारचा अर्ज करुन वि.प. कंपनीवर दबाव ठाकणेचा प्रयत्न केलेला आहे. सबब, थकबाकी मुदतीत न भरता थकबाकी भरलेचे लांबविलेले असून कंपनीचे नुकसान केले असलेने तक्रारदार यांचे कडूनच वि.प. कंपनीला रक्कम रु.5,000/- इतकी कॉम्पेनसेटरी कॉस्ट बसविणेत यावी व अर्ज नामंजूर करण्यात यावा असे वि.प. यांनी कथन केले आहे.
7. वि.प.क्र. 4 यांना सदरचे तक्रारअर्जातून वगळणेचा अर्ज दिला आहे.
8. वि.प. यांनी या संदर्भात पुरावा शपथपत्र व लेखी युक्तिवाद दाखल केला आहे.
9. तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे तसेच वि.प. यांचे म्हणणे, पुरावा व युक्तिवाद यावरुन आयोगासमोर निष्कर्षासाठी खालील मुद्दे उपस्थित होतात.
अ.क्र. | मुद्दा | उत्तरे |
1 | तक्रारदार हा वि.प. यांचा ग्राहक होतो काय ? | होय. |
2 | वि.प. यांनी तक्रारदार यांना सेवा देणेत त्रुटी केली आहे काय ? | होय. |
3 | तक्रारदारांनी केलेल्या मागण्या मिळणेस तक्रारदार पात्र आहे काय ? | होय, अंशतः. |
4 | अंतिम आदेश काय ? | खालीलप्रमाणे |
विवेचन
मुद्दा क्र.1
10. तक्रारदार यांनी वि.प. वीज वितरण कंपनीकडे घरगुती वापराकरिता वीज कनेक्शन घेतलेले असून त्याचा ग्राहक क्र. 250342105781 व मीटर नं. 9006484704 असे आहे. सबब, तक्रारदार हे वि.प. यांचे ग्राहक आहेत याबाबत उभय पक्षांमध्ये वादाचा मुद्दा नाही. सबब, तक्रारदार व वि.प. यांचेमध्ये सेवा घेणार व देणार हे नाते निर्माण झाले आहे. याकरिता तक्रारदार हा ग्राहक संरक्षण कायद्यांतर्गत ग्राहक होतो या निष्कर्षाप्रत हे आयेाग येत आहे.
मुद्दा क्र.2 ते 4
11. तक्रारदार यांनी वि.प. कंपनीकडे अर्जात नमूद ग्राहक क्रमांक असणारे वीज कनेक्शन घेतलेले आहे व त्याचे मीटरचा नंबरही अर्जात नमूद आहे. मात्र तक्रारदार यांना सन 2012 पासून सन 2015 पर्यंत मीटर हे फॉल्टी दाखवत होते व त्यानुसार अंदाजे 100 युनिटचे बिल म्हणजेच रक्कम रु.459.36 इतकी रक्कम तक्रारदार यांचे कडून वि.प. वीज कंपनीकडून अंदाजे घेतली जात होती. मात्र एप्रिल 2015 चे बिलामध्ये तक्रारदाराचे 13052 इतके युनिट मे 2012 ते मार्च 2015 या काळात विभागणी करुन दाखविण्यात आले व त्याची रक्कम रु.1,04,005/- इतकी रक्कम वजा करुन तक्रारदार यांना पुरवणी देयक म्हणून रु.6,40,80/- इतके बिल दिलेले आहे व सदरचे बिल तक्रारदार यांना मान्य नसलेने तक्रारअर्ज दाखल केलेला आहे. याचा विचार करता या संदर्भात वि.प. कंपनीने आपल्या कागदयादीसोबत मीटरचे टेस्टींग रिपोर्ट तसेच वडगांव वीज वितरण कंपनी यांचेकडून आलेले पत्र तसेच काही बिलेही पाठवलेली आहेत. दि. 16/7/2016 रोजी वि.प. वीज वितरण कंपनीने उपविभागीय कार्यकारी अभियंता, वडगांव यांना तक्रारदार यांचे मीटर संदर्भात पत्र दिले आहे व योग्य ती कार्यवाही करणेचे आदेशही केलेले आहेत व तदनंतर तक्रारदार यांना दि. 21 जुलै 2016 रोजी मीटर टेस्टींग करणेबाबतच्या दि. 14/7/2016 च्या तक्रारदार यांच्या दिलेल्या अर्जाबाबतही पत्राने खुलासा केलेला आहे. यामध्ये नवीन मीटरचे रिडींग व त्या मीटरचा डिस्प्ले गेलेने सदरचे बिल हे फॉल्टी देणेत आलेले आहे व त्यामुळे विद्युत पुरवठा कायमस्वरुपी बंद करतेवेळी त्यांचे अतिम रिडींग दिसत नसलेमुळे फायनल रिडींग दिले नाही असेही स्पष्ट नमूद आहे व युनिट हे 13052 इतके आलेने मार्चचे बिल हे रक्कम रु.1,64,557/- इतके आलेले आहे व त्यासाठी जुना मीटर नंबर हा भादोले कार्यालय यांना मीटर तपासणीसाठी पाठविले आहे असे स्पष्ट नमूद आहे. यावरुन सदरचे मीटर हे फॉल्टी आहे यावर वि.प. वीज वितरण कंपनी सुध्दा ठाम आहे असे स्पष्ट दिसून येते. वि.प. यांनी यासंदर्भात शपथपत्रही दाखल केले आहे. मात्र या आयोगासमोर
Section 26 (2) The Indian Electricity At 1910
Where the consumer so enters into an agreement for the hire of a meter the licensee shall keep the meter correct and in default if his doing so, the consumer shall for so long as to cease to be liable to pay for hire of the meter.
