जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच, लातूर
ग्राहक तक्रार क्रमांक : 19/2013 दाखल तारीख :11/02/2013
निकाल तारीख :14/05/2015
कालावधी :02वर्षे 03 म.03 दिवस
अॅड. मुश्ताक पिता साहेबअली सौदागर,
वय 25 वर्षे, धंदा वकीली,
रा. न्यु गाझीपुरा लातूर. ...तक्रारदार.
-विरुध्द-
1) उपकार्यकारी अभियंता,
महावितरण उत्तर विभग जुने पॉवर हाऊस,
लाल गोडाऊन जवळ, लातूर.
2) कनिष्ठ अभियंता,
म.रा.वि.वि.कंपनी मर्या.
शाखा क्र. 1 जुने पॉवर हाऊस,
लाल गोडाऊन जवळ, लातूर. ..... गैरअर्जदार
कोरम : 1) श्रीमती ए.जी.सातपुते, अध्यक्षा.
2) श्री.अजय भोसरेकर, सदस्य
3) श्रीमती रेखा जाधव, सदस्या.
तक्रारदारातर्फे : अॅड.एस.एम.कोतवाल.
गै.अ.क्र.1 ते 2 तर्फे :अॅड.एस.आर.जानते.
::: निकालपत्र :::
(घोषित द्वारा:श्रीमती रेखा आर.जाधव, मा.सदस्या.)
तक्रारदाराने सदर तक्रार ग्राहक संरक्षण कायदा 1986 चे कलम 12 अंतर्गत गैरअर्जदारा विरुध्द दाखल केली आहे. तक्रारदाराची तक्रार थोडक्यात अशी की,
अर्जदाराने दि. 28.06.2012 रोजी गैरअर्जदाराकडे आवश्यक ती कागदपत्रे देवुन डिमांड रक्कम भरली आहे, त्याची पावती क्र. 2808759 आहे; अर्जदाराचा विदयुत पुरवठा दि. 09.02.2013 रोजी गैरअर्जदाराने खंडीत केला आहे. अर्जदाराने गैरअर्जदारास विदयुत पुरवठा पुर्ववत चालु करण्याची विनंती केली असता, गैरअर्जदाराने विदयुत पुरवठा चालु केला नाही.
अर्जदाराचा दि. 05.11.2012 रोजी राहत्या जागे बद्दल वाद उदभवल्यामुळे गैरअर्जदार क्र. 2 ने अर्जदारास 3 दिवसाच्या आत मालकी हक्का बद्दलचे कागदपत्रे सादर करण्यास सांगीतले. अर्जदाराने त्याचे उत्तर दि. 08.11.2012 रोजी दिले. अर्जदाराने बनावट नाहरकत प्रमाणपत्र दिल्याचे कळविले आहे. गैरअर्जदाराने नगरसेवक राजेंद्र इन्द्राळे यांच्या दबावाला बळी पडून अर्जदाराचा विदयुत पुरवठा खंडीत केला आहे. अर्जदाराने आज पर्यंतचे सर्व विज देयक वेळेत भरले आहेत, अर्जदाराचा विदयुत पुरवठा खंडीत केल्यामुळे तक्रार दाखल करण्यास कारण प्राप्त झाले. अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत अंतरीम अर्ज दिला आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जात अर्जदाराचा वीज पुरवठा वीज देयक थकीत झाल्याचा कारणाशिवाय इतर कोणत्याही कारणास्तव खंडीत करु नये तसेच मानसिक व शारिरीक त्रासापोटी रु. 50,000/- तक्रारीचे खर्चापोटी रु. 10000/- ची मागणी केली आहे.
अर्जदाराने तक्रारी अर्जासोबत शपथपत्र व एकुण 11 कागदपत्रे दाखल केली आहेत.