याचा विचार करता सदरचे कलम 26(2) नुसार मीटर हे सुस्थितीत ठेवून त्याचे रिडींग योग्य त्या पध्दतीने घेण्याची सर्वस्वी जबाबदारी ही वि.प. वीज कंपनीवरच असते हे स्पष्ट होते. सबब, अशा वीज बिलामध्ये फॉल्टी हा शेरा वि.प. यांचे चुकीमुळे आलेची बाब ही वि.प. यांनी आपल्या तोंडी युक्तिवादामध्येही मान्य केली आहे. सबब, सन 2012 ते मार्च 2015 अखेरची सर्व वीज देयके हे वि.प. यांचे चुकीमुळेच आलेली आहेत व तक्रारदार ही सर्व बिले देणेस बंधनकारक नाहीत असे या आयोगाचे स्पष्ट मत आहे. तक्रारदार यांनी या कालावधी दरम्यानची बिलेही दिलेली आहेत मात्र वि.प. कंपनीने हिशोबाची पडताळणी करुन त्याकरिता (तक्रारदार यांनी 100 युनिटप्रमाणे बिले भरुन तदनंतर फरकाची दिलेली बिले) तक्रारदार यांना रक्कम रु. 64,080/- इतके बिल दिले आहे. या संदर्भातील हिशेबही वि.प. यांचे कथनानुसार निकालपत्राचे कलम 4 मध्ये नमूद केला आहे. वर नमूद इलेक्ट्रीसीटी अॅक्ट 1956 सेक्शन 56(2) नुसार तक्रारदारास मे 2012 मध्ये मीटर फॉल्टी दाखविलेपासून एप्रिल 2015 मध्ये म्हणजेच 2 वर्षानंतर सदरचे बिलाची फरकाची रक्कम वि.प. यांना दिलेने तक्रारदार हे वि.प. यांना देणे लागत नाहीत. तसेच इलेक्ट्रीसीटी अॅक्ट 1956 सेक्शन 56(2) नुसार
No sum due from any consumer under this section shall be recoverable after the period of 2 years from the date when such sum becomes first due याचाही विचार करता सदरचे बिल हे तक्रारदार यांना देणेस कोणताही परिस्थितीजन्य पुरावा वि.प. कंपनीने दाखल केलेला नाही.
12. तसेच तक्रारदार यांनी याबाबत पुराव्याचे शपथपत्र दाखल केलेले आहे. तसेच या शपथपत्राद्वारे तक्रारदार यांनी सदरची सर्व कथने केलेली आहेत. याचा ही विचार हे आयोग करीत आहे. सबब, तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मंजूर करणेचे निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे. वि.प. वीज वितरण कंपनीने आपल्या म्हणण्यामध्ये असेही कथन केले आहे की, तक्रारदार यांनी सदरचा वापर हा घरगती कनेक्शन असतानाही पॉवर प्लग मधून दुधाची डेअरी व शीतगृहासाठी केलेचे दिसून येते आहे व त्याचाही पंचनामाही वि.प. कंपनीने केला आहे. मात्र असा कोणताही पंचनामा याकामी दाखल नाही. सबब, पॉवर प्लगमधून दुधारी डेअरी अगर शीतगृह तक्रारदार चालवतात याचा कोणताही पुरावा या आयोगासमोर नसलेने सदरच वि.प. वीज कंपनीचे घेतलेला आक्षेप हे आयोग खेाडून टाकत आहे. अशा प्रकारे वि.प. वीज वितरण कंपनीने तक्रारदार यांना फॉल्टी बिलाची रक्कम देवून सेवा देणेमध्ये त्रुटी केलेली आहे या निष्कर्षाप्रत हे आयोग येत आहे व तक्रारदार यांचा तक्रारअर्ज मंजूर करीत आहे.
13. वि.प.क्र.4 यांनी दि. 17/2/2017 रोजी आपले नाव अर्जातून कमी करणेसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर तक्रारदार यांनी म्हणणेही दाखल केले आहे व आयोगाचे दि. 16/11/2017 चे आदेशाने सदरचा अर्ज अंतिम निकालाचे वेळी निर्णीत करणेत येईल असा आदेश करण्यात आला होता. सबब, अर्जातील वि.प.क्र.4 यांचे कामकाजाचा विचार करता सदरचे तक्रारअर्जाचे कामी त्यांचा काहीही संबंध येत नसलेचे आयोगाचे निदर्शनास येत असलेने सदरचा अर्ज वि.प.क्र.1 ते 3 यांचेविरुध्द मंजूर करणेत येतो व वि.प.क्र.4 यांना या तक्रारअर्जाचे कामी वगळणेत येते.
14. सबब, तक्रारदार यांचे दि. 27/8/2015 रोजी कायमस्वरुपी बंद केलेले वीज कनेक्शन जर पूर्ववत सुरु करुन दिले नसेल तर ते कनेक्शन तक्रारदार यांना वि.प.क्र.1 ते 3 यांनी पूर्ववत सुरु करुन द्यावे व नवीनही मीटर सुस्थितीत बसविले नसेल तर तेही सुस्थितीतील मीटर बसविणेचे आदेश वि.प. क्र.1 ते 3 यांना करण्यात येतात. तक्रारदार यांनी वेळोवेळी 100 युनिटपणे येणारी वीज बिले भरलेली आहे मात्र तरीसुध्दा त्यांचा वीज पुरवठा वि.प. कंपनीने खंडीत केलेला आहे. त्यामुळे निश्चितच त्यांना मानसिक त्रास तसेच नुकसान पोहोचले आहे यावर हे आयोग ठाम आहे. सबब, जरी तक्रारदार यांनी झालेले मानसिक त्रासापोटी रक्कम रु 1 लाख मागितले असले तरी या आयोगास ते संयुक्तिक वाटत नसलेमुळे मानसिक त्रासापोटी रु.10,000/- व नुकसान भरपाई म्हणून रु.10,000/- देणेचे आदेश वि.प. क्र.1 ते 3 यांना करण्यात येतात व तक्रारअर्जाचा खर्च रु.3,000/- देणेचे आदेशही करण्यात येतो.
सबब, हे आयोग खालील आदेश पारीत करीत आहे.
आदेश
1. तक्रारदाराचा तक्रारअर्ज अंशतः मंजूर करणेत येतो.
2. वि.प. क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांचे दि. 27/8/2015 रोजी कायमस्वरुपी बंद केलेले वीज कनेक्शन जर पूर्ववत सुरु करुन दिले नसेल तर ते कनेक्शन तक्रारदार यांना वि.प. यांनी पूर्ववत सुरु करुन द्यावे असा आदेश वि.प. यांना करणेत येतो. तसेच तक्रारदाराचे नवीन मीटर सुस्थितीत बसविले नसेल तर तेही सुस्थितीतील मीटर बसविणेचे आदेश वि.प. क्र.1 ते 3 यांना करण्यात येतात.
3. वि.प. क्र.1 ते 3 यांनी तक्रारदार यांना मानसिक त्रासापोटी रु.10,000/-, नुकसान भरपाईपोटी रु. 10,000/- व अर्जाचे खर्चापोटी रक्कम रु.3,000/- देणेचे आदेश करणेत येतात.
4. वर नमूद आदेशांची पूर्तता वि.प. क्र.1 ते 3 यांनी आदेशाचे तारखेपासून 45 दिवसांत करावी.
5. विहीत मुदतीत आदेशांची पूर्तता न केलेस ग्राहक संरक्षण कायदयातील तदतुदींअन्वये कारवाई करणेची मुभा तक्रारदाराला देणेत येते.
6. जर यापूर्वी वि.प. यांनी काही रक्कम तक्रारदार यांना अदा केली असेल तर त्याची वजावट करण्याची वि.प. यांना मुभा राहील.
7. सदर आदेशाच्या प्रती उभय पक्षकारांना विनाशुल्क पाठवाव्यात.