गैरअर्जदार क्र. 1 व 2 ने लेखी म्हणणे दिले आहे. अर्जदाराने खोटया बनावट कागदपत्रांच्या आधारे गैरअर्जदाराकडून विदयुत पुरवठा घेतला आहे. अर्जदार हा ग्राहक होत नाही, अर्जदाराची तक्रार खारीज करण्यात यावी. अर्जदाराने दि. 27.04.2012 रोजी नाहरकत प्रमाणपत्र महानगर पालिका, टॅक्स बिल, प्लॉट मालक श्री राजेंद्र इन्द्राळे यांचे लाईटसाठी संमतीप्रत सादर केल्यामुळे अर्जदारास विदयुत पुरवठा दिला होता. गैरअर्जदारास दि. 29.10.2012 रोजी प्लॉट मालक राजेंद्र इंद्राळे यांनी लेखी अर्ज देवुन त्याच्या मालकी जागेत अर्जदाराने खोटे कागदपत्रे देवुन सदरचे मिटर घेतले आहे, ते मीटर काढुन घ्यावे. गैरअर्जदाराने दि. 02.11.2012 रोजी राजेंद्र इंद्राळे यांच्या जागेची कागदपत्रे नाहरकत प्रमाणपत्र पत्राची वैधता तपासण्याचे पत्र दिले. अर्जदारास दि. 05.11.2012 रोजी नोटीस देवुन जागेची कागदपत्रे देण्यात यावी, अन्यथा विदयुत पुरवठा खंडीत करण्यात येईल, अर्जदाराने सदर नोटीसचे दि. 08.11.2012 रोजी खोटे उत्तर दिले. अर्जदारा विरुध्द शिवाजी नगर पोलिस स्टेशनला महानगरपालिकेने तक्रारदिली त्याची एक प्रत गैरअर्जदारास दिली. अर्जदार जागेचा मालक नाही. अर्जदाराचा विदयुत पुरवठा खंडीत करण्यात आला. गैरअर्जदाराचे कर्मचारी विदयुत पुरवठा खंडीत करण्यासाठी गेले असता, अर्जदार व त्याच्या घरातील व्यक्तीने धकमी दिली त्याची तक्रार गांधी चौक पोलिस स्टेशनला नोंद करण्यात आली आहे. अर्जदाराचा अर्ज दंडासह खारीज करण्यात यावा.
अर्जदाराने दाखल केलेली तक्रार, सोबतची कागदपत्रे, गैरअर्जदार यांनी दाखल केलेले लेखी म्हणणे व सोबतची कागदपत्रे यांचे वाचन केले असता, पुढील मुद्दे उपस्थित होतात.
मुद्दे उत्तर
- अर्जदार हा गैरअर्जदाराचा ग्राहक आहे काय ? होय.
- गैरअर्जदाराने अर्जदाराच्या सेवेत त्रूटी केली आहे काय ? नाही
- अर्जदार अनुतोष मिळण्यास पात्र आहे काय ? नाही
- काय आदेश ? अंतिम आदेशा प्रमाणे
मुद्दा क्र. 1 चे उत्तर होय असून, अर्जदाराने गैरअर्जदाराकडे डिमांड रक्कम भरुन विदयुत पुरवठा घेतला आहे. सदरचा मोबदला गैरअर्जदाराने स्विकारल्यामुळे अर्जदार हा ग्राहक या संज्ञेत येतो.
मुद्दा क्र. 2 चे उत्तर: अर्जदाराचा विदयुत ग्राहक क्र. 610551389891 असा असून, अर्जदाराचा सदरचा विदयुत पुरवठादि. 28.06.2012 पासुन दिल्याचे सदरील बिलावरुन दिसते. अर्जदाराने दि. 17.01.2013 रोजीचे विदयुत बिल भरल्याचे दाखल केलेल्या पावती क्र. 1446664 द्वारे भरले आहे.
गैरअर्जदाराने दिनांक 05.11.2012 व 24.11.2012 रोजी अर्जदारास विदयुत पुरवठा बंद करण्यासाठी नोटीस दिली आहे. त्याचे उत्तर अर्जदाराने दि. 08.11.2012 व 29.11.2012 रोजी दिले आहे. सदरच्या नोटीसीत गैरअर्जदाराने कागदपत्राची मागणी केली आहे. त्याप्रमाणे अर्जदाराने कागदपत्र दिली नाहीत ,अर्जदाराच्या नोटीसीच्या मुद्दा क्र. 6 मध्ये नमुद केले आहे की, विदयुत जोडणी घेत असतांना मी आपल्या कंपनीत पत्त्याचा पुरावा म्हणुन शिधा पत्रीका व ओळखीचा पुरावा पॅन कार्ड दिले आहे. याशिवाय राजेंद्र इंद्राळे यांचे नाहरकत प्रमाणपत्र यावरती मला विदयुत जोडणी दिली गेली होती,यावरुन असे दिसूनयेते की अर्जदाराने विदयुत पुरवठा घेते वेळेस राजेंद्र इंद्राळे यांचे नाहरकत प्रमाणपत्र दिले होते.
अर्जदाराने दि. 18.02.2012 रोजीचे 100/- रुपयाच्या बॉंडवरील ठराव पत्र दिले आहे, यावरुन सदर प्लॉट हा अर्जदाराने भिमराव हुरदुडे यांच्याकडून खरेदी केला असून, सदर करारनाम्यात प्लॉटचा मुळ मालक राजेंद्र इंद्राळे आहे. सदर प्लॉट कायदेशिररित्या हुरदुडे यांच्या नावावर नसतांना अर्जदाराने प्लॉटचा व्यवहार केलेला दिसत आहे. अर्जदार हा सदर प्लॉटचा मालक नाही, महाराष्ट्र विदयुत नियामक आयोगानुसार मुद्दा क्. 4.1 मधील तरतुदीनुसार विदयुत पुरवठा घेण्यासाठी जागेचा मालक असणे आवश्यक आहे किंवा जागा मालकाचे नाव, घरा संबंधीची कागदपत्रे असली पाहिजे अर्जदारास विदयुत पुरवठा घेण्यासाठी जागा मालक इंद्राळे यांची संमती नसल्याचे दि. 29.10.2012 रोजीच्या अर्जावरुन दिसते. गैरअर्जदारास दि. 29.10.2012 रोजी राजेंद्र इंद्राळे यांनी अर्ज देवुन अर्जदाराने ज्या जागेत विदयुत पुरवठा घेतला आहे ती जागा मुश्ताक अली सौदागर यांच्या मालकीची नसुन त्यानी खोटी कागदपत्रे तयार करुन विदयुत पुरवठा घेतला आहे. सदरचा विदयुत पुरवठा बंद करण्यात यावा, असे सदर अर्जात नमुद केले आहे. यावरुन असे दिसते की, जागा मालक राजेंद्र इंद्राळे यांच्या सदर जागेत विदयुत पुरवठा देण्यास हरकत घेतली असल्यामुळे गैरअर्जदाराने जाणीव पुर्वक विनाकारण अर्जदाराचा विदयुत पुरवठा खंडीत केला नाही, गैरअर्जदाराने सेवेत त्रूटी केली नाही, ही बाब अर्जदाराने ग्राहक संरक्षण कायदयानुसार सिध्द केली नाही, म्हणुन मुद्दा क्र. 2 चे उत्तर नाही असे आहे.
मुद्दा क्र. 3 : गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, दि. 12.02.2013 रोजी अंतरीम आदेशान्वये तात्पुरता विदयुत पुरवठा चालु करण्याचा आदेश दिला होता, अर्जदाराची तक्रार रद्द झाल्यामुळे अर्जदाराचा विज पुरवठा वीज कायदयाच्या नियमानुसार आदेश प्राप्ती नंतर त्वरीत बंद करावा.
सबब न्यायमंच खालील प्रमाणे आदेश पारित करीत आहे.
आदेश
- अर्जदाराची तक्रार रद्द करण्यात येते.
- गैरअर्जदार यांना आदेश देण्यात येतो की, आदेश प्राप्ती पासुन त्वरीत अर्जदाराचा वीज पुरवठा बंद करण्यात यावा.
- खर्चा बाबत आदेश नाही.
स्वा/- स्वा/- स्वा/-
(अजय भोसरेकर) (श्रीमती ए.जी.सातपुते) (श्रीमती रेखा जाधव)
सदस्य अध्यक्षा सदस्या
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच लातूर.